घरकामगार संघर्ष समितीतर्फे, पुण्यात 8 मार्च महिला दिनानिमित्त अभिवादन फेरी
बिगुल पत्रकार
8 मार्च, आंतरराष्ट्रीय महिला कामगार दिवस हा स्त्रियांच्या अधिकारांसाठीच्या, स्त्री-पुरूष समानतेसाठीच्या लढ्याची आठवण काढण्याचा, आणि त्याच्या समर्थनात एकजूट होण्याचा दिवस आहे.
भारतात हजारो वर्षे स्त्री ही रूढी, परंपरा, पितृसत्ता अशा अनेक गुलामींना बळी पडत आली. चूल आणि मुलाच्या चौकटीबाहेर स्त्रीने पडू नये, लहानपणीच बालविवाह, नवरा मेल्यावर केशवपन व सती जाण्याची प्रथा, शिक्षणाचा हक्क नाही या बंधनांमध्येच आयुष्य फिरत राही. जगाच्या स्तरावरही स्त्रियांची स्थिती काही वेगळी नव्हती. परंतु युरोपातील भांडवलशाही सोबतच जन्माला आलेल्या महिला कामगार वर्गाने स्त्री अधिकारांसाठीच्या आणि स्त्री-मुक्तीसाठीच्या लढ्यांना जन्म दिला. क्लारा झेटकीन सारख्या लढवय्या कम्युनिस्ट महिला कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिला कामगार संघटित होऊन रस्त्यांवर उतरल्या. एक कामगार म्हणून स्वतंत्र अस्तित्व, कामाचे तास कमी करून मिळावे, पुरुष कामगारांच्या बरोबरीने समान कामाला समान वेतन, मतदानाचा अधिकार अशा अनेक मागण्या घेऊन महिला रस्त्यावर उतरल्या व कुठल्याही सत्तेच्या दमनाला, बळाला न जुमानता संघर्ष चालू ठेवून आपल्या मागण्या त्यांनी दीर्घ लढ्यानंतर पूर्ण करवून घेतल्या. महिला कामगारांच्या लढ्यातून प्रेरणा घेऊन सुरू झालेल्या, आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला कामगार आंदोलनाने शंभर वर्षांपूर्वी पुरस्कार केलेल्या, आणि रशियातील कामगार वर्गीय क्रांतीने स्थापित केलेल्या 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला कामगार दिनाची रूजवातच कामगार वर्गीय आहे.
ह्याच लढ्यांपासून प्रेरणा घेत 8 मार्च रोजी आपल्या मागण्या घेऊन, आजही विविध प्रकारच्या गुलामीत दबलेल्या स्त्रिया स्त्रीमुक्तीच्या लढ्याला पुढे नेण्यासाठी दरवर्षी रस्त्यावर उतरतात. पुण्यातही घरकामगार संघर्ष समितीतर्फे 8 मार्च रोजी स्त्रीमुक्तीच्या लढ्यातील कार्यकर्त्यांना अभिवादन करत, स्त्रीमुक्तीचा निर्धार व्यक्त करत अभिवादन-फेरी आयोजित केली गेली.
फेरीची सुरुवात क्रांतिकारी घोषणांनी झाली. “आंतरराष्ट्रीय महिला कामगार दिवस चिरायू होवो.”, “मार्ग मुक्तीचा बनवावा लागेल, जगायचे असेल तर लढावे लागेल.” अशा अनेक घोषणांनी अप्पर इंदिरानगरचा परिसर दणाणून गेला. एक दिवस कामावर गेलो नाहीत तर खाडे पडतील याची जाण असूनही महिलांनी घोषणा देत, हातात मुक्तीचा संदेश देणाऱ्या दफ्त्या घेत, झेंडे घेत शारीरिक अंतराचे नियम पाळत फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सावित्रीबाई फुले, फातिमाबी शेख सारख्या लढाऊ महिलांनी देशात स्त्री मुक्तीच्या लढ्याची रूजवात केली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आपणही सद्यस्थितीत स्त्री मुक्तीचे ध्येय घेऊन आजच्या कार्यभारांसाठी लढू हा निर्धार सर्वांच्या मनात होता.
यावेळी महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियनच्या महिला व पुरुष साथीदारांनीही आपला सहभाग नोंदवला. संपूर्ण कामगार वर्गाची मुक्ती ही अर्धी संख्या असलेल्या स्त्री कामगारवर्ग मुक्तिशिवाय शक्य नाही, तेव्हा स्त्रियांच्या मुक्तीच्या लढ्याला स्त्रियांपुरते मर्यादित न ठेवता त्यांसोबतच पुरुष साथींनीही लढणे किती गरजेचं आहे याचे महत्त्व सांगत पुरुषांना फेरीत सहभागी होण्यास आवाहन केले. विशेषकरून 2014 नंतर मोदी सरकार सत्तेत आल्यावर फॅसिस्ट गुंड शक्तींचा उभार, जातीयवादी दंगली, पितृसत्ताक रूढी, परंपरा, मुलींवर दिवसागणिक वाढते अत्याचार ही आव्हानं वाढली आहेत, तेव्हा त्यांना तोंड देण्यासाठी सर्व घरकामगार महिलांनी एकत्र येऊन याविरुद्ध संघर्ष उभा करण्याचे ठाम मत दर्शवले. कामगार चळवळीतील गाणी आणि त्या लढ्यांचा इतिहास सांगणारी भाषणे झाल्यावर जोरदार घोषणांनी कार्यक्रमाची सांगता झाली.
कामगार बिगुल, एप्रिल 2021