मालवणी दारूकांडाच्या निषेधार्थ दिल्लीतही महाराष्ट्र भवनसमोर निदर्शन

Delhi protestदि. ७ जुलै रोजी नौजवान भारत सभेने मुंबईत १७ जूनला झालेल्या मालवणी दारूकांडाच्या निषेधार्थ दिल्लीतील महाराष्ट्र भवनसमोर निदर्शन केले. नौजवान भारत सभातर्फे बोलताना सनी यांनी सांगितले की सरकारच्या अनास्थेचा जोरदार निषेध झाला पाहिजे. मृतांच्या कुटुंबियांना मदत देणे टाळण्यासाठी सरकार मृतांचा आकडादेखील चुकीचा सांगत आहे, मुंबईत झालेल्या निषेधानंतर सरकारने जाहीर केलेली प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत लोकांपर्यंत पोहोचविण्यातही सरकार दिरंगाई करीत आहे व पीडितांचे बँक खाते नसल्याचे कारण देत टाळाटाळ करीत आहे. त्याचबरोबर बेकायदेशीर दारूचा व्यापार करणाऱ्यांनासुद्धा पाठीशी घालण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे. बिगुल मजदूर दस्ताच्या वतीने बोलताना गजेंद्र यांनी सांगितले की फडणवीस सरकारने या प्रकरणात लक्ष घालून लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे. मृतांपैकी बहुतेक जण मजुरी करणारे, लहानसहान व्यवसाय करणारे व दुर्बल आर्थिक पाश्र्वभूमी असणारे आहेत, म्हणूनच ना मीडिया या घटनेची भीषणता योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवीत आहे, ना सरकार संवेदनशील दिसत आहे. सरकारची असंवेदनशीलता सरकारमधील घटक पक्ष असलेल्या रीपब्लिकन पार्टीद्वारे पीडितांना साखर व पीठाच्या केलेल्या वाटपाच्या तमाशावरून दिसून येत आहे. सरकारवर योग्य मदत देण्याबाबत दबाव निर्माण करण्याऐवजी आरपीआय (ए) प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार करीत आहेत. नौजवान भारत सभातर्फे आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले ज्यामध्ये या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी व्यक्तींना कडक शिक्षा करण्याची तसेच पीडितांना किमान दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याच्या मागणीचा समावेश आहे.

कामगार बिगुल, ऑगस्‍ट २०१५