देशाच्या विविध भागांमध्ये क्रांतिकारी युवक, विद्यार्थी आणि कामगार संघटनांकडून कोरोनाच्या साथीत मदत कार्य
प्रवीण एकडे
कोरोना साथीच्या भयंकर परिस्थितीमध्ये, सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिलेले असताना देशभरातील विविध क्रांतिकारी युवक संघटना, विद्यार्थी संघटना, कामगार संघटना मदत कार्य करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. सामान्य जनतेच्या आर्थिक भागिदारीतून, कामगार-कष्टकरी वर्गासोबत एकतेच्या भावनेने हे मदत कार्य स्वयंसेवी पद्धतीने चालू आहे.
नौजवान भारत सभेतर्फे देशाच्या विविध भागांमध्ये कामगार-कष्टकरी वर्गापर्यंत अन्नाची तसेच राशनची मदत पोहोचवण्याचे काम अविरतपणे चालू आहे. महाराष्ट्रातील पुणे येथे दांडेकर पूल सर्व्हे नंबर 130, 132, 133, 214 या भागात तसेच चाकण, इंदिरा नगर, कात्रज परिसरा मध्ये शेकडो गरजू कुटुंबांना राशन च्या किट्स दिल्या गेल्या आहेत. तसेच सर्व्हे नंबर 135, 133 मध्ये काही दिवस तर कात्रज भागात प्रवासी कामगारांमध्ये 2 आठवड्यांपेक्षा जास्त दिवस, जनतेच्या सामुहिक श्रमातून आणि आर्थिक सहभागातून सतत सामुदायिक किचन चालू आहे. नौभासतर्फेच मुंबई मध्ये गोवंडी मधील काही भागात एक महिन्यापेक्षा जास्त काळापासून दररोज तयार अन्न विविध व्यक्तींच्या सहाय्याने वाटण्यात येत आहे तसेच सामुदायिक किचन ही चालवले जात आहे. परिसरातील युवक मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होत आहेत. दिल्ली मध्ये करावल नगर भागातही नौभास कडून मदतकार्य चालू आहे. बिहार मध्ये पाटण्यातील बिंद टोला तसेच मैनपुरा भागात लॉकडाऊन सुरू झाल्या पासून गरजु लोकांना राशन पुरवले जात आहे. नोएडा येथील सेक्टर ओमेगा-2 आणि कासना भागात नौजवान भारत सभेने काही कामगार कुटुंबांपर्यंत स्थानिक लोकांच्या जनसहयोगातून राशन, तसेच इतर जीवनावश्यक गोष्टी पोहचवण्याचे काम केले आहे. उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद आणि गोरखपूर मध्ये दिशा विद्यार्थी संघटना आणि नौजवान भारत सभा मिळून मदतकार्य करत आहेत. हे सर्व मदतकार्य जन सहयोगातून आणि जनतेच्या सामूहिक कष्टातून, आरोग्य विषयक सर्व काळज्या घेत चालवले जात आहे.
देशभरात विविध कामगार संघटना सुद्धा मदतकार्य करण्यास पुढे सरसावल्या आहेत. उत्तर-पश्चिम दिल्ली च्या शाहबाद डेरी परिसरामध्ये “दिल्ली घरेलू कामगार यूनियन” च्या वतीने सामुदायिक किचन 31 मार्च पासून नियमितपणे चालवले जात आहे. शाहबाद डेरी, रोहिणी सेक्टर 27 च्या परिसरात काही ठिकाणी तयार अन्न ही पोहचवले जात आहे. दिल्लीमध्येच “बवाना औद्योगिक क्षेत्र मजदूर यूनियन” द्वारा मेट्रो विहार मध्ये राशन पोहचवण्याचे काम नियमितपणे चालू आहे.
खरेतर नियोजनाच्या अभावी केलेल्या लॉकडाऊन मुळे कष्टकरी वर्गासमोर समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. लॉकडाऊन मुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत तर अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अजूनही अनेक ठिकाणी राशन ची मदत सुद्धा पोहोचलेली नाही जी थोडी मिळाली आहे ती ही अत्यंत तुटपुंजी आहे. प्रवासी कामगारांची परिस्थिती तर अत्यंत वाईट झाली आहे. त्यांच्याकडे एक तर राशन कार्ड नसल्यामुळे त्यांना राशन ही मिळत नाही आहे आणि सरकारने त्यांना स्वगृही नेण्याची सोय केली नसल्याने घरीही जाता येत नाही. अश्यातच असंख्य प्रवासी कामगार स्वगृही परतण्यासाठी हजारो किलोमीटर ची पायपीट करत आहेत. खरे तर अश्या महामारीच्या काळात सरकारने कामगार कष्टकऱ्यांची जेवणाची, राहण्याची तसेच आरोग्याची सोय करने गरजेचे आहे परंतु नेहमी प्रमाणेच सरकारने यातून अंग काढून घेतले आहे व गरीब जनतेवर उपासमारीची वेळ आणली आहे.
अशावेळी एकतेच्या भावनेने विविध युवक, विद्यार्थी संघटना तसेच कामगार संगठना मदतकार्य करत असतानाच आपण हा ही प्रश्न उपस्थित केला पाहिजे की या साथीच्या काळात सुद्धा नवीन संसद भवन बांधण्यासाठी मोदी सरकारकडे 22, 000 कोटी रुपये आहेत परंतु जेव्हा प्रवासी कामगारांना स्वगृही पाठवण्याची वेळ येथे तेव्हा मात्र सरकारकडे पैसे का नसतात व तिकिटाचे पैसे सुद्धा कामगारांकडूनच का वसूल केले जातात?
कामगार बिगुल, जुलै 2020