शिवसेना-भाजप मधील कलगीतुरा व त्याचा खरा अन्वयार्थ
नेहा
कधीकाळी शिवसेना आणि भाजप बरेच वर्ष मित्रपक्ष होते, पण नुकताच शिवसेनेचे संजय राऊत व भाजपचे किरीट सोमय्या यांच्यात जो कलगीतुरा झाला, त्याचा खरा अर्थ समजणे गरजेचे आहे. बाजारी प्रसारमाध्यमे याला चघळवण्याचा विषय बनवत असले तरी कामकरी जनतेने या दोन पक्षांमधील वादाच्या विषयाला मनोरंजन म्हणून न बघता या वादातून भाजप, शिवसेना आणि कॉंग्रेसादी सर्व भांडवली पक्षांचे खरे चरित्र काय आहे ते समजले पाहिजे.
सोमय्या, राउत आणि इतर नेत्यांच्या वक्तव्यांमधून खालील तथ्य समोर आली आहेत.
1. भाजपचे किरीट सोमय्यांनी हजारो कोटींचा गृहनिर्माण प्रकल्प उभारला आहे. पीएमसी बँक घोटाळ्यात सोमय्यांनी ब्लॅकमेल करून कॅश आणि दुसऱ्याच्या नावावर जमीन घेतली. वसईत लाडानी नावाच्या व्यक्तीच्या नावावर असलेली चारशे कोटींची जमीन फक्त साडेचार कोटीला घेतली.
2. भाजपचे किरीट सोमय्या यांचे पुत्र नगरसेवक नील सोमय्या यांनी निकॉन फेज वन आणि टू असे हजारो कोटींचे प्रकल्प उभे केले आहेत. हा सगळा पैसा पीएमसी बँकेतील आहे. पीएमसी बॅंकेतील पैसे काढून घ्या असेही आपल्या निकटवर्तीयांना त्यांनी सांगितले आहे, म्हणजे ही बॅंक बुडणार अशी यांना कल्पना आहे.
3. वनमंत्री राहिलेल्या भाजपा नेत्याने मुलीच्या लग्नात जंगलाचा आभास व्हावा म्हणून त्यांनी जे कारपेट टाकलं होतं त्याची किंमत साडेनऊ कोटी रुपये होती.
4. राज्यात भाजपचे सरकार असताना भरतीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाला. यामध्ये अमोल काळे आणि विजय ढवंगाळे हे दोन व्यक्ती सामील होते.
5. संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे उद्योजक प्रवीण राऊत यांच्यावर आर्थिक मामल्यांच्याप्रकरणात ईडीद्वारे अटकेची कारवाई झाली आहे. तसेच 1034 कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणात ईडीने संजय राउतांच्या मुलीच्या कंपनीतील भागिदार सुजित पाटकर यांच्या निवासस्थानी छापे मारले.
6. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्याकडे 19 बंगले आहेत. ही घरे वनविभागाच्या जमिनीवर बांधण्यात आली आहेत.
7. कधीकाळचे शिवसेना-कॉंग्रेसवासी आणि आताचे भाजपवासी नारायण राणे यांच्यावर 100 बोगस कंपन्या निर्माण केल्याचा आरोप आहे.
खरेतर याकाळात झालेल्या सर्व आरोपांची यादी अजून मोठी आहे. परंतु मुद्दा समजण्याकरिता वरील तथ्ये पुरेशी आहेत.
आता हे विसरून तर चालणार नाहीच की भ्रष्टाचाराच्या गटारगंगेत लोळण्यात यांचे भागीदार कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्ष कोणाच्याही मागे नाहीत! अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्यावरून त्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा करणाऱ्या भाजपने अजित पवारांसोबत शपथविधी करवला होता आणि “भूखंडाचे श्रीखंड खाल्ले” सारखे असंख्य भ्रष्टाचाराचे आरोप शरद पवारांवर झाले आहेत. कॉंग्रेस पक्षाला जनता उपरोधाने “खांग्रेस” म्हणते आणि कॉंग्रेस व भ्रष्टाचार यांचे समीकरण जनतेला इतके चांगले माहित आहे की त्याची यादी इथे देण्याची गरजही नाही. या पक्षांसोबतच वरवर प्रामाणिकपणा, साधनशुचिता यांचा आव आणणाऱ्या भाजपच्या नेत्यांचे आणि त्यांचा साथीदार असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांचे पाय भ्रष्टाचाराच्या गाळात किती रूतलेले आहेत हे मात्र पुन्हा दिसून आले आहे.
हे समजणे आवश्यक आहे की शिवसेना-भाजपची एकत्र सत्ता असताना, युती सरकारच्या काळात यांच्या नेत्यांनी हे भ्रष्टाचार केले, परंतु तेव्हा माहित असूनही दोन्ही पक्षांचे नेते गप्प होते. थोडक्यात वाटा मिळत होता, तेव्हा ते एकमेकांकडे कानाडोळा करत होते. आता जेव्हा दोन वेगळ्या गटात आहेत तेव्हा एकमेकांची थोडीशी प्रकरणे बाहेर काढून जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.
हे विसरता कामा नये की या पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांचे बाहेर काढलेले भ्रष्टाचाराचे वास्तव म्हणजे फक्त हिमनगाचे टोक आहे. या भांडवली पक्षांच्या सरकारांमध्ये चालू असलेल्या कोणत्या कामामध्ये भ्रष्टाचार होत नाही? अनेकांना वाटते की या पक्षांच्या नेत्यांच्या वैयक्तिक गुण-अवगुणांमुळे ते कमी किंवा जास्त भ्रष्ट असतात. मनमोहन सिंह किंवा इंद्रकुमार गुजरालांसारखी नावे लोक पुढे आणून म्हणतात की ही लोकं प्रामाणिक होती, वगैरे. नक्कीच वैयक्तिक चारित्र्यामुळे थोडाफार फरक तर पडतोच. परंतु हे समजणे आवश्यक आहे की या पक्षांचे भांडवली चरित्र त्यांना कायद्याच्या चौकटीत किंवा चौकटीबाहेरच्या भ्रष्टाचाराकडे नेणारेच आहे!
भांडवली पक्षांचे अस्तित्वच असते भांडवलदार वर्गाच्या एखाद्या गटाच्या हितांच्या रक्षणासाठी. मोठे उद्योगपती, छोटे उद्योगपती, क्षेत्रीय़ उद्योगपती, व्यापारी, ठेकेदार, बिल्डर अशा भांडवलदारांच्या विविध गटांपैकी काही गटांच्या हितरक्षणासाठीच हे पक्ष अस्तित्वात येतात. निवडणुकांमध्ये जनतेची मतं मिळवायला जरी ते “आम्ही सर्वांचे” सारखी भाषा वापरत असले तरी निवडून आल्यावर मात्र ते निर्णय, धोरणे सर्व आपापल्या पाठिराख्या भांडवलदार वर्गासाठीच राबवतात. म्हणून एकीकडे ते कायदेच असे बनवतात जेणेकरून कामगारांना स्वस्तात पिळवून घेत मालकांचे नफे वाढत राहतील आणि दुसरीकडे जनतेच्या कराच्या पैशांमधून सुद्धा लोकांच्या गरजांवर नाही तर भांडवलदारांच्या सोयीच्या प्रकल्पांवर खर्च करतात. या प्रकल्पांवर खर्च होणाऱ्या पैशांचा आणि मालकांच्या नफ्याचा एक वाटाच या पक्षांचा निधी बनतो आणि त्यावर हे पक्ष चालतात.
भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना यासारख्या सर्व भांडवली पक्षांच्या सर्व नेत्यांना ही गणितं माहित आहेत. म्हणूनच ते कधी या पक्षात तर कधी त्या पक्षात जातात आणि काही फरक पडत नाही! म्हणूनच हे सर्व सत्तेत असताना कायद्याच्या चौकटीत किंवा तिला ओलांडून पक्षाला पोसणाऱ्या भांडवलदारांचे खिसे भरायचे काम करतात. या पक्षांचे काही नेते स्वत:च भांडवलदार असतात आणि भांडवलदार या नात्याने कमावतात आणि बाकीचे भांडवलदारांकडून दलाली घेतात. “आप” सारखे भांडवली पक्ष वरवर प्रामाणिकपणाचा आव ठेवत, पारदर्शकतेचा चेहरा ठेवत, “कायदेशीर” मार्गाने उद्योगपतींकरिता योजना, धोरणे राबवतात आणि “जाहीरपणे” देणग्या घेतात! यांच्या पारदर्शकतेमुळे असो किंवा भाजप-शिवसेने सारख्या पक्षांच्या भ्रष्टाचारामुळे असो, जनतेवर होणाऱ्या परिणामात काहीही गुणात्मक फरक पडत नाही!
म्हणूनच सरकार कोणाचेही येवो किंवा जावो, जनतेच्या जीवनात कोणताही आमूलाग्र बदल होत नाही. आज सामान्य जनतेने, कामगार कष्टकऱ्यांनी भांडवली पक्षांचे खरे चरित्र ओळखून सामान्य जनतेच्या, कामगार कष्टकऱ्यांच्या निधीवर चालणारा स्वत:चा पक्ष उभा व मजबुत करणे आणि खाजगी संपत्ती व नफ्याची व्यवस्था संपवणाऱ्या क्रांतिकारी आर्थिक परिवर्तनांकडे जाणे हाच भ्रष्टाचारावर खरा उपाय होऊ शकतो.