विनाशकारी पूराने वेढले आसामला

अविनाश

आसाम एका भयंकर पूराच्या संकटातून जात आहे आणि तेथील जनजीवन उध्वस्त झाले आहे. पूर आला त्याचवेळी आसामची राजधानी गुवाहाटी मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाचा आखाडा बनली होती. (एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आमदारांनी “आपल्या” पक्षाविरोधात बंडाचा झेंडा उचलला होता. हे आमदार 22 जून रोजी गुवाहाटीला गेले होते.) अशामध्ये आसामचा पूर नाही तर महाराष्ट्राचे राजकारण भांडवली प्रसारमाध्यमांसाठी बातमी बनलेले होते. आसाम मध्ये प्रत्येक वर्षी येणारा पूर आणि सरकारी अव्यवस्थेमुळे जाणारे बळी हा कधीही या नेत्यांसाठी आणि भांडवली मीडीयासाठी चिंतेचा विषयच राहिलेला नाही. विनाशकारी पूरांच्या या आपदेने आसामच्या जनतेची मोठी दुर्दशा करून ठेवली आहे.

आसाममध्ये पूरस्थिती

आसाममध्ये गेला महिनाभर पावसाचा कहर चालू आहे आणि अभूतपूर्व असे नुकसान झाले आहे. आसममध्ये जून महिन्यात 109 टक्के अधिक पाऊस झाला आहे. हवामान खात्यानुसार राज्यामध्ये सर्वसाधारणपणे 252.8 मिलीमीटर पाऊस होतो, पण त्या तुलनेत यावर्षी 528.5 मिलीमीटर पाऊस झाला आहे.  28 जून 2022 पर्यंत 28 जिल्ह्यांमधील 24.92 लाख लोक पूराने प्रभावित झाले होते आणि मरणाऱ्यांची संख्या 139 झाली होती. जबरदस्त पावसामुळे आसामच्या कछार जिल्ह्यातील सिलचरचा बहुतांशा भाग पाण्याखाली गेला होता. ब्रह्मपुत्रा, बेकि, कोपिली, बराक आणि कुशियारा नद्या धोक्याच्या पातळीवर वहात होत्या. आसामच्या डिझास्टर मॅनेजमेंट अथोरिटी (ए.एस.डी.एम.ए.) च्या मते राज्यातील एकून 72 महसूल मंडळांमध्ये 2,389 गावे पुराने प्रभावित झाली होती आणि 1,76,201 लोकांनी 555 मदत-शिबिरांमध्ये आसरा घेतला होता. पूराच्या पाण्याने 155 रस्ते आणि 5 पूल नष्ट केले होते, आणि 7 तटबंद्या तुटल्या होत्या, ज्यापैकी 5 हैलाकांडी मध्ये होत्या आणि 2 विश्वनाथ येथे. याशिवाय 85,673 हेक्टरचे पीकक्षेत्र पाण्याखाली गेले आहे आणि 4,304 जनावरे वाहून गेली आहेत.

आसाम सरकारच्या अधिकृत वेबसाईटनुसार नद्यांचे विशाल जाळे असलेले आसाम राज्य पूर आणि धूप या नैसर्गिक संकटांनी ग्रस्त आहे, ज्यामुळे राज्याच्या विकासावर सतत विपरित परिणाम झाला आहे. 50 पेक्षा अधिक जोडनद्या असलेल्या ब्रह्मपुत्रा  आणि बराक नद्या दरवर्षी पावसाळ्यात पूर आणि सोबत विनाश घेऊन येतात. देशातील इतर राज्यांशी तुलना केली तर आसाममध्ये पूर आणि त्यामुळे होणारी जमिनीची धूप या समस्या सर्वात तीव्र आणि वेगळ्या आहेत. राष्ट्रीय पूर आयोग (आर.बी.ए.) च्या मते आसाममध्ये पूर संभाव्य क्षेत्र 31.05 लाख हेक्टर आहे (राज्याचे एकूण क्षेत्रफळ 78.523 लाख हेक्टर आहे).  म्हणजे आसाममध्ये एकूण जमिनीच्या 39.58 टक्के  क्षेत्र पूरसंभाव्य आहे आणि हे क्षेत्र देशातील पूरसंभाव्य क्षेत्राच्या जवळपास 9.40 टक्के आहे. रेकोर्ड्स नुसार पूराने प्रभावित होणारे क्षेत्र सरासरी 9.31 लाख हेक्टर आहे. संपूर्ण देशातील पूरग्रस्त क्षेत्राच्या जवळपास 10.2 टक्के क्षेत्र आसाममध्ये आहे, परंतु आसाममधील पूरग्रस्त क्षेत्र राज्यातील क्षेत्रफळाच्या 39.58 टक्के आहे.

स्वातंत्र्यानंतरच्या काळात आसामला  1954, 1962, 1972, 1977, 1984, 1988, 1998, 2002, 2004 आणि  2012 मध्ये मोठ्या पुरांना सामोरे जावे लागले आहे. जवळपास दरवर्षी पुराच्या तीन ते चार लाटा येतात, आणि आसामच्या मोठ्या भागांना उध्वस्त करतात. पुरांमुळे दरवर्षी सरासरी 200 कोटी रुपयांचे नुकसान होते आणि विशेषत: 1998 मध्ये 500 कोटी रुपयांचे आणि 2004 मध्ये 771 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

आसाम मध्ये दरवर्षी पूर का येतात

आसाममध्ये पूर हा जीवनाचा एक भाग राहिलेला आहे. अनेक शतकांपासून दक्षिण-पश्चिम मौसमी पावसानंतर आसामच्या खालच्या भागात पूर येत राहिलाय, आणि त्यामुळेच याला ‘पूराचे मैदान’ म्हणून ओळखले जाते. कधी काळी लोक पुराची वाट पहात असत, कारण की खनिज-युक्त पाणी त्यांच्या जमिनींच्या सुपिकतेला भरून काढत असे. अलिकडच्या काळात मात्र पूरामुळे होणाऱ्या नुकसानीत प्रचंड वाढ झाली आहे. याचे एक प्रमुख कारण आसामची नैसर्गिक भौगोलिक स्थिती असले, तरी भांडवली विकासाने आणि नफ्याच्या हव्यासाने यामध्ये प्रचंड भर टाकली आहे.

  1. ब्रह्मपुत्रा नदी

हिमालयाच्या तळाशी वसलेल्या आसाममध्ये दोन प्रमुख नद्यांची खोरी आहेत – ब्रह्मपुत्रा  आणि बराक, आणि दोन डोंगराळ जिल्ह्यांसहीत 20 पेक्षा जास्त मोठ्या नद्या आणि 50 सहाय्यक नद्यांचे एक मोठे जाळे आहे. शक्तिशाली ब्रह्मपुत्रा  नदी हिमालयातून निघते आणि बंगालच्या खाडीत जाण्याअगोदर अरुणाचल प्रदेशातून भारतात येते. ही नदी 5.46 किलोमीटरच्या सरासरी रुंदीने जवळपास 650 किलोमीटरचे अंतर आसाममध्ये वाहते, आणि त्यामुळेच पूर-मैदानांना ओलांडणारी ही प्रमुख नदी आहे. 5000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर कैलास-श्रेणीतून येणारी आणि आसामात प्रवेश होईपर्यंत अत्यंत गाळयुक्त होणाऱ्या या नदीची सरासरी 2.82 मीटर प्रती किलोमीटरची खोली 0.1 मीटर प्रति किलोमीटर इतकी कमी होते. खोली कमी झाल्यामुळे वेग कमी होतो आणि नदीतळात मोठ्या प्रमाणात गाळ व पहाडी भागातून जमा झालेले अवशेष यामुळे पाण्याचा स्तर वाढतो. उन्हाळ्यात हिमनगांचे बर्फ पघळून मातीचे क्षरणही होते आणि गाळाचे अवसादन वाढते. याशिवाय पूर्वोत्तर राज्यांमध्ये पावसाळाही तीव्र असतो. राज्यातील डिसास्टर मॅनेजमेंट अथोरिटी च्या मते, जून-जुलै मध्ये सर्वाधिक पावसासोबतच वर्षभरात 2900 मिलीमीटर पाऊस पडतो. आसामच्या जल संसाधन मंत्रालयाचे म्हणणे आहे की ब्रह्मपुत्रा  खोऱ्यात वार्षिक पावसाच्या 85 टक्के पाऊस पावसाळ्याच्या काळात होतो.  याशिवाय खोऱ्यात एप्रिल-मे मध्ये सुद्धा चांगला पाऊस होतो जो वादळी पाऊस असतो, आणि जूनमध्ये होणाऱ्या जास्त पावसात भर टाकतो.

एक दुसरे उल्लेखनीय कारण हे आहे की आसाम भुकंपाच्या दृष्टीने सक्रिय क्षेत्र आहे. नजिकच्या काळात बांधकामांमुळे अनेकदा भूस्खलन झाले आहे. भूकंप आणि भूस्कलनामुळे सुद्धा गाळ आणि अवशेष नदीमध्ये ढकलले जातात, जे नदीच्या तळाला अजून वर उचलतात आणि पूराचा धोका वाढवतात.

  1. नदी किनाऱ्याची धूप

गाळ वाहणाऱ्या नद्या आणि त्यांच्या सहाय्यक नद्या आसामात सोबत गाळ आणि माती वाहून आणतात. जमिनीची धूप होते आणि अधिक क्षेत्रफळ मिळाल्यामुळे नद्या विस्तारतात, आणि परिणामी पूर येतात.  नद्यांच्या किनारी जमिनीची धूप आसामसाठी एक गंभीर समस्या बनली आहे, आणि पुरामुळे गावे लुप्त झाल्यामुळे लोकांचे राज्यांतर्गत विस्थापन सुद्धा होत आहे. आसामात काही जागी किनारपट्टीची धूप झाल्यामुळे ब्रह्मपुत्रेची रुंदी 15 किलोमीटर पर्यंत वाढली आहे.

आसाम सरकारद्वारे हवामान परिवर्तनावरच्या एका अहवालात म्हटले आहे की 1950 पासून ब्रह्मपुत्रा  आणि तिच्या सहाय्यक नद्यांद्वारे 4.27 लाख हेक्टर जमिनीची धूप झाली आहे, जे राज्यातील एकूण जमिनीच्या जवळपास 7.5 टक्के आहे. दरवर्षी सरासरी जवळपास 8,000 हेक्टर जमिन नष्ट होत आहे. नदीकिनाऱ्याची धूप झाल्यामुळे आसामात शेतजमीन कमी होत आहे. आसामात 3,800 वर्ग किलोमीटरपेक्षा अधिक शेतजमीन, म्हणजे जवळपास सिक्कीमच्या आकाराच्या निम्मी, 1954 नंतर गायब झाली आहे.

  1. भांडवली लूट आणि नफा

भांडवली उत्पादन व्यवस्थेमध्ये नफ्याकरिता निसर्गाचे कोणत्याही प्रमाणात शोषण ग्राह्यच मानले जाते. परिणामी तात्कालिक नफा समोर ठेवून अनिर्बंध “विकास” योजना आखल्या जातात, ज्या पर्यावरणाचे दीर्घकालिक नुकसान करवतात. बंधारे, धरणे वा कालवे बांधताना किंवा कोणतीही “विकास योजना” राबवताना निसर्ग आणि शाश्वत विकासाला केंद्रस्थानी न ठेवता फक्त कंत्राटे देऊन दलाली खाण्याला प्राधान्य दिले जाते. आसाममध्ये झालेल्या अनियंत्रित भांडवली विकासामुळे पूरांनी घडवलेल्या नुकसानीत मोठी भर टाकली आहे.

नदीचा प्रवाह मर्यादित करण्यासाठी बंधारे बांधले जातात. तथापि, हा उपाय काळाच्या ओघात आसाममध्ये आता वाढीव आव्हान  म्हणून विकसित झाला आहे. पूर आटोक्यात आणण्यासाठी 1960 च्या दशकात आसाममध्ये बंधारे बांधण्यास सुरुवात झाली. सहा दशकांनंतर, यापैकी बहुतेक बंधारे एकतर कामातून गेले आहेत किंवा खराब स्थितीत आहेत आणि इतर अनेक वाहून गेले आहेत. दरवर्षी पावसाळ्यानंतर पूर आल्यावर नदीचे पाणी हे अडथळे तोडते आणि घरे व जमिनीत घुसते. आसाममधील मागील सरकारांनी गेल्या सहा दशकांत तटबंदीच्या बांधकामावर सुमारे 30,000 कोटी रुपये खर्च केले आहेत. दरवर्षी विनाशाच्या कहाण्या या अडथळ्यांच्या कुचकामीपणाचा पुरावा आहेत.

जंगलतोड, टेकडीतोड, अतिक्रमण आणि पाणथळ जमिनींचा नाश यासारख्या भांडवलदारांनी निर्मिलेल्या इतर कारणांमुळेही पूरस्थिती बिघडली आहे. बंधाऱ्यांमुळे नदीकाठी अतिक्रमण झाले आणि वाढत्या संख्येने लोकांनी नदीजवळ घरे बांधली आणि आस्थापने उभारली. राज्यातही लोकसंख्या वाढली आहे. ब्रह्मपुत्रा खोऱ्यातील लोकसंख्येची घनता 9 वरून 29 व्यक्ती प्रति चौ.कि.मी. इतकी वाढली आहे.

इंटरनॅशनल जर्नल फॉर रिसर्च इन अप्लाइड सायन्स अँड इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजीने प्रकाशित केलेल्या शोधनिबंधात म्हटले आहे की  पाणी-निचरा व्यवस्था सुधारण्यासाठी आसाममधील पाणथळ जागा आणि स्थानिक जलस्रोतांना पुन्हा निर्माण केले पाहिजे, जे जास्तीचे पाणी काढून टाकण्यासाठी काम करू शकतील आणि पाणी साचण्यास प्रतिबंध करू शकतील. “यासाठी ब्रह्मपुत्रा पूरक्षेत्रातील अतिक्रमणे हटवावी लागतील. मोडतोड आणि देखभालीसाठी स्थापित व्यवस्था आहे हे बघण्यासाठी तटबंदीची नियमितपणे पाहणी केली गेली पाहिजे; पहिली पायरी म्हणजे कारकून-कंत्राटदार संबंध तोडणे, ज्याने  पूर हा सिस्टीममधून पैसे काढण्याचा सोपा मार्ग बनला आहे,” असे हा लेख म्हणतो.

राज्य सरकारच्या हवामान बदलावरील अहवालानुसार, हवामान बदलामुळे आसाममध्ये अधिक वारंवार आणि गंभीर पूर येण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीच्या घटनांमध्ये 38 टक्के वाढ होईल, असे अहवालात म्हटले आहे. पावसाळ्यात सामान्य पावसाच्या ऐवजी वारंवार कमी किंवा जास्त पाऊस पडणे आणि वाढत्या तापमानामुळे हिमनद्या वितळणे याचा अर्थ असा होतो की हिमालयातील नद्या आसाममध्ये प्रवेश करण्यापूर्वी अधिक पाणी आणि गाळ वाहून आणतील. यामुळे सखल भागात वारंवार पूर येण्याची शक्यता वाढते.

अशा परिस्थितीत एकीकडे सरकारच्या धोरणांविरुद्ध आणि सध्याच्या व्यवस्थेतील भांडवली लुटमारीच्या विरोधात लढा देण्याची गरज आहे, तर दुसरीकडे या लढ्यांना एकत्र करून निसर्गाचे शोषण करणाऱ्या मानवद्रोही भांडवलशाही व्यवस्थेविरुद्ध लढा देणे ही एक अनिवार्य अट आहे.

अनुवाद: राहुल