कोळी आणि माशी

विल्हेल्म लाइबनिख्ट

विल्हेल्म लाइबनिख्ट

विल्हेल्म लाइबनिख्ट

विल्हेल्म लाइबनिख्ट (29 मार्च 1826 – 7 ऑगस्ट 1900) हा जर्मन कामगारांचा एक प्रख्यात नेता होता. आयुष्यभर त्याने कामगार वर्गाच्या लढ्यासाठी व क्रांतिसाठी तनमनधन अर्पण करून कार्य केले. हे पत्रक १८८१ साली त्यांनी कामगारांना भांडवलशाही सत्ता उपटून फेकण्याचे आवाहन करण्यासाठी लिहिले. भांडवलदार वर्ग कामगार वर्गाचे शोषण कशा प्रकारे करतो, व याच्या विरोधात लढण्याचा मार्ग कामगारांची एकता हाच आहे, हे त्यांनी या पत्रकाद्वारे दाखवून दिले आहे. जगभरातील कामगारांमध्ये हे पत्रक आजही लोकप्रिय आहे.

तुम्ही त्याला ओळखता! चिकट, केसाळ अंगाचा तो ढेरपोट्या किडा. उजेडापासून शक्य तितक्या दूर अंधाऱ्या जागी दबा धरून बसणारा, आणि आपलं भयानक जाळं विणत बसणारा. याच जाळ्यात बिचारी निष्काळजी आणि अडाणी माशी पकडली जाते आणि प्राणाला मुकते. तो विद्रूप किडा तुमच्या माहितीचा आहे. त्याचे बटबटीत कवडयांसारखे डोळे आणि शिकार पकडून तिचा गळा दाबण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या वेड्यावाकड्या वाळकुडया तंगड्या – त्याही तुम्ही पाहिल्या आहेत. हा किडा म्हणजे आपला कोळी!
तो बघा, तिथं कोपऱ्यात शांतपणे बकध्यान करत तो पडून आहे. भक्ष्य तावडीत सापडण्याची वाट पहात. कधी कधी तो तुम्हाला दिसेल तो एखाद्या दुबळ्या माशीला जाळ्यात अडकवून टाकण्यासाठी निर्दयपणे आपल्या सापळयाचे धागे वरखाली करत असताना. हा हावरा कीटक फार डोकं वापरून आपलं जाळ विणतो. पहिल्यांदा एक धागा, मग दोन आणि तीन-असे अनेक धागे तो गुंफतो. आडवे उभे धागे बांधतो. आणि जाळं असं काही पक्क बनवतो की माशीनं जिवाच्या आकांताने केलेल्या धडपडीनेसुद्धा ते तुटत तर नाहीच, पण नुसतं थरथरत सुद्धा नाही!
अन अखेर जाळं तयार होतं. सापळा लावला जातो. आता त्यातून सुटका नसते. कोळी आपल्या लपायच्या जागी परत जातो आणि भुकेने तडफडणारी एखादी साधीभोळी माशी अन्नाच्या शोधात येऊन जाळयात सापडण्याची वाट बघत राहतो.
माशी येण्यासाठी त्याला फार वाट पहावी लागत नाही. अन्नातचा कण शोधणारी ती बिचारी डकडे तिकडे बघत अगदी सहजपणे जाळ्याच्या पसरलेल्या धाग्यांमध्ये बरोबर सापडते. ती घाबरून धडपडते आणि आणखीनच गुंतते. जीव वाचवायला जाळ्यालाच धरू बघते आणि मग संपलंच सगळं!
spider and flyभक्ष्य पकडलं गेल्याचं दिसलं रे दिसलं की कोळी जागेवरून उठतो. आपली अधाशी नजर माशीवर टाकत आणि हातपायाच्या आकड्या सरसावून हळूहळू पुढे सरकू लागतो. त्याला मुळीच घाई नसते. एकदा जाळ्यात सापडलेली ती दुर्देवी माशी आता निसटणे शक्यच नाही हे या राक्षसाला पक्के माहीत असते. तो आणखी जवळ येतो. थंडगार बटबटीत डोळ्यांनी भक्ष्याचा अंदाज घेतो. त्या नजरेनंच माशीचं भान सुटतं. अंगावर चालून येणाऱ्या मृत्यूकडे पाहून ती भीतीने थरथर कापू लागते. चिकट धाग्यांमधून स्वतःला सोडवून घ्यायचा आकांताने प्रयत्न करते, आणि तिची पार दमछाक होते.
पण तिचे प्रयत्न फुकट असतात, धडपड वाया जाते. ती जास्तजास्तच जाळ्यात गुंतत जाते आणि कोळी जवळ जवळ येतच असतो. आणखी आणखी धागे तिच्याभोवती वेढले जातात. जाळ्यातून सुटण्याचा जितका प्रयत्न करावा तितकी अधिकच ती जाळ्यामध्ये गुंतत जाते. त्याचे बारीक पण चिवट धागे तिला पुरते अडकवून ठेवतात. अखेर तिला दमछाकीने धाप लागते, आणि सगळा प्रतिकार संपून जातो. आता ती तिच्या शत्रूसमोर, तिला जिंकून घेणाऱ्या त्या राक्षसासमोर असहाय बनलेली असते.
त्यानंतर कोळी आपल्या केसाळ आकड्यांनी माशीला पकड़तो आणि मरणमिठीत बंदिस्त करतो. मग तो दुबळ्या भक्ष्याच्या थरथर करणाऱ्या शरीराचे चावे घेऊ लागतो. एकदा, दोनदा – त्याची पाशवी वासना आणि भूक संपेपर्यंत कितीतरी वेळा. जराशी त्याची रक्ताची तहान भागली की माशीला तो अर्धमेले ठेवून दूर जातो. मग तो परत येतो आणि आणखी रक्त शोषतो. ती दुर्देवी माशी संपेपर्यंत, तिच्या अंगातले सगळे रक्त आणि जीवनरस संपेपर्यंत त्याच्या त्या फेऱ्या चालू रहातात. या हालांमधून तिला सोडवायला मृत्यूला वेळ लागतो. खूप वेळ लागतो.
बिचाऱ्या माशीच्या अंगात थोडीसुद्धा धुगधुगी शिल्लक दिसतीय तोवर हे रक्तपिपासू पिशाच्च तिची पाठ सोडत नाही. ते तिचा जीव शोषून घेतं, तिची शक्ती खच्ची करतं, तिचं रक्त पितं. आणि शोषून घ्यायला काही, अगदी काही उरलं नाही अशी खात्री पटल्यावरच तिच्यापासून दूर होतं.
शोषलं गेल्यानं शुष्क आणि पिसासारखं हलक बनलेलं माशीचं शरीर मग जाळ्यातून टाकून दिलं जातं. वाऱ्याच्या पहिल्याच झुळूकीसरशी ते कुठल्याकुठं जातं. आणि सगळं शांत होतं.
पण कोळी मात्र तृप्त मनानं आपल्या आरामगृहात जाऊन बसतो. स्वतःच्या पराक्रमावर अन एकंदर जगावर तो खूष असतो. सभ्य अन प्रतिष्ठित लोकांना जगात अजून सुखात रहाता येतं याचं त्याला समाधान वाटत असतं.
तुम्ही, शहरातले व खेड्यांमधले कामगार म्हणजे ही माशी आहात. जिचं शोषण होतं आणि प्राण जातात अशी माशी! जिचं सगळं हडप होतं अन जिचं रक्त पिऊन इतर जगतात. तुम्ही, दडपल्या गेलेल्यांनो, बुद्धिवंतानों, कारखान्यातल्या कामगारांनो, भीतीनं थरथरणाऱ्या तरुण कुमारिकांनो आणि हक्कांसाठी झगडण्याचाही धीर नसणाऱ्या तुडवलेल्या बायकांनो, लष्करी बुटांच्या टाचांखाली बळी जाणाऱ्या दुर्देवी लोकांनो, थोडक्यात सगळया गरीब व पिळल्या जाणाऱ्यांनो, तुम्ही ही माशी आहात! तुमचेही असेच बळी जात असतात. तुमच्या शरीरातला सगळा जीवनरस संपेपर्यंत तुमचं शोषण होतं आणि मग तुम्हाला कस्पटासारखं फेकून देण्यात येतं. देशाची सर्व संपत्ती घाम गाळून निर्माण करणाऱ्यांनो, देशाचं हृदय, मेंदू, जीवनशक्ती असणाऱ्यांनो, आज हुकुमाची तामिली करणं व एखाद्या कोपऱ्यात झिजून झिजून निमूटपणे मरणं याशिवाय दुसरा कोणताही हक्क तुम्हाला नाही. आणि यावेळी तुमचं रक्त, तुमचा घाम, तुमचे श्रम, तुमची बुद्धी, तुमचं सारं जीवनच इतर काहींना मोठं आणि बलवान करण्यासाठी खर्ची पडत आहे. तुमच्या मालकांना व तुम्हाला पिळणाऱ्यांना : या हावरट किळसवाण्या कोळ्यांना.
कोळी म्हणजे साहेब, थैलीशहा, शोषण करणारे, सट्टेबाज, भांडवलदार, धर्मगुरू आणि पुजारी, स्त्रियांना भ्रष्ट करणारे! कोळी म्हणजे ही सगळी तुमच्या जिवावर पोसली जाणारी बांडगुळं, आपल्याला टाचेखाली भरडणारे जुलमी सत्ताधारी, अन्याय व दडपशाही पोसणारे कायदे बनवणारे पंडित, आपल्याला गुलाम करणारे हुकुमशहा, इत्तर माणसांच्या जिवावर जगणारा प्रत्येक जण कोळी आहे. आपल्याला पायदळी तुडवणारा, आपल्या दुःखांकडे व आपल्या धडपडीकडे निर्दयपणे बघणारा कोळी आहे.
माशी म्हणजे कामगार, मालकाच्या मन मानेल तशा अन्यायी कायद्यांपुढे त्याला नमावे लागते, कारण स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबाचे पोट भरण्याकरता बिचाऱ्याकडे दुसरे साधनच नसते. कोळी म्हणजे प्रत्येक कामगाराच्या श्रमावर रोज सहाआठ रूपये कमवणारा अन् तरीही कामगाराला बाराचैदा तासांच्या कामाचे दोनतीन रूपये हातावर टिकवण्याचे धैर्य – नव्हे दयाबुद्धी (!) दाखवणारा बडा कारखानदार.
माशी म्हणजे एखादा खाण कामगार – तो खाणीच्या तळाशी विषारी वायूमध्ये काम करून जमिनीच्या पोटातून संपत्ती बाहेर काढतो, पण स्वतः ती उपभोगत नाही. कोळी म्हणजे कंपनीचा शेअरहोल्डर – त्या शेअर्सची किंमत दुप्पट, तिप्पट होते. पण तरी त्याचे कधी समाधान होत नाही. त्याला अधिकाधिक नफ्याचा भाग हवा असतो. तो कामगारांच्या श्रमाच्या फळांवर दरोडा टाकतो. आणि जर त्यांनी थोडीसुद्धा मजुरीत वाढ मागण्याचे धाडस केले तर तो या ‘बंडखोरांना’ मृत्यूचे दर्शन घडवण्यासाठी लष्कर बोलवतो.
माशी म्हणजे एखादे लहान मूल – ज्याला कोवळ्या वयापासूनच कारखान्यात किंवा घरी पोटाची खळगी भरण्यासाठी गुलामासारखे राबावे लागते. मात्र या मुलाचे गरीब आईबाप म्हणजे कोळी नव्हेत. कारण गरजेपोटी ते आपल्या मुलाचा असा बळी देत असतात. नैसर्गिक भावनांना असे विकृत रूप येण्याला व माणसांना स्वतःच्या कुटुंबाचा नाश करायला लावायला जवाबदार कोण आहे? तर नरकासमान असणारी परिस्थिती.
माशी म्हणजे सामान्य माणसाची एखादी सत्प्रवृत्त मुलगी. तिला प्रामाणिकपणे जगायची इच्छा असते, पण मालकाच्या आणि मॅनेजरच्या पाशवी वासनांना शरण गेल्याशिवाय तिला काम मिळू शकत नाही. हा मालक तिला वापरतो आणि मग, बहुतेकवेळी तिला दिवस गेल्यावर, क्रूरपणे व निर्दयपणे स्वतःची बदनामी होऊ नये म्हणून तिला फेकून देतो. कोळी म्हणजे तो रंगेल तरुण, ‘प्रतिष्ठित’ घरामधला तो रिकामटेकडा मवाली. निष्पाप मुलींना तो मजेखातर वाकड्या मार्गाला लावतो आणि त्यांची गटारातून फरफट करतो. किती जास्त बायकांना आपण भ्रष्ट केले आहे यातच त्याला मोठी धन्यता वाटत असते.
तू! नांगर धरणाऱ्या शेतकऱ्या, तू माशी आहेस. श्रीमंत जमीनमालकाकरता तू शेत करतोस. तू पीक पेरतोस पण तुझ्या पदरात ते पडत नाही. तू फळं पिकवतोस पण त्यांची चव तुझ्याकरता नसते. श्रीमंत जमीनदार हा कोळी. तो कुळांना आणि शेतमजुरांना क्षणभरही उसंत घेऊ न देता घाम गाळायला लावतो. आणि त्यावर स्वतः आरामाचे सुखासीन जीवन जगत असतो. कोळी म्हणजे दरवर्षी खंड वाढवणारा आणि प्रामाणिक श्रमांची किंमत कमी करणारा जमीनदार.
माशी म्हणजे आपण सगळे गरीब, साधेभोळे लोक. जे युगानुयुगे देवाच्या कोपाला घाबरत आलो, पुजाऱ्यांच्या पायांचे तीर्थ घेत आलो. धर्म-संस्थानांच्या फायद्याकरता व करमणुकीकरता आपण एकमेकांशी भांडलो व एकमेकांना गुलाम करत आलो. आपण इतके दिवस गुडघे टेकून राहिलो, अन्यायाने मिळवलेली फळं चाखणाऱ्यांपुढे नमलो, कारण आपल्या बुद्धीला धर्माच्या शिकवणीने विष पाजून पांगळे बनवले होते. कोळी म्हणजे ढोंगी व लोभी चेहऱ्याचे हे भगव्या वस्त्रातले धर्मगुरू. साधाभोळ्या माणसांच्या मनात हे आपल्या शिकवणीने गोंधळ माजवतात. सबंध देशाच्या आत्म्याला हे पोखरतात आणि समाजाला रसातळाला पोचवतात.
थोडक्यात, माशी म्हणजे दडपले गेलेले, गुलाम झालेले, पिळले जाणारे. कोळी म्हणजे स्वार्थी शेटजी किंवा जुलुमी सत्ताधीश-मग त्यांनी कोणताही बुरखा पांघरलेला असो.
पूर्वी कोळी मोठमोठ्या किल्ल्यांमध्ये व राजवाड्यामध्ये बसून जाळे विणत असे. आज तो उद्योगधंद्याच्या केंद्रामध्ये, पैश्याचा ओघ वाहणाऱ्या विभागांमध्ये राहाणे जास्त पसंत करतो. बहुतेक वेळा तो तुम्हाला औद्योगिक शहरांमध्ये आढळेल, पण कधी तो लहान शहरांमध्ये वा गावांमध्येही सापडेल. जिथंजिथं पिळवणूक करता येते, जिथं कामगार, कफल्लक मजूर, लहान कारागीर, शेतमजूर आणि कर्जाखाली वाकून गेलेले गरीब शेतकरी भांडवलदारांच्या अनावर लोभापुढे उघडे पडले आहेत तिथंतिथं त्याचं वास्तव्य असतं.
कुठेही नजर टाका, शहरात असो की खेड्यात, सगळीकडे तुम्हाला गरीब कीटक त्यांच्या शत्रूंच्या जाळ्यांमध्ये व्यर्थ झगडत असतांना दिसतील. तुम्हाला हे हळूहळू थकून जातांना दिसतील. शेवटी शुष्क होऊन मरताना दिसतील.
दुबळ्या भित्रट माशा आणि क्रूर रक्तपिपासू कोळ्यांमध्ये ही लढाई गेली शेकडो वर्षे चालू आहे. केवढी प्रचंड दुःखानी भरलेली ही गाथा आहे! यातनांची ही एक राक्षसी कहाणी आहे. मग ती परतपरत कशाला सांगायची? झालं गेलं होऊन गेलं, आपण आता सध्याच्या व पुढे येणाऱ्या काळाविषयी बोललं पाहिजे.
आपण माशी व कोळी यांच्यात आज चालू असलेल्या संघर्षाकडे जरा बारकाईने पाहूया. परिस्थिती कशी आहे हे यथार्थपणे कळून घेऊया. आपण सगळ्या माशांनी आपल्या शत्रूंनी लावलेल्या सापळ्याची नेमकी माहिती करून घ्यायला पाहिजे. त्यांच्या फसव्या युक्त्या-प्रयुक्त्यांचे खरे स्वरूप ध्यानात घ्यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण एकजूट करू या. आपल्याला अडकवणारे जाळे तोडणे एकट्याला जमणार नाही. आपली एकजूट हेच आपले बळ आहे. आपल्याला बंधनांमध्ये ठेवणाऱ्या साखळ्या आपण तोडून टाकू, आपल्या शत्रूंना त्यांच्या लपण्याऱ्या जागांतून हुसकावून लावू, ज्ञानाचा प्रकाश आपण सगळीकडे पसरवू. म्हणजे मग त्या धूर्त, पापी प्राण्याला कारस्थाने रचण्याकरता कधीही कुठे अंधारी जागा शिल्लक रहाणार नाही.
तुम्हा माशांना जर हे करायची इच्छा असेल, खरोखरीची इच्छा असेल, तर तुमचा विजय होणारच! हे खरं आहे की आज कोळ्याची ताकद जास्त आहे. पण ते मूठभर आहेत. तुम्ही जरी दुबळे आणि एकट्याने काही करायला असमर्थ असला तरी तुम्ही संख्येने अगणित आहात. तुम्हीच जीवनाचा आधार आहात, हे जग तुमचे आहे – जर तुम्हाला खरोखरच नवं जीवन जगण्याची इच्छा असेल तर. जर तुम्ही फक्त एकत्र आलात तर पंखांच्या एका फटकाऱ्यातच तुम्ही सगळे धागे तोडून टाकाल, तुम्हाला आज गुलाम करणारी, भुकेने तडफडवून तुमचा जीव घेणारी सगळी जाळी तुम्ही नष्ट कराल. गरीबी व गुलामगिरी तुम्ही कायमची नष्ट कराल – जर तुम्हाला हे करायची इच्छा असेल तर.
म्हणून खूप मोठ्या इच्छा करायला शिका!

कामगार बिगुल, सप्‍टेंबर २०१५