नकली देशभक्तीचा कलकलाट आणि लष्करातील जवानांचे उठणारे सूर
तपीश मैंदोला
मराठी अनुवाद :- गजानन कदम
साधारणता लोक लष्कराला, गायीला आणि गंगेला पवित्र मानतात.पावित्र्याचं हे मिथक लोकांच्या मन आणि मेंदूत खोलवर रुजलेलं आहे. सरकार, लष्कर, मीडिया आणि अंधराष्ट्रवादी पार्टी इत्यादींच्या प्रचाराने या भ्रमाला आणखी खोलवर रुजवण्यामध्ये मोठी भूमिका पार पाडली आहे. हेच कारण आहे की जेव्हा कधी संयोगाने अशी एखादी घटना घडते जी लष्कराच्या पवित्रतेच्या मिथकावर आघात करते, तेव्हा पहिल्या प्रतिक्रियेच्या स्वरूपात लोक घटनेच्या सत्यतेला स्विकारण्याचाही प्रयत्न करत नाहीत, मात्र अशा गोष्टींना अपवाद समजून स्वतःला त्या पासून दूर करण्याचा प्रयत्न करतात. लष्कर, सरकार आणि मीडियाची तर गोष्टच वेगळी, सामान्य लोक सुद्धा स्वीकारत नाहीत की भारतीय लष्करामध्ये भ्रष्टाचार, अस्पृश्यता आणि वर्ग-भेदाचा बोलबाला आहे. लष्कर ना केवळ सामान्य जनतेचं दमन-उत्पीडन करत आहे तर वर्गवर्चस्वतेच्या या संस्थेमध्ये अधिकारी सैनिकांचं शोषण सुद्धा करत असतात.
थोड्याच दिवसापूर्वी एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये आर्मीच्या सहायक व्यवस्थेचा भाण्डाफोड केला होता. त्या विडिओमध्ये असलेले आर्मी जवान रॉय मैथ्यू यांचे शव नंतर महाराष्ट्राच्या देवळाली कॅम्पमध्ये संदिग्ध परिस्थितीत आढळले. ह्या घटने अगोदर काही दिवसापूर्वीच बीएसएफचा जवान तेज बहादूर याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड करून लष्करात होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील भ्रष्टाचाराकडे सगळ्यांचे ध्यान आकर्षित केलं. त्या नंतर सीआरपीफ आणि लष्करातील जवानांचे आणखी दोन व्हिडीओ आले तरी ग्रह मंत्रालय आणि लष्करानं निर्लज्जपणे भ्रष्टाचाराच्या आरोपांना फेटाळून लावलं आहे. काही ‘देशभक्तांनी’ या जवानांना देशद्रोही घोषित केले तर काहींनी लष्कराला बदनाम करण्याची योजना असल्याचे सांगितले.
आपल्याला विसरून चालणार नाही की या बातम्या अधिक चर्चेत येण्याचं कारण सोशल मीडियावर त्या वायरल झाल्या होत्या. प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक मीडिया सारख्या माध्यमातून दुर्लक्षित करण्यासारखं राहील नाही. अश्या घटना भारतीय लष्करासाठी नवीन नाहीत. देशाच्या सुरक्षेच्या नावावर त्या दाबल्या जातात. कदाचित वाचकांना आठवत असेल की १७ ऑगस्ट २०१२ या दिवशी के. मैथ्यू नावाचा मिलिट्री इंजिनिअरींग रेजिमेंटचा एक जवान दिल्ली मध्ये २०० फूट उंच टाॅवरवर चढला होता. त्याची मागणी होती की संरक्षण मंत्र्याला भेटून आपल्या सोबत होणाऱ्या भेदभावा बद्दल तक्रार करायची होती. त्याला संरक्षण मंत्र्याला भेटू दिले नाही. पाचव्या दिवशी जेव्हा तो भूकेने व तहानेने व्याकूळ होऊन बेशुद्ध झाला तेंव्हा त्याला खाली उतरवून दवाखान्यात दाखल केलं. कोणालाही माहीत नाही की या घटनेनंतर त्या शिपायाचे आणि त्याच्या तक्रारीचे काय झालं. ८ ऑगस्ट २०१२ ला जम्मू-कश्मीर मधील सांबा येथे कार्यरत तिरूअनंतपूरमच्या के. अरुण वी. ने अधिकाऱ्या कडून झालेल्या छळाला कंटाळून स्वतःवर गोळी झाडून घेतली. त्याच्या आत्महत्येची बातमी पसरताच युनिट मध्ये कडाडून विरोध झाला आणि अधिकाऱ्यांनी घरांमध्ये स्वतःला बंद करून आपला जीव वाचवला. जवळच्या क्षेत्रामधून दोन युनिट पाठवून या विद्रोहाला दाबून टाकण्यात आलं. जवान आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांमध्ये होणाऱ्या खुनी संघर्षाचं हे एकमेव उदाहरण नाही.
परिस्थिती किती वाईट आहे याचा अंदाज सुरक्षेवर गठीत केलेल्या संसदीय समितीच्या ३१ व्या रिपोर्ट वरून लावू शकतो. हा अहवाल सांगतो की २००७ पासून २०१० च्या कालखंडात जिथे २०८ जवानांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यु झाला तिथे ३६८ नी आत्महत्या केली आणि १५ ते ३० नी आत्महत्येचा असफल प्रयत्न केला. वास्तविकता ही आहे की लष्कराचे अधिकारी सैनिकांसोबत त्याच प्रकारचे वर्तन करतात जसं वर्तन मालक आपल्या नोकरांसोबत करतात. या गोष्टींना नीट समजण्यासाठी माजी सैनिकांच्या त्या मागण्यांकडे पाहणे आवश्यक आहे, पेन्शन आंदोलनाच्या वेळेस जंतर-मंतरवर आंदोलन करत असताना, ‘वॉईस ऑफ एक्स सर्विसमॅन’ नावाच्या सैनिकांच्या एका संघटनेने १९ सूत्री मागणी केल्या होत्या त्यातल्या चार मागण्या लष्करात पसरलेली असमानता आणि होणाऱ्या त्रासाचं प्रातिनिधीक उदाहरणे आहेत. या मागण्या खालील प्रमाणे आहेत.
१. अस्पृश्यता आणि राहण्याच्या जागेतील भेदभाव बंद करणे.(या मागणीचे कारण आहे की लष्करातील सैनिकांसाठी घर बांधणी संस्था ‘आर्मी वेल्फेयर हाउसिंग ऑर्गनायझेशन’ अधिकारी आणि सैनिकांच्या उपयोगासाठी वेगवेगळी क्लष्टर बांधतात.)
२. सेवा घेणे बंद करणे. (अधिकारी आपल्याला झाडू लावणे, साफ-सफाई करणे, दुध मागवणे, स्वयंपाक बनवणे, कपडे धुणे, बूट पॉलिश इत्यादी कामे करवून घेतात.)
३. अधिकारी आणि सैनिकांची बाथरुम वेगवेगळी का?
४. लष्करातील भ्रष्टाचार संपवणे आणि अशी संस्था निर्माण करणे जिथे सैनिकांना भयभीत न होता अधिकाऱ्याची तक्रार करता यावी.
तर अशी आहे भारतीय लष्करातील सत्य परिस्थिती. जे लोक याला पवित्र आणि आदर्श संस्था मानतात त्यांना हे सर्व बघून धक्का बसू शकतो. खुप लोकांचा विश्वास आहे की जवान लष्करामध्ये देशभक्तीसाठी जातात. एक संशोधन सर्वे सांगतो की ७७ टक्के लोक लष्करामध्ये वेतन आणि सुख सुविधेच्या आकर्षणामुळे जातात.१७ टक्के लोक यासाठी जातात की या पेशामध्ये समाजात त्यांना मोठा मान मिळतो आणि ६ टक्के लोक यासाठी जातात की देशाची सेवा करायची असते.
प्रत्यक्ष परिस्थिती ओरडून सांगत आहे की भारतीय समाजातील इतर् सर्व वर्गसंस्थे प्रमाणे भारतीय लष्कर सुद्धा आतून कुजत आहे. श्रीमंत वर्गातील खात्या-पित्या घरचे काही थोडे-अधिक लोक यामध्ये अधिकारी होतात आणि उद्धवस्त होत असलेले शेतकरी आणि मजूर किंवा निम्न मध्यवर्गातील मुले-मुली शिपाई आणि लिपिक होत असतात. इतिहास साक्षी आहे की जेंव्हा तेलंगाणा, तेभागा, नक्सलबाडीचे मोल-मजूरी करणार्यांनी आणि शेतकऱ्यांनी अन्याय आणि शोषणा विरुद्ध प्रत्यक्ष कारवाई सुरु केली तेंव्हा भारताची लुट करणाऱ्या राज्यकर्त्यांनी आपली सत्ता वाचवण्यासाठी याच भारतीय लष्कराला जनतेचं दमन करण्यासाठी मैदानात उतरवलं होतं. आज पण शेतकरी आणि आदिवासींची जंगले-जमिनी व त्या खाली लपलेल्या खनिज संपत्तीच्या लुटीला सुरक्षित करण्यासाठी भारताच्या खुनी सरकारने आपल्याच लोकांच्या विरोधात भारतीय लष्कराला मैदानात पाचारण केल आहे.
न्यायाचा आदर करणाऱ्या प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे की भारताच्या लष्करातील शिपायाच्या वर्दीमागे कामगार, शेतकऱ्याच्या घरातून येणारा एक नवयुवक उभा आहे. ज्याचा उपयोग त्याच्याच वर्ग-भावांचा प्रतिकार दाबून टाकण्यासाठी केला जातोय. मोबदल्यात तो अधिकाऱ्याच्या हाताखाली स्वतः वर्ग शोषणाचा शिकार होतो. आवाज उठवणाऱ्या सैनिकांना देशभक्त आणि देशद्रोह्याच्या चष्म्यातून पहाणे बंद केलं पाहिजे आणि त्यांच्या प्रत्येक योग्य त्या जनवादी मागणीचे समर्थन करण्यासोबतच, लष्कराच्या प्रत्येक जनविरोधी, दमनकारी कारवाईला निर्भिकपणे उघडे पाडून विरोध केला पाहिजे.
कामगार बिगुल, एप्रिल २०१७