पॅरिस कम्युन: पहिल्या मजूर राज्याची सचित्र कथा (पुष्प पहिले)
आज भारतातच नाही, तर संपूर्ण दुनियेत कामगार भांडवली लुटखोरांच्या वेगवान होत चाललेल्या हल्ल्यांचा सामना करत आहेत, आणि कामगार आंदोलन विखुरलेपण, साचलेपणा, आणि हताशेने ग्रासलेले आहे. अशामध्ये इतिहासाची पाने उलटून कामगार वर्गाच्या गौरवशाली संघर्षांपासून शिकण्याचे आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचे महत्व फार वाढते. आजपासून 150 वर्षे अगोदर, 18 मार्च 1871 ला फ्रांसची राजधानी पॅरिस मध्ये पहिल्यांदा कामगारांनी आपले शासन कायम केले. याला पॅरिस कम्युन म्हटले गेले. त्यांनी शोषकांद्वारे पसरवल्या जाणाऱ्या या विचारांना ध्वस्त केले की कामगार राज्यकारभार चालवू शकत नाहीत. पॅरिसच्या बहादूर कामगारांनी फक्त भांडवली सत्तेच्या रथालाच उलटवले नाही तर 72 दिवसांच्या शासनाच्या दरम्यान येणाऱ्या दिवसांचे एक छोटे मॉडेल जगासमोर प्रस्तुत केले आणि दाखवले की समाजवादी समाजामध्ये भेदभाव, असमानता, आणि शोषण कशाप्रकारे समाप्त केले जाईल. पुढे चालून 1917 च्या रशियन कामगार क्रांतीने या क्रांतीचा पुढचा टप्पा रचला.
कामगार वर्गाच्या या साहसी कारवाईने फक्त फ्रांसमधीलच नाही तर जगातील भांडवलदारांचे काळीज थरथरले. त्यांनी कामगारांच्या पहिल्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी जीवतोड प्रयत्न केले आणि शेवटी कामगारांच्या कम्युनला त्यांनी रक्ताच्या नद्यांमध्ये न्हाऊन काढले. पण कम्युनचे सिद्धांत अमर झाले.
पॅरिस कम्युनच्या पराजयातूनसुद्धा जगातील कामगार वर्गाने महत्वाचे धडे घेतले. पॅरिसच्या कामगारांचे बलिदान कामगार वर्गाला सतत आठवण देत राहील की भांडवलशाहीला नष्ट केल्याशिवाय त्यांना मुक्ती मिळू शकत नाही.
पॅरिस कम्युनला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘कामगार बिगुल’ च्या या अंकापासून आम्ही जगातील पहिल्या कामगार राज्याच्या सचित्र कथेची सुरूवात करत आहोत. ‘मजदूर बिगुल’ मध्ये मार्च 2012 पासून प्रकाशित झालेल्या धारावाहिक कथेचा अनुवाद पुढील अंकांमध्ये आम्ही देत राहू. — संपादक मंडळ
भांडवलाच्या पाशवी जुलमी सत्तेविरोधात कामगार लढायला शिकले
1. अठराव्या शतकाच्या शेवटापर्यंत युरोपातील भांडवलदार वर्गाचा जबरदस्त विकास झालेला होता. लुटीसाठी चाललेल्या वसाहतिक युद्धांमधून आणि कामगारांच्या भयानक शोषणातून ते अमर्याद संपत्ती गोळा करत चालले होते. दुसरीकडे, कामगारांची अवस्था अत्यंत खराब होती आणि त्यांना जीवनात पदोपदी अमानवी अडचणींचा सामना करावा लागत होता. त्या काळापर्यंत कामगारांची संख्या बरीच वाढलेली होती पण त्यांना राजकीय संघर्षांचा कोणताही अनुभव नव्हता आणि ते असंघटित होते. आपल्या स्थितीची जाणीव आणि ऐतिहासिक भुमिकेबद्दलची जाणीवही त्यांच्यामध्ये फारच कमी होती. कामगारांच्या असहाय स्थितीचा आणि स्वस्त श्रमशक्तीच्या उपलब्धतेचा फायदा घेऊन कारखानदार त्यांना पिळवटून काढत होते. कामगारांना रोज सोळा ते अठरा तास काम करावे लागे आणि स्त्रिया तसेच लहान मुलांना सुद्धा बरेच काम करावे लागत असे. भल्या पहाटे कामगारांना कारखान्यात जावे लागे आणि रात्री उशिराच ते बाहेर पडू शकत. अनेक महिने तर त्यांना प्रकाशाचे दर्शनही होत नव्हते. घाणेरड्या आणि प्रदूषणकारी जागी न हलता एकाच स्थितीत तासन-तास काम केल्यामुळे ते अनेक आजारांनी ग्रस्त होत आणि अपघातांमध्ये मरणे किंवा अपंगत्व अगदी सामान्य बाब झालेली होती. अठराव्या शतकाच्या शेवटी इंग्लंडमध्ये कामगारांच्या एकूण मृत्यूपैकी 40 टक्के टी.बी. मुळे होत होते. जवळपास याच वेळी फ्रांसमध्ये कामगारांचे सरासरी आयुर्मान फक्त 35 वर्षांवर आलेले होते. कंबरतोड मेहनत, नरकासारख्या स्थितीत राहणे, सतत अर्धपोटी राहणे, आणि गरिबीच्या अवस्थेने कामगार वर्गाच्या भौतिक आणि आत्मिक विनाशाचा धोका निर्माण केला होता.
कापड गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची मोठी संख्या अधू होत जाई कारण अंदाधुंद वेगाने चालणाऱ्या मशिनी त्यांच्याकडून गुलामासारखे काम करवत. ‘इंग्लंडमधील कामगार वर्गाची दशा’ या आपल्या प्रसिद्ध पुस्तकात फ्रेडरिक एंगल्स लिहितात की कपडा उद्योगाच्या सर्वात मोठ्या शहरात, मॅंचेस्टर मध्ये, सडकेवर थोडे चालले तरी किमान 3-4 लोक असे मिळत ज्यांचे कोणते ना कोणते अंग तुटलेले असे! दमटपणा, उष्णता आणि दुर्गंधाने भरलेल्या कारखान्यांमध्ये 14-16 तास सतत काम करत राहिल्याने कामगार कमी वयातच मृत्यूमुखी पडत. एंगल्स लिहितात, “ज्या स्थितींमध्ये कामगार राहतात आणि काम करतात त्यामुळे लवकरच त्यांचे शरीर ठिसूळ बनते. त्यांच्यापैकी अनेकजण वय 40 होईपर्यंत निकामी होऊन जातात, काही 45 वयापर्यंत काम करत राहतात, पण 50 वयापर्यंत कोणीच टिकत नाही. अनेक जण तर शरीर कमजोर झाल्यामुळे निकामी बनत तर अनेक कामगार यामुळे कामावरून काढले जात कारण की सुताच्या टकळ्यांच्या बारीक धाग्यांवर कमी प्रकाशात सतत नजर खिळवून ठेवल्यामुळे त्यांना अंधत्व येई.” एंगल्सने हे पुस्तक 1844 ला लिहिले जेव्हा अनेक संघर्षांनंतर कामगारांच्या स्थितीमध्ये थोडा सुधार झाला होता. यावरुनच अंदाज लावता येईल की एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीला त्यांची स्थिती कशी असेल.
2. शेवटी, स्वत:ला वाचवण्याच्या सहजबोधातून कामगारांनी आपल्या मालकांविरोधात लढणे चालू केले. पण एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीला कामगारांमध्ये ही चेतना नव्हती की त्यांच्या त्रासाला आणि संकटांना कोण जबाबदार आहे. अगोदर त्यांना असेच वाटले की मशिनींंमुळे त्यांची अवस्था इतकी असह्य झाली आहे. इंग्लंडच्या मोठ्या औद्योगिक शहरांमध्ये—नॉटींघम, यॉर्कशायर, आणि लॅंकशायर मध्ये—1811मध्ये कामगारांनी मशीन नष्ट करण्याचे सुनियोजित अभियान चालू केले. या लोकांचा म्होरक्या ‘जनरल लुड्ड’ नावाचे एक काल्पनिक पात्र होते. असे म्हणतात की त्याचे नाव नेड लुड्ड या कामगाराच्या नावावरून पडले होते, ज्याने या आंदोलनाची सुरूवात केली होती. कामगारांच्या तुकड्या कारखाना मालकांच्या विरोधात हिंसक कारवाया करत, कारखान्यांना आग लावत, आणि मशिनींचे छोटे-छोटे तुकडे करत. पोलिस त्यांना थांबवण्यात अपयशी ठरले तेव्हा कारखाना मालकांच्या मागणीवरून सैन्याला पाचारण केले गेले. त्यांना चिरडण्यासाठी संसदेने कडक कायदे बनवले ज्यानुसार 17 कामगारांना फाशी दिली गेली आणि अनेकांना हजारो मैल दूर, ऑस्ट्रेलियाला पाठवले गेले. हळूहळू कामगारांना समजले की त्यांच्या समस्यांचे कारण मशीन नाहीत आणि मशीन नष्ट करून त्यांचे जीवन चांगले होणार नाही. असे असले तरी बराच काळ मशिनींवर आपला राग काढण्याचे सत्र तुरळकपणे चालूच राहिले. कार्ल मार्क्सने लिहिल्याप्रमाणे: “बराच काळ बेतल्यानंतर आणि बराच अनुभव आल्यानंतर कामगार मशीन आणि भांडवलाद्वारे मशिनीच्या उपयोगात फरक करू शकले आणि नंतर त्यांनी आपल्या प्रहाराच्या निशाण्यावर उत्पादनाच्या भौतिक अवजारांऐवजी त्या विशिष्ट सामाजिक व्यवस्थेला बनवणे शिकले जी या अवजारांचा वापर करते.”
3. युरोपातील दुसरा मोठा औद्योगिक देश असलेल्या फ्रांस मध्ये सुद्धा कामगारांची अवस्था इंग्लंडमधील कामगारांसारखीच असह्य होती. फ्रांसमधील दुसरे मोठे शहर लिऑं हे रेशीम उद्योगाचे केंद्र होते. नोव्हेंबर 1831 मध्ये आपल्या भयंकर गरिबीने त्रस्त मजुरांनी मजुरीच्या दराच्या प्रश्नावर विद्रोह केला. हजारो कामगारांनी सैन्याच्या शस्त्रागारावर हल्ला चढवून हत्यारं लुटली आणि सैनिकी तुकड्यांना पळवून शहर ताब्यात घेतले. त्यांनी काळे बॅनर घेऊन मोर्चा काढला, ज्यावर लिहिले होते, “आम्ही जगण्याच्या आणि काम करण्याच्या अधिकारासाठी लढत-लढत मरायला तयार आहोत!”. राजधानी पॅरिसवरून पाठवलेल्या 20,000 सैन्याने या विद्रोहाला निर्दयपणे चिरडले. पण बंडाची आग मात्र आत धगधगतच राहिली. कामगारांनी आपल्या गुप्त सोसायट्या (गट) बनवण्याचे सत्र सुरू केले, ज्यांमध्ये कामगार आपल्या अवस्थेबद्दल आणि तिला बदलण्यासाठी संघर्षाबद्दल चर्चा करत. फक्त तीन वर्षांनंतर, 1834 मध्ये, लिऑंच्या विणकरांनी पुन्हा एकदा विद्रोह केला. फेब्रुवारी 1834 मध्ये, कारखाना मालकांनी हे म्हणत मजुरी घटवण्याचे प्रयत्न सुरू केले की आता मजूर पूर्वीपेक्षा खूप जास्त कमावत आहेत आणि त्यामुळे उद्योगांच्या वाढीला अटकाव होत आहे.
याच्या उत्तरात, एप्रिल 1834 मध्ये कामगार पुन्हा सडकेवर उतरले. त्यांचे दमन करण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा त्यांनी शस्त्रागारावर हल्ला करत हत्यारं लुटली आणि सैन्याला शहर सोडून जाण्यासाठी मजबूर केले. यावेळी कामगार अधिक संघटित होते आणि त्यांच्या मागण्यांमध्ये कामाच्या चांगल्या स्थितीसोबतच राजेशाही संपवून गणतंत्राची स्थापना करण्याची मागणीही सामील होती. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी स्थापित झालेल्या राष्ट्रीय गार्डच्या (सैनिकी) तुकड्यांनी सुद्धा कामगारांना साथ दिली. संपूर्ण शहरावर विद्रोहींचा कब्जा स्थापित झाला. पॅरिस मधून पाठवलेल्या सैन्यासोबत मजुरांची एक आठवडाभर लडाई चालूच राहिली. तोफांच्या भडिमाराने आणि शेकडो मजुरांच्या हत्याकांडासहीत शेवटी या विद्रोहाला सुद्धा चिरडले गेले. 10,000 पेक्षा जास्त कामगारांना कैद करून पॅरिसला नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर खटला चालवून त्यांना अनेक वर्षे तुरूंगाची अथवा देशातून निष्कासित करण्याची शिक्षा दिली गेली. या विद्रोहाने हे दाखवले की कामगार किती वेगाने राजकीय दृष्ट्या जागरूक होत होते.
4. सुरूवातीच्या काळात जेव्हा कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप करणे चालू केले तेव्हा त्यांच्याकडे अशी कोणतीही संघटना नव्हती जी संपादरम्यान निर्माण होणाऱ्या एकजुटतेला कायम ठेवेल. कामगार वर्गाच्या सर्व संस्था आणि युनियन बेकायदेशीर मानल्या जात आणि यामुळे कामगारांनी गुप्त सोसायट्या बनवणे चालू केले. हळूहळू त्यांची संख्या आणि सक्रियता वाढत गेली. कामगारांच्या संघर्षामुळे शेवटी इंग्लंडच्या सरकारला 1824 मध्ये त्या कायद्यांना रद्द करावे लागले जे संघटना बनवण्यास प्रतिबंध करत होते. यानंतर लवकरच उद्योगाच्या प्रत्येक शाखेमध्ये ट्रेड-युनियन्स बनल्या ज्या भांडवलदार वर्गाच्या अत्याचार आणि अन्यायापासून कामगारांना वाचवण्याचा प्रयत्न करू लागल्या. त्यांचे उद्दिष्ट होते: सामुहिक कराराने मजुरी ठरवणे, मजुरीमध्ये शक्य तेवढी वाढ करवणे, कारखान्यांच्या प्रत्येक शाखेमध्ये मजुरीचा समान स्तर स्थापित करणे. अशा अनेक युनियन्सनी मिळून राष्ट्रीय स्तरावर कामगारांना एकजूट करण्याचा प्रयत्न करणे सुरू केले. युनियन्सच्या संघर्षाचे मार्ग होते—संप, संप तोडणाऱ्या मजुरांचा सामना करणे, आणि युनियन बाहेरील कामगारांना सामील होण्यासाठी मनवणे. युनियन्सच्या कारवायांनी कामगारांची चेतना आणि संघटितपणा वेगाने वाढू लागला.
5. संपांची घोषणा, ट्रेड युनियन्सची स्थापना, युनियन्सचे क्षेत्रीय संघटनांमध्ये आणि नंतर राष्ट्रीय संघटनांमध्ये एकत्र येणे, आणि त्यानंतर अनेक युनियन्सनी मिळून तात्पुरत्या संघटना बनवण्याचे काम कष्टकऱ्यांच्या राजकीय संघर्षासोबत सतत चालू राहिले आणि याने 1836-37 च्या आर्थिक संकटानंतर गंभीर हालचालींचे रूप धारण केले. 1837 मध्ये कामगारांच्या नेत्यांनी एक मागणीपत्रक—चार्टर—तयार केला ज्याद्वारे संसदेसमोर मागण्या मांडल्या गेल्या. यानंतर त्यांनी या मागणीपत्रकावर स्वाक्षऱ्या घेणे चालू केले. तीन वेळा, 1839, 1842 आणि 1848 मध्ये, हे मागणीपत्रक संसदेला दिले गेले आणि प्रत्येक वेळी त्यावर मागच्या वेळेपेक्षा जास्त स्वाक्षऱ्या होत्या. पहिल्यांदा 12 लाख स्वाक्षऱ्या जुळवल्या गेल्या, दुसऱ्यांदा 33 लाख आणि तिसऱ्यांदा जवळपास 50 लाख. या मागण्यांच्या समर्थनात आंदोलन करण्यासाठी नॅशनल चार्टीस्ट असोसिएशनची स्थापना केली गेली. या संघटनेचे उद्दिष्ट कारागीर आणि कष्टकरी वर्गाच्या मागण्या उचलणे होते आणि हिला कामगारांचा पहिला राजकीय पक्ष म्हटले जाऊ शकते.
स्वाक्षऱ्या घेणे आणि मागणीपत्रकाशी जोडलेल्या राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर चालणाऱ्या वाद-चर्चांमुळे कामगार आंदोलनाचा जबरदस्त राजकीय विकास झाला. कामगार आणि त्यांची कुटुंबं संध्याकाळी मशालींच्या उजेडात एकत्र होऊन राजकीय भाषण ऐकत असत आणि परिस्थितीवर चर्चा करत. रात्रीच्या वेळी ब्रिटनमधील शहरांच्या सडकांवर चार्टिस्टांचे भव्य मोर्चे निघत. कामगारांनी पहिल्यांदा अनुभव घेतला की ते जेव्हा मिळून आणि संघटित पद्धतीने काही करतात तेव्हा त्यांची शक्ती किती जबरदस्त बनते. जसजसे चार्टीस्ट आंदोलन पुढे गेले, कामगार आपल्या यश-अपयशांपासून धडे घेत आसपासच्या दुनियेची जास्त चांगली समजदारी मिळवत गेले आणि बऱ्याचशा भ्रमांपासून मुक्तही होत गेले. पण चार्टीस्ट नेते अजूनही कामगार वर्गाच्या भुमिकेला आणि संघटित होण्याच्या गरजेला योग्यरित्या समजू शकत नव्हते. चार्टीस्ट आंदोलन आपल्या प्रभावाचा पूर्ण उपयोग करण्यात अपयशी राहिले आणि 1848 नंतर उतरणीला लागले. पण हे इतिहासामध्ये सर्वहारा वर्गाचे पहिले व्यापक राजकीय आंदोलन होते आणि ते एक प्रेरणादायी उदाहरण बनले. चार्टीस्ट आंदोलनानंतर कामगार वर्गाच्या मुक्ती-संघर्षाने एका नवीन आणि अधिक उन्नत पातळीवर प्रवेश केला.
(क्रमश:)
कामगार बिगुल, मार्च 2021