क्रांतिकारी कामगार शिक्षण मालिका – 7
मूल्याच्या श्रम सिद्धांताचा विकास: ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो आणि मार्क्स – 2 (डेव्हिड रिकार्डो)

अभिजित

आतापर्यंत आपण अभिजात राजकीय अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांचे महत्त्वाचे योगदान आणि त्यांच्या कमतरता पाहिल्या आहेत. आपण बघितले ॲडम स्मिथ यांनी मूल्याचा श्रम सिद्धांत दिला आणि सांगितले की प्रत्येक मालाचे मूल्य त्यात लागलेल्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष श्रमांच्या प्रमाणाद्वारे ठरते. दुसऱ्या शब्दांत, प्रत्येक मालाचे मूल्य त्यामध्ये लागलेल्या उत्पादनाच्या साधनांच्या उत्पादनात खर्च झालेल्या श्रमांच्या प्रमाणाद्वारे आणि त्या वस्तूच्या उत्पादनात प्रत्यक्षपणे लागलेल्या श्रमांच्या प्रमाणाद्वारे ठरते. ॲडम स्मिथचे योग्य उत्तराधिकारी डेव्हिड रिकार्डो यांनी या शोधाची गणना राजकीय अर्थशास्त्राच्या सर्वात महत्त्वाच्या सिद्धांतांमध्ये केली. परंतु ॲडम स्मिथ आपला सिद्धांत केवळ साधारण माल उत्पादनालाच सुसंगतपणे लागू करू शकले, म्हणजे माल उत्पादनाचा तो काळ जेव्हा उत्पादनाच्या साधनांचा मालक स्वतः प्रत्यक्ष उत्पादकच आहे; म्हणजेच जोपर्यंत भांडवली माल उत्पादनाचे युग सुरू झालेले नव्हते.

भांडवली माल उत्पादनामध्ये उत्पादनाच्या साधनांचा मालक भांडवलदार बनतो (ज्यामागे बळजबरी आणि हिंसाचाराची ऐतिहासिक प्रक्रिया होती, जिला आदिम भांडवल संचय म्हणून ओळखले जाते) आणि प्रत्यक्ष उत्पादकाकडून उत्पादनाची साधने काढून घेतली जातात व तो आपली श्रमशक्ती विकण्यास बाध्य असलेला एक वेतनी कामगार बनतो. पूर्वी प्रत्यक्ष उत्पादकाच्या श्रमातून निर्माण होणारे नवीन मूल्य संपूर्णपणे प्रत्यक्ष उत्पादकाकडे जात असे. तोपर्यंत ॲडम स्मिथला सापेक्ष किंमत किंवा विनिमय मूल्य ठरवण्यात कोणतीही अडचण किंवा अडथळा नव्हता. परंतु आता हे नवीन मूल्य दोन भागांमध्ये विभागले जाते: मजुरी आणि नफा. अशा स्थितीत ॲडम स्मिथसमोर दोन समस्या उभ्या राहिल्या: पहिली, कामगार आणि भांडवलदार यांच्यातील देवाणघेवाण विनिमयाच्या समानतेच्या तत्त्वाद्वारे स्पष्ट करणे स्मिथला कठीण झाले. कारण कामगाराच्या प्रत्यक्ष श्रमाने जे नवे मूल्य निर्माण होत होते ते संपूर्णपणे कामगाराला मिळत नव्हते, तर त्याचा काही भाग नफ्याच्या स्वरूपात भांडवलदाराकडे जात होता आणि त्यामुळे कामगार व भांडवलदार यांच्यातील विनिमयाला विनिमयाच्या समतुल्यतेच्या तत्त्वाद्वारे समजावले जाऊ शकत नव्हते. दुसरी म्हणजे, जर प्रत्येक भांडवलदार उत्पादकाच्या उद्योगामध्ये नवीन उत्पादित मूल्य हे मजुरी व नफा यांच्यात समान प्रमाणात विभागले जात नसेल आणि जर भांडवल व श्रम यांचे गुणोत्तर प्रत्येक उद्योगात सारखे नसेल, तर मग मालाचे मूल्य आणि मालाची किंमत यामध्ये फरक निर्माण होईल आणि स्मिथ ह्या फरकाला त्याच्या मूल्याच्या श्रम सिद्धांताद्वारे स्पष्ट करू शकत नाही. आपण एका उदाहरणाने हे समजून घेऊ.

स्मिथ हे सत्य जाणतात की साधारण माल उत्पादनाच्या काळातही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रति तास श्रमावर मिळणारे उत्पन्न संतुलित होत राहते कारण जर पहिल्या क्षेत्रात एका तासाच्या श्रमावर साधारण माल उत्पादकाला 10 रुपये मिळत असतील आणि दुसऱ्या क्षेत्रामध्ये एका तासाच्या श्रमासाठी साधारण माल उत्पादकाला 12 रुपये मिळत असतील तर मग पहिल्या क्षेत्रातील काही उत्पादक दुसऱ्या क्षेत्रात जातील आणि या प्रक्रियेमुळे दुसऱ्या क्षेत्रातील मागणी आणि पुरवठ्याच्या समीकरणात बदल झाल्यामुळे, मालांच्या किमतीत काही प्रमाणात घट होईल आणि प्रति तास श्रमावर मिळणारे उत्पन्नही घसरेल. ही प्रक्रिया दोन्ही क्षेत्रांतील प्रति तास श्रमावर मिळणाऱ्या उत्पन्नाचे संतुलन होईपर्यंत सुरू राहील. स्मिथच्या मते ही प्रक्रिया संपूर्ण अर्थव्यवस्थेत चालू असते असते, व त्यात स्पर्धा अस्तित्वात असते.

त्यामुळे, साधारण माल उत्पादनाच्या प्रत्येक क्षेत्रातील वस्तूंची सापेक्ष किंमत किंवा विनिमय मूल्य तिच्यामध्ये लागलेल्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष श्रमांच्या प्रमाणात ठरेल. स्मिथच्या उदाहरणाच्याच आधारे आपण खाली तक्ता-1 मध्ये दिलेल्या उदाहरणावरून हे समजून घेऊ:

प्रति तास श्रमातून मिळणारे उत्पन्न उत्पादनात लागलेले अप्रत्यक्ष श्रम उत्पादनात लागलेले प्रत्यक्ष श्रम मालाचे मूल्य
उत्पादक ‘क’ रु. 10 प्रति तास 5 तास = रु. 50 10 तास = रु. 100 रु. 150
उत्पादक ‘ख’ रु. 10 प्रति तास 10 तास = रु. 100 20 तास = रु. 200 रु. 300

जोपर्यंत प्रत्यक्ष उत्पादकच उत्पादनाच्या साधनांचा मालक आहे (ज्याला तो उत्पादनाच्या साधनांचे उत्पादन करणाऱ्या माल उत्पादकाकडूनच वरील नियमांद्वारे ठरणाऱ्या सापेक्ष किमतीला खरेदी करतो) तोपर्यंत मालाचे मूल्य श्रमाच्या प्रमाणाद्वारे ठरवण्यात स्मिथचा मूल्याचा श्रम सिद्धांत पूर्णपणे सक्षम आहे. पण आता आपण अशा परिस्थितीची कल्पना करतो आहोत ज्यात भांडवली माल उत्पादन सुरू झालेले आहे, प्रत्यक्ष उत्पादकाला उत्पादनाच्या साधनांपासून वंचित केले गेले आहे आणि तो आपली श्रमशक्ती विकणारा वेतनी मजूर बनला आहे आणि भांडवलदाराकडे उत्पादनाच्या साधनांची मालकी आली आहे. आता उत्पादनाच्या साधनांची किंमत तर पूर्वीप्रमाणेच मालाच्या मूल्यात हस्तांतरित केली जाते, परंतु आता प्रत्यक्ष श्रमाच्या प्रत्येक तासापासून मिळणारे उत्पन्न किंवा त्यातून निर्माण होणारे मूल्य भांडवलदार आणि मजुरी कामगार यांच्यामध्ये नफा आणि मजुरीच्या स्वरूपात विभागले जाते. साहजिकच, संपूर्ण अर्थव्यवस्थेत वेगवेगळ्या भांडवली माल उत्पादकांकडून उत्पादनाच्या साधनांवर होणारा खर्च आणि श्रमशक्तीच्या खरेदीवर होणारा खर्च सारख्या प्रमाणात नसतो. अशा परिस्थितीत हा मुद्दा सखोलपणे समजून घेण्यासाठी आणखी एक उदाहरण पाहू या. स्मिथप्रमाणे आपण असे गृहीत धरू की प्रत्यक्ष श्रमाने उत्पादित केलेले मूल्य दोन्ही भांडवलदारांच्या (‘क’ व ‘ख’) बाबतीत समान प्रमाणात विभागले गेले आहे. आपण असे देखील गृहीत धरू की उत्पादनाच्या एका चक्रात उत्पादनाची साधने पूर्णपणे वापरली जातात. अशा वेळी परिस्थिती तक्ता-2 मध्ये दर्शविल्याप्रमाणे असेल:

 

 

उत्पादनाच्या साधनांवर झालेली भांडवल गुंतवणूक किंवा त्यांच्या उत्पादनात लागलेले श्रमाचे प्रमाण/अप्रत्यक्ष श्रम मालाच्या उत्पादनात लागलेले प्रत्यक्ष श्रम मजुरी नफा सापेक्ष किंमत (प्रत्यक्ष श्रम आणि अप्रत्यक्ष श्रम यांची बेरीज)
उत्पादक ‘क’ 10 तास = रु. 100 20 तास = रु. 200 रु. 100 रु. 100 रु. 300
उत्पादक ‘ख’ 20 तास = रु. 200 30 तास = रु. 300 रु. 150 रु. 150 रु. 500

पहिल्या भांडवलदारासाठी नफ्याचा दर = नफा / एकूण गुंतवणूक x 100= (100 / 200) x 100= 50 टक्केदुसऱ्या भांडवलदारासाठी नफ्याचा दर = नफा / एकूण गुंतवणूक x 100= (150 / 350) x 100= 43.16 टक्केयेथे नवीन मूल्य दोन्ही भांडवलदारांच्या बाबतीत नफा आणि मजुरी यांच्यात समान प्रमाणात विभागले जात असले तरी दोन्ही भांडवलदारांसाठी नफ्याचा दर भिन्न आहे. याचे कारण असे की अतिरिक्त मूल्याचा दर (म्हणजे वैयक्तिक भांडवलदारासाठी नफा आणि मजुरी यांचे गुणोत्तर) समान असला तरी उत्पादनाच्या साधनांवरील गुंतवणूक आणि मजुरीवर झालेली गुंतवणूक यांचे गुणोत्तर, म्हणजे भांडवल आणि श्रम यांचे गुणोत्तर वेगवेगळे आहे आणि नफ्याचा दर हा नफा व एकूण भांडवल गुंतवणूक यांचे गुणोत्तर असते. अशा स्थितीत दोन्ही भांडवलदारांसाठी अतिरिक्त मूल्याचा दर सारखा असला तरी नफ्याचा दर वेगवेगळा असेल. पण जर दोन क्षेत्रांमध्ये भांडवलदारांच्या नफ्याच्या दरात तफावत असेल, तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत ही परिस्थिती कायम राहू शकते का? नाही. अशा परिस्थितीत स्पर्धेमुळे भांडवलाचा ओघ कमी नफ्याचा दर असलेल्या क्षेत्रातून जास्त नफ्याचा दर असलेल्या क्षेत्राकडे जाईल, ज्यामुळे जास्त नफ्याचा दर असलेल्या क्षेत्रातील पुरवठा वाढेल आणि किंमत कमी होईल, तसेच कमी नफ्याचा दर असणाऱ्या क्षेत्रातील पुरवठा कमी होईल आणि किमती वाढतील. या प्रक्रियेत दोन्ही क्षेत्रातील नफ्याचा दर संतुलित होणे हे एका प्रक्रियेच्या स्वरूपात घडेल. प्रत्येक भांडवलदार किमान अर्थव्यवस्थेचा सरासरी नफ्याचा दर प्राप्त केल्यानंतरच समाधानी होईल. हा सरासरी नफ्याचा दर काय आहे?वरील उदाहरणात, अर्थव्यवस्थेचा सरासरी नफ्याचा दर = एकूण नफा/एकूण गुंतवणूक= (250/550) x 100= 45.45 टक्केजर प्रत्येक भांडवलदाराला मिळणारा नफा एका सतत चालणाऱ्या प्रक्रियेच्या स्वरूपात आणि एक प्रवृत्ती म्हणून सरासरी नफ्याच्या जवळ पोहोचला, तर त्याच्या मालाची किंमत अशी असेल: ‘उत्पादनाच्या साधनांची किंमत + मजुरी + सरासरी नफा’.परंतु अशावेळी प्रत्येक मालाची सापेक्ष किंमत त्याच्या श्रममूल्यापासून वेगळी होईल. ॲडम स्मिथचा श्रम सिद्धांत या परिघटनेचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही. जेव्हा ॲडम स्मिथ या परिघटनेचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही, तेव्हा तो त्याच्या मूल्याच्या श्रम सिद्धांताचाच त्याग करतो आणि मूल्याच्या उत्पादन-खर्च सिद्धांताकडे येतो, ज्याचा आम्ही आधीसुद्धा उल्लेख केला आहे. या सिद्धांतानुसार मजुरीचा एक नैसर्गिक दर असतो आणि नफ्याचाही एक नैसर्गिक दर असतो. या दरांनुसार स्मिथ मजुरी आणि नफा मोजतो आणि उत्पादनाच्या साधनांमधील गुंतवणुकीत त्याला जोडून मालाची किंमत काढतो आणि अशा प्रकारे मालाची सापेक्ष किंमत त्यामध्ये लागलेल्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष श्रमांच्या प्रमाणावरून करण्याच्या स्वतःच्याच सिद्धांताचा त्याग करतो. परंतु आपण सर्व हे जाणतो की मजुरी आणि नफ्याचे असे नैसर्गिक दर गृहीत धरणे म्हणजे वास्तवात ती गोष्ट गृहीत धरण्यासारखे आहे जिल समजावण्याचीची अपेक्षा राजकीय अर्थशास्त्राकडून केली गेली आहे. याचे कारण हे आहे की स्मिथ ना कामगार आणि भांडवलदार यांच्यातील देवाणघेवाण समजू शकतात, ना ते भांडवली माल उत्पादनात होणाऱ्या स्पर्धेमुळे निर्माण होणाऱ्या उत्पादनाच्या किमतींना (prices of production) सुसंगतपणे समजून घेऊ शकतात. परिणामी, विरोधाभासांनी वेढले जाऊन ते त्यांच्या मूल्याच्या वैज्ञानिक श्रम सिद्धांताचाच त्याग करतात. ते मूल्याच्या श्रम सिद्धांताच्या रक्षणासाठी फक्त दोन अटी घालतात, ज्या कोणत्याही भांडवली अर्थव्यवस्थेत कधीच पूर्ण होत नाहीत आणि कधीही पूर्ण होऊ शकत नाहीत: पहिली अट, प्रत्येक उद्योगातील नवीन मूल्य मजुरी आणि नफा यांच्यात समान प्रमाणात विभागले जावे आणि दुसरी अट अशी की प्रत्येक उद्योगात भांडवल आणि श्रम यांचे गुणोत्तर समान असावे. जर या दोन अटींची पूर्तता झाली नाही तर स्मिथ मूल्याच्या उत्पादन-खर्च सिद्धांताकडे वळतात.रिकार्डोने स्मिथची ही अडचण सोडवतात. रिकार्डो म्हणतो ती पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे भांडवली माल उत्पादन मूल्याच्या श्रम सिद्धांताला नाकारत नाही तर त्याला समृद्ध करते. भांडवली माल उत्पादनाच्या परिस्थितीतही मूल्याचा श्रम सिद्धांत खरा आहे आणि तोच वस्तूंच्या सापेक्ष किमतींचे अचूक स्पष्टीकरण देऊ शकतो. हे सिद्ध करण्यासाठी प्रथम रिकार्डो स्मिथचेच उदाहरण घेतो आणि सांगतो की आपण माल उत्पादनाच्या एका ‘आदिम स्थिती’ची कल्पना करत आहोत जी आपण वरील तक्ता-1 मध्ये दर्शविली आहे. त्यानंतर रिकार्डो त्यात भांडवली माल उत्पादनाची एक अशी परिस्थिती जोडतो जिच्यात स्मिथने नमूद केलेल्या दोन्ही अटी, म्हणजे नवीन मूल्याचे नफा आणि मजुरी यांमध्ये समान प्रमाणात विभागले जाणे आणि सर्व भांडवली उद्योगांमध्ये भांडवल आणि श्रम यांचे समान गुणोत्तर असणे, पूर्ण होत आहेत. ती परिस्थिती कशी असेल? खाली दिलेल्या तक्ता-3 वरून समजून घेऊयात:
आपण वरील उदाहरणात पाहू शकतो,  त्याप्रमाणे आता एका तासाचे श्रम जे 10 रुपये उत्पन्न देते, ते नफा आणि मजुरीत विभागले जात आहे. आता एका तासाच्या श्रमासाठी मजुराला रु. 4 मजुरी मिळत आहे, तर उर्वरित रु. 6 नफ्याच्या स्वरूपात भांडवलदारांकडे जात आहेत. तसेच एका तासात दोन्ही भांडवलदारांच्या उद्योगांमध्ये रु. 60 च्या बरोबरीची उत्पादन साधन खर्च होतात. म्हणजेच प्रति तास उत्पादित वस्तूंचे मूल्य आहे: ‘प्रति तास भांडवल खर्च + प्रति तास नफा’ जे वरील दोन्ही भांडवलदारांच्या बाबतीत रु. 60 + रु. 6, म्हणजेच रु. 66 आहे. लक्षात ठेवा की गुंतवलेल्या भांडवलात मजुरी समाविष्ट आहे, जी भांडवलदार त्याच्या भांडवलाच्या काही भागातून कामगारांना देतो. नफ्याचा दर आहे: प्रति तास नफा/प्रति तास भांडवल खर्च. या उदाहरणात नफ्याचा दर = रु. 6/रु. 60 म्हणजे 10 टक्के. म्हणजेच, दोन्ही भांडवलदारांच्या उद्योगांमध्ये भांडवल-श्रम यांचे गुणोत्तर समान आहे आणि नवीन मूल्याचे नफा आणि मजुरी यांच्यातील विभागणीचे गुणोत्तर समान आहे. त्यामुळे दोघांसाठीही मूल्य आणि किमतीत फरक नाही.आता आणखी एक उदाहरण घेऊ. येथे भांडवल आणि श्रम यांचे गुणोत्तर वेगळे आहे. परंतु आपल्याला असे गृहीत धरून चालावे लागेल की नफ्याचा दर दोघांसाठीही सारखाच आहे, कारण जर तो असमान असेल तर भांडवलाचा प्रवाह कमी नफ्याचा दर असलेल्या क्षेत्रातून जास्त नफ्याचा दर असलेल्या क्षेत्राकडे तोपर्यंत होत राहील जोपर्यंत एका प्रक्रियेच्या स्वरूपात नफ्याच्या दराचे संतुलन होणार नाही. साहजिकच, रिकार्डोला देखील हे माहीत होते की प्रत्यक्षात सर्व भांडवलदारांना कोणत्याही क्षणी सरासरी नफा मिळत नाही आणि नफ्याचे सरासरीकरण एका सतत चालणाऱ्या प्रक्रियेच्या स्वरूपातच सुरूच राहते. परंतु या आर्थिक गतीला समजण्यासाठी आणि मूल्य व किमतीतील तफावतीची परिघटना समजून घेण्यासाठी आपल्याला दोन्ही भांडवलदारांसाठी श्रम आणि भांडवल यांचे गुणोत्तर वेगळे परंतु नफ्याचा दर जवळजवळ सारखाच आहे असे मानावे लागेल आणि हाच कुठल्याही परिघटनेला समजून घेण्याचा वैज्ञानिक मार्ग असतो. चला, या परिस्थितीत काय होईल ते पाहूया.खाली दिलेला तक्ता-4 समजून घेण्याची युक्ती अशी आहे की तुम्ही प्रथम तो सातव्या स्तंभापासून पहिल्या स्तंभापर्यंत वाचा, कारण सर्वप्रथम आपल्याला दोन्ही भांडवलदारांसाठी नफ्याचा दर समान आहे असे गृहीत धरावे लागेल. आणि नंतर तक्ता-4 पुन्हा पहिल्या स्तंभापासून नवव्या स्तंभापर्यंत वाचा.
येथे आपण पाहू शकतो की दोन्ही भांडवलदारांच्या उद्योगांमध्ये श्रम आणि भांडवल यांचे गुणोत्तर समान नाही कारण एका तासाच्या श्रमात, पहिल्या भांडवलदाराच्या उद्योगाला भांडवल खर्च 30 रुपये आहे, तर दुसऱ्या भांडवलदाराच्या उद्योगाला हा खर्च रु. 90 आहे. परंतु स्पर्धेमुळे नफ्याचे सरासरीकरण होते आणि त्यामुळे नफ्याचा दर दोघांसाठी समान मानला गेला आहे. अशा स्थितीत पहिल्या भांडवलदाराच्या उद्योगात प्रति तास 3 रु. नफा मिळत आहे कारण प्रति तास भांडवल खर्च रु. 30 आहे आणि नफ्याचा दर 10 टक्के आहे. दुसर्‍या भांडवलदाराच्या उद्योगात प्रति तास 9 रु. नफा मिळत आहे कारण प्रति तास भांडवल खर्च रु. 90 आहे आणि त्यासाठीदेखील नफ्याचा दर 10 टक्के आहे. प्रति तास उत्पादित होणाऱ्या मालाचे मूल्य 1 तासात प्रत्यक्ष श्रमाने निर्माण केलेल्या नवीन मूल्याच्या आणि 1 तासात उत्पादनाच्या साधनांवर झालेल्या खर्चाच्या बरोबरीचे असल्याने (जे येथे एकूण भांडवल खर्च आणि दिलेली मजुरी यातील फरकाएवढे आहे, म्हणजे रु. 26) पहिल्या भांडवलदारासाठी दर तासाला उत्पादित मालाचे मूल्य आहे रु. 10 + रु. 26 = रु. 36 आणि त्याच्यासाठी किंमत आहे रु. 3 (सरासरी नफा) + रु. 30 (एकूण भांडवल खर्च). त्याचप्रमाणे दुसऱ्या भांडवलदारासाठी मूल्य निर्मिती/तास आहे रु. 96 आणि किंमत आहे रु. 99. दोन्ही भांडवलदारांच्या उद्योगांमध्ये जिवंत/प्रत्यक्ष श्रमाने प्रति तास निर्माण होणारे मूल्य रु. 10 च आहे कारण एका तासाचे श्रम रु. 10 चेच मूल्य निर्माण करत आहे. दोन्ही उद्योगांमध्ये प्रत्यक्ष श्रमाने प्रति तास तेवढेच एकूण नवीन मूल्य (रु. 20) तयार होत आहे जेवढे पूर्वी म्हणजे तक्ता-3 मध्ये होत होते. दोन्ही उद्योगांमध्ये एकूण नफा सुद्धा अजूनही तेवढाच आहे (एकूण रु. 12) जेवढा पूर्वी म्हणजे तक्ता 3 मध्ये होता. परंतु हे नवीन मूल्य आणि नफा आता दोन भांडवलदारांमध्ये वेगळ्या पद्धतीने पुनर्वितरित होत आहे. कारण भांडवल आणि श्रम यांच्यातील गुणोत्तर दोन्ही उद्योगांमध्ये भिन्न आहे आणि त्यामुळे दोन्हीमध्ये नफ्याचा दर भिन्न आहे, परंतु प्रत्येक भांडवलदार त्याच्या भांडवलाच्या आकारानुसार किमान सरासरी नफा मिळवण्याची अपेक्षा ठेवतो आणि जेव्हा असे होत नाही तेव्हा भांडवलाचा प्रवाह कमी नफ्याचा दर असलेल्या क्षेत्रांतून जास्त नफ्याचा दर असलेल्या क्षेत्रांकडे जातो, त्यामुळे एक प्रवृत्ती म्हणून नफ्याचा सरासरी दर सृजित होतो.रिकार्डोचे योगदान हे होते की त्याने सांगितले की मालाचे मूल्य आणि मालाची किंमत यामध्ये निर्माण होणारा फरक कधीही 7 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही. याला ‘रिकार्डोचा 7 टक्के नियम’ असेही म्हणतात. हा फरक 7 टक्क्यांपेक्षा जास्त होताच एक उलटी प्रक्रिया सुरू होते जी मूल्य आणि किंमत यांच्यातील फरक विरुद्ध दिशेने वळवते. म्हणून रिकार्डो म्हणतो की जर एक प्रक्रिया म्हणून पाहिले तर किमतींसाठी श्रमाच्या प्रमाणात निर्माण झालेले मूल्य गुरुत्व केंद्र किंवा गुरुत्वाकर्षण म्हणून कार्य करते आणि किमती श्रम-मूल्याच्या याच गुरुत्व केंद्राभोवती फिरत राहतात. म्हणूनच जर आपण साधारण माल उत्पादनाऐवजी भांडवली माल उत्पादनाचे जरी विश्लेषण केले, तरी ते मूल्याच्या श्रम सिद्धांताला निष्फळ करत नाही तर त्याला समृद्ध करते किंवा त्यात एक बदल घडवून आणते. अजूनही वस्तूंची सापेक्ष किंमत या 7 टक्क्यांच्या कमाल फरकासह त्यांच्या श्रम मूल्याच्या गुरुत्व केंद्राभोवतीच फिरते आणि त्यांना स्पष्ट करण्यासाठी आपल्याला वस्तूंच्या सापेक्ष किंमतीच्या उत्पादन-खर्च सिद्धांताकडे जाण्याची आवश्यकता नाही, जसे की स्मिथने केले होते आणि जो त्याच्या सिद्धांताचा तो हिस्सा आहे ज्याला मार्क्सने अवैज्ञानिक म्हटले आहे.अशाप्रकारे रिकार्डो स्मिथच्या एक पाऊल पुढे जातात आणि ॲडम स्मिथच्या श्रम सिद्धांताला ॲडम स्मिथच्या स्वतःच्या विरोधाभासांपासून वाचवतात आणि दाखवतात की तो भांडवली माल उत्पादनाच्या युगातही कोणत्याही अटींशिवाय पूर्णपणे वैध आहे. नंतर अनुभवांच्या अभ्यासाने हे बरोबर सिद्ध केले की भांडवली माल उत्पादन, भांडवलदार, खाजगी मालकी आणि नफ्याच्या श्रेणी अस्तित्वात आल्याने मूल्याच्या श्रम सिद्धांताचा त्याग करण्याची गरज नाही, फक्त त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. भांडवली माल उत्पादन मूल्याचा श्रम सिद्धांत निष्फळ करत नाही, उलट सुधारित स्वरूपात त्याला अधिक मजबूत करते.परंतु स्मिथप्रमाणेच रिकार्डोसुद्धा हे समजू शकले नाहीत की भांडवलशाही समाजात भांडवलदार वर्गाच्या नफ्याचे मूळ यात आहे की कामगाराची श्रमशक्ती ही स्वतः माल बनते. भांडवलदार आणि कामगार यांच्यातील विनिमय हा श्रम आणि मजुरीचा नसून श्रमशक्ती आणि मजुरीचा असतो आणि ही श्रमशक्ती अशी एक विशिष्ट माल आहे जी तिच्या उत्पादक उपभोगाच्या प्रक्रियेत तिच्या मूल्यापेक्षा जास्त मूल्य निर्माण करण्यास सक्षम आहे. त्यामुळे अतिरिक्त मूल्याच्या सिद्धांतापर्यंत स्मिथ आणि रिकार्डो किंवा मार्क्स यांच्यापूर्वीचा कोणताही राजकीय अर्थशास्त्रज्ञ पोहोचू शकला नाही. तसेच मार्क्सपूर्वीचे अभिजात राजकीय अर्थशास्त्र मूर्त आणि अमूर्त श्रम यांमधील फरक आणि मजुरीवर लागणारे परिवर्तनशील भांडवल (variable capital) आणि एकदाच मालामध्ये आपले मूल्य हस्तांतरित करणारे उत्पादनाच्या घटकांवर लागणारे चल भांडवल (circulating capital) यांच्यातील फरकालासुद्धा स्पष्टपणे समजू शकले नव्हते. याशिवाय स्मिथ आणि रिकार्डो यांनी जमिनीचे भाडे, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि चलन याबाबत जे सिद्धांत दिले आहेत ते अपूर्ण, सदोष आणि अनेक भ्रमांनी ग्रस्त आहेत, ज्यांची आलोचना करत मार्क्सने जमीन भाडे, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि चलन याबाबत वैज्ञानिक सिद्धांत मांडले. परंतु त्यावर आपण भविष्यातील अध्यायांमध्ये विचार करू. आता आमचे उद्दिष्ट केवळ थोडक्यात हे दाखवणे होते की मार्क्सच्या आधी अभिजात राजकीय अर्थशास्त्राने मूल्याचा श्रम सिद्धांत कसा विकसित केला आणि मार्क्सने त्यातील उणिवा दूर करून अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत कसा विकसित केला, भांडवली समाजात कामगार वर्गाच्या शोषणाला संपूर्णतेत आणि वैज्ञानिकरित्या कसे समजले.

(मूळ लेख- मजदूर बिगुल, डिसेंबर 2022 मराठी अनुवाद- जयवर्धन)

कामगार बिगुल, नोव्हेंबर 2023