गुडगावच्या एका कामगाराची मुलाखत
✍आदित्य
आज संपूर्ण देशात जवळपास निम्मी लोकसंख्या एकतर बेरोजगार आहे किंवा रोज काम करूनच आपली उपजीविका चालवू शकते. गुडगाव अशी जागा आहे जिथे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे लाखो कामगार राहतात. यांच्यामध्ये मुख्यत्वे ऑटोमोबाईल आणि कापड क्षेत्रातील कामगार सामील आहेत. परंतु इतकी संख्या असूनही हे सर्व कामगार सर्वाधिक वाईट जीवन जगण्यास मजबूर आहेत. या मुलाखतीत एका अशाच कामगारासोबत संवाद केला गेला आहे, जे गेल्या 11 वर्षांपासून गुडगाव मध्ये काम करत आहेत आणि त्यांनी जवळपास सर्व प्रकारच्या कारखान्यांमध्ये काम केले आहे. चला जाणून घेऊयात गुडगावच्या एका कामगाराची कहाणी, त्यांच्याच तोंडून.
प्रश्न: पहिल्यांदा तुम्ही स्वत:बद्दल सांगा. गुडगाव मध्ये कधीपासून आहात आणि काय काम करता?
उत्तर: मी उत्तरप्रदेशातील अलाहाबादचा आहे आणि गुडगाव मध्ये 2010 पासून रहात आहे. सध्या मी उद्योग विहार येथील एक्सपोर्ट हाऊस मध्ये काम करतो आणि तिथे माझे काम कटिंगचे आहे.
प्रश्न: तुम्ही जवळपास 12 वर्षांपासून गुडगाव मध्ये आहात. तर, या काळात तुम्ही कुठे-कुठे आणि काय-काय काम केले आहे?
2010 ते 2013 दरम्यान एकूण 23 कंपन्यांमध्ये मी काम केले. प्रत्येक जागी एक महिना, दिड महिना, दोन महिने असे करून खर्च चालवण्यासाठी काम केले |
उत्तर: 2010 ते 2013 दरम्यान एकूण 23 कंपन्यांमध्ये मी काम केले. प्रत्येक जागी एक महिना, दिड महिना, दोन महिने असे करून खर्च चालवण्यासाठी काम केले. तसा तर मी शिकलेल्या मध्यम-वर्गातून येतो, पण माझ्या योग्यतेचे काम काही मिळालेच नाही, खरेतर शिक्षण आणि मेहनतीच्या हिशोबाने रोजगार मिळायला पाहिजे होता. एक्सपोर्ट लाईनवर काम करत असताना ज्या पद्धतीची भाषा आमच्या संदर्भात वापरली जायची ती सुद्धा आम्हाला पटली नाही. मग एका जागी एक-दोन माणसं अशी भेटली की ज्यांची वागणूक चांगली वाटली, तर मग 15 महिने त्यांच्याकडे काम केले. या दरम्यान ट्रॉलीला धक्का देण्यापासून ते सामान वाहण्यापर्यंत अनेक कामे करवली गेली. मग माझी एक परिक्षा होती जिच्याकरिता सुट्टी मागितली आणि सुट्टी दिली गेली नाही, तर मग मी परिक्षेला तसाच निघून गेलो. परत आलो, तर काम सुटले होते. यानंतर मी जय ऑटो कंपनी नावाच्या ऑटोमोबाईल कंपनीमध्ये दिड-दोन महिने काम केले. तिथे खूपच अवघड काम होते. 12 तास शिफ्ट असायची, त्यातही नाईट शिफ्ट लावली जायची.
प्रश्न: तिथे काय काम होते?
जेव्हा माझी मजुरी 3,900 रुपये होती तेव्हासुद्धा मी 500 रुपयांचा फॉर्म भरत होतो. अनेकदा तर ओव्हरटाईम करून मी फॉर्मचे पैसे काढत होतो. |
उत्तर: तिथे माल उचलून चालू असलेल्या असेंब्ली लाईनवर ठेवावा लागे. माल कमी कधीच पडला नाही पाहिजे असे होते. तिथले काम सोडल्यावर पुन्हा एक्सपोर्ट लाईनवरच एका जागी काम मिळाले, जिथे काम शिकवले गेले. तिथे मी सॅंपलींग आणि कटींगचे काम शिकले.
प्रश्न:: अच्छा, तर तुम्ही सांगितले की एका जागी परिक्षा देण्याच्या कारणाने तुम्हाला काम सोडावे लागले, तर तुम्ही काम करताना अभ्यासही करत होते आणि तुम्ही किती शिक्षण घेतलेत?
उत्तर: हो, काम तर सतत करत होतो, पण सोबतच अभ्यासाला वेळही काढायचो आणि सतत परिक्षा देत होतो. मी बारावीपर्यंत शिकलो आहे, आणि मग ग्रॅज्युएशन काही दिवस केले, आणि एम.ए. पर्यंतची पुस्तके लायब्ररीतून घेऊन वाचत होतो. नंतर मी आय.टी.आय. सुद्धा केले. जेव्हा माझी मजुरी 3,900 रुपये होती तेव्हासुद्धा मी 500 रुपयांचा फॉर्म भरत होतो. अनेकदा तर ओव्हरटाईम करून मी फॉर्मचे पैसे काढत होतो. आम्ही तीन भाऊ आहोत, तिघेही सतत फॉर्म भरायचो, आणि आम्ही खूप पैसा यामध्ये वाहवला आहे, पण आजवर कोणालाही नोकरी लागली नाही. आम्ही 2019 पर्यंत परिक्षाच देत होतो. 2019 नंतर पुन्हा भाजप सरकार आल्यावर तर जागा निघणे बंद झाले आहे. मग आम्ही फॉर्म भरणेच बंद केले.
प्रश्न: सध्या कामगारांची एकंदरीत स्थिती कशी आहे? फॅक्टऱ्यांमध्ये स्थिति कशी आहे, याबद्दल काही सांगा.
उत्तर: सध्या कामगारांची स्थिती ही आहे की ते 9-10 हजारांची नोकरी करत आहेत. यामध्ये भागत तर नाही. नाईलाजाने त्यांना ओव्हरटाईम करण्याची लालसा निर्माण होते. यामध्ये बघा की जर कंपनीला गरज असेल ओव्हरटाईमची तर ती जबरदस्ती तुम्हाला थांबवून काम करवून घेते, पण जर तुम्हाला गरज असेल की ओव्हरटाईम करून काही जास्त कमवावे तर ते तुमच्या हातात नाहीये. इतकेच नाही तर कंपन्यांना गरज नसताना ब्रेक सुद्धा दिला जातो. काही ठिकाणी जिथे ब्रेक दिला जात नाही, कामगार नियमित काम करत आहेत, तिथे त्यांना धमकावून काम करवले जाते. इंचार्ज असेल, मॅनेजर असेल किंवा सुपरवायझर असेल, हे सगळे त्यात सामील असतात. अनेकदा तर बाथरूमला जाण्यावरही निर्बंध लादले जातात, किंवा 5 मिनिटे लेट झाले तर त्यांना कामावरून काढण्याची धमकी दिली जाते. ही स्थिति त्य जागेची आहे जिथे कंपनीची हेड ब्रॅंच (मुख्य शाखा) आहे, जिथे त्या कंपनीचा मुख्य मालक सुद्धा बसतो. तर जिथे फक्त प्रॉडक्शन लाईन आहे तिथे स्थिती काय असेल याचा तुम्ही अंदाज लावू शकता. 12-14 तासांच्या ड्युटीमध्ये त्यांना 5 मिनिटे आपसात बसून बोलण्याचा सुद्धा वेळ दिला जात नाही.
प्रश्न: अनेकदा असेही ऐकायला मिळते की कामगारांना तिथे आपसात जात-धर्माच्या नावाने विभागण्याचे काम सुद्धा केले जाते, तर यावर काय स्थिती आहे?
उत्तर: हो, कंपन्यांमध्ये सुपरवायझर म्हणून अशाच लोकांना ठेवले जाते जे सत्तेच्या बाजूने असतात. जर त्यांना समजले की काही लोक अशा मानवतावादाच्या गोष्टी करत आहेत, किंवा मुस्लिम आहेत, तर त्यांच्यावर विशेष नजर ठेवली जाते आणि लोकांना त्यांच्याविरोधात भडकावले सुद्धा जाते. दुसरे, आमच्या कंपनीत भेटल्यावर राम-राम म्हणायला सांगितले जाते. जर तुम्ही राम-राम म्हणत नसाल तर विरोधी पक्षात आहात. अशा स्थितीत तुमच्यावर वेगळी नजर ठेवली जाते, तुम्हाला वेगळे केले जाते आणि अशी स्थिती निर्माण केली जाते की तुमची घुसमट होऊ लागेल. तुमच्याशी अशाप्रकारे वर्तन केले जाते की तुम्ही खालच्या जातीचे आहात, आणि दुसऱ्या धर्माचे आहात म्हणून राम-राम करत नाही. इथपर्यंत की तुम्ही जर बाथरूमला गेलात तर मालकाच्या चमच्यांना तुमच्या मागे पाठवले जाते हे बघायला की तुम्ही इतर कोणत्या कारणाने तर नाही गेलात.
प्रश्न: तुमच्या मते कामगारांची ही स्थिती असण्याचे कारण काय आणि कामगारांनी काय केले पाहिजे?
उत्तर: याचे एक मुख्य कारण हे आहे की कामगार आज विखुरलेले आहेत. कामगारांना जागरूक करण्यासाठी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. एखादी गोष्ट आम्ही ऐकतो किंवा वाचतो, तेव्हा आम्ही तर्क लढवतोय की हे खरे आहे की खोटे. म्हणजे, आज सर्व लोकांना तर्काच्या माध्यमातून आपण सोबत जोडले पाहिजे.
ही एका कामगाराची कहाणी आहे, जेव्हा की असे हजारो-लाखो-कोट्यवधी कामगार आज फक्त गुडगाव मध्येच नाही, तर देशाच्या सर्व भागांमध्ये काम करत आहेत. यांमध्ये अनेक असेही आहेत ज्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे, पण त्यायोग्य काम न मिळाल्यामुळे ते मजुरी करत आहेत. बाकी, अशा मजुरांची संख्या तर कोट्यवधींमध्ये आहे, ज्यांनी खराब शिक्षण व्यवस्थेमुळे दहावी-बारावी किंवा त्या अगोदरच शिक्षण सोडावे लागले. अर्थ स्पष्ट आहे की कारण तर या व्यवस्थेमध्ये आहे, भांडवली व्यवस्थेमध्ये. त्यामुळे एका समतामूलक समाजाच्या स्थापनेशिवाय या भेदाला आणि शोषणाला संपवले जाऊ शकत नाही.
(अनुवाद. मूळ लेख मज़दूर बिगुल, ऑक्टोबर 2022 मध्ये प्रकाशित)
कामगार बिगुल, नोव्हेंबर 2022