स्त्री कामगारांचा संघर्ष श्रमाच्या मुक्तीच्या महान संघर्षाचा हिस्सा आहे !
– एलियानोर मार्क्स (अनुवाद: निमिष)
कामगार वर्गाचे महान नेते आणि शिक्षक कार्ल मार्क्स ह्यांची सगळ्यात लहान मुलगी एलियानोर मार्क्स वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच वडिलांच्या सचिवाची जबाबदारी पार पाडत होती आणि कामगार चळवळ तसेच समाजवाद ह्या विषयांवरील आंतरराष्ट्रीय संमेलनांमध्ये त्यांच्याबरोबर सहभागी देखील होत होती. कार्ल मार्क्स ह्यांच्या मृत्यूनंतर त्यांची अपूर्ण हस्तलिखितं प्रकाशनासाठी तयार करण्याकरिता फ्रेडरिक एंगेल्ससोबत एलियानोर ह्यांनी काम केले. एलियानोर आणि त्यांचे पती एडवर्ड अवेलिंग इंग्लंडच्या समाजवादी चळवळीत सक्रिय होते. एलियानोर इंग्लंडच्या सर्वोत्तम वक्त्यांपैकी एक म्हणून प्रसिद्ध होती. १८८६ मध्ये एलियानोरने क्लेमेंटिना ब्लॅकबरोबर महिला कामगारांना संघटित करण्याचे काम हाती घेतले. त्या विमेन्स ट्रेड युनियन लीग मध्ये देखील सक्रिय होत्या. लंडनच्या एका मोठ्या आगपेटी कारखान्यातील महिला कामगारांचा यशस्वी संप संघटित करण्यामध्ये देखील त्यांनी त्यांच्या मैत्रीण असणाऱ्या ॲनी बेझंट ह्यांची मदत केली होती. ‘नॅशनल युनियन ऑफ गॅस वर्कर्स अँड जनरल लेबरर्स’ संघटित करण्यामध्ये देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आणि गोदी कामगारांच्या संपात देखील त्या सहभागी होत्या. एलियानोर ह्यांनी वैज्ञानिक समाजवादावरच्या अनेक वैचारिक पुस्तकांचा व अनेक प्रसिद्ध साहित्यिक कृतींचा इंग्रजीत उत्कृष्ट अनुवाद केला. त्यांनी कामगार चळवळीवर अनेक पुस्तके व महत्त्वाचे लेख लिहिले, उदाहरणार्थ ‘द फॅक्टरी हेल’ (कारखान्यातील नरक), ‘द विमेन क्वेश्चन’ (स्त्री प्रश्न), ‘अमेरिकेतील कामगार चळवळ’, शेलीचा समाजवाद’ आणि ‘इंग्लंड मधील कामगार चळवळ’. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही एलीयानोर ह्यांच्या काही लेखांमधील महत्त्वाचे भाग प्रकाशित करत आहोत जे आपल्या देशातील महिला कामगारांना संघटित करण्यामधील समस्या आणि आव्हानांबद्दल आजदेखील प्रासंगिक ठरतील असे आहेत.
– संपादक
आपण कशा पद्धतीने संघटित झाले पाहिजे?
केवळ वर्ग संघर्षाकडे लक्ष वेधणे पुरेसे नाही. कुठली हत्यारं वापरायची आणि ती कशी वापरायची ह्याचे ज्ञान देखील कामगारांना असणे आवश्यक आहे. कुठल्या परिस्थितीत हल्ला चढवायचा आहे आणि आधी मिळवलेले कोणते लाभ अबाधित ठेवायचे आहेत. संप आणि बहिष्काराचा मार्ग कुठे आणि कधी अवलंबायचा, कामगारांच्या अधिकारांचे संरक्षण करणारे कायदे कसे पदरात पाडून घ्यायचे आणि आधी मिळवलेले कायदे केवळ कागदावरच राहू नयेत ह्यासाठी काय करायचे हे आता कामगार शिकत आहेत. अशा परिस्थितीत आपण स्त्रियांनी काय केले पाहिजे? निःसंशयपणे आपल्याला जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपण संघटित होऊ तेव्हा महिला म्हणून संघटित व्हायचे नाही, तर सर्वहारा म्हणून. आपल्या पुरुष कामगारांच्या स्त्री प्रतिद्वंद्वी म्हणून नव्हे तर संघर्षात त्यांच्या साथीदार म्हणून. आपण संघटित कसे व्हावे हा सगळ्यात गंभीर प्रश्न आहे असे मला वाटते. आपण आपले अंतिम उद्दिष्ट — आपल्या वर्गाच्या मुक्तीपर्यंत पोहोचण्याचे साधन म्हणून आपल्या संघटित शक्तिचा उपयोग करत ट्रेड युनियन मध्ये संघटित होण्यापासून सुरुवात केली पाहिजे असे मला वाटते. हे काम सोपे निश्चितच नाही. खरंतर महिला कामगारांची परिस्थिती इतकी बिकट आहे कि त्यात पुढे जाणे हे काळीज पिळवटून टाकेल इतके कठीण असते.
परंतु दिवसेंदिवस हे काम अधिकाधिक सोपे होईल. सर्वच कामगारांना एकजूट करण्यात किती ताकद आहे हे जसजशा स्त्रिया, आणि विशेषतः पुरुष समजू लागतील तसतसे हे काम सोपे वाटू लागेल.
स्त्री कामगारांना संघटित करण्यामधील समस्या
आजवर झालेली प्रगती जरी संतोषजनक असली, आणि कामगार संघटनांनी जी प्रगती केली आहे ती उल्लेखनीय जरी असली तरी महिला आजही खूप मागे आहेत, आणि अनेक वर्षांच्या मेहनतीतुन मिळवलेले परिणाम अत्यंत कमी आहेत ह्या सत्यापासून आपण आपली डोळेझाक करून घेऊ शकत नाही.
कापड उद्योग, जिथे महिला कामगार सर्वप्रथम ट्रेड युनियनमध्ये संघटित झाल्या होत्या, तिथेही अनेक कमतरता आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अनेक क्षेत्रांमध्ये महिला आजही असंघटित आहेत, पण आता अशी क्षेत्रे कमी होत आहेत, कारण असंघटित महिला कामगार कसे त्यांच्याविरोधात मालकांच्या हातातले हत्यार बनून जातात हे आता ट्रेड युनियन देखील शिकत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ट्रेड युनियन चालवण्यात महिला कामगारांचा काहीच सहभाग नसतो.
उदाहरणार्थ लँकेशायर आणि यॉर्कशायर मध्ये(इंग्लंड मधील दोन शहरे – संपादक), जिथे स्त्रिया निरपवादपणे युनियन सदस्य आहेत, नियमितपणे युनियनला सहयोग देतात आणि युनियनचा लाभ देखील घेतात, तिथेही ह्या संघटनांच्या नेतृत्वात त्यांची कोणतीही भूमिका नसते, त्यांच्या स्वतःच्या युनियनच्या कोषाच्या व्यवस्थापनाबाबत त्यांचे कसलेही मत घेतले जात नाही, आणि आजवर कधीही त्या त्यांच्या युनियनच्या संमेलनांमध्ये प्रतिनिधी बनलेल्या नाहीत. प्रतिनिधित्व आणि प्रशासन संपूर्णतः पुरुषांच्या हातात असते.
स्त्रियांच्या ह्या स्पष्ट दुय्यमतेचे आणि उदासीनतेचे कारण समजणे सोपे आहे. सर्वच स्त्री संघटनांच्या बहुतांश बाबींमध्ये सामान्यतः हेच दिसून येते आणि आपण ह्याकडे डोळेझाक करू शकत नाही. ह्याचे कारण हे आहे कि आजही स्त्रियांना दोन जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात : फॅक्टरीत त्या सर्वहारा असतात व रोजंदारी कमावतात, जिच्यावर तिची व तिच्या मुलांची गुजराण बऱ्याच अंशी अवलंबून असते, पण त्या घरगुती गुलाम देखील आहेत, त्यांच्या नवऱ्याच्या, वडिलांच्या आणि भावांच्या बिनपगारी नोकर. सकाळी फॅक्टरीला जाण्यापूर्वीच स्त्रियांनी इतके काम केलेले असते कि तेच काम जर पुरुषांनी केले तर त्यांना खूप मोठी कामगिरी पार पाडल्यासारखी वाटेल. दुपारच्या वेळी पुरुषांना कमीतकमी थोडा वेळ आराम मिळण्याची अपेक्षा असते, पण स्त्रियांना तेव्हासुद्धा आराम मिळत नाही. आणि सरतेशेवटी बिचाऱ्या पुरुषाला संध्याकाळचा वेळ तरी स्वतःसाठी मिळतो पण त्याहून अधिक बिचाऱ्या स्त्रीला तर त्या वेळेतही काम करावे लागते. घरातले काम तिची वाटच बघत असते. तिला मुलांकडे बघावे लागते, कपड्यांची धुलाई आणि डागडुजी करावी लागते. थोडक्यात जर कुठल्याही औद्योगिक वस्तीतले पुरुष फॅक्टरीत दहा तास काम करत असतील, तर स्त्रिया सोळा तास काम करतात. त्यानंतर त्या आणखी कुठल्याही गोष्टीत सक्रिय सहभाग कसा घेऊ शकतील? हे भौतिकदृष्ट्याच असंभव असल्याचे दिसून येते. पण तरीही ह्याच औद्योगिक क्षेत्रांमध्ये स्त्रियांची स्थिती सर्वात चांगली आहे. त्यांना ‘चांगली’ मजुरी मिळते, पुरुषांचे त्यांच्याशिवाय पान हलत नाही, आणि म्हणूनच त्या तुलनेने स्वतंत्र आहेत. आपण जर त्या शहरांमध्ये व जिल्ह्यांमध्ये जाऊन बघितले जिथे स्त्रियांच्या कामाचा अर्थ आहे निरस आणि थकवणारे काम, जिथे सामान्यतः बहुतांश काम हे घरीच (एखाद्या मालकासाठी घरीच केलेलं काम) केलेलं काम असतं तिथे परिस्थिती सगळ्यात वाईट आणि संघटित होण्याची गरज सगळ्यात अधिक असल्याचे दिसून येते.
गेल्या काही वर्षात ह्या समस्येवर बरेच काम झाले आहे, पण प्रयत्नांच्या तुलनेत निष्पन्न फारसे काही झालेले नाही असेही मला म्हणावे लागेल. परंतु स्त्री कामगारांची दयनीय परिस्थिती हेच ह्याचे एकमेव कारण आहे असे मला वाटत नाही. बहुतांश स्त्री संघटनांच्या बांधणी आणि संचालनाच्या पद्धतीत ह्याचे एक प्रमुख कारण निहीत आहे असे मला वाटते. ह्यातील बहुतांश संघटनांचे नेतृत्व मध्यमवर्गातील स्त्री व पुरुष दोघेही करतात असे दिसून येते. हे लोक एका चांगल्या हेतूने काम करतात ह्याबद्दल दुमत नाही, पण कामगार चळवळीचे उद्दिष्ट काय हे ते समजून घेऊ इच्छित नाहीत व समजून घेऊ शकतही नाहीत. ते त्यांच्या आजूबाजूला पसरलेली गरिबी पाहून अस्वस्थ होतात आणि ह्या कमनशिबी कामगारांची परिस्थिती सुधारण्याची त्यांची इच्छा असते. परंतु ते आपले लोक नाहीत.
लंडनच्या दोन संघटनांची उदाहरणे घेऊ ज्यांनी स्त्रियांची युनियन्स बनवण्यासाठी बरेच कष्ट केले आहेत. विमेन्स ट्रेड युनियन प्रॉव्हिडन्ट लीग हि जुनी संघटना आहे व विमेन्स ट्रेंड युनियन असोसिएशन हि नवीन संघटना आहे. पहिल्यापेक्षा दुसऱ्या संघटनेची उद्दिष्टे थोडी जास्त प्रगत आहेत परंतु दोन्ही संघटनांचे नेतृत्व आणि जनाधार सर्वात अभिजन आणि रोकड्या भांडवली मानसिकतेचे स्त्री-पुरुष करतात. बिशप, पाद्री, भांडवली लोकप्रतिनिधी, आणि त्याहून अधिक कद्रू भांडवली मानसिकतेच्या त्यांच्या बायका, धनाढ्य आणि अभिजन स्त्रिया, आणि भद्रजन अनेक स्त्री संघटनांचे पालनकर्ते आहेत.
कोट्यधीश लॉर्ड ब्रेसेन सारखे निर्लज्ज शोषक, आणि अति प्रतिक्रियावादी सर ज्युलियन गोल्डश्मिड ह्यांची बायको ह्यांसारख्या ‘अभिजन महिला’ विमेन्स लीग करिता पैसे गोळा उभे करण्यासाठी ‘सलून चहापानाचे’ आयोजन करतात, तर लेडी डिलके ह्या चळवळीचा उपयोग आपल्या नवऱ्याच्या राजकीय हितासाठी करते. एका बैठकीत एका स्त्री कामगाराने तिच्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेल्या लोकांच्या शहाणपणाच्या सल्ल्याबद्दल चिकित्सक रस दर्शवला, ह्याबद्दल ह्यांना वाटलेले आश्चर्यच ह्यांचे कामगारांबद्दलचे अज्ञान किती मोठे आहे ते दाखवते. कामगार स्त्रिया स्वतःच्या हितांबद्दल देखील असाच चिकित्सक रस दाखवतील, आपल्या बाबी स्वतःच्या हातात घेतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वहाराच्या महान आधुनिक चळवळीचा एक मोठा आणि जिवंत भाग बनतील अशी आम्हाला आशा आणि विश्वास वाटतो. बऱ्याच अंशी त्यांनी असे केले देखील आहे.
स्त्री कामगार आणि बुर्झ्वा (भांडवली विचारांच्या) स्त्रियांची उद्दिष्टे वेगवेगळी आहेत
‘अनेक चांगली उद्दिष्टेच नरकाकडे घेऊन जातात’ अशी एक जुनी इंग्लिश म्हण आहे. स्त्री कामगार बुर्झ्वा स्त्री चळवळीच्या मागण्या समजून घेऊ शकतात, त्या मागण्यांबद्दल सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेवू शकतात, आणि त्यांचा दृष्टिकोन तसाच असला पाहिजे, फक्त स्त्री कामगार आणि बुर्झ्वा स्त्रियांची उद्दिष्टे खूप वेगवेगळी आहेत.
मी माझा दृष्टिकोन स्पष्टपणे मांडू इच्छिते, आणि अनेक स्त्रियांच्या वतीने मी तो मांडत आहे असे मला वाटते. स्त्रिया म्हणून आम्हालाही स्त्रियांकरिता ते सर्व अधिकार मिळवायचे आहेत जे आज पुरुषांना, ज्यात पुरुष कामगार देखील शामिल आहेत, मिळाले आहेत. परंतु ‘स्त्री प्रश्न’ हा श्रमाच्या मुक्तीच्या व्यापक प्रश्नाचेच एक अनिवार्य अंग आहे असे आम्ही मानतो.
‘स्त्री प्रश्न’ अस्तित्वात आहे ह्याबद्दल दुमत नाही. परंतु आमच्यासाठी, म्हणजेच जन्माने, किंवा कामगारांच्या उद्दिष्टांसाठी कार्यरत असल्यामुळे कामगार वर्गात गणल्या जाणाऱ्यांसाठी हा व्यापक कामगार चळवळीचा मुद्दा आहे. जेव्हा उच्च किंवा मध्यमवर्गीय स्त्रिया न्याय्य अधिकारांसाठी लढतात तेव्हा आम्ही त्यांना समजून घेऊ शकतो, त्यांना सहानुभूती देखील दर्शवू शकतो, व गरज पडल्यास त्यांची मदत देखील करू शकतो, आणि हे अधिकार मिळवल्याने कामगार स्त्रियांना देखील फायदाच होईल.
परंतु ह्या स्त्रियांनी केलेल्या सर्व मागण्या आज मान्य जरी झाल्या तरी कामगार स्त्रियांच्या आयुष्यात खूप फरक पडणार नाही. स्त्री कामगार तेव्हा देखील प्रदीर्घ काळासाठी, अत्यंत कमी मजुरीवर व आरोग्यास अत्यंत घातक अशा परिस्थितीत काम करत राहतील, तेव्हाही वेश्यावृत्ती आणि उपासमार ह्यांतील निवड त्यांना करावीच लागेल. हे देखील पहिल्यापेक्षा जास्त प्रकर्षाने दिसेल कि वर्ग संघर्षात स्त्री कामगारांना त्यांच्या शत्रू गोटात नेक स्त्रिया भेटतील; पण त्यांना अशांशी देखील तितक्याच उग्रपणे लढावे लागेल जितके कामगार वर्गातील त्यांच्या बांधवांना भांडवलदारांशी लढावे लागते. मध्यमवर्गातील स्त्री-पुरुषांना एक ‘मुक्त-क्षेत्र’ हवे आहे, जेणेकरून कामगारांचे शोषण केले जाऊ शकेल.…
जेव्हा बुर्झ्वा स्त्रिया अशा कुठल्याही अधिकाराची मागणी करतात जो आपल्यासाठी देखील फायद्याचा आहे, तेव्हा आपण देखील त्यांच्या बरोबरीने लढू, जसे आपल्या वर्गातील पुरुषांनी सुद्धा मतदानाच्या अधिकाराला केवळ त्याची मागणी भांडवलदार वर्गाने केली आहे म्हणून नाकारले नव्हते. आपण देखील बुर्झ्वा स्त्रियांनी आपल्या हितासाठी मिळवलेला असा कोणताही अधिकार नाकारणार नाही जो त्या आपल्याला इच्छेने वा अनिच्छेने प्रदान करतात. आम्ही अशा अधिकारांना हत्यारे म्हणून स्वीकारतो, अशी हत्यारे जी आम्हाला आमच्या कामगारवर्गीय बांधवांच्या बरोबरीने उभं राहून लढायला बळ देतात. आम्ही पुरुषांशी लढण्यासाठी एकत्र आलेल्या स्त्रिया नसून, शोषकांच्या विरोधात लढणारे कामगार आहोत.
कामगार बिगुल, मार्च 2022