तुमच्या धर्माचा ऱ्हास
राहुल सांकृत्यायन
लेखकाचा परिचय
राहुल सांकृत्यायन (1893-1963) खऱ्या अर्थाने जनतेचे लेखक होते. ते आजच्यासारख्या तथाकथित प्रगतिशील लेखकांसारखे नव्हते, जे जनतेच्या जीवन आणि संघर्षापासून अलिप्त राहून आपापल्या महालांमध्ये बसून कागदावर प्रकाश टाकत असतात. जनतेच्या संघर्षाचे मोर्चे असोत वा सरंजामदार-जमीनदारांच्या शोषण-दमनाच्या विरूद्ध शेतकऱ्यांच्या संघर्षाचा लढा असो, ते नेहमीच पहिल्या फळीत उभे राहिले. अनेक वेळा तुरूंगात गेले, यातना सहन केल्या. जमीनदारांच्या भाडोत्री गुंडांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्लासुद्धा केला, परंतु स्वातंत्र्य, समानता आणि मानवी स्वाभिमानासाठी ते ना कधी संघर्षातून मागे हटले आणि ना कधी त्यांची लेखणी थांबली.
जगभरातील 26 भाषा अवगत असलेल्या राहुल सांकृत्यायन यांच्या अचाट बुद्धीचे अनुमान यावरूनसुद्धा लावता येऊ शकते की, ज्ञान-विज्ञानाच्या अनेक शाखा, साहित्याच्या अनेक प्रकारांमध्ये त्यांनी हातोटी मिळवली होती. इतिहास, तत्वज्ञान, पुरातत्वशास्त्र, मानववंशशास्त्र, साहित्य, भाषा-विज्ञान इ. विषयांवर त्यांनी अधिकारवाणीने लेखन केले. बौद्धिक गुलामी, तुमचे अध:पतन, पळू नका-जगाला बदला, तत्वज्ञान-संदर्भ, मानवसमाज, वैज्ञानिक भौतिकवाद, जय यौधेय, सिंह सेनापती, साम्यवादच का?, बावीसावे शतक इ. रचना त्यांच्या महान प्रतिभेची ओळख स्वत:हूनच करून देतात.
राहुल देशातील दलित-शोषित जनतेला हर-तऱ्हेच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी लेखणीचा हत्यारासारखा वापर करायचे. त्यांचं म्हणणं होतं की, “साहित्यकार जनतेचा जबरदस्त सहकारी, सोबतच तो त्यांचा नेता (पुढारी) आहे. तो सैनिक आहे आणि सेनापतीसुद्धा.”
राहुल सांकृत्यायन यांच्यासाठी जीवनाचं दुसरं नाव गती होतं आणि मरण किंवा स्तब्धतेचं दुसरं नाव होतं साचलेपणा. यामुळेच अगोदरच तयार असलेल्या मार्गावर चालणे त्यांना कधीही आवडले नाही. ते नव्या मार्गाचे संशोधक होते. परंतु फिरणे म्हणजे त्यांच्यासाठी फक्त भूगोलाची ओळख करून घेणे नव्हते. ते सुदूर देशांतील जनतेचं जीवन आणि त्यांच्या संस्कृतीशी, त्यांच्या जिजीविषेशी ओळख करून घेण्यासाठीचं फिरणं होतं.
समाजाला मागे ढकलणाऱ्या हरतऱ्हेच्या विचार, रूढी, मूल्ये, मान्यता-परंपरांच्या विरूद्ध त्यांचे मन अतिशय तिरस्काराने भरलेले होते. त्यांचं संपूर्ण जीवन आणि लिखाण याविरूद्ध विद्रोहाचं जितं-जागतं उदाहरण आहे. यामुळेच त्यांना महाविद्रोहीसुद्धा म्हटले जाते. राहूल यांची ही वेगळी रचना आजसुद्धा आपल्या समाजातील प्रचलित रूढी-परंपरांच्या विरुद्ध तडजोड विहीन संघर्षाची आरोळी आहे.
तसे तर धर्मांमध्ये आपसात मतभेद आहेत. एक पूर्वेकडे तोंड करून पूजा करा सांगतो तर दुसरा पश्चिमेकडे. एक डोक्यावर केस वाढवायला सांगतो, तर दुसरा दाढी. एक मिशी कापायला सांगतो, तर दुसरा सांगतो मिशी ठेवा. एक म्हणतो जनावराचा गळा रगडून कापा, तर दुसरा सांगतो एका झटक्यात् मुंडी साफ करा. एक कुडत्याचा गळा उजवीकडे ठेवतो, तर दुसरा डावीकडे. एक शिवाशीवीचा कोणताही विचार बाळगत नाही, तर दुसऱ्याकडे प्रत्येक जातीची चूल वेगळी. एक खुदा शिवाय दुसऱ्या कोणाचे नावही जगात राहू देऊ इच्छित नाही, तर दुसऱ्यांकडे देवतांची गणती संपत नाही. एक गाईचे रक्षण करायला सांगतो, तर दुसरा तिच्या बळीचे पुण्य मानतो.
याच प्रकारे जगात सर्व धर्मांमध्ये बरेच मतभेद आहेत. हे मतभेद फक्त विचारांपुरते मर्यादित नाही राहिले, तर गेल्या दोन हजार वर्षांचा इतिहास सांगतो की या मतभेदांमुळे धर्मांनी एकमेकांवर अनन्वित अत्याचार केलेत. ग्रीस आणि रोमच्या अमर कलाकारांच्या रचनांचा आज अभाव का दिसतो? यामुळेच की तिथे एक असा धर्म आला जो अशा मूर्तींना स्वत:च्या अस्तित्वासाठी धोका मानत होता. इराणच्या ऐतद्देशीय कला, साहित्य, संस्कृतीला नामशेष का व्हावे लागले? – कारण, तिथे अशा एका धर्माशी गाठ पडली जो मानवतेचे नावच धरतीवरून संपवू पहात होता. मेक्सिको आणि पेरू, तुर्कस्तान आणि अफगाणिस्तान, इजिप्त आणि जावा – कुठेही पहा, धर्मांनी स्वत:ला कला, साहित्य, संस्कृतीचा शत्रूच सिद्ध केले आहे. आणि रक्तपात? त्याचे तर विचारूच नका. आपापल्या खुदा आणि ईश्वराच्या नावावर, आपापल्या पुस्तकांच्या आणि पाखंडाच्या नावावर यांनी माणसाच्या रक्ताला पाण्यापेक्षाही स्वस्त करून दाखवले. जर जुन्या ग्रीक धर्माच्या नावावर निर्दोष ख्रिश्चन आबालवृद्ध, स्त्री-पुरुषांना सिंहापुढे फेकणे, तलवारीने कापून काढणे मोठ्या पुण्याचे काम समजत होते, तर हातात अधिकार आल्यावर ख्रिश्चनांनी तरी मागे का रहावे? येशू ख्रिस्ताच्या नावावर त्यांनी खुलेपणाने तलवारीचा वापर केला. जर्मनीत लोकांना मानवतेमध्ये आणण्यासाठी जणू हत्याकांडच घडवले गेले. जुने जर्मन ओक वृक्षाची पूजा करत. त्या ओकने त्यांना पथभ्रष्ट करू नये याकरिता आसपासच्या वस्त्यांमध्ये एकही ओक राहू दिला नाही. पोप आणि पेत्रयार्क, इंजिल आणि येशूच्या नावावर प्रतिभावान लोकांच्या विचार-स्वातंत्र्याला आग आणि लोखंडाच्या सहाय्याने दडपत राहिले. थोड्याश्या मतभेदामुळे किती तरी लोकांची मुंडी छाटली गेली, किती तरी लोकांना जिवंत जाळले गेले. हिंदुस्तानाची भूमी सुद्धा अशा धर्मांधतेला कमी बळी पडलेली नाही. इस्लाम येण्याअगोदर सुद्धा काय मंत्र म्हणणाऱ्या आणि ऐकणाऱ्यांच्या तोंडात आणि कानात शिसे आणि लाख ओतली नव्हती? शंकराचार्या सारखा माणूस – सर्व शक्तिनिशी गळा फाडून ओरडत होता की सर्वकाही ब्रह्म आहे, ब्रह्मापेक्षा भिन्न ते सर्व असत्य आहे, त्यापासून ते रामानुजापर्यंत आणि इतर तत्वज्ञानाचे प्रवाह सुद्धा तोंडी जमाखर्चापुढे गेले नाहीत, उलट सर्वशक्तिनिशी शूद्र आणि दलितांना दाबून ठेवण्यात त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. इस्लाम आल्यानंतर तर हिंदू-धर्म आणि इस्लाममधले रक्ताळलेले झगडे आजवर चालत आलेत. त्यांनी तर आपल्या देशाला नरक बनवले आहे. म्हणतात की इस्लाम तर शक्ती आणि विश्वबंधुत्वाचा धर्म आहे, हिंदू धर्म ब्रह्मज्ञानाचा आणि सहिष्णुतेचा धर्म आहे; पण या दोन्ही धर्मांनी आपल्या या दाव्यांना वास्तवात उतरवून दाखवले का? हिंदू मुसलमानांना दोष देतात की ते निर्दोषांचे खून करतात; आमच्या मंदिरांना आणि पवित्र तीर्थांना नष्ट करतात; आमच्या स्त्रिया पळवून नेतात. पण, झगड्यांमध्ये काय हिंदू निर्दोषांचे खून करत नाहीत? तुम्ही कानपूर चे हिंदू-मुस्लिम झगडे घ्या, किंवा बनारस वा अलाहाबाद वा आग्र्याचे, तुम्हाला दिसेल की सगळीकडे हिंदू-मुस्लिमांच्या चाकू आणि लाठ्यांना बळी पडलते ते निरपराध, अज्ञात स्त्री-पुरूष, आबालवृद्ध. गावातला किंवा गल्लीतला एखादा कमनशिबी व्यक्ती चुकून त्या रस्त्याने जावा आणि कोणीतरी मागून सुरा भोसकून पसार व्हावे. सर्व धर्म दयेचा दावा करतात, पण हिंदुस्तानातील या धार्मिक झगड्यांना पहाल तर तुम्हाला समजेल की मानवताच इथे आसरा मागत आहे. नि:शस्त्र म्हातारे आणि म्हाताऱ्याच नाहीत तर छोटी-छोटी मुलंही मारली जातात. आपल्या धर्माच्या शत्रूंना जळत्या आगीत फेकण्याचे प्रसंग आजही बघायला मिळतात.
एक देश आणि एक रक्त मनुष्यांना भाऊ-भाऊ बनवतात. रक्ताचे नाते तोडणे अस्वाभाविक आहे, परंतु हिंदुस्तानात काय दिसून येते? हिंदूंच्या सर्व जातींमध्ये, मग सुरूवातीला काही का असेना, आज तर एकच रक्त वहात आहे; चेहरा पाहून तुम्ही सांगू शकत नाही की हा ब्राह्मण आहे आणि तो शूद्र. कोळशापेक्षाही काळे ब्राह्मण तुम्हाला लाखोंच्या संख्येने सापडतील. आणि शूद्रांमध्येही गव्हाळ रंग वाल्यांचा अभाव नाही. जवळपास राहणाऱ्या स्त्री-पुरूषांचे लैंगिक संबंध, जातींनी कितीही बंधने आणली तरी, नेहमीच घडत असतात. कितीतरी धनिक खानदानांबद्दल, राजवंशांबद्दल तर लोक स्पष्टच बोलतात की दासाचं पोर राजा आणि दासीचा पोर राजपुत्र. असे असूनही हिंदू धर्माचे लोक हजारो जातींमध्ये विभागलेले आहेत. कितीतरी हिंदू, हिंदू नावावर जातीय एकता स्थापित करू पाहतात. पण, ती हिंदू जातीय़ता आहे कुठे? हिंदू जात तर एक काल्पनिक शब्द आहे. अरे अस्तित्वात आहेत ते ब्राह्मण – ब्राह्मणच नाही तर शाकद्विपी, सनाढ्य, जुझौतिया – राजपूत, खत्री, भुमिहार, कायस्थ, चांभार, इत्यादी. — . एका राजपूताचे खाणे-पीणे, लग्न-श्राद्ध हे आपल्याच जातीपुरते मर्यादित असते. त्याचे सामाजिक विश्व त्याच्या जातीपुरतेच मर्यादित आहे. म्हणूनच एखादा राजपूत जेव्हा मोठ्या पदावर पोहोचतो, तेव्हा तो नोकरी लावणे, वशिला लावणे किंवा इतर मार्गांनी सर्वात अगोदर आपल्या जातीच्या माणसाला फायदा पोहचवू बघतो. हे तर स्वाभाविकच आहे. जेव्हा दिवसरात्र जगण्या-मरण्यात संबंध ठेवणारे फक्त आपल्याच बिरादरीचे लोक आहेत, तर नजर दूरवर जाईलही कशी?
म्हणायला तर हिंदूंवर टीका करत इस्लाम म्हणतो की आम्ही जाती-पातीची बंधने तोडली. इस्लाम मध्ये येताच सर्व भाऊ-भाऊ होतात. पण हे खरे आहे का? असे असते, तर आज मोमिन (विणकर), अप्सार (पिंजारी), राईन (काची) इत्यादींचा प्रश्न उपस्थित झाला नसता. अर्जल आणि अशरफ शब्द कोणाच्या तोंडावर आले नसते. सैयद-शेख, मलिक-पठाण आपल्यापेक्षा खालच्या जातींबद्दल तसाच विचार करतात जसे उच्चजातीय हिंदू. खाण्याच्या बाबतीत शिवाशीव कमी आहे, आणि आता तर ती हिंदूंमध्येही कमी होत चालली आहे. पण प्रश्न तर आहेच की – सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रात इस्लाममधील वरच्या जातींनी खालच्या जातींना पुढे येण्याची संधी कधी दिली का? धार्मिक नेता असेल तर शाही दरबार आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्व जागा वरच्या जातींसाठीच आरक्षित राहिल्या. जमिनदार, तालुकदार, नवाब सर्वच वरच्या जातींचे आहेत. हिंदुस्तानातील चार-पाच कोटी लोकांनी हिंदुंच्या सामाजिक, आर्थिक, आणि धार्मिक अत्याचारांपासून सुटकेकरिता इस्लामचा आसरा घेतला. पण, इस्लाम मधील वरच्या जातींनी काय त्यांना बहरू दिले? सातशे वर्षांनंतरही आज गावचा मोमिन जमिनदारांचा आणि मोठ्या जातींच्या जुलमाचा तसाच शिकार आहे, जसा त्याचा कानू वा कुर्मी जातीचा शेजारी. हिंदुंशी भांडून इंग्रजांचे पाय चाटून कौन्सिल मधील जागा, सरकारी नोकऱ्यांमध्ये जागा यांनी आपल्यासाठी सुरक्षित करून घेतल्या आहेत. पण जेव्हा त्या जागांच्या वितरणाचा प्रश्न उभा राहतो, तेव्हा त्यातील बहुतांश सर्वच जागा वरच्या जातीचे सैयद आणि शेख आपल्या हातात घेतात. साठ-साठ, सत्तर-सत्तर टक्के लोकसंख्या असलेल्या मोमिन आणि अंसार जाती तोंड बघत राहतात. बहाणा काय केला जातो तर त्यांच्यामध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. पण सातशे आणि हजार वर्षांनंतरही जर शिक्षणाच्या संधीमध्ये ते इतके पिछाडलेले असतील तर त्याचा दोष कोणावर आहे? त्यांना कधी शिकायची संधी दिली गेली? जेव्हा शिकण्याची वेळ आली, शिष्यवृत्ती देण्याची वेळ आली, तेव्हा तर सगळे लक्ष आपल्या भाऊबंदांकडेच दिले गेले. मोमिन आणि अन्सार, आचारी आणि चपरासी, सेवक आणि हुक्कासेवकाच्या कामासाठीच तर आहेत. त्यांच्यापैकी कोणी शिकला जरी, तरी त्याच्या वशिल्यासाठी आपल्या जातीत तसा प्रभावशाली व्यक्ती पण कोणी नाही; आणि बाहेर वाले आपल्या भाऊबंदकीला सोडून त्याला का भाव देतील? नोकऱ्या आणि पदांसाठी इतकी धावपळ, इतका मनस्ताप फक्त जातीच्या आणि देशाच्या सेवेसाठीच नाहीये, ती आहे रुपयांसाठी, सन्मानाच्या आणि आरामशीर जीवनासाठी.
हिंदू आणि मुसलमान वेगवेगळे धर्म असल्यामुळे काय त्यांची जात वेगळी होऊ शकते? ज्यांच्या नसांमध्ये त्यांच्याच पूर्वजांचे रक्त वहात आहे, जे याच देशात पैदा झाले आणि वाढले, मग दाढी आणि शेंडी, पूर्व आणि पश्चिमची नमाज (प्रार्थना) काय त्यांना वेगळा समुदाय सिद्ध करेल? रक्त पाण्यापेक्षा घट्ट नसते का? मग हिंदू आणि मुसलमानाच्या फरकाने बनलेल्या या वेगवेगळ्या जातींना हिंदुस्तानाबाहेर कोण स्विकार करते? जपान मध्ये जा किंवा जर्मनीत, इराणला जा किंवा तुर्कस्तानात, सगळीकडे आपल्याला हिंदी किंवा ‘इंडियन’ असेच बोलावतात. जो धर्म भावापासूनच दुरावतो, अशा धर्माचा धिक्कार! जो धर्म आपल्या आपल्या नावाने भावाचा खून करण्यास प्रेरित करतो, त्या धर्माचा सत्यानाश! जर माणसाने शेंडी कापून दाढी वाढवल्याने तो मुसलमान होत असेल आणि दाढी काढून शेंडी ठेवल्याने तो हिंदू वाटत असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे की हा भेद फक्त बाह्य आणि नकली आहे. एक चिनी मग तो बौद्ध असो वा मुसलमान, ख्रिश्चन असो वा कन्फ्युशियन, पण त्याची जात चीनीच राहते; एक जपानी मग तो बौद्ध असो वा शिंतो-धर्मी पण त्याची जात जपानीच राहते; एक इराणी मग तो मुसलमान असो वा पारशी, पण तो स्वत:साठी इराणी सोडून दुसरे नाव स्विकारायला तयार नाही. मग आपण हिंदी लोकांना धर्माच्या तुकड्यांमध्ये विभागायला तयार कसे आणि या अनैतिक कृत्याला आपण का सहन करावे?
धर्मांच्या मूळाशी घाव घातला गेला आहे; आणि त्यामुळेच आता धर्मांचा मेळ घालण्याच्या गोष्टी कधीकधी कानावर पडतात. पण, हे शक्य आहे का? “मजहब नही सिखाता, आपस मे बैर रखना” (धर्म आपसात वैर शिकवत नाही) – या बेमालूम थापेला काय म्हणावे? जर धर्म वैर शिकवत नाही, तर शेंडी-दाढीच्या लढाईमध्ये आज हजार वर्षे हा देश पिडीत का आहे? जुना इतिहास सोडा, आज सुद्धा हिंदुस्तानाच्या शहरांमध्ये, गावांमध्ये एका धर्मावाल्याला दुसऱ्या धर्मवाल्याच्या रक्ताची तहान कोण लावत आहे? कोण गाय खाणाऱ्यांना लढवत आहे? खरी गोष्ट तर हीच आहे – “मजहब तो है सिखाता आपस मे बैर रखना । भाई को है सिखाता भाई का खून पीना ।” (धर्म तर आपसात वैर शिकवतो, भावाला भावाचे रक्त प्यायला शिकवतो). हिंदुस्तान्यांची एकता धर्मांच्या मेळाने नाही तर धर्मांच्या चितेवर होईल. कावळ्याला धुवून हंस बनवता येत नाही. कांबळं धूवून रंगवता येत नाही. धर्मांचा आजार नैसर्गिक आहे. त्याचा, मृत्यूशिवाय इलाज नाही.
एकीकडे तर हे धर्म एकमेकांच्या रक्ताला इतके तहानलेले आहेत. त्यांच्यापैकी प्रत्येक दुसऱ्याला शिक्षा सुनावत आहे. कपडे-लत्ते, खाणे-पिणे, बोली-वाणी, प्रथा-परंपरा अशा प्रत्येक बाबतीत एक दुसऱ्याच्या उलटा मार्ग धरतो. पण, जिथे गरिबांच्या शोषणाचा आणि धनिकांच्या स्वार्थाच्या रक्षणाचा प्रश्न येतो, तेव्हा मात्र दोघेही बोलतात. गाढव-गावचे महाराज मूर्खशिरोमणी बख्श सिंह सात पिढ्यांपासूनचे पहिल्या दर्जाचे मूर्ख आहेत. आज त्यांच्याकडे वर्षाला पन्नास लाखांची जमिनदारी आहे, जी मिळवण्यासाठी ना त्यांना कणभर अक्कल खर्च केली ना आपल्या बुद्धीच्या जोरावर ते तिला सहा दिवसही चालवू शकतात. ना ते आपल्या मेहनतीद्वारे जमिनीतून एक छटाक तांदूळ पैदा करू शकतात, ना एक कवडी गूळ. महाराज मूर्खशिरोमणी बख्श सिंह यांना जर तांदूळ, गहू, तूप, लाकडाच्या एका ढिगासह जंगलात एकटे सोडले तरी ना त्यांच्याकडे इतकी बुद्धी आहे ना त्यांना कोणते काम येते की ते आपले पोट भरू शकतील; सात दिवसात तडफडून ते तिथंच मरतील. पण आज गाढव-गावात तर महाराज महिन्याला दहा हजार रूपये मोटारगाडीच्या इंधनासाठी फूंकतात. वीस-वीस हजार रूपये जोडीचे कुत्रे त्यांनी पाळलेत. दोन लाख रूपये खर्च करून त्यांच्यासाठी महाल बनलेला आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र डॉक्टर आणि नोकर आहेत. उन्हाळ्यात त्यांच्या घरात बर्फाचे तुकडे आणि वीजेचे पंखे चालतात. महाराजांच्या खाण्यापिण्याची तर बातच निराळी आहे. त्यांचे नोकर सुद्धा दूधातुपाने तृप्त आहेत, आणि ज्या पैशांची ते उधळपट्टी करतात्, ते पैसे येतात कुठून? त्या पैशांना पैदा करणारे कसे जगतात? – ते तर दाण्या-दाण्याला मोताद आहेत. त्यांच्या मुलांना महाराज मूर्खशिरोमणी बख्श च्या कुत्र्यांचे उष्टे मिळाले तर ते स्वत:ला धन्य समजतील.
पण जर एखाद्या धर्मानुयायला विचारले की अशा मूर्ख माणसाला हातपाय न हलवता दुसऱ्याच्या कष्टाच्या कमाईला अशा वेडेपणाने उधळण्याचा काय अधिकार आहे, तर पुजारी म्हणतील – “अरे तो तर पूर्वजांची कमाई खातोय. ईश्वरानेच त्यांना मोठं बनवलंय. वेद-शास्त्र सांगतात की लहान-मोठं बनवणारा तर ईश्वर आहे. जर गरीब अन्नाच्या कणासाठी दारोदर भटकत असेल, तर ही ईश्वराने त्याला दिलेली शिक्षा आहे.” जर एखाद्या मौलवी किंवा पादऱ्याला विचाराल तर उत्तर मिळेल – “तू काफिर आहेस का? नास्तिक तर नाही? गरीब-श्रीमंत हे तर जगाचा कारभार चालवायला ईश्वराने बनवलेत. ईश्वराच्या मर्जीमध्ये नाक खुपसण्याचा माणसाला काय अधिकार? गरिबाला ईश्वरी प्रसादच समजा. त्याची अधिनता आणि आज्ञाधारकता प्राप्त करा, सर्वनाशाच्या (कयामत) वेळी तुम्हाला याची मजुरी मिळेल.” विचारा जरा – जर विना मेहनतच महाराज मूर्खशिरोमणी बख्श सिंह पृथ्वीवरच स्वर्गसूख भोगत आहेत, तर अशा ‘दिव्याखाली अंधार’ दरबारात अधिनता आणि आज्ञाधारकतेने काही होण्याची आशा कशी असेल?
बावळट-शहराचे नवाब नामाकूल खान सुद्धा बरेच जुने धनाढ्य आहेत. त्यांची सुद्धा जमिनदारी आहे आणि ऐयाशीत तर ते मूर्खशिरोमणी बख्श सिंहापेक्षा कमी नाहीत. त्यांच्या शौचालयाच्या भिंतींवर अत्तर शिंपडले जाते आणि गुलाबपाण्याने त्याला धुतले जाते. सुंदर आणि आकर्षक स्त्रियांना फसवून आणण्यासाठी तर त्यांची शेकडो माणसं देशविदेशात फिरत राहतात. या पऱ्या एकाच मुलाखतीत त्यांना शिळ्या वाटू लागतात. कैक हकीम, डॉक्टर आणि वैद्य त्यांच्यासाठी शक्तिवर्धक औषधं, रसायनं तयार करत राहतात. दोन-दोन वर्ष जुनी दारू पॅरिस आणि लंडनच्या तळघरांमधून मोठी रक्कम मोजून मागवून ठेवली जाते. नवाब-बहादुरांचा तळवा तर इतका लाल आणि मुलायम आहे की इंद्राच्या पऱ्यांची जीभही नसेल. यांच्या पाशवी कामवासनेच्या तृप्तीसाठी कित्येक नवऱ्यांना तलवारीखाली जावे लागले आहे, कितीतरी पित्यांना खोट्या खटल्यांमध्ये तुरूंगात सडवले गेले आहे. वर्षाला साठ लाख उत्पन्नही त्यांच्यासाठी पुरेसे नाही. दरवर्षी पाच-दहा लाख रूपये कर्ज चढतेच. यांना G.C.S.I., G.C.I.E., फर्जिंद-खास फिरंग (इंग्रजांचे खास लाडके) इत्यादी मोठमोठ्या उपाध्या सरकार कडून मिळाल्या आहेत. व्हाईसरॉयच्या दरबारात सर्वात पहिली खुर्ची यांची असते आणि त्यांच्या स्वागतामध्ये व्याख्यान देण्याचे आणि अभिनंदन पत्र वाचण्याचे काम बावळट-शहराचे नवाब-बहादूर आणि गाढव-गावाचे महाराज बहादूर यांना मिळते. छोटे आणि मोठे अधिकारी या दोन्ही धनाढ्य उमरावांच्या बुद्धीचे, काम करण्याच्या योग्यतेचे आणि जनतेच्या पालनपोषणाचे कौतुक करताना थकत नाहीत.
नवाब-बहादुरांच्या ऐश्वर्याला खुदाची देणगी आणि कर्माचे फळ म्हणणाऱ्या पंडित, मौलवी, पुरोहित आणि पादऱ्यांचे एकमत आहे. रात्रंदिवस आपसात तसेच आपल्या अनुयायांमध्ये रक्तपाताचा बाजार तेजीत ठेवणारे, अल्ला आणि ईश्वर इथे मात्र एकमत असतात. वेद आणि कुराण, इंजिल आणि बायबल मध्ये याबद्दल फक्त एक शिक्षा आहे. या रक्तशोषक परजीवींच्या स्वार्थांचे रक्षणच जणू या धर्मांचे कर्तव्य आहे. आणि मेल्यानंतरही वैकुंठात आणि स्वर्गात सर्वात चांगले महाल, सर्वात सुंदर बगीचे, सर्वात सुंदर डोळ्यांच्या पऱ्या आणि अप्सरा, सर्वात चांगले मद्य आणि मधाचे प्रवाह बावळट-शहराचे नवाब-बहादूर आणि गाढव-गावाचे महाराज आणि त्यांच्या भाऊबंदांसाठी राखीव आहेत, कारण त्यांनी दोन-चार मशिदी, दोन-चार मंदिरं बनवले आहेत; काही साधू-फकिर आणि ब्राह्मण-मुजावर रोजच त्यांच्याकडे श्रीखंड-पुरी, कबाब-पुलावावर ताव मारत असतात.
गरिबांची गरीबी आणि दारिद्र्याच्या जीवनात काहीच बदलत नाही. हो, जर ते दर एकादशीला उपवास, प्रत्येक रमजानचे रोझे आणि सर्व तीर्थयात्रा, हज-जियारतच्या यात्रा न थांबता आणि काटेकोरपणे करत राहिले, स्वत:च्या पोटाला चिमटा घेऊन ब्राह्मण-मुजावरांचे पोट भरत राहिले, तर त्यांनाही जन्नत आणि वैकुंठाच्या कोणत्या तरी कोपऱ्यातील खोली आणि उरल्या-सुरल्या पऱ्या-अप्सरा मिळतील. गरिबांना फक्त या स्वर्गाच्या आशेवर आपले जीवन घालवायचे आहे. पण ज्या स्वर्ग-जन्नतच्या आशेवर आयुष्यभर दु:खाचे डोंगर चढायचे आहेत, त्या स्वर्ग-जन्नतचे अस्तित्वच आज विसाव्या शतकाच्या भूगोलात कुठे नाही. अगोदर पृथ्वी चपटी होती. स्वर्ग तिच्या उत्तरेकडील सात पर्वतांच्या आणि सात समुद्रांच्या पल्याड होता. आज ना चपट्या पृथ्वीचा पत्ता आहे ना उत्तरकेडील सात पर्वत आणि सात समुद्रांचा. ज्या सुमेरू पर्वतावर इंद्राच्या अमरावती क्षीरसागरात शेषावर पहुडलेला देव होता, ती आता फक्त मुलांचे मन रमवणारी गोष्ट उरली आहे. ख्रिश्चन आणि मुसलमानांच्या जन्नतसाठी सुद्धा त्याच वेळच्या भूगोलात स्थान होते. आजकालच्या भूगोलाने तर त्यांच्या मुळावरच घाव घातला आहे. मग त्या आशेवर लोकांना उपाशी ठेवणे दगाबाजी नाही काय?
कामगार बिगुल, मे 2021