पॅरिस कम्युन: पहिल्या मजूर राज्याची सचित्र कथा (पुष्प तिसरे)

आज भारतातच नाही, तर संपूर्ण दुनियेत कामगार भांडवली लुटखोरांच्या वेगवान होत चाललेल्या हल्ल्यांचा सामना करत आहेत, आणि कामगार आंदोलन विखुरलेपण, साचलेपणा, आणि हताशेने ग्रासलेले आहे. अशामध्ये इतिहासाची पाने उलटून कामगार वर्गाच्या गौरवशाली संघर्षांपासून शिकण्याचे आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचे महत्व फार वाढते. आजपासून 150 वर्षे अगोदर, 18 मार्च 1871 ला फ्रांसची राजधानी पॅरिस मध्ये पहिल्यांदा कामगारांनी आपले शासन कायम केले. याला पॅरिस कम्युन म्हटले गेले. त्यांनी शोषकांद्वारे पसरवल्या जाणाऱ्या या विचारांना ध्वस्त केले की कामगार राज्यकारभार चालवू शकत नाहीत. पॅरिसच्या बहादूर कामगारांनी फक्त भांडवली सत्तेच्या रथालाच उलटवले नाही तर 72 दिवसांच्या शासनाच्या दरम्यान येणाऱ्या दिवसांचे एक छोटे मॉडेल जगासमोर प्रस्तुत केले आणि दाखवले की समाजवादी समाजामध्ये भेदभाव, असमानता, आणि शोषण कशाप्रकारे समाप्त केले जाईल. पुढे चालून 1917 च्या रशियन कामगार क्रांतीने या क्रांतीचा पुढचा टप्पा रचला.

कामगार वर्गाच्या या साहसी कारवाईने फक्त फ्रांसमधीलच नाही तर जगातील भांडवलदारांचे काळीज थरथरले. त्यांनी कामगारांच्या पहिल्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी जीवतोड प्रयत्न केले आणि शेवटी कामगारांच्या कम्युनला त्यांनी रक्ताच्या नद्यांमध्ये न्हाऊन काढले. पण कम्युनचे सिद्धांत अमर झाले.

पॅरिस कम्युनच्या पराजयातूनसुद्धा जगातील कामगार वर्गाने महत्वाचे धडे घेतले. पॅरिसच्या कामगारांचे बलिदान कामगार वर्गाला सतत आठवण देत राहील की भांडवलशाहीला नष्ट केल्याशिवाय त्यांना मुक्ती मिळू शकत नाही.

पॅरिस कम्युनला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘कामगार बिगुल’ च्या या अंकापासून आम्ही जगातील पहिल्या कामगार राज्याच्या सचित्र कथेची सुरूवात करत आहोत. ‘मजदूर बिगुल’ मध्ये मार्च 2012 पासून प्रकाशित झालेल्या धारावाहिक कथेचा अनुवाद पुढील अंकांमध्ये आम्ही देत राहू. — संपादक मंडळ

कामगाराच्या रक्ताने लिहिलेली पॅरिस कम्युनची अमर कहाणी 

मागील दोन पुष्पांमध्ये आपण हे माहित करून घेतले की `भांडवलशाहीच्या जुलमी, पाशवी सत्तेच्या विरूध्द लढायचे कसे हे कामगार शिकले’. मशिनी तोडून आपला राग व्यक्त करण्यापासून कामगारांचे आंदोलन चार्टीस्ट आंदोलनापर्यत पोहचले. हे कामगार वर्गाचे पहिले व्यापक आंदोलन होते आणि ते अयशस्वी झाले तरी ते एक प्रेरणादायी उदाहरण ठरले. यानंतर 1848च्या क्रांत्यांमध्ये कामगारांनी चढाओढीने हिस्सा घेतला आणि खूप मोठी किंमत मोजून ते बहुमोल धडे शिकले. आपण कम्युनिस्ट लीगची स्थापना, कम्युनिस्ट घोषणापत्र लिहीले जाणे आणि कामगारांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या स्थापने बाबत जाणले. या अंकात आम्ही पॅरिस कम्युनची सगळी कथा थोडक्या शब्दांत वाचकांसमोर मांडणार आहोत. या महागाथेच्या एकेका पैलूच्या बाबतील सविस्तर माहिती पुढील प्रत्येक अंकात सविस्तर देत राहू.

  1. 1870 च्या उन्हाळ्यात फ्रांसच्या भांडवलदार वर्गाने देशाला प्रशिया सोबतच्या युद्धात उतरवले. सरकार व सेनेचे नेते भ्रष्ट होते. एका मागून एक अशा अनेक युद्धांत फ़्रांन्सचा पराजय झाला. शेवटी सप्टेंबर मध्ये 80,000 अप्रशिक्षित व कुचकामी हत्यारांनी सज्ज लोकांना प्रशियाच्या सुसंघटीत आणि सुसज्ज सेनेपुढे झोकले गेले. फ्रेंच घेरले गेले आणि वाईट पद्धतीने हारले. फ्रान्सचा नेता तिसरा नेपोलियन आणि त्याचे अर्धे सैन्य कैद केले गेले. पॅरिस चे रक्षण करणाऱ्या सेनेचे याच प्रकारे हाल झाले. प्रशिया राजधानी पॅरिसवर चालून आला! परंतु शहरातील कामगार जनतेने “नॅशनल गार्ड” च्या सैनिकी तुकडीची निर्मिती केली होती. त्यांचे खाण्याचे हाल होत होते. बेकरीवाल्यांच्या दुकानासमोर पावासाठी मोठमोठ्या रांगा लागत होत्या. तरीही त्यांनी शहराच्या सुरक्षेसाठी अनेंक तोफा जमवल्या आणि पॅरिसच्या तटंबदी वर सज्ज केल्या. पॅरिसच्या श्रीमंत लोकांना वाटले की कामगारांच्या या कारवाईचा धोका त्यांनाही तितकाच आहे जितका प्रशियाला. जनतेमध्ये क्रांतीकारी उत्साह जागृत झाला होता आणि बाहेरच्या शत्रूवर ताणलेल्या बंदुका तेवढ्याच लिलया पद्धतीने आतल्या शत्रूकडे फिरू शकत होत्या. श्रीमंताच्या इशाऱ्यावरून जनतेकडून या तोफा हिसकावण्याचा प्रयत्न केला गेला. तातडीने इशाऱ्याचा संदेश पसरवला गेला: सगळ्या शहरातील कामगार ज्यात स्त्रिया पण होत्या व पुरूष पण, ते सगळे तोफांच्या रक्षणासाठी निघाले. आणि सरकारी सैनिक या रक्षकावर हल्ला न करता त्यांना सामील झाले.

    कम्युनच्या निर्णयांची घोषणा होताच ते वाचण्यासाठी पॅरिसच्या कष्टकऱ्यांची गर्दी होत होती. एका भितींवर चिटकवलेले घोषणापत्र वाचणारे कष्टकरी लोक.

  2. 18 मार्च 1871 रोजी पॅरिस कम्युन म्हणजेच कामगारांचे राज्य घोषित केले गेले. सरकार आपल्या काही सैनिकी तुकड्यांसोबत थोड्या दूर अंतरावरच्या वर्सायच्या महालात पळून गेले. कम्युनार्डांनी (पॅरिस कम्युनच्या कामगारांनी) त्यांना जाऊ दिले, जेव्हा की ते या सैनिकांना आपल्या बाजूला वळवू शकत होते. जे श्रीमंत लोक पॅरिस मधून पळून जात होते त्यांना कम्युनार्ड्सनी बंधक बनवायला हवे होते, पण त्यांनी असे केले नाही. त्यांना या उदारतेची खूप मोठी किमंत मोजावी लागली. एरोनदिसमेंट म्हणजेच जिल्ह्यांमध्ये वाटल्या गेलेले पॅरिस महानगर आता कम्युनार्ड्सच्या तुकड्यांच्या ताब्यात होते. त्यामध्ये स्त्री-पुरूष, कामगार आणि बुध्दीजीवी सहभागी होते. लेनिन च्या शब्दात “एक नव्या प्रकारचे राज्य—कामगारांचे राज्य” निर्माण होत होते. या नव्या राज्याने केलेल्या घोषणा वाचण्यासाठी लोकांची रस्त्यावर गर्दी होत होती. चर्चचे सत्तेपासून विलगीकरण, बेकरी दुकानात रात्री काम करण्याची मनाई, गरिबांचे मागील भाडे रद्द, पाद्र्यांना अटक, बंद पडलेले कारखाने परत चालू करणे, कामगारांना झालेला दंड माफ.

कम्युनच्या निर्णयांची घोषणा होताच ते वाचण्यासाठी पॅरिसच्या कष्टकऱ्यांची गर्दी होत होती. एका भितींवर चिटकवलेले घोषणापत्र वाचणारे कष्टकरी लोक.

26 मार्च 1871 ला जनतेद्वारे निवडलेल्या समितीने पॅरिस कम्युन स्थापन झाल्याची घोषणा केली. संपूर्ण पॅरिसमध्ये कामगारांमध्ये उत्साहाची लाट पसरली. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत कम्युनचे रक्षण करण्याचा संकल्प केला

कामगारानी कम्युनच्या रक्षणासाठी जागोजागी बॅरिकेड्स उभे करून सरकारी सेनेविरूध्द मोर्चे बांधणी सुरू केली. या मध्ये स्त्रिया अग्रभागी होत्या.

  1. जगातील या पहिल्या कामगार सरकारची स्थापना भांडवली राज्यातील नोकरशाही पूर्णपणे बरखास्त करून खऱ्या सार्वत्रिक मताधिकाराने झाली. स्थापनेनंतर टेलर, न्हावी, चर्मकार, प्रेस कामगार हे सर्व कम्युनचे सभासद म्हणून निवडले गेले. कम्युनला कार्यपालिका आणि न्यायपालिका म्हणजेच सरकार आणि संसद या दोघाचेही काम करायचे होते. जुन्या पोलीस आणि सेनेला बरखास्त केले गेले आणि सर्व कष्टकरी जनतेला शस्त्रसज्ज करण्याचे काम सुरू झाले. सत्तेवर आल्यावर दोनच दिवसात जुन्या सरकारचे सगळे बदनाम कायदे कम्युनने रद्द केले. कम्युनने पहिल्यांदा वास्तविक धर्मनिरपेक्ष लोकशाही साकार करून हे घोषित केले की धर्म हा प्रत्येक व्यक्तीचा खाजगी मामला आहे आणि राज्यसत्ता वा सरकारला यापासून दूर ठेवले जाईल. कम्युन मध्ये सर्वाधिक महत्वपूर्ण हुद्दे आणि जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तींनाही कोणतेही विशेषाधिकार नव्हते. कामगार आणि अधिकारी, मंत्री यांच्या पगारात भांडवलशाहीत जी मोठी तफावत होती ती काढून टाकली गेली. पॅरिस कम्युनमध्ये साधारण कामगार जनसमुदायच वास्तविक मालक व शासक होते. कम्युन असेपर्यंत जनसमुदाय मोठ्या प्रमाणात संघटित होते आणि सर्व महत्त्वाच्या राजकीय प्रश्नांवर लोक आपापल्या संघटनांमध्ये चर्चा करत असत.

वीर कम्युनार्डांनी सेनेचा जबरदस्त मुकाबला केला. एका बॅरिकेड वर लढणारी स्त्री कामगार.

  1. याच दरम्यान वर्साय मधील बादशहाचा मंत्री थियेर आणि त्याचे प्रतिक्रियावादी सरकार प्रशियाई अधिकाऱ्यांच्या सहाय्याने पॅरिस कम्युनवर आक्रमण करण्याची योजना आखत होते. या हल्यासाठी प्रशियाने हजारोच्या संख्येने कैद केलेल्या फ्रेंच सैनिकांना परत पाठवण्याचे मान्य केले. या सैनिकांना हत्यारबंद करून कामगारांविरूद्ध वापरण्यात येणार होते. प्रशिया आणि फ़्रांसचे शासक जे एकमेकांच्या विरोधात युद्ध करत होते, ते कामगारांना चिरडण्यासाठी निर्लज्जपणे एकत्र झाले होते. दुसरीकडे, कम्युनार्ड पण आपली तयारी करत होते. रस्त्यांवर बॅरिकेड उभे केले गेले होते. स्त्रिया आणि पुरूषांनी मिळून ते उभे केले होते आणि ते स्वत: तैनातही झाले होते. परंतु ते संपूर्ण शहरावर ताबा नाही करू शकले. जे भांडवलदार लोक पॅरिस मध्ये राहत होते त्यांनी वर्सायला माहिती पाठवून दिली की शहरात कुठे-कुठे संरक्षण कमकुवत आहे आणि 22 ते 28 मे च्या दरम्यान सैन्य त्याच मार्गाने घुसले जेथे सुरक्षा व्यवस्था कमजोर होती.
  2. हा एक रक्तरंजित आठवडा होता. कम्युनार्डांनी हिमतीने सामना केला. परंतु हल्लेखोर सैन्यासमोर त्यांना माघार घ्यावी लागली आणि पॅरिसच्या एका छोट्या हिश्श्यात शेवटी त्यांनी मोर्चा बांधला. आता प्रत्येक गल्ली युद्धाचं मैदान होती आणि प्रत्येक घर एक किल्ला. अशा भीषण हल्ल्यासमोर, ज्यामध्ये त्यांनी स्त्रिया व लहान मुले यांचे सुध्दा प्राण घ्यायचे सोडले नाहीत, थकलेले कम्युनार्ड माघार घ्यायला मजबूर होते. शहराच्या जळत्या अवशेषांमध्ये लढणाऱ्या हजारो कम्युनार्डांना अटक केली गेली, हजारोना तिथेच मारून टाकले गेले. अनेक हजारांना, ज्यामध्ये मुले, आजारी आणि वृद्ध लोक होते त्यांना हाकलत मोकळ्या जागेत आणले गेले व गोळ्या घातल्या गेल्या. वर्सायच्या माथेफिरू सेनेची प्रत्येक तुकडी खाटीक होती, आणि कम्युन सोबत सहानुभुती असल्याचा ज्याबद्दलही संशय होता त्या प्रत्येक व्यक्तीला ती मारून टाकत होती. कम्युनला तिच्याच रक्ताच्या थारोळ्यात बुडवले गेले. पॅरिसचे श्रीमंत लोक जे आता परत आले होते ते रस्त्यावर उभे राहून चालू असलेला घृणीत तमाशा बघत होते आणि या विजयासाठी स्वत:ची पाठ थोपटत होते.

  1. सफेद दहशतवाद अनिर्बंध चालूच राहिला. हजारोच्या संख्येने कम्युनार्डांना घेरून, ‘पेरे लाशेज’ स्मशानभूमीत आणि इतर डझनभर जागांवर नेऊन गोळ्या घातल्या गेल्या. भितींला टेकवून उभे करून निर्भय जनतेवर जेव्हा सेना गोळीबार करत होती तेव्हा पॅरिसच्या कामगाराचा मारेकरी जनरल गॅलीफेत तेथे उभा राहून तमाशा बघत होता. प्रेतांचे मोठ-मोठे ढीग लागले होते, ज्यात काही न मेलेले लोक सुद्धा होते. “कम्युनार्डांच्या भिंती”चा एक भाग अजूनही शिल्लक आहे. त्यावर चित्रित केलेले वीर कम्युनार्डांचे चेहरे भांडवलशाहीला आह्वान आहेत आणि कम्युनच्या शहीदांचे स्मारक पण आहेत. फक्त त्या एका आठवड्यात 40,000 कामगारांचे हत्याकांड झाले. यानंतर जे कम्युनार्ड वाचून निघू शकले होते, त्यांना शोधून परत आणले गेले व त्यांच्यावर खटला चालवण्याचे नाटक केले गेले. त्या सर्वाना अपराधी मानले गेले, आणि त्यांना गोळ्या घातल्या गेल्या किंवा फ़्रांसच्या ताब्यातील दूरवरच्या बेटांवर तापाने, अतिशय कष्टाच्या कामाने आणि दुर्लक्षाने मरण्यासाठी पाठवले गेले.

    कम्युन मध्ये भाग घेतलेल्या हजारो कामगारांवर खटला चालवण्याचे नाटक केले गेले. परंतु सगळे न्यायाधीश भांडवलदारांचेच लोक होते आणि खटल्याचा निकाल अगोदरच ठरलेला होता. हजारो कामगारांना मृत्युची शिक्षा दिली गेली किंवा देशाबाहेर तडीपार केले गेले.

  2. कम्युनच्या जीवनकाळातच कार्ल मार्क्स ने लिहिले होते :कम्युनला नष्ट जरी केले तरी संघर्ष फक्त स्थगित होईल. कम्युनचे सिद्धांत शाश्वत आणि अनश्वर आहेत. जोपर्यंत कामगारवर्ग मुक्त होत नाही तो पर्यंत हे सिद्धांत सतत प्रकट होत राहतील. कामगारांचे पहिले हत्यारबंद बंड आणि पहिल्या कामगार वर्गाच्या सत्तेचे महत्त्व सांगताना मार्क्सने म्हटले होते, “18 मार्चचे गौरवशाली आंदोलन मनुष्यजातीला वर्गशासनापासून कायमची मुक्ति देणाऱ्या महान सामाजिक क्रांतीची पहाट आहे.”

कम्युनला रक्ताच्या थारोळ्यात बुडवूनही भांडवलदार कधीही सुखाने बसू शकले नाहीत. कामगारांनी आपल्या साथीदारांच्या  रक्ताच्या  लाल  झेंड्याला  हातात  घेऊन स्वातंत्र्य आणि न्यायाच्या जगासाठी आपली लढाई पुन्हा सुरू केली.

कामगार बिगुल, मे 2021