महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियनची पहिली सर्वसाधारण सभा आणि कामगार आयुक्त कार्यालयासमोर भव्य आंदोलन!
सर्व बांधकाम कामगारांना एक करण्याचा संकल्प !
पुण्यामध्ये महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली मजूर-नाक्यांवरील बांधकाम कामगार मोठ्या संख्येने आपल्या मागण्यांबद्दल सचेतन होत आहेत आणि संघटित होऊन आपल्या मागण्यांकरिता त्यांनी संघर्ष छेडणे चालू केले आहे. गेल्या काही दिवसात युनियनची पहिली सर्वसाधारण सभा संपन्न झाली आणि कामगारांनी पुणे कामगार आयुक्त कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करून रोजगारासहीत इतर अनेक मागण्यांना तोंड फोडले आहे.
1 ऑगस्ट 2021रोजी महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियनची पहिली सर्वसाधारण सभा पुण्यामध्ये कात्रज येथे संपन्न झाली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित बांधकाम कामगारांनी युनियनच्या घटनेला एकमताने स्विकारले आणि घटनेनुसार युनियनच्या कार्यकारणीची निवड बहुमताने करण्यात आली. यावेळी करोना काळात निधन झालेले नाना पाटोळे आणि सोपान क्षिरसागर या कामगारांना उपस्थित सर्व कामगारांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी युनियनचे अध्यक्ष म्हणून निवड झालेले कॉ. परमेश्वर जाधव यांनी मांडले की “अर्थव्यवस्थेमधील सर्वाधिक असुरक्षित आणि शोषणकारी कामांमध्ये बांधकाम कामगारांचे काम आहे. प्रत्येक शहरात असंख्य कामगार अड्ड्य़ांवर आपल्या श्रमशक्तीला विकण्यासाठी, आणि रोज हातावर पोट घेऊन येणारे लाखो बांधकाम कामगार महाराष्ट्रात आहेत. खुलेआम चालणारा हा माणसांच्या श्रमशक्तीच्या खरेदी-विक्रीचा बाजार खरेतर मानवतेला काळीमाच आहे. कामाचे तास, किमान मजुरी, आरोग्य सुविधा, ई.एस.आय., रेशनची सुविधा सोडा, साधे कामगार नाक्यावर शेड आणि पाणीसुद्धा कामगारांना मिळत नाही, पेंशन आणि रोजगाराची हमी तर दूरच आहे. सर्व घरे बांधणारे बांधकाम कामगार स्वत: झोपडपट्ट्यांमध्ये रहायला मजबूर आहेत. भांडवली राजकारणात जनतेला मूर्ख बनवण्याकरिता या कामगारांच्या नोंदण्यांचा दिखावा सरकारने चालवला आहे, परंतु वास्तवामध्ये नोंदण्या करायच्याच नाहीत अशा सूचना कामगार अधिकाऱ्यांना देऊन ठेवल्या आहेत आणि ऑनलाईन पद्धत, कागदी घोड्यांच्या अनावश्यक मागण्यांद्वारे नोंदण्या लटकवण्याचेच धोरण सतत राबवले जाते. यातून दिसून येते की हे सरकार वास्तवामध्ये ठेकेदार-बिल्डरांचे सरकार आहे, कामगारांचे नाही.” करोना काळातील संकटाबद्दल मांडत त्यांनी म्हटले की “नाक्यावरील बांधकाम कामगारांसाठी तर प्रत्येक दिवसच दुष्काळ आहे, आणि करोना काळ तर दुष्काळात तेरावा महिना ठरला आहे. करोना काळामध्ये हजारो कामगार बेरोजगार झाले, शेकडो मजुरांची मजुरी बुडवली गेली आणि भुकेने मरण्याची पाळी आली. गेल्या वर्षभरात महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियनने संघर्ष करत शेकडो कामगारांना त्यांची मजुरी तर मिळवून दिली आहेच, सोबतच ठेकेदार-बिल्डरांना कामगारांना सन्मानाने वागवण्यास भागही पाडले आहे.”
यावेळी युनियनच्या कार्यकारणीने महाराष्ट्रातील लाखो बांधकाम कामगारांना एकजूट करून एकतेची वज्रमूठ बांधण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच जमलेल्या कामगारांनी रोजगार अधिकाराकरिता, तसेच नोंदणीची जबाबदारी कामगाराची नाही, तर सरकारची आहे असे ठामपणे मांडत कामगार नाक्यावर येऊन सरकारने नोंदणी करावी या मागणीकरिता, जोर लावण्याचा निर्धार व्यक्त केला.
लॉकडाऊन संपलेला असला तरी नाक्यावरील बांधकाम कामगारांच्या हालअपेष्टा आणि बेरोजगारीची स्थिती संपलेली नाही. आठवड्यातील 3 दिवस सुद्धा काम मिळणे दुरापास्त आहे ही स्थिती बनलेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी मदतीच्या केलेल्या घोषणा म्हणजे फक्त घोषणांचा पाऊस आहे आणि वास्तवात जमिनीवर जवळपास कोणालाच काहीही मिळालेले नाही. याच असंतोषाला व्यक्त करण्याकरिता पुण्यातील बांधकाम कामगारांनी शहरातील काही कामगार नाके बंद ठेवून नुकतेच भव्य आंदोलन केले. पुणे शहराच्या इतिहासातील रोजंदारी बांधकाम कामगारांनी केलेला हा पहिलाच संप होता.
महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियनच्या वतीने रोजगाराचा अधिकार आणि कामगारांच्या नोंदणीकरिता 31 ऑगस्ट रोजी पुणे येथे कामगार आयुक्त कार्यालयासमोर भव्य आंदोलन केले गेले. पुण्यातील अप्पर डेपो, कात्रज, दत्तनगर, गोकुळनगर, कोंढवा येथील मजूर अड्ड्यावरील शेकडो मराठी व हिंदी भाषिक बांधकाम कामगार यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते. सर्वच जातींच्या, सर्वच धर्मांच्या, हिंदी, मराठी, कन्नड, सर्व भाषिक, स्त्री व पुरुष कामगारांनी जन्मजात अस्मितांच्या भिंती तोडून सहभाग घेतला व कामगारांची वर्गीय एकजूट दाखवून दिली. “कामगार एकजुटीचा विजय असो”, “मजदूर एकता जिंदाबाद’, “भगतसिंह राष्ट्रीय रोजगार हमी कायदा झालाच पाहिजे”, “हर काथ को काम दो, वरना गद्दी छोड दो”, “प्रत्येकाची नोंदणी झालीच पाहिजे”, “बेरोजगारी भत्ता मिळालाच पाहिजे”, “इंकलाब जिंदाबाद”, “कामगारांना पेंशन मिळालीच पाहिजे” या घोषणांनी शिवाजीनगरचा परिसर निनादून गेला होता.
यावेळी सूत्रसंचालन करताना युनियनचे सचिव निमिष वाघ यांनी मांडले की “आपण आंदोलन, संप का करतो? लॉकडाऊन, त्यानंतर उडलेला महागाईचा भडका, आणि त्यातच नाक्यावरची बेरोजगारी आपल्याला सर्व बाजूंनी पिचून काढत आहे. आपली परिस्थिती उघडपणे दिसत असताना देखील सरकार आपल्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहे. लॉकडाऊन अगोदरही अत्यंत असुरक्षित स्थितीत, अत्यंत कमी वेतनात आपली पिळवणूक चालूच होती. ही केवळ आजचीच गोष्ट नाही, तर ह्या भांडवली व्यवस्थेची हीच नीती नेहमीच राहिली आहे. सरकार कुठलेही असो, मालकांच्या, बिल्डरांच्या तुंबड्या भरण्यासाठी, त्यांचे साम्राज्य वाढत राहण्यासाठी शक्य ते सर्व केले जाते, परंतु हे सर्व निर्माण करणाऱ्या कामगारांना मात्र वाऱ्यावर सोडून दिले जाते. तेव्हा रोजगार, पेंशन, शिक्षण, नोंदणी, इत्यादी मागण्यांसाठी तर आपण आंदोलन करतोच, पण ह्या मालकधार्जिण्या सरकारला, आणि भांडवली व्यवस्थेला आह्वान देत राहण्यासाठी आपल्याला आंदोलन करावे लागते! आंदोलन करून, संप करून आपण हे दाखवून देतो की आपण देखील माणसे आहोत, आपण देखील जिवंत आहोत! इतकेच नव्हे, तर आपण आता संघटित आहोत, आपल्याला गृहित धरून चालणार नाही, आपला आवाज दाबून आता चालणार नाही! आपण आंदोलन यासाठी करतो की आपल्यासारख्या इतरांना प्रेरणा देऊन, सतत वाढत जाणारी एकजूट निर्माण केली जावी आणि आपल्या सर्व अधिकारांसाठी क्रांतिकारी आंदोलन उभे रहावे.”
यावेळी युनियनच्या वतीने साथी पवन इन्सान, अमर घनघाव, किशोर कांबळे यांनी आपले मत व्यक्त केले. सर्व कामगार प्रतिनिधींनी आपला रोष व्यक्त करत मांडले की करोना काळानंतर रोजगाराची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे, कामगार उपाशी आहेत आणि राज्य-केंद्र सरकार त्याकडे गुन्हेगारी दुर्लक्ष करत आहेत. मोदी आणि ठाकरे ही दोन्ही सरकारे फक्त बिल्डर-भांडवलदारांच्या सेवत गुंतली आहेत, आणि बांधकाम कामगार व घरकामगारांना वाऱ्यावर सोडले आहे. घरकामगारांच्या नोंदण्या रखडण्यामागे फक्त सरकारी अधिकाऱ्यांची अनास्थाच नाही तर राज्य सरकारचे सुनियोजित धोरण आहे हे वक्त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. मोबाईल, इंटरनेट सुविधा नसलेल्या कामगारांना जिला वापरणे शक्य नाही अशी ऑनलाईन प्रक्रिया, मोबाईलवर ओ.टी.पी., कागदपत्रे स्कॅन करणे आणि अपलोड करणे, अनेकदा साईट बंद असणे आणि यावरताण म्हणजे कामगार वर्गाला त्याच्या शोषक बिल्डर-ठेकेदारांकडून प्रमाणपत्र आणण्यास भाग पाडणे अशा अशक्यप्राय प्रक्रियेला फाटा देऊन कामगार नाक्यांवर येऊन सरकारने नोंदणी केली पाहिजे अशी मागणी यावेळी केली गेली. वक्त्यांनी मांडले की सरकारला सुद्धा आपण ही जाणीव करून दिलेली आहे की आता हे किड्या-मुंग्यांसारखे जगणे, सरकारचे आपल्याला वाऱ्यावर सोडणे, आपल्या अधिकारांना पायदळी तुडवणे, आपण खपवून घेणार नाही. आपल्या हक्कांसाठी, आपल्या मागण्यांसाठी झुंजार संघर्ष करण्यासाठी आपण एकजूट झालो आहोत, होत आहोत. इतकेच नव्हे, तर ज्यांच्यासाठी हे सरकार, ही व्यवस्था चालते, ज्यांच्या पैशावर सत्तेतले सगळे पक्ष आणि प्रतिनिधी उभे आहेत, त्या मालक, बिल्डर, ठेकेदारांनासुद्धा आपल्या ह्या संपातून हा संदेश गेला आहे की नाक्यावरचे बांधकाम कामगार आता एकटे, विखुरलेले, शक्तीहीन नाहीत, ते त्यांच्या पिळवणुकीच्या विरोधात, लुटीच्या विरोधात संघटित होत आहेत, ताकद बनत आहेत. इतकेच नाही, तर नाक्यावरचे कामगार एकत्र येऊ शकतात हा महाराष्ट्र भरातील बांधकाम कामगारांनाही आपण संदेश दिला आहे.
यावेळी पाठिंबा देताना भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षातर्फे कॉ. निखिल एकडे यांनी मांडले की फक्त कामगार वर्गीय पक्षच खऱ्या अर्थाने रोजगाराची हमी देऊ शकतो, तेव्हा कामगारांनी आपले आंदोलन फक्त आर्थिक मुद्यांभोवती केंद्रित न ठेवता कामगार वर्गीय राजकारण समजले पाहिजे. युनियनच्या कलापथकाने कामगार चळवळीची क्रांतिकारी गाणी सादर केली. यावेळी घरकामगार संघर्ष समिती सुद्धा आंदोलनात सहभागी झाली. घरकामगार संघर्ष समितीच्या वतीने अश्विनी खैरनार, कुसुम रोकडे यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी प्रतिनिधी मंडळाला कामगार आयुक्तांनी रखडलेल्या नोंदण्या तातडीने पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले तसेच अपघाताने मृत्यू झालेल्या युनियन सदस्य सोपान क्षिरसागर यांना नुकसान भरपाई सुद्धा देण्याचे आश्वासन दिले. रोजगार अधिकारासंदर्भातील निर्णय हा धोरणात्मक निर्णय आहे, तेव्हा मंत्रीमंडळाकडे त्यासंदर्भातील पत्र पाठवल्याची प्रतही उपलब्ध करून दिली.
यानंतर महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियनचे अध्यक्ष परमेश्वर जाधव यांनी मांडले की आज शेकडोंच्या संख्येने एकत्र आलेल्या कामगारांनी आपल्या एकतेच्या जोरावर काही मागण्यांचे लेखी आश्वासन प्राप्त केले आहे. कामगारांमध्ये जात-धर्म-भाषेच्या नावाने फूट पाडणाऱ्या नेत्यांपासून आणि संघटनांपासून सावध राहण्याचा इशारा देत परमेश्वर जाधव यांनी मांडले की एकता हीच कामगारांची खरी शक्ती आहे आणि जात-धर्म-भाषेच्या भेदांविरुद्ध लढूनच कामगार खऱ्या अर्थाने एक होऊ शकतात. आंदोलनाचा समारोप करत त्यांनी मांडले की महाराष्ट्रामध्ये रोजगार अधिकाराच्या आंदोलनाचा बिगुल फुंकला आहे, आणि राज्यभरामध्ये या मागणीच्या भोवती व्यापक एकजूट बनवण्याकरिता यापुढे युनियन प्रयत्नशील राहील आणि येत्या काळात हजारोंच्या संख्येने मुंबईला मोर्चा नेऊन झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जाग आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.