पॅरिस कम्युन: पहिल्या मजूर राज्याची सचित्र कथा (पुष्प दुसरे)

आज भारतातच नाही, तर संपूर्ण दुनियेत कामगार भांडवली लुटखोरांच्या वेगवान होत चाललेल्या हल्ल्यांचा सामना करत आहेत, आणि कामगार आंदोलन विखुरलेपण, साचलेपणा, आणि हताशेने ग्रासलेले आहे. अशामध्ये इतिहासाची पाने उलटून कामगार वर्गाच्या गौरवशाली संघर्षांपासून शिकण्याचे आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचे महत्व फार वाढते. आजपासून 150 वर्षे अगोदर, 18 मार्च 1871 ला फ्रांसची राजधानी पॅरिस मध्ये पहिल्यांदा कामगारांनी आपले शासन कायम केले. याला पॅरिस कम्युन म्हटले गेले. त्यांनी शोषकांद्वारे पसरवल्या जाणाऱ्या या विचारांना ध्वस्त केले की कामगार राज्यकारभार चालवू शकत नाहीत. पॅरिसच्या बहादूर कामगारांनी फक्त भांडवली सत्तेच्या रथालाच उलटवले नाही तर 72 दिवसांच्या शासनाच्या दरम्यान येणाऱ्या दिवसांचे एक छोटे मॉडेल जगासमोर प्रस्तुत केले आणि दाखवले की समाजवादी समाजामध्ये भेदभाव, असमानता, आणि शोषण कशाप्रकारे समाप्त केले जाईल. पुढे चालून 1917 च्या रशियन कामगार क्रांतीने या क्रांतीचा पुढचा टप्पा रचला.

कामगार वर्गाच्या या साहसी कारवाईने फक्त फ्रांसमधीलच नाही तर जगातील भांडवलदारांचे काळीज थरथरले. त्यांनी कामगारांच्या पहिल्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी जीवतोड प्रयत्न केले आणि शेवटी कामगारांच्या कम्युनला त्यांनी रक्ताच्या नद्यांमध्ये न्हाऊन काढले. पण कम्युनचे सिद्धांत अमर झाले.

पॅरिस कम्युनच्या पराजयातूनसुद्धा जगातील कामगार वर्गाने महत्वाचे धडे घेतले. पॅरिसच्या कामगारांचे बलिदान कामगार वर्गाला सतत आठवण देत राहील की भांडवलशाहीला नष्ट केल्याशिवाय त्यांना मुक्ती मिळू शकत नाही.

पॅरिस कम्युनला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘कामगार बिगुल’ च्या या अंकापासून आम्ही जगातील पहिल्या कामगार राज्याच्या सचित्र कथेची सुरूवात करत आहोत. ‘मजदूर बिगुल’ मध्ये मार्च 2012 पासून प्रकाशित झालेल्या धारावाहिक कथेचा अनुवाद पुढील अंकांमध्ये आम्ही देत राहू. — संपादक मंडळ

कामगार वर्गाच्या वाढत्या संघर्षाचा आणि त्याच्या मुक्तीच्या विचारधारेचा जन्म

1. 1840 च्या दशकात इंग्लंड्मध्ये कामगार चळवळीचे दोन भाग झालेले होते. त्यापैकी एक होता चार्टीस्ट आणि दुसरा होता समाजवादी. चार्टीस्ट लोक सिंद्धांताच्या बाबतीत थोडे मागासलेले होते; पण ते खरे कामगार वर्गीय होते आणि आपल्या वर्गाचे प्रतिनिधी होते. दुसरीकडे समाजवादी दूरदृष्टे होते. कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी व्यावहारिक मार्ग सुचवत असत, पण ते भांडवलदार वर्गातून आलेले असल्यामुळे कामगारांमध्ये पूर्णत: मिसळत नसत. फ्रेडरिक एंगल्स यांनी म्हटल्याप्रमाणे चार्टीस्ट आणि समाजवादी यांची एकता हे कामगार चळवळीचे पुढचे पाऊल होते आणि या गोष्टीची सुरवात तेव्हाच झाली होती. कामगार आपल्या चळवळीमध्ये विचारांचे महत्व समजू लागले होते आणि ट्रेड युनियन्स, चार्टीस्ट व समाजवादी असे सर्व स्वतंत्रपणे किंवा मिळून कामगारांसाठी असंख्य शाळा, पुस्तकालये, वाचनालये, इत्यादी चालवत असत. भांडवली सरकारे याला धोकादायक समजत असत आणि अनेकदा त्यांच्यावर बंदीही घालत असत. परंतु कामगारामध्ये हळूहळू विकसित होत असलेल्या राजकीय चेतनेच्या प्रसाराला थांबवणे शक्य नव्हते

1848 मध्ये लंड्नच्या एका चौकात कामगारांच्या “साहित्यिक आणि वैज्ञानिक संस्थेची” बैठक

1844 ला जर्मनीमध्ये कापड उद्योगाचे प्रमुख केंद्र असलेल्या सिलेसिया शहरामध्ये विणकर कामगारांनी गरिबी आणि उपासमारीमुळे हताश होऊन मोठा विद्रोह केला. त्यांनी सिलेसिया शहराचा ताबा घेतला आणि त्यांना चिरडण्यासाठी फ़ौजेला पाचारण करण्यात आले. अनेक कामगारांना गोळ्या घातल्या गेल्या तर अनेकांना कैद आणि चाबकाच्या फटकाऱ्यांच्या शिक्षा सुनावल्या गेल्या. इतिहासात या विद्रोही आंदोलनाला खूप महत्व आहे कारण विणकर कामगारांनी केलेल्या रास्त मागण्या, दिलेल्या घोषणा आणि कामगारांनी केलेल्या राजकीय कारवाया यामुळे समाजातील कामगारांची स्थिती आणि भुमिका याबद्दल त्यांची समज जोमाने वाढत होती असे दिसते. वरील चित्रात आपल्या मागण्या मांडण्यासाठी जात असलेल्या विणकर कामगारांना दाखवले आहे. हे चित्र जर्मनीच्या प्रसिध्द चित्रकार आणि कामगार आंदोलनाच्या समर्थक कॅथी कॉलवित्झ यांनी बनवले आहे.

चार्ल्स फ़ुरिये

सेंट सायमन

रॉबर्ट ओवेन

2. कामगार आदोंलनाचा एक मजबूत प्रवार होण्याअगोदरच समाजवादाचा विचार अस्तित्वात आला होता. परंतु याला “काल्पनिक” समाजवाद म्हटले गेले कारण त्यामागे काही ठोस वैज्ञानिक विचार व मार्गाची योग्य समज नव्हती. या काळातील बहुतांश  प्रगतिशील लोकांना आशा होती की यामुळे राजे-जहागिरदार-सामतांच्या अत्याचारांचा अंत होईल आणि विवेक, स्वातंत्र्य व न्यायाचे राज्य स्थापन होईल. वास्तवात सामंती अत्याचार व जोर जबरदस्तीची जागा निर्दय भांडवली शोषणाने आणि धनसंपत्तीच्या शासनाने घेतली. भांडवली विकासाच्या सुरुवातीच्या काळातच काही असे विचारक आणि दूरदृष्टे  लोक होते की त्यांनी भांडवली व्यवस्थेच्या अवगुणांना हेरले होते आणि एका चांगल्या व्यवस्थेसाठी आवाज उठवला होता की जी सगळ्यांसाठी न्याय व बंधुत्व या तत्वांवर उभी असेल.

रॉबर्ट ओवेन यांनी स्थापित केलेली वस्ती “न्यु लेनार्क”. येथे एक मोठी सूत गिरणी होती. येथे काम करणारे 2500 कामगार व त्याची कुंटुंबं रहात असत. त्यांना घेऊन ओवेन यांनी समाजवादाच्या आपल्या “आदर्शा”ला लागू करण्याचे प्रयोग केले.

या महान चितंकामध्ये सर्वोच्च स्थान फ्रांसचे सेंट-सायमन आणि इंग्लंडचे चार्ल्स फ़ुरिये आणि रॉबर्ट ओवेन यांचे आहे. त्यांनी भांडवली व्यवस्थेची  कठोर आणि खरी टीका केली आणि तिच्या जागी भविष्यात न्यायपूर्ण समाजाची कल्पना सादर केली. सगळ्यात मोठी गोष्ट ही की त्यांनी सामान्य लोकांना भांडवलशाही व्यवस्थेने घातलेल्या बेड्यांमधून स्वत:ला मुक्त करण्यासाठी आवाहन केले. परंतु ते हे समजू शकले नाहीत की भांडवली व्यवस्था हटवून नवा समाज स्थापन करण्यासाठी योग्य रस्ता कोणता असेल. त्यांनी जे काही सुचवले ते भोळेपणाने व अव्यावहारिक असे एक स्वप्न होते. त्यांना स्वत:ला हा विश्वास नव्हता की कामगार वर्ग हाच ती सामजिक शक्ती आहे जी शोषणाची साखळी तोडून स्वत:ला आणि पूर्ण मानवजातीला मुक्त करू शकेल.  त्यांना वाटत होते की समाजातील प्रबुद्ध लोकांनी एकत्र येऊन जबाबदारी घेऊन कामगारांचा या दुर्दशेतून उध्दार करावा. परंतु या महान चिंतकाच्या कार्याशिवाय कामगाराच्या मुक्तीसाठीचा वैज्ञानिक सिध्दांत अस्तित्वात येऊ सुद्धा शकत नव्हता.

कार्ल मार्क्स (जन्म 5 मे 1848; निधन 14 मार्च 1883) ने आपले सर्व आयुष्य तरूणपणापासूच कामगारांच्या मुक्तीसाठी समर्पित केले. आपल्या क्रातिकारी विचारांमुळेच त्यांना वयाच्या 25 व्या वर्षी आपला देश सोडावा लागला त्यांनी त्याचे उर्वरित आयुष्याचा मोठा भाग दुसऱ्या देशात व्यतित झाला. प्रत्येक देशातील भांडवली सरकार त्यांना घाबरत होते; परंतु त्यांना सगळ्या जगभरातील कष्टकऱ्यांकडून खूप प्रेम आणि सन्मान मिळाला.

फ्रेडरिक एंगल्स (जन्म 25 नोंव्हेबंर 1820; मृत्यू 5 ऑगस्ट 1895) एका कारखानदाराचा मुलगा असूनही ज्यानी आपली शक्ती आपल्या पित्याच्या इच्छेचे पालन करण्यासाठी व पैसे कमावण्यासाठी न वापरता, आपली सगळी ऊर्जा क्रांतिकारी संघर्षासाठी वापरली. मार्क्स व एंगल्स याची ओळख 1844 मध्ये झाली आणि तेव्हापासून कामगार वर्गाच्या या दोन महान नेत्यांच्या अशा अतूट मित्रतेची सुरूवात झाली, जी मैत्री इतिहासात एक दाखला बनली आहे. या दोघानी आपली सगळी प्रतिभा व ऊर्जा भांडवलशाहीच्या दासतेतून मानवतेच्या मुक्तीच्या उद्दिष्टाला पुढे नेण्यासाठी लावली.

3. जेव्हा कामगार आंदोलनाने बराच अनुभव प्राप्त केला आणि कामगार वर्ग जास्त योग्य पद्धतीने संघटित झाला तेव्हा तेव्हा असा एक वैज्ञानिक सिद्धांत समोर आला जो मानवतेला मुक्तीच्या योग्य दिशेने घेऊन जाऊ शकत होता.  या सिध्दांताने हे दाखवले की आत्तापर्यंतचा सामाजिक विकास कोणकोणत्या टप्प्यांमधून झाला आहे आणि सामाजिक विकासाच्या सगळ्यात वरच्या पायरीवर म्हणजे “कम्युनिझम”कडे जाण्याचा  रस्ता कोणता असेल. या सिध्दाताचे प्रणेते होते कामगार वर्गाचे महान नेते कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगल्स. जर्मनीत जन्मलेल्या या दोन अद्भूत प्रतिभाशाली व्यक्तींनी तरूणपणीच क्रांतिकारी संघर्षासाठी तन-मन अर्पण केले. मार्क्स आणि एंगल्स यांनी वैज्ञानिक समाजवादाचा सिध्दांत मांडला आणि कामगार वर्गाच्या संघर्षाची कार्यनिती बनवली. त्यांनी म्हटले की “कामगारांकडे पायातील बेडी शिवाय गमावण्यासारखे काहीच नाही.” मार्क्सवादाने सर्व जगाला दाखवले की कामगार वर्गच सर्वात “क्रांतिकारी” वर्ग आहे आणि खाजगी मालकीच्या व्यवस्थेला नष्ट करण्यासाठीच्या संघर्षामध्येतो सर्व कष्टकरी जनतेचे नेतृत्व करेल. परंतु हा नवा सिध्दांत दुनिया बदलण्यासाठी जबरदस्त ताकद तेव्हाच बनू शकला असता जेव्हा तो लोकांच्या मनाची पकड घेऊ शकला असता.

1844 मध्ये विविध समाजवादी कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करताना मार्क्स आणि एंगल्स

‘कम्युनिस्ट लीग’च्या केंद्रीय समितीची बैठक, सर्वात डावीकडे बसलेले कार्ल मार्क्स

4.  मार्क्स व एंगल्स याच्या अगोदर कामगार आंदोलन आणि समाजवादाचा विकास हा वेगवेगळ्या मार्गाने होत होता. 1847 मध्ये मार्क्स आणि एंगल्स यांच्या सहयोगाने पहिल्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचीची— “कमुनिस्ट लीग”ची—स्थापना झाली आणि एका नव्या घोषणेचा जन्म झाला— “जगातील कामगारांनो एक व्हा!” या लीग तर्फे मार्क्स व एंगल्स यांनी ‘कम्युनिस्ट घोषणापत्र’ तयार केले जे 1848 मध्ये छापून तयार झाले. या छोट्या पुस्तिकेने मागील 160 वर्षांमध्ये जग बदलून टाकले आहे. आज जगातील सगळ्या भाषांमध्ये या पुस्तिकेच्या कोट्यवधी प्रती छापल्या गेल्या आहेत. परंतु जेव्हा पहिल्यांदा हे घोषणापत्र प्रसारित झाले तेव्हा त्याचा जबरदस्त परिणाम झाला. त्यांनतर कामगार आंदोलन व समाजवाद हे दोन वेग-वेगळे मार्ग न राहता एकमेकात मिसळून एक अपराजेय शक्ती बनले.

‘कम्युनिस्ट घोषणापत्रा’च्या पहिल्या आवृत्तीचे मुखपृष्ठ

5. 19 व्या शतकातील 4थ्या दशकात झालेल्या अनेक जनविद्रोहांना जबरदस्तीने चिरडल्यानंतर युरोपमध्ये सामाजिक, राजकीय प्रतिक्रियेचा आणि दमनकारी पोलीस यंत्रणेचा काळ आला. परंतु दमनामुळे दीर्घकाळापासून दबलेल्या सामाजिक शक्ती सतत मजबूत होत होत्या. 1848 मध्ये असंतोषाचा ज्वालामुखी फ़ुटला. सगळ्या युरोपमध्ये उलथापालथी झाल्या, ज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सर्वात पुढे कामगार वर्ग होता. या क्रांतीचा पहिला स्फोट सिसिली मध्ये झाला परंतु त्यानंतर एकेक करून हे क्रांतीचे लोण फ्रान्स, ऑस्ट्रिया, रशिया, जर्मनी, इटली, स्पेन, हंगेरी, पोलंडपासून सगळ्या युरोपभर पसरले आणि घृणित, निरंकुश राजकीय व्यवस्था, सम्राट, आणि मंत्र्यांनाही भस्मसात करून गेले.

फ्रांस मध्ये 1848 मध्ये क्रांतीची सुरूवात होताच जनतेने राजमहालावर हल्ला केला, जिथून राजाने अगोदरच पलायन केलेले होते. लोक राजसिंहासनला खेचत रस्त्यावर घेऊन आले आणि त्याला आग लावली.

 

1848 च्या क्रांतीदरम्यान लुटखोर व अत्याचारी शासनाला लोकांनी लाथ मारून बाजूला सारले होते. त्यावेळचे हे प्रसिध्द कार्टून आहे. याच काळात प्रसिध्द रशियन क्रांतीकारी लेखक अलेक्झांद्र हर्जन यांनी लिहिले होते “हा अद्भूत काळ आहे. वर्तमानपत्र हातात घेताना माझे हात थरथर कापायला लागतात. — रोजच अनपेक्षित घटना घडत आहेत, वीजेची नवी गर्जना ऐकायला मिळत आहे. एकतर मानव जातीचा उज्वल पूनर्जन्म होणार आहे किंवा जगबुडीचा दिवस येत आहे. लोकांच्या मनात एक नवी ताकद निर्माण झाली आहे, जून्या आशा परत जाग्या झाल्या आहेत आणि एक असे साहस मनावर स्वार झाले आहे की ते काहीही करू शकतात.”

परंतु दिमाखदार पराक्रमी संघर्ष करूनही मेहनती कामगार वर्गाला हार मानावी लागली. कामगाराच्या वाढत्या शक्तीला आणि झुंझार चेतनेला घाबरून भांडवलदार वर्गाने प्रत्येक प्रकारची गद्दारी व धोकेबाजी करून क्रांतिकारी आदोलनाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम केले. दुसऱ्या बाजूला कामगार वर्गाच्या कमजोरीचे मूळ कारण हे होते की जबरदस्त क्रांतिकारी लढावू वृती असूनही तो चांगल्या रितीने संघटित नव्हता आणि त्यांना आपल्या ऐतिहासिक कार्यभाराची व धेयाची योग्य समज नव्हती. 1848च्या क्रांत्यांचा शेवट पराजयामध्ये झाला परंतु युरोपाच्या येणाऱ्या इतिहासाला त्यांनी बदलून टाकले. सोबतच या क्रांत्यांनी युरोपातील कामगार वर्गाला राजकीय संघर्षाचा अमूल्य अनुभव दिला. त्यांनी जगाला दाखवून दिले की एका मोठ्या व ताकदवान सामाजिक शक्तीच्या रूपाने कामगार वर्ग समोर आल्यावर आता भांडवलदार वर्ग प्रगतिशील राहिलेला नाही आणि तो एका प्रतिक्रांतिकारी शक्तीमध्ये रुपांतरीत झाला आहे.

पॅरिस मध्ये जून विद्रोह करताना कामगारानी काढलेला मोर्चा. या घटनेचे साक्षीदार कार्ल मार्क्स ने लिहिलेले आहे की: “कामगारांपुढे कुठलाही पर्याय उरला नव्हता–ते भुकेने मरतील किंवा संघर्ष करतील! त्यांनी 22 जून रोजी मोठ्या उठावाने उत्तर दिले, जे आधुनिक समाजाचे विभाजन करणाऱ्या दोन वर्गामधील पहिले मोठे युध्द होते. हे भांडवलशाही व्यवस्थेच्या संरक्षण वा संहाराचे युध्द होते.” भांडवलदारांच्या सरकारने पाशवी दमन केले. रस्त्यावर चाललेल्या लढ्यामध्ये 500 कामगार मृत्यूमुखी पडले . पण त्यानंतरच्या काही महिन्यांमध्ये 11 हजार कामगाराना गोळ्या घालून ठार मारण्यात आले

6. कामगारानी आपल्या संघटना बांधणे सुरू केले.  संप अधिकाधिक व्यापक होत गेले. समाजवादी मंडळांच्या आणि गटांच्या स्थापना होऊ लागल्या आणि कामगारानी आपल्या समस्यांना फक्त स्वत:च्याच कारखान्याच्या, शहराच्या,  देशाच्या संकुचित नजरेतून बघणे बंद केले. 19 व्या शतकातील 7व्या दशकापर्यंत कामगार आंदोलन जागतिक स्तरावर आपल्या शक्तींना एकजूट करण्यासाठी सज्ज झाले होते.  आता कष्टकरी वर्गाला एका नव्या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये एकजूट करण्याची वेळ आली होती.

या ऐतिहासिक भाषणाचे काही अंश:
“भाड्याने घेतलेले श्रम अस्थायी आणि हलक्या प्रकाराचे श्रम आहे. त्याला इच्छापूर्वक केलेल्या, तत्पर मस्तिष्काने आणि प्रसन्न मनाने केलेल्या सहयोगपूर्ण श्रमासमोर समाप्त व्हावे लागेल…”
“मोठ्या प्रमाणात आणि आधुनिक विज्ञानानुसार चालणारे उत्पादन मालकांच्या वर्गाच्या अस्तित्वाशिवाय केले जावू शकते…”
“त्यांच्याजवळ (कामगारांजवळ-संपादक) यशाचा एक मार्ग आहे—त्यांची संख्या. परंतु संख्या तेव्हाच कामी येते जेव्हा ती आपापसात मिळून एकजूट होईल आणि ज्ञान तिचे नेतृत्व करेल…”
“म्हणून राजकीय सत्तेवर ताबा घेणे हे कामगार वर्गाचे महान लक्ष बनले आहे. ”
या भाषणाचा शेवट या शब्दांनी झाला—“ जगातील कामगारांनो एक व्हा.”

28 सप्टेंबर 1864 रोजी लंडन मध्ये झालेल्या एका सभेत ब्रिटन, फ्रांस, जर्मनी, इटली आणि इतर काही देशातील कामगारांनी भाग घेतला होता. त्यांनी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची(इंटरनॅशनल वर्कींग मेन्स असोसिएशन)स्थापना केली, जी इतिहासात “पहिल्या आतंरराष्ट्रीय” नावाने प्रासिध्द झाली आहे. कार्ल मार्क्स व फ्रेडरिक एंगल्स हे आंदोलनाचे मुख्य राजकीय व वैचारिक नेते होते. युरोपातील विविध देशांमधील आणि  अमेरिकेतील अनेक ट्रेड युनियन्स, कामगार सोसायट्या, श्रमिक शिक्षण मंडळ आणि विविध कामगार “पहिल्या  आंतरराष्ट्रीय”मध्ये सामिल झाल्या. या सर्व देशांमध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या राष्ट्रीय शाखा प्रस्थापित झाल्या आणि थोड्या कालावधीतच इंटरनॅशनल हे एक व्यापक आंतरराष्ट्रीय कामगार संघटना बनले. या काळात भारतात कारखाने नुकतेच सुरू झाले होते, त्यामुळे कामगारांची संख्या खूप कमी होती आणि विखुरलेली होती. परंतु 20 वर्षानी जेव्हा भारतात खूप कारखाने उभे राहिलेले होते, ज्यांमध्ये खूप मोठ्या संख्येने कामगार काम करत होते तेव्हा संघटित होण्याच्या विचाराच्या प्रचारासाठी “आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने” आपले दोन प्रतिनिधी भारतात कलकत्त्याला पाठवले होते.

(क्रमश:)

कम्युन जिंदाबाद!
पुढील अंकामध्ये कम्युनची स्थापना आणि तिच्या अमर सिद्धांतांच्या जन्माची कहाणी`

कामगार बिगुल, एप्र‍िल 2021