तर्कवादी विचारवंत कलबुर्गी यांची हत्या
धार्मिक कट्टरतावाद्यांचे आणखी एक भ्याड कृत्य
पावेल पराशर
३० ऑगस्ट २०१५ च्या पहाटे प्रसिद्ध कन्नड साहित्यिक, तर्कवादी विचारवंत, संशोधक आणि लेखक प्रा. एम.एम. कलबुर्गी यांची कट्टरपंथी हिंदुत्त्ववादी फासिवाद्यांनी हत्या केली. कर्नाटकसह देशभरात सामाजिक-लोकशाहीवादी संघटना, कार्यकर्ते, विद्यार्थी, शिक्षक, बुद्धिजीवी यांनी मोठ्या संख्येने हिंदुत्त्ववादी फासिवाद्यांच्या या भ्याड कृत्याच्या विरोधात आपला रोष प्रकट केला. बेगळुरु येथे प्रसिद्ध कलाकार गिरिश कर्नाड यांच्यासह साहित्य, कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील अनेक नावाजलेल्या व्यक्ती या घटनेच्या विरोधातील मोर्चामध्ये सहभागी झाल्या. धारवाड व हंपी विद्यापिठांच्या विद्यार्थ्यांयनी जबरदस्त निषेध करत खुन्यांना लवकरात लवकर पकडण्याची मागणी केली. मंगळुरूमध्येसुद्धा या हत्येमुळे सुन्न झालेल्या शिक्षक, विद्यार्थी व शैक्षणिक क्षेत्रातील लोकांनी कलबुर्गी यांना श्रद्धांजली वाहिली. दिल्लीतील जंतरमंतरवर या घटनेच्या विरोधात झालेल्या सभेत वेगवेगळ्या प्रागतिक, डाव्या व लोकशाहीवादी संघटनांनी भाग घेतला. या व्यतिरिक्त मुंबई, चेन्नई, हैद्राबाद, इलाहाबाद, लखनौ, गोरखपूर, पटना, वाराणसी, कोलकाताबरोबर ठिकठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ सभा, मोर्चे झाले.
साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित प्रा. कलबुर्गी हे धारवाडमधील कर्नाटक विद्यापिठाच्या कन्नड विभागाचे प्रमुख होते व नंतर त्यांनी हंपी येथील कन्नड विद्यापिठाचे कुलगुरूपदही भूषवले होते. एक प्रबुद्ध बुद्धिजीवी आणि तर्कवादी म्हणून कलबुर्गी यांचे जीवन म्हणजे धार्मिक कुरीतींच्या, अंधविश्वासांच्या, जातीप्रथेच्या, कर्मकांडांच्या व सडक्या जुन्या मान्यता आणि परंपरांच्या विरुद्ध संघर्षातील एक आदर्श होते. या दरम्यान कट्टरतावादी संघटनांकडून त्यांना सतत धमक्या आणि हल्ल्यांना तोंड द्यावे लागले, परंतु या धमक्यांना आणि हल्ल्यांना भीक न घालता कलबुर्गींनी आपले संशोधन आणि प्रचार-प्रसाराचे काम सुरूच ठेवले. प्रा. कलबुर्गी एक असे संशोधक आणि इतिहासकार होते ज्यांची इतिहासाचा अभ्यास, शोध आणि उद्देश्य यांच्याबद्दलची दृष्टी यथास्थितीवादाच्या विरोधात सतत संघर्ष करीत राहिली. त्याचबरोबर कलबुर्गी आपले संशोधन शैक्षणिक गल्ल्यांतून बाहेर नाटक, कथा, चर्चा, वादविवाद यांच्या माध्यमांतून व्यवहारात उतरवण्यासाठी नेहमीच तत्पर असायचे आणि म्हणूनच यथास्थितीवादाचे संरक्षक, धार्मिक कट्टरपंथियांना त्यांचे विचार सर्वाधिक अस्वस्थ करायचे. त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली. खुद्द कलबुर्गी यांच्या शब्दांमध्ये सांगायचे झाल्यास – ऐतिहासिक तथ्यांवर दोन प्रकारचे संशोधन होत असते. पहिला प्रकार सत्याचा शोध लावून थांबतो, दुसरा त्याच्या पुढे जाऊन वर्तमानाचा पथप्रदर्शक बनतो. पहिल्या प्रकारचे संशोधन फक्त शैक्षणिक पद्धतीचे असते, तर दुसऱ्यामध्ये वर्तमानाला मार्गदर्शन केले जाते. वर्तमानातील प्रश्नांवर इतिहासाकडून मिळणाऱ्या शिकवणीचा प्रकाश टाकणाऱ्या दुसऱ्या प्रकारच्या संशोधनावर आपण जोर द्यावा, ही काळाची गरज आहे.
प्रा. कलबुर्गी यांनी प्राचीन कन्नड श्लोकांच्या, पुरालेखांच्या व शिलालेखांच्या अनुवादात आणि विवेचनाध्ये अद्वितीय योगदान दिले. अकराव्या आणि बाराव्या शतकात विकसित वाचन साहित्याचे त्यांनी सखोल अध्ययन केले आणि अनेक शोधपत्रांमधून तत्कालिन पश्चिमी चालुक्य साम्राज्याच्या काळातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीची व्याख्या केली. त्या काळातील प्रसिद्ध तर्कवादी संत बसव यांच्या श्लोकांना त्यांनी आपल्या संशोधनाचा आधार बनवले. त्यांच्याच आधारे खोदकामात सापडलेल्या शिलालेखांचा आधुनिक कन्नडमध्ये अनुवाद केला आणि २२ इतर भाषांमध्येसुद्धा त्यांचा अनुवाद करून घेतला. कलबुर्गी यांनी एकूण १०३ पुस्तके लिहिली आणि ४०० हून अधिक प्रबंध सादर केले. कलबुर्गी त्यांच्या मार्ग पुस्तक मालिकेसाठी विशेष ओळखले जातात, व मार्ग ४ साठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १२ व्या शतकातील तर्कवादी संत बसवेश्वर यांनी कलबुर्गी यांच्या संशोधनावर आपला प्रभाव पाडलाच, त्याचबरोबर त्यांनी लिहिलेल्या कित्येक नाटकांच्या केंद्रस्थानीसुद्धा बसवेश्वरच होते. या नाटकांच्या माध्यमातून कलबुर्गी यांनी मूर्तिपूजा, जातियवाद, काल्पनिक ईश्वराची अवधारणा, जुन्या सडलेल्या परंपरा, धर्म आणि त्याचे पाखंडी एजंट यांच्यावर कठोर प्रहार केले व महिलांवरील, दलितांवरील अत्याचार व सांप्रदायिकतेच्या विरोधात एक दीर्घ मालिका निर्माण केली.
लिंगायत समुदाय व शैव पंथाचे संस्थापक संत चेन्नाबसव यांचा जन्म वास्तविक बसव यांची बहिण नागलंबिका आणि एक दलित कवी दोहारा कक्कया यांच्या विवाहातून झाल्याचे त्यांनी मार्ग मालिकेतील पहिल्या पुस्तकात मांडल्यापासून त्यांना हिंदुत्त्ववादी संघटना आणि प्रामुख्याने आक्रमक लिंगायत समाजाच्या रोषाचे लक्ष्य व्हावे लागले. हा निष्कर्ष लिंगायत समाजाला आपल्या उच्च जातीय रक्ताच्या बदनामीचे कारस्थान वाटले. लिंगायत जात ही कर्नाटकातील मोठ्या शेतकऱ्यांची व जमिनदारांची जात आहे, हे लक्षात घ्यायला हवे. त्याचबरोबर धार्मिक कट्टरतावाद्यांनी बहिष्कार घातलेले व धार्मिक कर्मकांडांवर प्रहार करणारे यू. आर. अनंतमूर्ती यांचे पुस्तक नग्न पूजा कां चुकीची आहे ची प्रशंसा केल्यामुळे व आपल्या व्याख्यानांमधून व प्रबंधांमधून या पुस्तकात दिलेल्या तथ्यांचे संदर्भ दिल्यामुळे त्यांना विश्व हिंदू परिषद, राम सेना आणि बजरंग दलसारख्या फासिवादी संघटनांच्या हल्ल्यांना तोंड द्यावे लागले.
एक संशोधक, शिक्षणतज्ञ, एक तर्कवादी साहित्यिक आणि बुद्धिजीवी म्हणून त्यांचा जीवनसंघर्ष आणि फासिवाद्यांनी केलेली त्यांची हत्या, फासिवाद्यांना सगळ्यात जास्त कशाचे भय वाटते, याचीच साक्ष देतात. ते तर्काला घाबरतात, विज्ञानाला घाबरतात, संशोधनाला घाबरतात, सत्याच्या शोधाला घाबरतात आणि ज्ञानाला घाबरतात. कलबुर्गींची हत्या म्हणजे तर्कवाद्यांच्या हत्यांच्या साखळीतील आणखी एक हत्या होय. या अगोदर महाराष्ट्रात नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या अशाच हत्या झालेल्या आहेत. फासिवाद्यांनी सत्तेत आल्यानंतर बिनधोकपणे हत्यांची मालिका सुरू केलेली आहे. कलबुर्गी यांची ज्या दिवशी हत्या झाली त्याच दिवशी बजरंग दलाच्या मेंगळुरू विभागाचे संयोजक भुवित शेट्टी यांनी उघडपणे ट्विटरवर या हत्येचे स्वागत केले व त्याचबरोबर तर्कवादी साहित्यिक एस भगवान यांनासुद्धा जिवे मारण्याची धमकी दिली, यावरून फासिवाद्यांचा सध्याचा बेडरपणा दिसून येतो. स्वतःला संसदेत आणि विधानसभेत भगव्या टोळीच विरोधक म्हणवणाऱ्या काँग्रेसने हिंदुत्त्वाची नवीन प्रयोगशाळा बनलेल्या कर्नाटकबद्दल फक्त सौम्य भूमिका घेतली आहे असे नाही तर त्यांना संरक्षणसुद्धा दिलेले आहे. आज जनतेची मुस्कटदाबी करण्याचे कारस्थान देशभरात सुरू असताना अभिव्यक्तीचे धोके पत्करणे आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यासाठी झुंजार संघर्ष उभारणे ही काळाची पहिली मागणी आहे.
कामगार बिगुल, सप्टेंबर २०१५