जगातील सर्वात मोठा युद्ध गुन्हेगार – संयुक्त राज्य अमेरिका
विराट
ऑगस्ट १९४५, दुसरे जागतिक महायुद्ध जवळपास संपल्यात जमा आहे. जर्मनीला पूर्णपणे पराभूत करण्यात आले आहे आणि फासिस्ट नाझींनी, ज्यांचे नेतृत्व हिटलर कडे होते, शरणागती पत्करली आहे. हिटलरचा मित्र असलेला इटलीचा फासिस्ट नेता मुसोलिनीला अगोदरच जनतेने चौकात फासावर लटकावले आहे. करोडो बलिदानांच्या जोरावर सोवियत संघाच्या लाल-सेनेने जर्मनीची राजधानी बर्लिनवरती विजय मिळवला आहे आणि जर्मनीची संसद असलेल्या राइशस्टाग वर लाल झेंडा अभिमानाने फडकत आहे. जर्मन हल्ल्यांमुळे फ्रांस, ब्रिटेन सहित संपूर्ण युरोपची राखरांगोळी झाली आहे. जपानची बहुतांश शहरेसुद्धा उध्वस्त झाली आहेत. आणि त्यांचा पराभव सुद्धा अटळ आहे. जपानची ६८ मुख्य शहरे बॉम्बवर्षक विमानांनी उध्वस्त केली आहेत. उत्तरेकडून सोवियत संघ अंतिम प्रहार करण्याच्या तयारीत आहे आणि त्यामुळे जपान शरणागती पत्करण्यास जवळपास तयार झाला आहे. त्याच वेळी ६ ऑगस्ट रोजी जपानच्या हिरोशिमा शहरावर अमेरिकेचा अणुबॉम्ब हल्ला… सेकंदांमध्ये शहराचा जवळपास दोन तृतीयांश हिस्सा राखेत रुपांतरीत झाला आहे. जवळपास एक लाख लोकांचे मृतदेह राख बनून ह्या राखेत मिसळले आहेत. अमेरिकेच्या व्हाईट हाउसमध्ये विजयाचा उन्माद पसरलेला आहे. तीन दिवसांनंतर ९ ऑगस्ट रोजी जपानचे आणखी एक शहर नागासाकीवर अजून एक अणुबॉम्ब हल्ला. ८०,००० लोक राखेत रुपांतरीत. व्हाईट हाउस मधील विजयोन्माद अजूनच किळसवाण्या पातळीवर पोहोचलेला. हा विजयोन्माद जपानवरील विजयामुळे निर्माण झालेला नाही, कारण जपान तर अगोदरच शरणागती पत्करण्यास तयार होता. अणुबॉम्ब टाकून अमेरिका आता भांडवली राष्ट्रांचे नेतृत्व करण्यास सज्ज झाली आहे आणि हा विजयोन्माद त्याचाच आहे.
अगदी हेच चित्र होते जेव्हा दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या शेवटी अमेरिकेने जपानवर दोन अणुबॉम्ब टाकले आणि त्याच बरोबर जपानच्या तत्काळ शरणागतीच्या घोषणेसोबतच दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला. बहुतांश लोकांचा हाच समज असतो की जपानने अणुबॉम्ब हल्ल्यांमुळे शरणागती पत्करली. पण हे पूर्ण सत्य नाही. जपानमधील अधिकांश शहरे अणुबॉम्ब हल्ल्यांच्या अगोदरच जवळपास उद्ध्वस्त झाली होती आणि त्यांची केवळ १० महत्वाची शहरे तोपर्यंत सुरक्षित राहिली होती. हे निश्चितपणे म्हटले जाऊ शकते की त्या वेळी जपानच्या विजयाच्या सर्व शक्यता संपुष्टात आल्या होत्या आणि जरी अणुबॉम्ब टाकले गेले नसते तरी जपान शरणागतीच्या उंबरठ्यावर उभा होता आणि हा केवळ एक अनुमान वा तर्क नाही. जपान तोपर्यंत शस्त्रसंधी करण्यास तयार नव्हता कारण त्यांना बिनशर्त शरणागती पत्करायची नव्हती. त्याच बरोबर जपान त्याच्या अधिपत्याखालील भूभाग शाबूत ठेऊ इच्छित होता. स्टालिनच्या नेतृत्वाखालील सोवियत संघ जर तटस्थ राहून शस्त्रसंधी करण्यास तयार झाला तर काही अटी मान्य करून शस्त्रसंधी करण्यावर त्यांच्या आशा केंद्रित झाल्या होत्या. पण जेव्हा सोवियत संघाने उत्तरेकडून हल्ल्याच्या हालचाली सुरु केल्या तेव्हा जपानपुढे विनाअट शरणागती पत्करण्याशिवाय अन्य मार्ग उरला नव्हता. अमेरिकेला ही परिस्थिती समजत होती आणि ह्या परिस्थितीचा लाभ उचलण्यासाठीच अणुहल्ला केला गेला, जेणेकरून विजयाचे श्रेय अमेरिकेला मिळावे. ब्रिटेन अगोदरच अत्यंत कमकुवत झाले होते आणि आता ते जागतिक भांडवलशाहीचे नेतृत्व करण्याची कुवत गमावून बसले होते. दुसरीकडे युद्धादरम्यान अमेरिकेचे सर्वात कमी नुकसान झाले होते. त्याच बरोबर हे महायुद्ध त्यांच्या उद्योगांसाठी वरदान ठरले होते. शस्त्रास्त्रे व अन्य युद्धसामग्री यांच्या विक्रीतून अमेरिकन अर्थव्यवस्थेने प्रचंड नफा कमावला होता. अश्या परिस्थितीत जागतिक भांडवलशाहीचे नेतृत्व करण्यासाठी अमेरिका अव्वल व निर्विवाद दावेदार ठरण्याच्या मार्गावर होती. खरे तर १९४४ मधील ब्रेटन-वुड्स संधीच्या वेळीच तिचे स्थान भक्कम झाले होते परंतु जपानवरील अणुहल्ल्यांमुळे तिच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले. हे हल्ले एक प्रकारचे शक्ती प्रदर्शन होते. ह्या शक्ती प्रदर्शनाची किंमत लाखो जपानी लोकांनी त्यांच्या मृत्यूने चुकवली आणि आजही वेगवेगळ्या विकारांच्या रूपात चुकवत आहेत. ह्या हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांव्यतिरिक्त हल्ल्यातून जे रेडियेशन्स वातावरणात पसरले त्याचा प्रभाव आजही कायम आहे आणि तेथील जनतेसाठी तो शाप ठरला आहे. जपानमधील हा विध्वंस पार पाडल्यानंतर तेथील पुनर्निर्माणाची कंत्राटेसुद्धा अमेरिकेनेच मिळवली व त्याद्वारे अमेरिकन अर्थव्यवस्था अजूनच मजबूत झाली. युरोपमधील पुनर्निर्माण कार्याची कंत्राटे अमेरिकेनेच मिळवली. अश्या प्रकारे युद्ध काळात शस्त्रास्त्रे आणि युद्धोत्तर काळात पुनर्निर्माण कार्याची कंत्राटे मिळवून अमेरिका एक जागतिक महासत्ता बनली. तेव्हा पासून आजपर्यंत अमेरिकेने मानवतेविरुद्ध जेवढे अपराध केले आहेत त्यांची यादी देणे अशक्य आहे.
‘दहशतवादाविरुद्ध लढाई’च्या नावाखाली अमेरिकेने जगभरात जेवढी युद्धे छेडली आहेत, व त्यातून अमेरिकेला जो नफा होतो त्याचे मोजमाप करणेसुद्धा अवघड आहे. जगात युद्धे सुरु ठेवणे हे अमेरिकेला त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या मंदीच्या काळात अत्यंत गरजेचे आहे. महाशक्ति बनल्यानंतर जी असंख्य युद्धे अमेरिकेने जगातील जनतेवर लादली त्यातून अमेरिकेचा प्रचंड फायदा झाला, पण हेसुद्धा सत्य आहे की जनतेच्या अदम्य प्रतिकारासमोर अमेरिकेला नेहमीच पराभव पत्करावा लागला. १९५५ मध्ये अमेरिकेने जेव्हा व्हिएतनामवर साम्राज्यवादी युद्ध लादले त्यावेळी अमेरिकाला तिच्या सैन्य शक्तीचा प्रचंड अभिमान होता. परंतु लवकरच तिला ह्या गोष्टीची जाणीव झाली की आपल्या सैन्य शक्तीपेक्षाही झुंझार कष्टकरी जनतेची ताकत जास्त आहे. २० वर्षे चाललेल्या ह्या युद्धात अमेरिकेने अमानवीय युद्ध अपराध केले. व्हिएतनामवर कार्पेट बॉम्बिंग केली गेली आणि संपूर्ण युद्धात तब्बल ४० लाख व्हिएतनामी नागरिकांना जीव गमवावा लागला. परंतु जनतेच्या अभूतपूर्व संघर्षापुढे अमेरिका टिकू शकली नाही आणि शेवटी ह्या युद्धात तिचा अत्यंत लाजीरवाणा पराभव झाला. तत्पूर्वी, १९५३ मध्ये उत्तर कोरियाने सुद्धा जनतेच्या अदम्य साहसाचे दर्शन घडवीत अमेरिकेला पाणी पाजले होते.
जगभरात जिथे जिथे जनतेने गुलामगिरीचे जोखड फेकून देण्याचे प्रयत्न केले, त्या प्रत्येक ठिकाणी अमेरिका तिथल्या शासकवर्गाच्या बाजूने उभी राहिली. जिथे कुठे जनतेने विद्रोह केले, त्या सर्व ठिकाणी अमेरिकेने ते विद्रोह चिरडून टाकण्यात आपले योगदान दिले. मग ते क्युबामधील क्रांती विफल करण्याचे प्रयत्न असोत, चिलीमधील लोकनिर्वाचित अलेंदे सरकार उलथवून टाकण्यातील मध्यवर्ती भूमिका असो, समाजवादी चीनमध्ये प्रतिक्रांतीकारी शक्तींना बळ देणे असो किंवा ‘चे’ गव्हेरा सारख्या क्रांतीकारकांची हत्या करणे असो, ह्या प्रत्येक जनविरोधी कृत्यांमध्ये अमेरिकेने मध्यवर्ती भूमिका बजावली. इराक व अफगानिस्तारन विरुद्धच्या युद्धांमध्ये सुद्धा अमेरिकेने लाखो लोकांचे जीव घेतले आहेत.
आज इस्लामिक आतंकवाद संपवण्याच्या नावाखाली अमेरिका संपूर्ण अरब जगतात, आफ्रिका व अफगानिस्तान मध्ये युद्ध चालवत आहे. कदाचित आपल्याला हे ऐकून आश्चर्य होईल की ह्या दहशतवादाला अमेरिकेनेच निर्माण केले आहे. १९८० च्या दशकात अमेरिकेनेच अफगानिस्तानमध्ये सोवियत साम्राज्यवादाचा सामना करण्यासाठी आणि तेथील डाव्या विचारांच्या सरकारला उलथवून टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुजाहिदीन तयार केले. अमेरिकेने त्यासाठी अमाप पैसा आणि शस्त्रास्त्रे त्यांना पुरवली. पुढे चालून जेव्हा हे मुजाहिदीन तिच्या कामाचे राहिले नाहीत तेव्हा अमेरिकेने अफगानिस्तानमध्ये आपला साम्राज्यवादी विस्तार करण्याचे प्रयत्न सुरु केले. तेव्हा हे मुजाहिदीन अमेरिकेचेच शत्रू बनले. जे धार्मिक कट्टरपंथी मुजाहिदीन अमेरिकेने स्वतःचे हित जपण्यासाठी तयार केले, तेच आता तिचे सर्वात मोठे शत्रू बनले होते. त्यानंतर अमेरिकेने दहशतवाद संपवण्याच्या नावाखाली अफगानिस्तानमध्ये लष्करी प्रवेश केला. इस्लाेमिक स्टेट सारख्या अत्यंत क्रूर दहशतवादी संघटनेला तयार करण्यात सुद्धा अमेरिकेचाच मोठा हात आहे. सीरिया आधील असद सरकार उलथवून लावण्यासाठी अमेरिकेनेच इस्लाामिक स्टेट(इसीस)ला प्रचंड प्रमाणात शस्त्रास्त्रे व पैसा उपलब्ध करून दिला. असद सरकार उलथवून लावणे अमेरिकेला शक्य झाले नाही पण ह्या धार्मिक कट्टरपंथी संघटनेची ताकत मात्र मिळालेल्या आधुनिक शस्त्रास्त्रे व पैश्यामुळे प्रचंड वाढली. त्या जोरावरच आज ‘इस्लामिक स्टेट’ने इराक, सीरिया व अरब जगातील अन्य ठिकाणी अमानुषतेचा कहर माजवला आहे. सुरुवातीला अमेरिकेने त्यांना वाढवले आणि आज तेच अमेरिकेचे मोठे शत्रू झाले आहेत. इतर अनेक दहशतवादी संघटना अमेरिकेच्या आणि अन्य साम्राज्यवादी शक्तींच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाठींब्यावर अस्तित्वात आल्या आहेत. उदाहरणार्थ पँलेस्टाइनमध्ये झालेला ‘हमास’चा उदय हा अमेरिका व इसराइल कडून पँलेस्टाइनच्या जनतेचे जे भयंकर दमन व अत्याचार केले गेले त्या विरुद्धच्या प्रतिकाराच्या रुपात झाला आहे. त्याच बरोबर अमेरिका आज जगभरात दहशतवाद संपवण्याच्या नावाखाली जगभरातील निरपराध जनतेवर ड्रोन हल्ले करत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने अमेरिकाच जागतिक दहशतवादाचा निर्माता आणि दहशतवादी राष्ट्र आहे.
जगभरात युद्ध उभारून अमेरीकेने प्रचंड नफा कमावला आहे. युद्ध सामग्री व शस्त्रास्त्रांच्या निर्मिती मधील जगातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी ७ कंपन्या अमेरिकेतील आहेत! ह्या कंपन्यांचा अमेरिकन राजकारणावर प्रचंड प्रभाव व दबदबा आहे. ह्या कंपन्यांचा नफा कायम राहण्यासाठी युद्ध होणे अत्यंत गरजेचे आहे, जेणे करून त्यांच्या शस्त्रास्त्रांच्या उत्पादनाला मागणी कायम रहावी. त्याच बरोबर ह्या युद्धांच्या माध्यमातून अमेरिका विविध देशांमध्ये सरळ घुसखोरी करून तिथले बाजार स्वतःच्या नियंत्रणात आणू इच्छिते. मंदीच्या काळात जेव्हा भांडवलदारांचा माल विकला जात नाही त्यावेळी त्यांना नवीन नवीन बाजारपेठांची गरज भासू लागते. संपूर्ण अरब जगावर अमेरिका यासाठी युद्ध थोपत आहे कारण तिची नजर तिथल्या बाजारपेठेवर आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की अरब जगातील बहुतांश देशांनी त्यांच्या बाजारपेठा अमेरिकन भांडवलासाठी बंद ठेवल्या होत्या. ह्याच कारणामुळे अमेरिका ‘लोकशाही आणि शांती’च्या स्थापनेसाठी ह्या देशांमधील तिच्या विरोधातील सरकारे उलथवून त्यांच्या ठिकाणी तिला अपेक्षित असलेले बाहुले सरकार आणू इच्छिते, जे तिच्या इशाऱ्यांवर काम करेल. इराकमध्ये सद्दाम व लीबियामध्ये गद्दाफीची राजवट उलथवून टाकण्यामागे अमेरिकेचा हाच हेतू होता, जो पूर्णत्वास गेला. अरब जगतात युद्ध चालवण्यामागे अजून एक अत्यंत महत्वाचे कारण म्हणजे तिथे उपलब्ध असलेले कच्च्या तेलाचे प्रचंड साठे! आपण बघू शकतो की जगभरात युद्ध चालू ठेवण्यात अमेरिकेचा फायदाच फायदा आहे.
जापानमधील हिरोशिमा पासून इराक- अफगानिस्तान पर्यंत अमेरिकेने असंख्य निरपराध लोकांचा बळी घेतला आहे आणि अजूनही घेतच आहे. भांडवली देशांच्या नेतृत्वकारी देशाची आपली घृणास्पद भूमिका अमेरिका तिच्या पूर्ण शक्तीनिशी पार पाडत आहे. ह्यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकते की आपली ही अमानुष कृत्ये अमेरिका ‘जागतिक शांतते’च्या नावाखाली पार पाडते आहे? परंतु दुसऱ्या महायुद्धापासून आजपर्यंतच्या इतिहासावरून एक गोष्ट अगदीच स्पष्ट आहे की जनतेच्या दुर्दम्य इच्छाशक्ती व शौर्यापुढे अमेरिकेला नेहमीच पराभूत व्हावे लागले आहे. मग ते व्हिएतनाम असो, पँलेस्टाइन असो, इराक असो वा अफगानिस्तान असो. हा इतिहास आहे की जनतेने कुठेही अमेरिकेसमोर शरणागती पत्करलेली नाही. जगभरातील विविध देशांमधील शासनकर्ते भलेही अमेरिकेच्या सोबत असोत, पण प्रत्येक ठिकाणी जनता तिच्या विरोधात प्रतिकाराची तलवार घेऊन उभी राहिलेली आहे आणि आपण ही गोष्ट विसरता कामा नये की इतिहास जनता बनवते, शासक नव्हे!
कामगार बिगुल, सप्टेंबर २०१५