पैशाच्या परगण्यात अध्यात्माचा धिंगाणा!

अरविंद

मुख्य प्रवाहातील मिडियाने, म्हणजेच लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाने आणखी एका गॉडमॅनचे (खरे तर एका गॉडवुमनचे) सत्यस्वरूप देशातील जनतेसमोर उघडे केले आहे. यामागे या प्रसारमाध्यमांचा काही चांगुलपणा वगैरे आहे असे समजण्याचे कारण नाही, कारण आपल्या महान देशातील मिडिया याहून जास्त जोरकसपणे दूध पिणारी एखादी गणेशमूर्तीसुद्धा दाखवू शकतो. बातमीतील चटपटीतपणामुळे ही बातमी आणखी काही काळ चालली असती. पण तेवढ्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर पटेलांचा तारणहार बनून हार्दिक पटेल साहेबांचे पदार्पण झाले. हा तारणहार आपल्या भूमिकेत रंग भरतो न भरतो तोच शीना- इंद्राणी मिडियामध्ये झळकू लागली. न्यूज चॅनेलचे पत्रकार शिकारी कुत्र्यांसारखे वास काढत जंगलांमध्ये पसरताना दिसू लागले आणि वर्तमानपत्रेसुद्धा हे इंद्राणीजाल भेदण्याची खात्री देऊ लागली. अधूनमधून मोदी आणि त्यांचे परदेश दौरे, नेत्यांची एकमेकांवरची चिखलफेक आणि पाकिस्तानला शिव्याशाप यासारखे मिडियाचे नेहमीचे ताजे तडतडीत मुद्दे होतेच. असो. इतर गोष्टी बाजूला सारून सध्या राधे माँ प्रकरणापासूनच सुरू करू या.
nithya-radheआपल्या प्रिय भारत देशाला कृषिप्रधान म्हणण्याबरोबरच बाबाप्रधान देश म्हटले तर काही अतिशयोक्ती होणार नाही. असे म्हणण्याचे कारण अगदी उघड आहे. इथे आपल्याला डाल डाल पर चिडिया का बसेरा तर कुठे दिसणार नाही पण इथे तिथे सगळीगडे बुवा (आणि बायासुद्धा) निश्चितच दृष्टीस पडतील. यांच्या कपड्यांवरून आपण या सगळ्यांना एका तागडीत तोलण्याचा प्रयत्न कराल तर हमखास घोटाळा होईल. यांचे वेगवेगळे प्रकार आहे आणि हे वेगवेगळे प्रकार एकदुसऱ्यापासून पूर्णपणे भिन्नसुद्धा आहेत. सर्वांचे आपापल्या भक्तांचे वेगळे स्वतंत्र साम्राज्य आहे आणि हे साम्राज्या टिकवून ठेवण्याचे वेगवेगळे डावपेचही आहेत. आपल्याला बाबांच्या या घनदाट जंगलात कुठे बलात्कारी आसाराम बापू किंवा नारायण साई दिसतील, जे स्वतः तुरुंगात आहेत परंतु मुले त्यांच्या जीवनाचा सरकारी पाठ्यपुस्तकांमधून अभ्यास करीत असतात, आणि त्याचवेळी ते तुरुंगातून आपल्या विरोधातील साक्षीदारांवर हल्ले घडवून आणत असतात आणि त्यांच्या हत्या करतात. कुठे आपल्याला रामदास दासांचे दर्शन होईल ज्यांनी भामटेगिरीला एक नवी उंची मिळवून दिलेली आहे आणि ज्यांनी हरयाणा सरकारच्या विरोधात जणू युद्ध छेडले होते. यांचे महत्ता आजसुद्धा अबाधित आहे, आणि यांच्या खटल्याच्या दिवशी रोहतकच्या रस्त्यांवर यांच्या भक्तांच करुण क्रंदन आपल्याला पाहायला मिळेल. कुठे आपल्याला आशुतोष महाराज दिसतील ज्यांचे शिष्य काही दिवसांपूर्वी आपल्या गुरुचा मृतदेह या अपेक्षेने कवटाळून बसले होते की ते आपल्या समाधीतून बाहेर येतील, परंतु खेदाची बाब म्हणजे गुरुजी समाधीतून थेट मोक्षाला गेले आणि भक्तांच्या वाट्याला फक्त निराशाच आली. आपल्याला या पवित्र भूमीत श्रीश्री रविशंकर यांच्यासारखे उच्चवर्गीय बाबासुद्धा दिसतील ज्यांनी खाऊन पिऊन सुखी लोकांना जगण्याची कला शिकवतानाच एक जोड कार्यक्रम म्हणून देशातील भोळ्याभाबड्या गरीब जनतेला पैसा कमावण्याची कला शिकवण्याचाही पुरेपूर प्रयत्न करीत असतात. आपल्याला गुरमीत राम रहीम यांचेही दर्शन होईल, ज्यांच्यावर बलात्कार, साक्षीदारांच्या हत्या, ३०० चेल्यांना नपुंसक बनवण्याचे आरोप आहेत, मात्र हे महाशय अजूनही मॅसेंजर ऑफ गॉड बनलेले आहे. नेहमी नाक पकडून पोट आतबाहेर करताना दिसणाऱ्या बाबा रामदेव यांच्याबद्दल तर काय बालावे! पातंजली ऋषींनी कधी स्वप्नातसुद्धा विचार केला नसणार की त्यांचा एखादा शिष्य कधी योगविद्येचे रूपांतर कामधेनूत करून असे अमाप दूध काढू लागेल. विदेशातील काळ्या पैशावर आकाशपाताळ एक करणाऱ्या बाबा रामदेवांनी मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर जणू मौनव्रतच धारण केले आहे.
कुठे निर्मल बाबा तर कुठे कृपालू महाराज, कुठे मुरारी बापू तर कुठे भीमानंद, कुठे सारथी बाबा तर कुठे प्रेमानंद, कुठे बिंदू बाबा तर कुठे नित्यानंद. ज्यांनी आपले विशाल साम्राज्य स्थापन केले आहे, आणि जे ऐश्वर्यात मनसोक्त लोळत आहेत, असे आपल्याला इतके बाबा सापडतील की त्यांच्या नावांनी कित्येक पाने वाया घालवली जाऊ शकतात. जर काही कमतरता होती तर ती राधे माँची. स्वतःला दुर्गेचा अवतार म्हणवणाऱ्या या महाशया हिंदी फिल्मी गाण्यांवर पाश्चात्य कपडे परिधान करून अश्लील नृत्य करत आपल्या खऱ्या रूपातसुद्धा भक्तांना दर्शन देतच असतात. वेगवेगळे आरोप आणि लहानसहान खटल्यांनंतर सध्या यांचे ग्रह काहीसे फिरले आहेत. परंतु यांच्या भक्तांच्या मनातील श्रद्धा मात्र अढळ आहे. जशी प्रत्येक प्रदेशाचे आपले एक वैशिष्ट्य असते तसेच भारत खंडाचेही आपले एक वैशिष्ट्य आहे. येथे श्रद्धावानम् लभते ज्ञानम् आणि गुरु बिन ज्ञान नहीसारख्या ओळींना भरपूर आदर दिला जातो. एकीकडे तर श्रीमंत आणि गरीबांसाठी वेगवेगळे बाबा असतात तर दुसरीकडे यांची कमतरता भरून काढण्यासाठी आलीशान मंदिर, डेरे, आश्रम आणि कुंभ मेळ्यांचे आयोजन आणि शाही स्नान आहे. एवढे सारे पुण्यात्मा आणि ईश्वराचे एजंट असूनदेखील आपल्याकडे इतकी गरीबी, बेरोजगारी, अज्ञान, कुपोषण आणि दुर्दशा कां म्हणून आहे, हा खरा प्रश्न आहे. जगभरात ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात विलक्षण प्रगीत झालेली असूनदेखील आपल्याकडे लोक पवित्र स्नान, रूढीवादी मूल्ये, अंधश्रद्धा यांतून बाहेर कां पडू शकलेले नाहीत? सुशिक्षित समुदायसुद्धा अतार्किकता आणि कूपमंडुकतेत गटांगळ्या कां खातो आहे?
भांडवली व्यवस्थेने, पैशाच्या ताकदीने आज धर्माचे पूर्णपणे भांडवलीकरण केले आहे. धर्मात पैशाचा मुक्त संचार होतो आहे. आपल्या अडचणींची, समस्यांची खरी कारणे जनतेला कळू नयेत, गरीबी- उपासमार- बेरोजगारी यांच्यासाठी जनतेने व्यवस्थेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नये यासाठी त्यांच्यावर दैववादाचे जोखड लादले जाते. तमाम पाखंडी धार्मिक बाबा, पंडे-पुजारी, मुल्ले मौलवी जनतेच्या जाणीवा धूसर करण्याचेच काम करतात. भांडवली व्यवस्था जनतेवर आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी धर्माचा सहाय्यक म्हणून वापर करते. वेगवेगळ्या प्रकारचे बुवा स्वतः चैनीत जगतात आणि जनतेला त्याग, आत्मोन्नती आणि पारलौकिक जीवनाचे धडे देतात. वर्गजाणीवेच्या अभावामुळे व्यापक कष्टकरी जनता सध्याच्या व्यवस्थेतील गुंतागुंत समजू शकत नाही. समस्यांच्या खऱ्या कारणांचा शोध घेऊन त्यांची सोडवणूक करण्याऐवजी आपल्या भौतिक गरजांच्या पूर्ततेसाठी धार्मिक कर्मकांडांच्या जाळ्यात अडकण्याचा, दैवासमोर नतमस्तक होण्याचा आधार ही व्यवस्थाच पुरवते. असुरक्षितता आणि भीती एका काल्पनिक शक्तीमध्ये श्रद्धा निर्माण होण्यास कारणीभूत ठरते आणि जेव्हा असुरक्षितता आणि भीतीच्या खऱ्या कारणांचा शोध घेऊन त्यांना दूर केले जाईल तेव्हा आपोआप एका काल्पनिक शक्तीमध्ये यांचा तोडगा शोधण्याची आवश्यकतासुद्धा आपोआप संपून जाईल आणि काल्पनिक शक्तीचे अस्तित्त्वसुद्धा संपुष्टात येईल.
पुनर्जागरण-प्रबोधनापासून वंचित राहिलेल्या भारतासारख्या देशामध्ये ज्ञान-विज्ञान-तर्काधारित मूल्ये सामान्य जनतेपासून तर दूर आहेतच, परंतु येथील सुशिक्षित समजला जाणारा समुदायसुद्धा या जीवनमूल्यांपासून बराच दूर आहे. युरोप, अमेरिका, रशिया, चीन अशा कोणत्याही देशाचे उदाहरण घेतल्यास समाजात बदल घडवून आणण्याच्या पहिल्या प्रयत्नांमध्ये मध्यवर्गाची एक सकारात्मक भूमिका होती.
परंतु आपल्याकडचा मध्यवर्ग इतका विसविशीत, कणा नसलेला आणि निस्तेज-भ्याड आहे की या गुणांच्या बाबतीत तो जगासमोर एक उदाहरण ठरावे. भाषेपासून संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये आजसुद्धा वासाहतिक भूतकाळ आणि गुलामीच्या खुणा सहज पाहायला मिळतात. कला, संस्कृती, साहित्य आणि मिडियासारख्या विविध क्षेत्रांमध्ये पैशासाठी विकले जाणारे भाट बसलेले आहेत. यांना लोकशाही, तार्किकता, आलोचनात्मक विवेक यांसारख्या गोष्टी जणू परग्रहांवरून आल्यासारख्या वाटतात. जनतेच्या गरजा, त्यांच्या अडीअडचणी यांना वाचा फोडायचे दूरच राहिले, उलट त्यांच्याकडे कानाडोळा करण्याची प्रवृत्तीच जास्त पाहायला मिळते. इतकेच नाही तर जनतेच्या बाजूने बोलणाऱ्या बुद्धिजीवींच्या कट्टरतावाद्यांकडून हत्या केल्या जातात तेव्हासुद्धा वेगवेगळ्या न्यूज चॅनेलवर राशीफल सांगितले जात असते, भूतप्रेतांचे किस्से-कहाण्या सुरू असतात किंवा टीआरपीसाठी एखाद्या नव्या चटपटीत विषयाचा शोध सुरू असतो. अलीकडेच नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, एम.एम. कलबुर्गी यांच्या निर्घृण हत्या झाल्या, तरी जनतेतील एका मोठ्या संख्येला याचा काहीच थांगपत्ता लागलेला नाही, असे दिसून येते. ठराविक वर्तुळामध्ये विरोध व्यक्त होऊन बातमी गायब झाली. सिनेमा, क्रिकेटर, नेता यांच्या फडतूस बातम्या मात्र राष्ट्रीय बातम्या ठरतता.
भारतीय समाज आपल्या वासाहतिक भूतकाळामुळे फक्त सरंजामी- अतार्किक मूल्यांना चिकटून राहिला असे नाही तर लोकशाही क्रांतीच्या अभावामुळे ज्ञान, तर्क, विवेकावर आधारित विचारांपासूनही जवळजवळ वंचित राहिला. म्हणूनच इथे बाबा-बुवांच्या रूपात धर्माचे वेगवेगळे दुकानदार सहजासहजी आपले दुकान थाटू शकतात. भांडवली व्यवस्था आणि तिच्यातील स्पर्धा माल-अंधभक्ती आणि दुसऱ्यांना चिरडून पुढे जाण्याची प्रवृत्ती निर्माण करते. जनता आपले अज्ञान आणि वर्गजाणीवेच्या अभावामुळे अलौकिक शक्तींवर विश्वास ठेवते, तर पैसेवाले लोक माल अंधभक्ती आणि उत्पादन व्यवस्थेमधील अस्थिरता- अनिश्चिततेमुळे.
आजचा काळ एकीकडे अंधकाराचा- निराशेचा काळ आहे, तर दुसरीकडे तो आव्हानांनी भरलेला काळ आहे. प्रत्येक समाज बदलतो आणि बदल सोडून दुसरे काहीच शाश्वत नाही. परंतु समाज आपोआप बदलत नाही हेदेखील तेवढेच खरे आहे. कुठल्याही समाजाला बदलतो माणूस. नफाकेंद्रित भांडवली व्यवस्थेच्या जागी एक मानवकेंद्रित व्यवस्था स्थापन केली जाईल, तेव्हाच हे बुवा आणि त्यांना जन्म देणारी आधारभूमी नष्ट करता येऊ शकेल. लोकांच्या भौतिक गरजा पूर्ण होतील तेव्हा अलौकिक शक्तींचा भौतिक आधारसुद्धा हळूहळू नाहीस होत जाईल. परंतु व्यवस्था बदलेपर्यंत हाताची घडी घालून वाट बघून चालणार नाही. सचोटी आणि धैर्यासह ज्ञान-विवेक-तर्क आणि लोकशाही मूल्यांचा सतत अथकपणे प्रचार प्रसार करावा लागेल. आपली शक्ती प्रभावीपणे वापरून आपल्या हक्कांसाठी मुठी आवळाव्या लागतील. अंधकाराच्या शक्तींशी अनवरत झुंज घ्यावी लागेल. आणि सत्य वारंवार जनतेसमोर घेऊन जावे लागेल.

कामगार बिगुल, सप्‍टेंबर २०१५