मानेसरच्या ब्रिजस्टोन कंपनी कामगारांचा संघर्ष जिंदाबाद!
देशातील बड्या कार कंपन्यांसाठी सुटे भाग बनवणाऱ्या ब्रिजस्टोन इंडिया प्रॉडक्ट्स प्रायवेट लिमिटेड, मानेसरचे श्रमिक आपल्या युनियन बनवण्याच्या अधिकारासाठी सध्या लढा देत आहेत. ही कंपनी ब्रिजस्टोन कार्पोरेशन, जपानची साहाय्यक कंपनी आहे. येथे गाड्यांचे कंपनविरोधी भाग (अँटी वाइब्रेशन प्रॉडक्ट्स) तयार केले जातात.
गुडगाव-मानेसर-धारुहेडा-बावलपर्यंत पसरलेल्या ऑटोमोबाइल सेक्टरच्या औद्योगिक पट्ट्यात जगभरातील नावाजलेल्या ब्रँडच्या गाड्यांचे व त्यांच्या भागांचे उत्पादन हजारो औद्योगिक एककांमध्ये होते. देशातील अर्थव्यवस्थेत प्रमुख वाटा या पट्ट्यातूनच येतो. परंतु या पट्ट्यात वेगवान गाड्यांचे निर्माण करणाऱ्या कामगारांची अवस्था मात्र फारच भीषण आहे. ब्रिजस्टोन इंडियाचे कामगार गेले सहा महिने युनियन बनवण्यासाठी धडपड करीत आहेत. कामगारांच्या युनियन बनवण्याच्या प्रयत्नात कंपनीच्या व्यवस्थापनाने अगदी सुरुवातीपासूनच अडथळे निर्माण करण्याचे काम केले आहे. ब्रिजस्टोन कंपनीचे कामगार ब्रिजस्टोन इंडिया ऑटोमोटिव्ह एम्प्लॉइज युनियन नावाच्या युनियनची नावनोंदणी करू इच्छित आहेत. कामागार पहिल्यांदा युनियन बनवण्यासाठी एकजूट झाले तेव्हाच कंपनीचे जनरल मॅनेजर मनोज मनचंदा यांनी काही कामगारांना विकत घेऊन ही प्रक्रिया रोखण्याचे प्रयत्न केले होते. परंतु कामगारांनी हार मानली नाही व पुन्हा एकदा नव्या नेतृत्त्वाखाली सावधपणे युनियन बनवण्याच्या कामी लागले. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेतल्या. युनियन नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या दोन आमसभा दि. १२ एप्रिल २०१५ आणि ३१ मे २०१५ रोजी झाल्या. लेबर विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून कंपनी व्यवस्थापनाला ही बातमी मिळाली. बैठकीत उपस्थित असलेल्या ३१ कामगारांपैकी ११ कामगार त्यावेळी कामावर हजर होते, व ओव्हरटाईम करीत होते असे त्यांनी बनावट कागदपत्रांद्वारे सिद्ध करण्याचा घाट घातला, जेणेकरून या बैठका खोट्या ठरवण्यात याव्यात. या कारखान्यात जवळपास १८० कायमस्वरूपी कामगार काम करीत आहेत. त्यामुळे बैठकीच्या वेळी जर २० कामगारसुद्धा उपस्थित असतील तर युनियनची नोंदणी झाली पाहिजे. या आधारे लेबर कमिशनरने ही प्रक्रिया पुढे नेत फाइल डेप्युटी लेबर कमिशनर अनुपम मलिक यांच्याकडे सोपवली. यापुढची कारवाई मात्र थंड पडली. ना कोणतेही कारण देऊन नोंदणीची प्रक्रिया रद्द करण्यात आली, ना नोंदणीसंख्या देण्यात आली. दुसरीकडे सत्यापन तारखेनंतर व्यवस्थापनाने प्रक्रियाधीन युनियनचे नामांकित पदाधिकारी कृष्ण मुरारी आणि शिवपूजन यांची कोणतीही नोटीस न देता चेन्नई येथील कारखान्यात बदली करून टाकली. त्यांनी नकार देताच त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. व्यवस्थापनाने एक एक करून वीसच्या वीस कामगारांना बाहेरचा रस्ता दाखवला. या सगळ्या प्रकाराच्या विरोधात कामगारांनी कोर्टाची परवानगी घेऊन १७ सप्टेंबरला टूल डाऊन (काम बंद) केले. त्या दिवशी त्यांना पोलिस आणि गुंडांच्या बळावर कंपनीतून बाहेर काढण्यात आले. कामगारांच्या एका दिवसाच्या टूल डाऊनला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या दिवशी कंपनीने बेकायदेशीरपणे कारखाना बंद केला. दुसऱ्या दिवशी जेव्हा कामगार पहाटेच्या शिफ्टसाठी पोहोचले त्यावेळी पोलिस आणि बाउंसरसह उभ्या असलेल्या व्यवस्थापकांनी त्यांना आत जाण्यापासून रोखले.कामगारांना सांगण्यात आले की त्यांना कामावर घेतले जाणार आहे की नाही ते अर्ध्याा तासानंतर कळवण्यात येईल. कामगार पुन्हा गेटवर आले तेव्हा बाउंसरनी ४ कामगारांना आत ओढून घेतले. त्यांना धमकी देण्यात आली की एक तर त्यांनी काम करावे किंवा कागदावर सही करून निघून जावे. यानंतर जवळपास ४०० कामगारांनी कंपनीच्या गेटपासून थोड्याच अंतरावर परटेंट लावून संप सुरू केला. कामावरून काढून टाकलेल्या २० कामगारांना पुन्हा कामावर घेण्याची व युनियन बनवू देण्याची मागणी कामगारांनी केली. यानंतर व्यवस्थापन पोलिसांमार्फत कामगारांवर दबाव टाकण्याचे प्रयत्न करू लागले. दुसरीकडे कामावर गेलेल्या महिला कामगारांशी गैरवर्तन करण्यात आले. कारखान्यात सुमारे ४० ते ४५ महिला कामगार आहेत. त्यांच्याकडून जबरदस्तीने त्यांना बिलकुल माहित नसलेले मोल्डिंगचे काम करून घेण्यात आले. महिला कामगार साधारणपणे डफ्लैशिंगचे काम करतात परंतु कारखाना व्यवस्थापनाने त्यांच्याकडून जबरदस्तीने पुरुष कामगारांनी करावयाची कामे करवून घेतली. त्यांना कारखाना परिसरात साफसफाई करण्यासही भाग पाडण्यात आले. दुसऱ्या दिवशी महिला कामगारांनी संपावर गेलेल्या कामगारांना साथ देण्याचा निर्णय घेतला. ऑटोमोबाइल इंडस्ट्री कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स युनियन ब्रिजस्टोनच्या कामगारांच्या संघर्षाला समर्थन देत आहे. ऑटोमोबाइल इंडस्ट्री कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स युनियनच्या अनंत यांनी सांगितले की कामगारांच्या युनियन बनवण्याचा अधिकार चिरडून टाकण्याचा हा काही पहिला प्रकार नाही. यापूर्वी भिवाडीमध्ये श्रीराम पिस्टनच्या कामगारांनी युनियन बवण्याच्या अधिकारासाठी संप पुकारला होता. फरक एवढाच की श्रीराम पिस्टन कंपनी राजस्थानमधील भिवाडी येथे आहे आणि ब्रिजस्टोन हरयाणाच्या मानेसरमध्ये. कामगारांची अवस्था सगळीकडे सारखीच आहे. आपल्या घामाने चकचकीत गाड्या बनवणाऱ्या या कामगारांच्या आयुष्यात अंधकार, भूक आणि गरिबी सोडून दुसरे काहीच नाही. आजच्या काळात कामगारांना आपली एक सेक्टरगत युनियन बनवणे गरजेचे आहे. अशी युनियन जी त्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांच्या अधिकारांसाठी संघर्ष करील. हा रिपोर्ट लिहिला जाईपर्यंत ब्रिजस्टोन कंपनीचे कामगार आपल्या हक्कासाठी लढत होते आणि कारखान्याबाहेर संपावर बसले होते.
कामगार बिगुल, नॉव्हेंबर २०१५