सोफी शोल – फासीवादाच्‍या  विरोधात लढणारी एका धाडसी मुलीची गाथा 

मुकेश त्यागी
मराठी अनुवाद – विशाल पाटील

जर्मनीच्या नाझी समुदायाने लाखोंच्या संख्येने यहूदींचा नरसंहार तर केलाच पण त्‍याचबरोबर  सन १९३३ ते १९४५ च्या दरम्यान हिटलरच्या फासीवादी शासनाचा विरोध करणारे ७७ हजार जर्मन नागरीकांना नाझींच्या मार्फत चालणाऱ्या विशेष किंवा तथाकथित जन न्यायालया आणि कोर्ट मार्शलद्वारे मृत्‍युची शिक्षा दिली. यामधील किती तरी लोकांना आपण ओळखत देखील नाही, परंतु म्युनिख विश्वविद्यालयच्‍या विद्यार्ध्यांचे  ‘व्हाईट रोज’ नाव असलेले नाझी विरोधी  एक भुमिगत  चळवळ चालवणारा समुह, आणि त्या समुहाचे नेतृत्व करणारी धाडसी मुलगी म्हणजे सोफी शोल आणि तिचे सहकारी लढवय्ये यांचा संघर्ष व बलिदान जनतेला चांगलाच परिचित आहे.  जीवशास्त्र व तत्‍वज्ञानाची २१ वर्षंाची सोफी व तिचा भाउ हान्स यांनी विश्वविद्यालयात हिटलर आणि युद्धाच्या विरोधात पत्रके वाटप करणे, त्यांना अटक, त्यांची लांबलचक चौकशी, कोर्ट कचेरी, न्‍याय मिळविण्‍यासाठी त्‍यांनी केलेला अतूट संघर्ष आणि त्यांचा तिसरा सहकारी क्रिस्टोफ प्रोब्स्टसह मृत्यूदंडाची शिक्षेची गोष्‍ट आहे – २००५ साली निर्माण झालेला जर्मन चित्रपट ‘सोफी शोल – द फाइनल डेज’. गेस्टपो आणि नाझी न्यायालयच्या फाइलीमध्‍ये या संबंधी केली गेलेली चौकशी, न्यायालयात उपलब्ध माहितीच्या आधारे सोफी शोल आणि सहकारी यांच्या द्वारा फासीवाद विरोधात जर्मन  जनतेला जागृत करण्याचा प्रयत्‍न, अशा धाडसी ऐतिहासीक घटनांचे चित्रण ह्या चित्रपटात उत्तम झाले आहे.

चित्रपट ‘सोफी शोल – द फाइनल डेज’ या मधील एक दृश्‍य

सोफी व तिचा भाऊ हान्स सारखेच ‘व्हाइट रोज’ ग्रुपचे बहूतेक तरुण सदस्य लोकशाहीवादी, उदार, मानवतावादी परीवारांमधून आलेले होते, परंतु त्यांनी सुरवातीस हिटलरच्या नाझी युवा संघटनेत उत्‍साहाने काम केलेले होते. त्या वेळेच्या जर्मन समाजाचे वर्णन त्यांच्या समुहात जीवंत राहिलेल्‍या ऐका सदस्याने असे केले होते, “प्रत्येक गोष्टि वर फासीवाद्यांचे नियंत्रण होते – प्रसार माध्यमे, हत्यारे, पोलिस, सेना, न्यायालय, दळणवळण, प्रत्येक स्‍तरांवरचे शिक्षण, सर्व सांस्कृतिक-धार्मिक संघटन.  कमी वयातच नाझी विचारांची शिकवण सुरू होत होती आणि ‘हिटलर युवा’ या युवा संघटनेच्या मार्फत पूर्ण बौद्धिक नियंत्रण मिळे पर्यंत शिकवण दिली जात होती. परंतु वैद्यकीय शाखेचा विद्यार्थी हान्स आणि त्याचे दोन मित्र यांनी सोवियत संघात, पूर्वेच्‍या मोर्चामध्‍ये सेनेच्या दवाखान्यात काम करत असतानां युद्धांचा दुष्‍परिणाम बघितला, तसेच त्यांना पोलंड आणि सोवियत संघ इत्यादि ठिकाणी निष्पाप यहूदीं व अन्‍य जनतेचा नरसंहाराच्या बातम्यासुद्धा माहित झाल्‍या होत्‍या.    या सर्व घटनांमुळे त्यांनी युद्ध व नाझीवादाच्या विरोधात जर्मन जनतेत प्रचार करण्‍याची आणि प्रतिकार संघटित करण्याची प्रेरणा मिळाली.

जुन १९४२  साली त्यांनी पत्रके छापून व भिंतीवर लिहून आपल्या कामाची सुरवात केली. हे लोक हाताने चालवले जाणाऱ्या साइक्लोस्टाइल मशिनचा वापर करून पत्रके छापत होते. पोस्टाने म्‍यूनिख व जवळपासच्या क्षेत्रात विद्यार्थी, शिक्षक व बुध्दीवादी लोकांना पाठवत, टेलिफोन बुथ आणि तत्सम ठिकाणी पुस्तकात ठेवत, अशा प्रकारे या पत्रकांचे वाटप केले जात होते.

यांनी आपल्‍या दुसऱ्या पत्रकात यहूदींवर होणाऱ्या अमानवीय अत्याचाराची निंदा या शब्‍दात केली होती, “पोलंडवर विजय मिळविल्यानंतर ३ लाख यहूदींचा अमानुष पध्दतीने रक्तपात केला. जर्मन लोकांचा मुर्खपणा व निष्काळजी पणा फासीवादाच्या अत्याचाराला अधिक प्रेरणा देत आहे. आम्ही सर्वजन ह्या गुन्‍ह्याच्‍या दोषापासुन अलिप्‍त राहू इच्छितो आणि आपल्‍या आंतरमनाला किंचीत देखील दु:ख न जाणवता अारामात आपले जीवन जगत आहोत. परंतु ह्या गुन्ह्यांतून आपण कधीच दोषमुक्त होऊ शकत नाही, आपण सर्व दोषी आहोत, दोषी आहोत, दोषी आहोत.”

सोफी शोल हिचा मुळ फोटो

जानेवारी १९४३  साली ‘व्हाइट रोज’ च्या पाचव्या पत्रक ‘जर्मन जनतेला आवाहन’ च्‍या ६ हजार प्रति छापल्या गेल्या, संघटनेच्या सदस्यांनी आणि समर्थकांनी म्यूनिखसह दक्षिण जर्मनीतल्या शहरांनमध्‍ये वाटप केले. नंतर, गेस्टापो द्वारा चौकशी दरम्‍यान सोफीने सांगितले की १९४२च्‍या उन्हाळ्या पासुनच संघटनेचे ध्येय जास्तीत-जास्त जर्मन जनतेपर्यंत पोहचणे हे होते, म्हणूनच पत्रकातुन संघटनेचे नाव बदलुन ‘जर्मन प्रतिकार आंदोलन’ असे केले. या वेळेपर्यंत ते ठाम झाले होते की जर्मनी युद्ध जिंकू शकत नाही, म्हणुन त्यांनी म्हटले “हिटलर युद्ध जिंकू शकत नाही, पण लांबवू शकतो.” त्यांनी नाझी अमानवीयता, साम्राज्‍यवाद आणि प्रशियाई सैन्यवादावर हल्ला केला आणि अभिव्‍यक्ति स्वातंत्र्य तसेच अपराधी हुकूमशाही राजसत्ते पासुन जनतेची सुरक्षा करण्यासाठी जर्मन प्रतिकार आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.

जानेवारी १९४३  च्या शेवटी स्टालिनग्राडच्या लढाईत जर्मन सैन्याची विनाशकारी हार व त्यांच्या आत्मसमर्पणा मुळे युद्धाची दिशाच बदलुन गेली आणि जर्मनीच्या ताब्यात असलेले सर्वच देशात प्रतिकार आंदोलने सुरू झाली. १३ जानेवरी १९४३  साली म्यूनिखचा नाझी पक्ष नेता याने विद्यार्थ्यांना कायर म्हटले म्हणुन मोठा उद्रेक झाला होता. त्या मुळे ‘व्हाइट रोज’च्या सदस्यांचा उत्साह अधिकच वाढला. स्टालिनग्राड च्या पराभवाची बातमी ऐकल्या नंतर त्यांनी शेवटचे सहावे पत्रक काढले “विद्यार्थी मित्रांनो” त्याच्यात घोषणा केली होती की  आपल्या प्रजेसाठी सर्वात घृणित आततायी राज्‍यकर्त्यासाठी निर्णयाचा क्षण येवून पोहचला आहे, आपल्याला स्टालिनग्राडच्या मृतकांची शपथ आहे. ३, ८ आणि १५ फेब्रुवारीला ह्या लोकांनी म्यूनिख विश्वविद्यालय व इतर इमारत्‍यांवर टिनच्‍या स्‍टेंसिल ने ‘डाउन विद हिटलर’ आणि ‘आझादी’ सारख्‍या घोषणा लिहल्या.

ह्या वेळी टपाला मार्फत पत्रके पाठवल्या नंतर, पत्रके शिल्लक होती परंतु पाकिट संपले होते, कागदाच्या कमतरतेमुळे मिळत ही नव्हते.त्या मुळे सोफी आणि हान्स शोल यांनी १८ फेब्रुवारीला सहकार्‍यांनी केलेल्‍या नकाराला डावलून पत्रके स्वतःच्या जबाबदारी वर विश्वविद्यालयात वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी ते दोघे एका सुटकेस मधे पत्रके घेवून गेले व क्‍लास सुरू असताना बंद दरवाज्‍याबाहेर पत्रके ठेवली. तरीही काही पत्रके शिल्लक राहिल्‍या मुळे  ते वरच्या मजल्यावर वाटण्‍यासाठी गेले. सोफीने अचानक वरूनच हॉल मधे शेवटची काही पत्रके फेकली व त्‍याचवेळी एका कर्मचाऱ्याने हे बघितले, तेव्‍हा त्‍यांना बाहेर जाताना अडवून गेस्टापो मार्फत अटक करण्यात आली. त्या वेळेस सातव्या पत्रकाची सामग्री हान्सकडे होती, तो त्याने नष्ट करण्याचा प्रयत्‍न केला परंतु यश आले नाही, पण सोफी आपल्या कडील पुरावे नष्ट करण्यात यशस्वी झाली. गेस्टापोमध्‍ये या प्रकरणाची चौकशी व तपास रॉबर्ट मोर नावाच्या अधिकाऱ्याने केली व सुरूवातीला त्याने सोफीला निर्दोष ठरवत सोडण्याचा आदेश दिला, परंतु हान्स ने सगळे कबूल केल्‍यामुळे तसेच इतर  पुरावे मिळाल्‍यामुळे  सोफी ने देखील कबूल केले आणि संघटनेच्या इतर सदस्यांना वाचवण्यासाठी सर्व जबाबदारी स्वता:वर घेतली.

२२ फेब्रुवारी १९४३ साली सोफी आणि हान्स शोल तसेच प्रोब्स्ट वर नाझींच्या राजकीय खटल्‍यांमध्‍ये अन्‍यायासाठी बदनाम ‘लोक न्यायालया’त खटला चालवला गेला. खोल चौकशी व खटल्‍यामध्‍ये न्यायाधीश फ्रेसलर याच्या धमकी नंतरही सोफीने शौर्यान्‍ो आणि दृढतापूर्वक न डगमगता उत्तर दिले, “आम्ही  जाणतो तसे तुम्ही देखील जाणता आहात की युद्ध हरले गेले आहे. परंतु तुम्ही तुमच्‍या कायरतेमुळे त्याचा स्विकार करणार नाही. न्यायाधीश रोलैंड फ्रेसलर ने त्या तिघांना देशद्रोही ठरविले व मृत्युदंडाची शिक्षा दिली. त्याच दिवशी त्यांना शिरच्छेद करण्याच्‍या यंत्राने गळा कापून मृत्युदंड दिला गेला. या शिक्षेचा सामना त्या तिघांनी बहादुरीने केला. जेव्हा गळ्यावर यांत्रिक करवत ठेवली तेव्हा सोफी म्हणाली “सुर्य अजुनही तेजोमय आहे” आणि हान्स ने ही “आझादी जिंदाबाद” ची घोषणा दिली.

‘व्हाइट रोज’ संघटनेच्या बहुतेक सभासदांना अटक करून वेगवेगळे खटले चालवत कोणाला मृत्यूदंड तर कोणास जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. जरी त्‍यांना दुष्‍ट, गद्दार ठरवून शिक्षा दिल्‍या होत्‍या आणि  जर्मनी मधील वृत्तपत्रात अशाच बातम्‍या छापल्‍या गेल्‍या परंतु ह्यांचे समर्थक एवढे वाढलेले होते की जर्मन नाझी अधिकारी या बातम्या व अफवा दाबून ठेवू शकले नाही आणि ‘व्हाइट रोज’ संघटनेच्या सभासदांनी अन्‍य जर्मनांना प्रतिकारासाठी प्रेरित केले. त्यांचा प्रतिकार व त्यांना मिळालेल्‍या शिक्षेच्या बातम्या जर्मनी बाहेर गेल्यावर सोवियत लाल सेनाने ‘व्हाइट रोज’ च्या स्वातंत्र्याच्‍या संघर्षांच्या सन्मानार्थ एक पत्रक काढत ह्यांचे अपुरे राहिलेले सहावे पत्रक ‘म्यूनिखच्या विद्यार्थ्यांचे घोषणा पत्र’च्या नावाने प्रकाशित केले व मित्र राष्ट्रांच्या विमानांच्या मदतीने संपुर्ण जर्मनीत फेकले. चित्रपट आकाशातून पडणाऱ्या पत्रकांच्‍या दृष्यासोबत संपतो.

कामगार बिगुल, एप्रिल २०१७