23 जुलै, चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने
चंद्रशेखर आझादांची शहादत सतत प्रेरणा देत राहील!

नेहा

शहादत थी हमारी इसलिये कि

आज़ादियों का बढ़ता हुआ सफ़ीना

रुके न एक पल को

मगर ये क्या? ये अँधेरा

ये कारवाँ रुका क्यों है?

चले चलो कि अभी काफ़िला-ए-इंकलाब को

आगे, बहुत आगे जाना है।

चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मदिनाला 115 वर्षे पूर्ण झाली. तरीही आजपर्यंत त्यांचा विसर कुणाला पडलेला नाही. त्यांच्या अलोट धैर्याने आणि त्यागाने देशात जे चैतन्य निर्माण केले, ते आजच्या तरुण पिढीला क्रांतिकारी स्फूर्ती देत आहे. चन्द्रशेखर आझाद यांनी कामगारांचे , गरिबांचे जीवन खूप जवळून बघितले होते. स्वातंत्र्यानंतर कामगार वर्गाच्या राज्याची स्थापना व्हावी असे त्यांचे स्वप्न होते. महान युवा क्रांतिकारक आणि हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन चे कमाण्डर चन्द्रशेखर आझाद यांचे जीवन शोषण, अन्याय, अत्याचारावर आधारित व्यवस्थेमध्ये जीवन जगत असलेल्या युवकांना प्रेरणेचा स्त्रोत आहे, ज्यांना या व्यवस्थेत गुदमरल्यासारखे वाटते आणि विशेषत: कामगार-कष्टकरी वर्गातून आलेल्या तरुण मुला-मुलींसाठी ज्यांच्यासाठी क्रांती ही एकच आशा उरली आहे, त्यांच्यासाठी चंद्रशेखर आझादचे व्यक्तिमत्त्व मार्ग दाखविण्याकरिता मशालसारखे आहे.

आझाद यांचा जन्म 23 जुलै, 1906 रोजी मध्यप्रदेश राज्यातील भाबरा गावात झाला, एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्यांना प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याची संधीही मिळाली नव्हती. या बाबींमध्ये ते हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मी (एच.आर.ए.) आणि हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (एच.एस.आर.ए.) च्या इतर क्रांतिकारकांपेक्षा भिन्न होते, जे बहुतेक मध्यमवर्गामधून आलेले सुशिक्षित युवक होते. आझाद हे एच.आर.ए. आणि एच.एस.आर.ए. यांच्यामधील सर्वात कळीचे व्यक्ती होते आणि काकोरी प्रकरणानंतर आझाद यांनी  क्रांतिकारक संघटनेमध्ये विखुरलेल्या सूत्रांना जोडून ठेवण्यात व संघटनेला एकसंध करण्यात नेतृत्वाची भूमिका बजावली होती. हे काम अत्यंत खडतर होते. चंद्रशेखर आझाद अतिशय लढाऊ वृत्तीचे व्यक्ती होते, परंतु स्वभावाने अतिशय शांत व संयमी होते. विशेषतः ज्या ज्या वेळी सशस्त्र उठावाची कामगिरी त्यांच्याकडे असे त्या त्या वेळी ते अत्यंत शांत व संयमीपणे वागायचे. आपल्या ध्येयाच्या बाबतीत अतिशय निर्भयी होते. चळवळीच्या धकाधकीतून मिळणाऱ्या थोड्याफार वेळात ते राजकीय अभ्यास करत असत. त्यांना इंग्रजी चांगले वाचता येत नसे. त्यामुळे इंग्रजीतील समाजवादी साहित्य व वैचारिक साहित्य ते इतर साथीदारांकडून वाचून घेऊन नीट समजावून घेत असत. इ.स.1921 मध्ये महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात तेव्हाच्या 15 वर्षे वयाच्या चंद्रशेखरने सहभाग घेतला होता. त्यासाठी त्यांना अटक झाली होती. तेव्हा न्यायालयात चंद्रशेखरने आपले आडनाव ‘आझाद’ असल्याचे नोंदवले. तेव्हापासून ते त्याच आडनावाने ओळखले जाऊ लागले. 1925 साली काकोरी येथे दहशतवाद्यांनी रेल्वेवर केलेल्या हल्ल्यात चंद्रशेखर आझादांनी भाग घेतला होता. 1920-30 च्या दरम्यान दहशतवादी चळवळीकडे खेचले गेलेले तरुण क्रांतिकारक जनतेचे स्फुर्तीस्थान बनले होते. तरुणांतले प्रामुख्याने नजरेसमोर येणारे एक नाव म्हणजे चंद्रशेखर आझाद. पंजाब , उत्तर प्रदेश , बिहार या प्रांतात त्याचे कार्यक्षेत्र होते. त्यामुळे चंद्रशेखर आझादांचे नाव कानावर आले तर या प्रांतातील पोलिस अधिकारी अक्षरशः चळाचळा कापू  लागायचे.

सन 1931 भारताच्या क्रांतिकारी आंदोलनासाठी व देशातील कष्टकरी जनतेसाठी सर्वांत घातक ठरलं! आयुष्यभर अंगीकारलेल्या सशस्त्र लढ्याच्या मार्गावर लढत लढतच 27 फेब्रुवारी 1931 रोजी इंग्रजांशी लढतांना आझाद शहीद झाले आणि 23 मार्च 1931 लाच भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना इंग्रज सरकारने फाशी देऊन भांडवलशाही-साम्राज्यशाही व प्रत्येक प्रकारच्या शोषणाविरुद्ध लढणाऱ्या खऱ्या योद्धांना आपल्या मार्गातून हटविले. या क्रांतिकारकांच्या बलिदानानंतर कामगार कष्टकऱ्यांची सत्तेची आशा धूसर झाली, परंतु संपली नाही. कारण ह्या व्यक्तींना मारून सुद्धा ते त्यांच्या विचारांना संपवू शकले नाहीत.

चंद्रशेखर आझाद यांचा जन्म कमालीची गरिबी, अशिक्षितता, धार्मिक कट्टरतेच्या वातावरणात झाला. ते फक्त पुस्तकं वाचून नाहीत तर राजकीय संघर्ष व जीवन संघर्षातील आपल्या सक्रिय अनुभवातून शिकून त्या क्रांतिकारी दलाचे नेते झाले ज्या दलाचं उद्देश्य फक्त इंग्रजांना घालवणं नव्हतं तर एक शोषणविरहित आणि समतामूलक समाजाची स्थापना करणं होतं. कामगारांच्या सत्तेशिवाय आणि शोषणाच्या प्रत्येक रूपाचा विनाश केल्याशिवाय, देशातील कष्टकरी जनतेची मुक्ती शक्य नाही हे सत्य ते जाणून होते. जोपर्यंत आपल्या देशातील जनता देशी – विदेशी भांडवलदारांच्या नफ्यासाठी आपल्या हाडामासाचा, रक्ताचा एक एक थेंब वाहायला मजबूर आहे, जोपर्यंत शिक्षण, आरोग्य, रोजगार, उत्तम आवास, उत्तम भोजन यांपासून एकही कामगार वंचित आहे, जोपर्यंत भूक आणि कुपोषणाचा भस्मासुर आमच्या बालकांना गिळत राहील तोपर्यंत आमच्या क्रांतिकारकांचे स्वप्न आमच्या स्मरणात राहील. ज्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी त्यांना आपल्या प्राणांची देखील आहुती द्यावी लागली ते स्वप्न आम्ही जिवंत ठेवू.

साथींनो, आजचा काळ हातावर हात धरून आणि स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवून बसण्याचा नाही. कुणी तारणहार किंवा पैगंबर येऊन आपल्याला मुक्ती मिळवून देईल असेही नाही. आपणच आपली ताकद ओळखायला हवी. चंद्रशेखर आझादांसारखे क्रांतिकारक देखील कोणी अवतार पुरुष नव्हते, ते सुद्धा तुमच्या आमच्या सारखे मानवंच होते. त्यांनीसुद्धा मुंबईत मजुरी करण्यापासून कितीतरी रात्री रस्त्यावर व फूटपाथवर व्यतीत केल्या होत्या. परंतु त्यांनी जीवनाच्या त्या संकटांपुढे गुडघे न टेकता जीवनाला अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण बनविण्याचं जे स्वप्न बघितलं, जो संकल्प केला त्यास पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न शेवटच्या श्वासापर्यंत करत राहिले. आपण कष्टकऱ्यांनी ज्या हातांनी या भांडवली जगाच्या इमल्यांना उभं केलं, ज्यावर भांडवलदार मिरवतात, त्याच हातांनी आता आपल्या शोषणमुक्त समतामूलक भविष्याला रचावं लागेल. नव्या जोमानं क्रांतिकारी आंदोलनाची सुरुवात करावी लागेल. इतिहासातील चुकांपासून धडा घेत, क्रांतिकारी संघटनेचा पाया रचावा लागेल. आपल्याला पुन्हा एकदा नव्या ऊर्जेनं आणि नव्या आवेगानं आपल्या मुक्तीस्वप्नांना देशाच्या कानाकोपऱ्यात पसरवावं लागेल. शासक वर्गाच्या आपल्याला जाती धर्मात विभागण्याच्या षडयंत्राविरुद्ध आपल्याला सर्व जाती-धर्मातील कष्टकऱ्यांची वर्गीय एकजूट बनवावी लागेल. तेंव्हाच आपण आपल्या शहिदांच्या वास्तविक स्वप्नांना पूर्ण करू शकू.