उद्धरण
“जर देशप्रेमाची व्याख्या सरकारची अंध आज्ञाधारकता नसेल, झेंडा आणि राष्ट्रगीताची भक्तिभावाने पूजा करणे नसेल; उलट आपल्या देशावर, आपल्या साथी नागरिकांवर (सर्व जगातील) प्रेम करणे असेल, न्याय आणि लोकशाहीच्या तत्वांशी एकनिष्ठता असेल; तर खऱ्या देशप्रेमासाठी आवश्यक आहे की जेव्हा आपले सरकार त्या तत्वांना पाळणार नाही, तेव्हा आपण त्या सरकारचा हुकूम मानायला नकार द्यावा”
– हॉवर्ड झिन
“सविनय कायदेभंग आमची समस्या नाहीये. आमची समस्या आहे नागरिकांची आज्ञाधारकता. आमची समस्या आहे की जगभरामध्ये लोक नेत्यांच्या हुकूमशाही आदेशांचे पालन करत आहेत … आणि या आज्ञाधारकतेमुळे कोट्यवधी लोक मारले गेले आहेत. … आमची समस्या ही आहे की जगभरात गरिबी, भूकबळी, अज्ञान, युद्ध आणि क्रूरतेचा सामना करणारे लोक आज्ञाधारक बनून बसले आहेत. आमची समस्या ही आहे की लोक आज्ञाधारक आहेत आणि जेल सामान्य चोरांनी भरले आहेत … मोठे चोर देश चालवत आहेत. हीच आमची समस्या आहे.”
– हॉवर्ड झिन
‘‘ज्या पृथ्वीवर प्रत्येक पुढच्या मिनीटाला एक बालक भूखेने वा आजाराने मरते, तेथे सत्ताधाऱ्यांच्या वर्गांच्या दृष्टिने सर्व बाबी समजून घेण्याची सवय लावली जाते- लोकांनी ही परिस्थिति म्हणजे एक नैसर्गिक व स्वाभाविक परिस्थिति आहे असे समजावे म्हणून त्यांना त्याप्रमाणे विचार करण्यास शिकविले जाते- लोकानां असे वाटते की ही व्यवस्था म्हणजेच देशभक्ति आहे व म्हणून जो कोणी या व्यवस्थेस विरोध करेल त्यास देशद्रोही व परकीयांचा दलाल समजण्यांत येते- जंगली कायद्यांस पवित्र स्वरूप देण्यांत येते व याद्वारे पराभूत झालेली माणसे स्वतःच्या परिस्थितीस नियती समजू लागतात’’
– एदुआर्दो गालियानो (अर्जेटीनाचे प्रसिद्ध लेखक)
कष्टकरी व शेतकऱ्यांना नीट समजावले पाहिजे की तुमचे खरे शत्रू भांडवलदार आहेत, म्हणूनच तुम्ही त्यांच्या डावपेचांपासून जपून राहिले पाहिजे आणि त्यांच्या आहारी जाऊन काहीही करू नये. जगातील सर्व गरीबांचे, मग ते कोणत्याही जातीचे, वर्णाचे, धर्माचे किंवा राष्ट्राचे असोत, अधिकार सारखेच आहेत. तुम्ही धर्म, वर्ण, वंश आणि राष्ट्रीयता व देशाचे भेदभाव नष्ट करून एकजूट होण्यात व सरकारची शक्ती आपल्या हातांमध्ये घेण्याचा प्रयत्न करण्यातच तुमचे भले आहे. या प्रयत्नांमध्ये तुमचे काहीच नुकसान होणार नाही, यामुळे एके दिवशी तुमच्या बेड्या तुटून पडतील आणि तुम्हांला आर्थिक स्वातंत्र्य लाभेल.
– भगतसिंह (सांप्रदायिक दंगली आणि त्यांवरील उपाय)
सर्वात भिकार निरक्षर कुणाला म्हणावं तर राजकीय निरक्षराला. तो ऐकत नाही, बोलत नाही, राजकीय प्रक्रियेत सहभागी होत नाही. त्याला कळत नाही की जगण्याची किंमत, डाळीचे भाव, मासळीचे दर, पिठामिठाची किंमत, घरभाडं, जोड्यांची किंमत, औषधांच्या किमती सारं काही राजकीय निर्णयांवरून ठरतं. आपल्या राजकीय अजाणतेपणाचा त्याला अभिमान सुद्धा वाटतो आणि छाती फुगवून तो सांगत रहातो की मी राजकारणाचा द्वेष करतो. त्या राजकीय बेअक्कल माणसाला हे कळत नाही की त्याच्या राजकीय अज्ञानातूनच जन्माला येते वेश्या, बेवारस मूल, दरोडेखोर आणि सर्वात वाईट म्हणजे भ्रष्ट अधिकारी, शोषणकारी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे तळवेचाटू नोकर.
– बर्टोल्ट ब्रेष्ट
कामगार बिगुल, जानेवारी 2020