कामगारांची परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट होत आहे. आज लॉकडाऊन उघडले असले तरी आठवड्यातून दोन दिवसाच्या वर काम मिळत नाहीच. मजुरी पडलेली आहे. त्यातच डोक्यावर दुसऱ्या लॉकडाऊनची टांगती तलवार आहेच. पहिल्या लॉकडाऊनच्या काळात घेतलेले उधार आणि कर्ज अजूनही फेडले गेलेले नाहीत. लाईटबिल, घराचं भाडं, कर्जांचे हफ्ते, सगळेच अजूनही थकलेले आहेत. शिक्षण ऑनलाईन सुरू झाल्यामुळे कामगारांच्या मुलांची शाळा मागे पडलेली आहे, सुटलेली आहे. रोज वाढणारी महागाई ह्या सगळ्या वणव्यात तेल ओतत आहेच. मागच्या काही महिन्यांमध्ये अनेक बांधकाम कामगारांना अकाली मृत्यूला सामोरे जावे लागले आहे —काहींना कोरोनामुळे, काहींना उपासमारीमुळे, काहींना घरी जाताना चालता चालता मृत्यू आला आहे. अनेक बांधकाम कामगारांनी ह्या सगळ्या परिस्थितीने पिचून आत्महत्या देखील केलेली आहे. रोजगार आणि शिक्षण दोन्हीवर गदा आल्याने अनेक बांधकाम कामगार व्यसनांच्या, गुन्हेगारीच्या आहारी गेलेले आहेत.