संघवाल्यांचे कारस्थान ओळखा
ओळखा, कोण खरा देशभक्त आहे आणि कोण देशद्रोही?
सध्या देशभरात काही लोक देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीचे ठेकेदार बनलेले आहेत. हे तेच लोक आहेत ज्यांचा स्वातंत्र्यलढ्यात कसलाही सहभाग नव्हता. अमर शहीद भगतसिंग आणि त्यांच्यासारख्या अनेकानेक स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या विरोधात ज्यांनी इंग्रजांसाठी हेरगिरी केली, तेच हे लोक आहेत. हे तेच लोक आहेत ज्यांनी हिटलर आणि मुसोलिनीला आपला आदर्श मानले होते. आणि स्वातंत्र्याच्या आगोदर ब्रिटिश राणीला सलामी देणारे हेच लोक आहेत. हे कधीपासून देशभक्तीचे ठेकेदार बनले? सत्ताधारी पार्टी आणि संघ परिवाराची ही माणसं आज धर्म आणि जातीच्या नावाखाली देशाचे तुकडे पाडत आहेत. साम्प्रदायिकतेच्या लाटेवर स्वार होऊन हे सत्तेत पोहचले. त्यांनी देशभक्तीला सरकारभक्तीकशी जोडलं आहे. जो कोणी ही शासनापेक्षा वेगळा विचार करण्याचे धाडस करतो आहे, त्यांच्या राजकारणावर टीका करत आहे, जो आपल्या हक्कासाठी आवाज उठवतो आहे, अशा प्रत्येकालाच ते देशद्रोही आणि राष्ट्रद्रोही घोषित करीत आहेत. अम्बानी आणि अदानींसारख्यांच्या तुकडयांवर जगणारा कॉरपोरेट मीडियासुद्धा ह्या तथाकथित “देशभक्तीच्या” सुरात सूर मिसळवीत आहे आणि आपल्या चकचकीत वातानुकूलीत स्टूडिओमध्ये खटलाही चालवीत आहे.
हे एकूण प्रकरण जेएनयू (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली) मध्येे भारतविरोधी घोषणा दिल्यापासून तापले. सर्वोच्चा न्यायालयाच्या आदेशाचा या धार्मिक कट्टरतावादी फासीवादी गुंडांनी न्यायालयाच्या आवारात भंग केला. त्यात दिल्ली पोलीसांनी बघ्याची भूमिका घेतली. न्यायालयाच्या आवारात पत्रकारांवर आणि नागरिकांवर हल्लात केला गेला. त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. असं तर हिटलरच्या जर्मनीमध्ये आणि मुसोलिनीच्या इटलीमध्ये व्हायचं, जेव्हा कायद्याचंशासन संपलं होतं. आणि त्यावेळीसुद्धा अशाच प्रकारचे देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीचे ठेकेदार रस्त्यांवर गुंडगिरी करीत होते. अशा वेळी आम्ही तुम्हांला काही गोष्टींवर विचार करण्याचे आवाहन करीत आहोत.
जेएनयूमध्ये भारत विरोधी घोषणा देणारे काही जण म्हणजे अराजकतावादी तत्त्वे होती, हे आता सिद्ध झाले आहे. त्यांपैकी बहुतेकजण तर जेएनयूचे विद्यार्थीसुद्धा नव्हते. खरे तर आरोपींना पोलिस अजून अटकसुद्धा करू शकेलेले नाहीत. परंतु एक निरपराध विद्यार्थी कन्हैया कुमारला मात्र अटक करण्यात आली. त्याशिवाय इतर काही विद्यार्थ्यांवर खोटे खटले भरण्यात आले आहेत. त्यांना निशाणा कां बनवण्यात येत आहे, आपल्याला माहीत आहे का? कारण हे तेच विद्यार्थी आहेत ज्यांनी याआधी कामगारांचे शोषण, महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात आवाज उठवला होता. हे तेच विद्यार्थी आहेत ज्यांनी मोदी सरकारच्या विद्यार्थीविरोधी, कामगारविरोधी आणि गरीबविरोधी धोरणांना विरोध केला होता. अशात मोदी सरकार काही अराजकतावादी तत्वांच्या हालचालींचं नाटक करून या निरपराधी विद्यार्थ्यांना आणि संपूर्ण जेएनयूला निशाणा बनवत आहे. तेव्हा विचार करा की हे नक्की चाललंय काय? दिल्लीच्या मायापुरीमधील एका कामगाराचा काम करीत असताना मृत्यू झाला. त्यानंतर जेव्हा कामगारांनी न्यायाची आणि नुकसान भरपाईची मागणी केली तेव्हा त्यांच्यावरही पोलिसांनी लाठीमार केला. त्यांच्या नेत्यांवर देशविरोधी असण्याचा आरोप करण्यात आला. पुण्यातील एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांसोबतही हेच झालं. आणि जेव्हा जेव्हा आपल्या हक्कांसाठी देशातील कष्टकरी आणि कामगार आवाज उठवण्याचा प्रयत्न करीत आहेत तेव्हा त्यांच्यापैकी प्रत्येकासोबत हेच केले जात आहे.
देशद्रोह किंवा राष्ट्रद्रोहाची व्याख्या संविधानात दिली गेली आहे, हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. सरकारापासून ते देशातल्या सर्व पक्षांना ती बंधनकारक आहे. ही व्याख्या काय सांगते? तर कोणतीही व्यक्ती सरकारच्या निर्णयावर टीका करू शकते, त्याचा सनदशीर मार्गाने विरोध करू शकते, तसेच समाजातील कोणत्याही समुदायाच्या हक्कासाठी बोलू शकते. परंतु जर कुणी व्यक्ती सरकारविरुद्ध सशस्त्र विद्रोह किंवा हिंसक कारवाई करण्यात गुंतलेली असेल किंवा हिंसेसाठी प्रवृत्त करण्यात गुंतलेली असेल तर तिच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला जाऊ शकतो. मग वाट्टेल त्याला देशद्रोही आणि राष्ट्रद्रोही घोषित करण्याचा हक्क धार्मिक कट्टरतावादी फासीवाद्यांना कुणी दिला? विशेष म्हणजे, आज राष्ट्रभक्तीचे सर्टीफिकेट इतरांना देण्याचा ठेका घेणारे हेच लोक देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात तर देशाशी गद्दारी करीत होते. इंग्रजांच्या विरोधात लढण्याचे सोडूनच द्या, उलट त्यांच्यासाठी हेरगिरी करणे, माफीनामे लिहून देणे आणि राणीला सलामी देणे यांसारखी कामे यांनी केलेली आहेत. इतिहास त्याचा साक्षीदार आहे. १९२५ मध्ये आरएसएसची स्थापना झाल्यापासून १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आरएसएस काय करीत होती, हे आरएसएसचा कुणीही माणूस सांगू शकेल काय? राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रद्रोहाचे प्रमाणपत्र वाटणाऱ्यांनी पसरवलेल्या उन्मादाच्या पलीकडे जाऊन विचार करा. जर आज निरपराध पत्रकार, नागरिक, कामगार, विद्यार्थी, शिक्षक कोर्टापासून गल्लीबोळापर्यंत सर्वत्र या कट्टरतावाद्यांचा निशाणा ठरत आहेत. उद्या तुम्ही या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्हीसुद्धा त्यांचे बळी ठरणार नाही का?
विचार करण्यासारखी तिसरी गोष्ट ही की देश म्हणजे काही कागदावर बनवलेला नकाशा नसतो. देश हा त्यात राहणाऱ्या सामान्य कष्टकरी जनतेचा बनलेला असतो. आज मोदी सरकार आणि संघ परिवार जी महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शोषण आणि उत्पीडन देशातील कोट्यावधी कष्टकरी सामान्य लोकांवर, विद्यार्थ्यांवर, तरुणांवर, दलितांवर, स्त्रियांवर आणि वृद्धांवर लादत आहेत, तीच या सरकारची देशभक्ती आहे का? आणि या शोषण-उत्पीडनाच्या विरोधात जो आवाज उठवील, तो देशद्रोही आहे का? सध्या परिस्थिती अशीच आहे. जो कुणी सरकारच्या विरोधात आवाज उठवील, तो देशद्रोही आणि जो कुणी सरकारच्या प्रत्येक निर्णयावर नंदीबैलासारखा हो ला हो म्हणेल, तो देशभक्त. म्हणूनच तर सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने सरकारच्या प्रत्येक निर्णयावर मान डोलावण्यास नकार देणाऱ्या देशद्रोह्यांना वठणीवर आणण्यासाठी तऱ्हेतऱ्हेच्या गुंडांच्या टोळक्यांना रस्त्यावर मोकळे सोडले आहे. आणि त्यानंतर तुमचा प्रत्येक आवाज भारत माता की जय, वंदे मातरम् च्या कल्लोळात आणि लाथाबुक्क्यांच्या वर्षावात दाबून टाकला जात आहे. आणि हे तेच लोक आहेत जे त्यांच्या संघटनेतील एकासुद्धा अशा व्यक्तीचे नाव सांगू शकत नाहीत जी देशासाठी लढली आहे, जिने देशासाठी हौतात्म्य पत्करले आहे. हे कसले राष्ट्रभक्तीचा पुरावा देणार? तुम्ही अशा लोकांना राष्ट्रप्रेमाचे ठेकेदार होऊ द्याल का? ह्या गुंडांच्या गर्दीत कोण कोण सहभागी आहेत?
आज आपण हिटलरच्या अनुयायांचे खरे रूप ओळखले नाही आणि त्यांच्या विरोधात आवाज उठवला नाही, तर उद्या फार उशीर झालेला असेल. देशातील महागाई, बेरोजगारी आणि गरिबीची भीषण परिस्थिती पाहता, तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला न आलेल्या आपल्यापैकी प्रत्येकालाच आज ना उद्या आपल्या हक्कांसाठी आवाज उठवावा लागेल. अशा वेळी प्रत्येकालाच हे सरकार आणि त्याच्या संरक्षणाखाली काम करणाऱ्या गुंडांच्या टोळ्या देशद्रोही ठरवतील. विचार करावाच लागेल, आवाज उठवावाच लागेल. नाहीतर, फार उशीर झालेला असेल.
कामगार बिगुल, फेब्रुवारी २०१६