पुन्हा एकदा गोमांस तस्करीच्या संशयावरून हत्या!
फॅशिस्टांनी उभ्या केलेल्या गोरक्षकांच्या उन्मादी जमावाचे जनविरोधी चरित्र ओळखा!
✍ पूजा
कामावरून घरी परतणारी, किराणा घ्यायला चौकातल्या दुकानात गेलेली किंवा कुठल्याही कारणाने घराबाहेर पडलेली घरातील व्यक्ती घरी येतच नाही आणि कळतं की तिला जमावाने ठेचून मारलं!! काल्पनिक नाही तर सत्य घटना! एक नाही अनेक घटना!! घराबाहेर काय घरात देखील जाऊन जीव घेतल्याच्या घटना!! कारण? फक्त संशय!! गोमांस खाण्याचा संशय, गोमांस वाहतूक करण्याचा संशय! ह्या गोरक्षेच्या हत्यांच्या साखळीत अखलाख, मजलूम, इम्तियाज, तबरेझ आणि कित्येक जीव गमावले गेलेत आणि आता त्यात 24 जून रोजी आणखी एक नाव जोडलं गेलंय, 32 वर्षीय अफान अन्सारीच! या घटनेने पुन्हा एकदा गोमातेच्या नावाने राजकारणाच्या पोळ्या भाजणाऱ्यांचे खरे चरित्र उघडे करण्याची गरज अधोरेखित केली आहे.
महाराष्ट्रातल्या नाशिक मध्ये गोरक्षेच्या नावाखाली धार्मिक कट्टरतेत मदमस्त असणाऱ्या जमावाने गोमांस वाहतूक करत असल्याच्या संशयावरून अफान अन्सारी, नासीर शेख ह्या दोन मुस्लिम युवकांना 24 जून रोजी मारहाण केली ज्यात अफानचा मृत्यू झाला. हे दोघे कार मधून प्रवास करत असताना हिंदुत्ववादी जमावाने यांना अडवले, गाडीतून बाहेर काढले आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. घोटी-सिन्नर रोडवर ही घटना घडली. चालू गाडी थांबवून, दमदाटी करत मूळचे कुर्ला, मुंबई येथील रहिवासी असलेल्या 32 वर्षीय अफान व 24 वर्षीय नासीर ह्यांना बाहेर खेचत त्यांच्याकडे असलेलं मांस हे गोमांस आहे सांगत त्यांना अमानुषपणे लोखंडी, लाकडी सळयांनी मारहाण केली. पोलिसांनी धामणगाव रुग्णालयात दोघांना दाखल केले असता रस्त्यातच अफान अन्सारीचा मृत्यू झाला तर नासीर शेखची स्थिती गंभीर आहे. ह्यापूर्वी देखील इगतपुरीजवळ ह्या गौरक्षकांनी 23 वर्षीय लुकमान अन्सारी याची गोमांस नेत असल्याच्या संशयावरून हत्या केली होती.
गेल्या 9 वर्षात नित्याची बनत गेलेली बातमी म्हणजे अशी जमावाने केलेली हत्या, म्हणजेच ‘मॉब लिंचींग’ फॅशिस्ट, हिंदुत्ववादी शक्तींनी समाजात पसरवलेल्या धार्मिक कट्टरतेच्या विषाचं क्रूर प्रतिबिंब आहे. आज देशभरात गोरक्षा, लव्ह जिहाद, लँड जिहाद सारखे खोटे, फसवे मुद्दे घेऊन धार्मिक उन्माद पसरवण्याचे काम केले जाते आहे. रा. स्व. संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू महासभा यांसारख्या कट्टर हिंदुत्ववादी, धार्मिक उन्माद पसरवणाऱ्या संघटना ह्यात प्रामुख्याने पुढे आहेत. एका अहवालानुसार 2012 ते 2023 ह्या काळात ‘मॉब लिंचींग’च्या तब्बल 90 घटना घडल्या ज्यात 45 मृत्यू झालेत! 2010 पासून आजपर्यंत गोहत्येसंदर्भातील हल्ल्यांमध्ये जितके मृत्यू झाले आहेत, त्यामध्ये 86% मुस्लिम आहेत आणि त्यातही 96.8% हल्ले 2014 नंतर झाले आहेत. 63 पैकी 32 घटना भाजप शासित राज्यांमध्ये झाल्या आहेत. इंडिया-स्पेंडच्या एका अहवालानुसार गेल्या 7 वर्षात जमावाकडून हत्येच्या घटनांमध्ये जवळपास 28 लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात 24 लोक मुस्लिम होते. यापैकी निम्म्याच्या वर हल्ले (52%) अफवांवर आधारित होते. इंडिया-स्पेंडच्या अहवालात असेही दिसून आले आहे की गेल्या 8 वर्षांमध्ये अशा 63 हल्ल्यांपैकी 61 हल्ले 2014 ते 2017च्या दरम्यान झाले आहेत आणि थोड्या (5%) घटनांमध्ये कोणालाही अटक झालेली नाही, उलट 13 घटनांमध्ये (म्हणजे 21%) पोलिसांनी पीडित व्यक्तींच्या विरोधातच गुन्हा दाखल केला आहे. असे दिसून आले आहे की यापैकी 23 घटनांमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि स्थानिक गोरक्षण समिती सारख्या कट्टर हिंदुत्ववादी फॅशिस्ट संघटना सक्रिय होत्या.
भारतीय जनता पक्षाचा पवित्र नव्हे, राजकीय प्राणी: गाय!
2014 ते 2018 दरम्यान नेत्यांच्या भाषणात होणाऱ्या जातीय, धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या भाषेचा प्रयोग पूर्वीपेक्षा पाच पटीने अधिक होता ज्यात 90% भाजपा नेते होते आणि त्यात गायींचे संरक्षण एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता. 2014 च्या निवडणूक प्रचार अभियानादरम्यान नरेंद्र मोदी सतत गोरक्षेबद्दल बोलत होते. वेळोवेळी भाजपा नेत्यांनी केलेल्या मुस्लिम द्वेष पसरविणाऱ्या, हिंसेचे समर्थन करणाऱ्या वक्तव्यांची काही उदाहरणे पाहूयात.
“आपण कायदा हातात घेऊ नये, पण त्याच्या (पहलू खान) मृत्यूबद्दल आम्हाला दु:ख नाही कारण जे गायतस्कर आहेत ते गोहत्या करणारे आहेत; त्यांच्यासारख्या पापींच्या नशिबी यापूर्वीही हेच होते आणि यापुढेही राहील.”
ज्ञानदेव आहुजा, भाजपा आमदार, राजस्थान राज्य, एप्रिल 2017.
“भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्याचा एकच मार्ग आहे: गौ (गाय), गंगा आणि (देवी) गायत्री यांचे रक्षण करणे… या वारशाचे रक्षण करणारा समाजच टिकेल. अन्यथा अस्मितेचे मोठे संकट उभे राहील आणि अस्मितेचे हे संकट आपले अस्तित्व धोक्यात आणेल”
– आदित्यनाथ, भाजपा मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश राज्य, नोव्हेंबर 2017
“जोपर्यंत गायीला राष्ट्रमातेचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत गोरक्षकांना तुरुंगात टाकले किंवा त्यांच्यावर गोळ्या झाडल्या तरी गोरक्षण युद्ध थांबणार नाही.”
टी राजा सिंह लोध, भाजप आमदार, तेलंगणा राज्य, जुलै 2018
“जे गोमांस खाण्यासाठी मरत आहेत, ते पाकिस्तान किंवा अरब देशांमध्ये किंवा जगातील इतर कोणत्याही भागात जाऊ शकतात जिथे ते उपलब्ध आहे.”
– मुख्तार अब्बास नक्वी, भाजप, केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री, मे 2015
“आमच्या मातेला मारण्याचा प्रयत्न केला तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही मरायला आणि मारायला तयार आहोत.”
-साक्षी महाराज, भाजपचे खासदार, मोहम्मद अखलाकच्या हत्येबद्दल, ऑक्टोबर 2015
“मुस्लिम या देशात राहू शकतात, पण त्यांना गोमांस खाणे सोडावे लागेल. गाय हा आमचा श्रद्धेचा विषय आहे.”
-मनोहर लाल खट्टर, भाजपचे मुख्यमंत्री, हरियाणा राज्य, ऑक्टोबर 2015
“गायीला मारणाऱ्यांना आम्ही फाशी देऊ.”
रमन सिंह, भाजपचे मुख्यमंत्री, छत्तीसगड राज्य, एप्रिल 2017
“मी वचन दिले आहे की गायीला माता न मानणाऱ्यांचे आणि त्यांची हत्या करणाऱ्यांचे मी हात-पाय तोडीन”
विक्रम सैनी, भाजपा आमदार, उत्तर प्रदेश राज्य, मार्च 2017
या सर्व वक्तव्यांमधून हेच दिसून येते की वर्तमान सरकारकडून गोरक्षणाच्या नावावर होत असलेल्या राजकारणाचे समर्थन अशा प्रकारच्या उन्मादी जमावांना प्रोत्साहन देत आहे. या हिंदुत्ववादी फॅशिस्ट शक्तींना जमावाद्वारे हत्यांमधून दहशत निर्माण करून, धार्मिक अल्पसंख्य व दलितांना असे दुय्यम नागरिक बनवायचे आहे ज्यांच्यासाठी कायदा आणि लोकशाही अधिकारांचा काहीच अर्थ नसेल.
ह्यांची गोमाता, गायीवरच्या प्रेमाची सत्यता ही आहे की ह्यांना गायीशी काहीच घेणे देणे नाही, तिच्या नावावर राजकारण करून ह्यांना मुस्लिम समुदायाला निशाणा बनवून एक नकली शत्रू आपल्यासमोर उभा करायचा आहे. आपण हे विसरता कामा नये की भाजपाचे अर्नेस्ट मावरी, एन. बिरेन सिंह, विसासोली ल्होंगू, श्रेप्रकाश यांच्यासारखे नेतेच केरळ आणि उत्तर-पूर्व भारताच्या राज्यांमध्ये उघडपणे गोमांस खाण्याबद्दल बोलतात किंवा निवडणुकीत भाजपा निवडून आली तरी गोमांस मिळणं बंद होणार नाही याचे आश्वासन देतात. अमित शहा गोव्यात जाऊन तिथल्या जनतेला आश्वासन देतो की गोव्यात गोमांस विक्री कधीच बंद होणार नाही. भाजपा नेता संगीत सोम खुद्द अल-दुआ नावाच्या कत्तलखान्याचा मालक असल्याचे समोर आले आहे! परंतु ह्याबद्दल रा. स्व. संघ, भाजपा, हिंदू महासभा, विहिंप एक चकार शब्द सुद्धा काढताना दिसत नाहीत कारण वास्तवात गाय यांच्यासाठी एक पवित्र प्राणी नसून एक राजकीय प्राणी आहे! अनेकदा ह्या संघटनांनीच षडयंत्रकारी पद्धतीने स्वतः गोहत्या करून गोमांस मुस्लिम वस्तीत, मुस्लिम घरात ठेवून दंगे भडकवण्याचा, जमावाला घेऊन मुस्लिमांवर हल्ला करण्याचा, त्यांना जीवे मारण्याच्या घटनांना सत्यात उतरवले आहे. अशाच एका घटनेत हिंदू महासभेचा मुख्य प्रवक्ता असलेला संजय जाट मुख्य आरोपी होता. सप्टेंबर 2015 मध्ये 50 वर्षीय मोहंमद अखलाखला जिवानिशी मारण्यात आले आणि त्याचा 22 वर्षीय मुलगा गोरक्षकांनी केलेल्या मारहाणीत गंभीररित्या जखमी झाला. ह्या घटनेत आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक भाजपाच्या स्थानिक नेत्याचा मुलगा देखील होता पण आज त्याच्यासह सर्व आरोपी जामिनावर बाहेर आहेत आणि अखलाखच्या कुटुंबाला ह्यांनी गुंडागर्दी करून गाव सोडण्यास भाग पाडले आहे. फॅशिस्ट शक्तींकडून गोरक्षणाचा मुद्दा नेहमीच उचलला गेला आहे. स्वतंत्र भारतात आर.एस.एस.ने सतत गोमांस प्रतिबंधक कायद्याच्या मुद्याला एका जन-अभियानाच्या स्वरूपात उचलले आहे. अशाप्रकारे गाईला खूप काळापासून एका राजकीय वाहनाच्या स्वरूपात वापरले गेले आहे आणि अनेकदा हे हिंदू-मुस्लिम दंगलींचे कारणही बनले आहे.
संघ परिवाराचे ‘पवित्र’गाईचे मिथक
संघ परिवाराकडून पसरवले जाणारे पहिले असत्य हे की हिंदू संस्कृतीने नेहमीच गोहत्येला निकृष्ट मानले आहे. संघाने भारतात गोमांस खाण्याच्या प्रथेला इस्लाम सोबत जोडण्याचा प्रयत्न केला आहे (यात लक्षात घेण्याजोगी बाब ही की मुघल सम्राट बाबर, अकबर, जहांगीर आणि औरंगजेबाने जैन व ब्राह्मणी भावनांना समायोजित करण्यासाठी गोहत्येवर बंदी घातली होती) आणि गोमांस खाण्याला मुस्लिम समुदायाची ओळख म्हणून स्थापित करण्याचा प्रयत्न सतत केला आहे. लोकांमध्ये या भ्रमाचा प्रसार करण्याचे काम संघ व्यवस्थित करत आहे की मुस्लिमांनी गोमांस खाणे चालू केले कारण मुस्लिम नेहमीच हिंदू संस्कृती विरुद्ध असतात आणि हिंदू संस्कृतीने आदीकाळापासून गाईला पवित्र आणि गोहत्येला निकृष्ट व पाप मानले आहे. भारतात इस्लाम येण्याच्या खूप अगोदर पासून गोमांस खाण्याची प्रथा प्रचलित होती. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत जे हे सिद्ध करतात की गोमांस खाण्याची प्रथा भारतात अनेक शतकांपासून प्रचलित आहे. वैदिक काळात (जवळपास ई.स.पूर्व 800 ते 1500) भारतात ‘पवित्र’ गाय अशी कुठलीही कल्पना अस्तित्वात नव्हती. वैदिक आर्यांच्या धार्मिक कर्मकांडांमध्ये अनेकदा गाईचा बळी दिला जात होता. या विषयावर डी.एन.झा यांचे पुस्तक ‘द मिथ ऑफ द होली काऊ’ (पवित्र गाईचे मिथक) यात खूप सविस्तर चर्चा केली आहे आणि तथ्यांसहित सिद्ध केले आहे की हिंदू संस्कृतीने नेहमीच गोहत्येला निकृष्ट मानलेले नाही. आजही फक्त मुस्लिम गोमांस खात नाहीत, तर हिंदू धर्मातीलही अनेक जाती गोमांस खातात. केरळ मध्ये 72 जाती आहेत, ज्यापैकी अनेक हिंदू आहेत, ज्या गोमांस खातात. याशिवाय अनेक खालच्या म्हटल्या जाणाऱ्या जातीही गोमांस खातात. सर्वसाधारणपणे दलित, आदिवासी आणि शूद्र समजल्या जाणाऱ्या समुदायांमधील खालच्या स्तरांमध्ये मांस खाल्ले जाते. गोमांस हे प्रथिनांचा सर्वात स्वस्त स्त्रोत असल्यामुळे ते यावर अवलंबून आहेत. याकडेही लक्ष दिले पाहिजे की जगाच्या स्तरावर गोमांस खाणाऱ्यांमध्ये भारत सातव्या स्थानावर आहे.
भाजपा, आरएसएस प्रणित गोहत्याबंदी कायद्याचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम
2014 च्या निवडणूक प्रचारात गाय-गाय करून हंबरडा फोडणाऱ्या, गायींच्या मृत्यूने आकस्मिक चिंतित झालेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा गायी मारल्या जाण्याचा तर्क सपशेल खोटा ठरला जेव्हा 2012 मध्ये झालेल्या जनावरांच्या जनगणनेतून लक्षात आले की भारतात गाईंच्या संख्येत 6.2 टक्के दराने वाढ झालेली आहे! यातून गाईंचा मोठ्या प्रमाणात मारल्या जाण्याचा प्रश्नच उरत नाही! तसे तर अगोदरपासूनच भाजप शासित राज्यांमध्ये गोमांस बंदी कायद्यांमधील बदलांमुळे बीफ उद्योग आणि चामडे उद्योगाचे खूप नुकसान झाले आहे. मे महिन्यात भाजप सरकारने केंद्रीय स्तरावर ‘प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्स अॅक्ट 1960’ मध्ये एक नवीन कलम जोडले आहे, ज्यानुसार त्याच बाजारांमध्ये जनावरांची खरेदी-विक्री होऊ शकते जे नोंदणीकृत आहेत आणि तेथेही गाईची विक्री फक्त शेतीविषयक कारणांमुळेच होऊ शकते, वधासाठी नाही. यामुळे निर्यात, रोजगार आणि बीफ उद्योग व चामडे उद्योग मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहेत. भारत सरकारने 23 मे रोजी एक ‘असाधारण’आदेश काढला, ज्याद्वारे पशू बाजारांमध्ये मारण्यासाठी होत असलेल्या पशू विक्रीवर बंदी आणली. याचा सर्वात जास्त परिणाम मांस उद्योगावर दिसून आला कारण या उद्योगाला लागणाऱ्या 90 टक्के पशूंचा पुरवठा अशाच बाजारांमधून होत होता. सोबतच चामडे उद्योगालाही कच्चा माल न मिळाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे, असा उद्योग ज्यामध्ये 2006 ते 2011 दरम्यान 8.3 टक्के दराने वार्षिक वाढ होत होती. पण आता निर्यातीत वेगाने घट झाली आहे. या उद्योगात 25 लाख लोकांना रोजगार मिळतो, ज्यापैकी बहुतांश अनुसूचित जातींमधील आहेत. जवळपास 8 लाख दलित हे मेलेल्या जनावरांच्या कातडीच्या उद्योगावर जगतात पण हिंदुत्व ब्रिगेडच्या अफवांच्या जोरावर जमावाद्वारे होणाऱ्या हत्यांच्या घटनांमुळे फक्त दलितच नाही, तर या उद्योगाशी जोडलेले ट्रक चालक, व्यापारी आणि इतर लोकही मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहेत. चामड्याचे उत्पादन करणारे लहान कारखाने, जे मुख्यत: दलितांना अशा कामांमध्ये नेमत होते, ते आता कामावरून काढले जात आहेत. घरगुती स्तरावर या उद्योगात काम करणाऱ्या लोकांची उपजीविका सुद्धा धोक्यात आहे. दुसऱ्या बाजूला सरकारने गाय / बैलाच्या चामड्याला शून्य टक्के कर लावून आयात करण्याची परवानगी दिली आहे, म्हणजे भारतात गाय मेली नाही पाहिजे, पण ती विदेशात मारली असेल तर स्वागत आहे! गरीब शेतकऱ्यांची सुद्धा दुरवस्था होत आहे. बहुतेक शेतकरी प्रेमाने जोपासलेल्या म्हाताऱ्या आणि आजारी जनावरांना विकत असतात जेणेकरून त्या पैशातून नवीन जनावरे घेऊ शकतील. आता नवीन गाईंना घेणे दूरच, उलट पशूहत्येवर पूर्ण बंदीमुळे शेतकऱ्यांना जनावरांच्या संगोपनाचा वेगळा खर्च (जो दरवर्षी जवळपास 40,000 रुपये असेल) करावा लागेल. या बंदीमुळे हिंदू आणि मुस्लिम दोघेही आपली जीविका गमावत आहेत.
गायीच्या नावावर राजकारण करून हे जनतेला आपापसात विभागण्याचे काम करतात जेणेकरून आपण आपल्या खऱ्या मुद्द्यांवर म्हणजेच शिक्षण, रोजगार, आवास, आरोग्य इत्यादींबाबत न बोलता असल्या खोट्या, फसव्या मुद्द्यांना घेऊन एकमेकांची डोकी फोडावीत! आज ही गोष्ट समजून घ्यायला लागेल की जाती – धर्माच्या नावावर ह्या कट्टर संघटनांकडून भडकवल्या जाणाऱ्या दंगलींमध्ये मरतात ती गरीब, कष्टकरी घरांतील मुलं! जेव्हा दंगलीचा वणवा पेटतो तेव्हा त्यात जळणारी घरं ही सामान्य कष्टकरी जनतेची असतात. कुठल्या नेत्या मंत्र्याची, बिल्डर-ठेकेदार-उद्योगपतींची नाहीत! ह्यांची मुलं कधीच रस्त्यांवर तलवारी-त्रिशूळ घेऊन धर्म रक्षणाच्या ‘पवित्र’ कार्यासाठी रक्ताच्या नद्या वाहताना दिसत नाहीत. उलट ते विदेशात मोठमोठ्या, नामांकित शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेत असतात, मौज-मज्जा करत असतात! हे गौरक्षणाचे, धर्मरक्षणाचे ‘पवित्र’ काम सामान्य कष्टकरी घरातल्या तरुणांचा उपयोग करवून घेऊन करवले जाते म्हणजे ह्यांना त्यांच्या राजकारणाच्या पोळ्या शेकता याव्यात, जनतेने आपआपसात लढत रहावं म्हणजे ह्यांना सर्व लोकशाही अधिकार संपवता येतील, कामगार कायदे नष्ट करता येतील, जनतेवर अमाप कर लावून महागाई अतोनात वाढवता येईल आणि ते सर्व करता येईल ज्यामुळे मालक, ठेकेदार, बिल्डर, उद्योगपती यांच्या तिजोऱ्या भरता येतील! म्हणून ह्यांना आपण आपल्या वस्त्या-गल्ल्यांमधून बाहेर हाकलून द्यायला हवे. यामागील राजकारण समजून घेऊन एकजूट होऊन आपल्या वास्तविक मागण्यांसाठी संघटित होऊन लढावं लागेल. अखलाख, पहलू पासून ते अफानपर्यंत सर्वांना तेव्हाच न्याय मिळेल!