सुनपेडमधील बर्बर घटनेच्या विरोधात मुंबईत निदर्शने

सुनपेड येथे झालेल्या या बर्बर घटनेच्या विरोधात मुंबईत अखिल भारतीय जाती विरोधी मंचद्वारे एक जोरदार निदर्शन करण्यात आले. मुंबई येथील अंधेरी स्टेशनसमोर २५ ऑक्टोबरच्या सायंकाळी ५ वाजता हे निदर्शन झाले. अखिल भारतीय जाती विरोधी मंचच्या वतीने या घटनेच्या विरोधात एक पत्रक काढून हजारो लोकांमध्ये वाटण्यात आले. विरोध प्रदर्शनात अखिल भारतीय जाती विरोधी मंचच्या सत्यनारायण यांनी बोलताना सांगितले की स्वातंत्र्य मिळूनही देशातील दलितांवरील अत्याचार कमी होण्याऐवजी उलट वाढलेच आहेत. गेल्या दीड वर्षात तर स्थिती आणखीनच भयंकर झाली आहे. जातीयवादी शक्तींना सरकारकडून पुरेपूर समर्थन मिळते आहे. याशिवाय लोकांमध्ये धार्मिक पायावर फूट पाडण्याचे राजकारणही मजबूत होत आहे व देशात तणावपूर्ण वातावरण निर्माण केले जात आहे. सत्यनारायण यांनी सांगितले की मोदी सरकार पूर्ण ताकदीनिशी गरीब कष्टकरी जनतेला लुटते आहे आणि अल्प कालावधीतच हे सिद्ध झाले आहे की पुढेसुद्धा लोकांना फोडून त्यांच्यावर राज्य करण्याचे राजकारणच चालू राहणार आहे. सत्यनारायण यांनी सांगितले की सुनपेडची घटना जातीय अत्याचारांमधील रानटीपणा दाखवून देणारी आहे.
बिगुल मजदूर दस्ताच्या नारायण खराडे यांनी सांगितले की जातीय अत्याचारांच्या घटनांच्या वर्गीय पैलूकडे डोळेझाक करून चालणार नाही. जातीय चारित्र्याबरोबरच त्यांचा एक वर्गीय पैलू आहे, व तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अशा रानटी अत्याचारांना प्रामुख्याने गरीब दलित बळी पडत असतात. नारायण यांनी पुढे सांगितले की आज आपण आपले शत्रू आणि आपले मित्र कोण आहेत हे नीट ओळखले पाहिजे. आज अस्मितेचे राजकारण करणाऱ्या तमाम संघटनांपासून आणि पक्षांपासून आपण सावध राहिले पाहिजे. दलितांचे पुढारीपण मिरवणारे रामदास आठवले, मायावती, रामविलास पासवान यांसारखे नेते वास्तवात गरीब दलितांचे शत्रू आहेत. यांना दलितांची आठवण फक्त निवडणूक तोंडावर येताच येते. बिहार निवडणुकीच्या तोंडावर दलितांना चुचकारण्यासाठी भाजप नेते मुंबईत आंबेडकर स्मारकाची पायाभरणी करून आपण दलितांचे उद्धारक असल्याचे दाखवतात त्यावेळी रामदास आठवलेंसारखे नेतेसुद्धा त्यांच्या या नाटकात सहभागी होऊन दलितांची भयंकर दिशाभूल करीत असतात. अस्मितेचे राजकारण करणारे हे नेते सुनपेडसारख्या घटनांनंतर कोणत्याही प्रकरचा प्रतिरोधाचा लढा उभारताना दिसत नाहीत. रस्त्यांचे नामकरण करायचे असेल, मूर्त्या बसवायच्या असतील तर मात्र हे सगळ्यात पुढे उभे असलेले दिसतात. लक्ष्मणपूर बाथे, बथानी टोला, रमाबाईनगर, खैरलांजी, जवखेड आणि सुनपेडसारख्या घटना घडतात तेव्हा जणू यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असते. यांच्या कचाट्यातून सुटल्याशिवाय दलित मुक्तीचा लढा पुढे जाऊ शकणार नाही. नारायणने पुढे सांगितले की आज ब्राह्मण्यवादी विचारधारेचे वाहक कोण आहेत हेसुद्धा आपण नीट समजून घेतले पाहिजे. ब्राह्मण्यवादाचा विरोध म्हणजे फक्त ब्राह्मण व्यक्ती आणि धार्मिक ग्रंथांचा विरोध, एवढेच समजणे म्हणजे भयंकर चूक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जे अत्यंत भयंकर अत्याचार झालेले आहेत ते प्रामुख्याने श्रीमंत शेतकऱ्यांनी केलेले आहेत, व जातीय सोपानात ते सर्वांत वरच्या स्थानावर नाहीत. जाट, मराठा, यादव इत्यादी जातीच्या लोकांनी सर्वांत भीषण दलित अत्याचार घडवून आणले आहेत. जातीय पायावर दलितांची अन्य मागास जातींसोबत एकता बनवण्याचा पर्याय सुचविणाऱ्या दलित पुढाऱ्यांच्या दाव्यात किती दम आहे, हे यावरून सिद्ध होते. त्यामुळे अशा नेत्यांच्या कचाट्यातून जातिविरोधी आंदोलन सोडवल्याशिवाय आपण एक इंचसुद्धा पुढे सरकू शकत नाही हेच दिसून येते. यानंतर इतर वक्त्यांनीसुद्धा आपले विचार मांडले व घटनेची कठोर निर्भर्त्सना केली.

2015-10-25-Protest-Sunped-dalit_1792015-10-25-Protest-Sunped-dalit_145-1 2015-10-25-Protest-Sunped-dalit_187

कामगार बिगुल, नॉव्‍हेंबर २०१५

A protest against sunped dalit massacre was organised today evening at Andheri station by All India Anti-caste forum….

Posted by अखिल भारतीय जाति विरोधी मंच on Sunday, October 25, 2015