लैंगस्टन ह्युजेसच्या काही कविता

 

उफाळणारे जलनग

तुम्हा लोकांसाठी
तुम्ही लोक, जे की समुद्रावरचा फेस मात्र आहात
समुद्र नव्हे
काय अर्थ आहे तुमच्यासाठी
लहरींच्या सतत माऱ्याने तुटणाऱ्या पर्वतांचा
वा त्या लहरींचा
अथवा या उफाळलेल्या जलनगांच्या अदम्य सामर्थ्याचा
तुम्ही तर समुद्रावरचा फेस मात्र आहात
तुम्ही धनदांडगे
समुद्र नाही आहात

 

जुलूम

स्वप्ने
नाही येत आता
स्वप्नं पाहणाऱ्यांकडे
ना गीतं येतात
गाणं गाणाऱ्यांकडे

काही देशांत
रात्रीचा काळोख
आणि थंडगार लोखंड पसरलेला आहे
चोहीकडे हवेमध्ये
परंतु स्वप्ने
येतील नव्याने पुन्हा
आणि गीतं
फोडतील
या कैदखान्यांना

न्याय

न्याय एक आंधळी देवता आहे
आम्हा काळ्या लोकांना समजते
तिला बांधलेल्या पट्टीच्या पलीकडे लपले आहेत दोन सडके घाव
जिथे कदाचित असायचे दोन डोळे

(अनुवाद: अमन)