क्रांतिकारी कामगार शिक्षण मालिका – 9
मालापासून ते पैशापर्यंत
✍ अभिनव
पैसा (इंग्रजीतील Money (मनी) या अर्थाने, रुपयाचा भाग असलेले एकक या अर्थाने नाही:अनुवादक) ही एक रहस्यमय गोष्ट आहे. ज्याच्या खिशात तो पुरेश्या प्रमाणात आहे तो स्वतःला शक्तिशाली आणि जगाचा राजा समजतो. पण त्यालाही पैशाची भीती वाटते आणि तो पूजा करतो की पैसा नेहमी त्याच्या खिशात रहावा. ज्याच्याकडे पैसा नाही तो सुद्धा त्याच्या शक्तीपुढे नतमस्तक होतो आणि देवी लक्ष्मीने आपल्या खिशातही प्रवेश करावा अशी प्रार्थना करत राहतो. पण ही पैसा गोष्ट नक्की काय आहे? या रहस्यमय शक्तीमागील रहस्य काय आहे? हे समजून घेण्यासाठी आपल्याला माल आणि मालाचे उत्पादन समजून घ्यावे लागेल. आपल्याला मूल्य आणि विनिमय-मूल्य यांच्यातील संबंधांबद्दल समजून घ्यावे लागेल. या दिशेने काही प्राथमिक पावले आपण उचलली आहेत. आता पुढे जाऊया. पण यासाठी संक्षेपात थोडं मागे जावे लागेल.
सामाजिक श्रम विभाजन आणि विनिमय
आपल्याला माहित आहे की मानवी श्रमाच्या उत्पादनांचा विनिमय तेव्हाच सुरू होऊ शकतो जेव्हा समाजात सामाजिक श्रम विभाजन असेल. म्हणजे, जर लोक सामूहिकरीत्या किंवा वैयक्तिकरित्या, त्यांच्यासाठी उपयुक्त असलेल्या सर्व गोष्टींचे उत्पादन स्वतःच करत असतील (जसे आदिम टोळी समाजात होते आणि अगदी प्रगत आणि उच्च स्तरावरील कम्युनिस्ट समाजात असे असेल) तर वस्तूंच्या विनिमयाची गरज नसेल आणि वस्तू केवळ उपयोग-मूल्य म्हणून अस्तित्वात असतील आणि त्या मालामध्ये रूपांतरित होणार नाहीत, कारण माल म्हणजे फक्त त्या वस्तू आहेत ज्यांची देवाणघेवाण किंवा खरेदी-विक्री केली जाऊ शकते. जेव्हा समाजात श्रमविभागणी असते, म्हणजेच विविध उत्पादक किंवा उत्पादकांच्या गटांद्वारे विविध उपयुक्त वस्तू तयार केल्या जातात, तेव्हाच सर्व उपयुक्त वस्तूंचे मालामध्ये रूपांतर होते. अशा परिस्थितीत विनिमय अनिवार्य होऊन जाईल. श्रमाचे सामाजिक विभाजन उत्पादक शक्तींच्या विकासासह विकसित झाले, जी स्वत: निसर्गासोबत मनुष्याच्या उत्पादन आंतरक्रियेत विकसित झाली. हे सामाजिक श्रम विभाजन उत्पादकांच्या नकळत विकसित होते. यामागे जाणीवपूर्वक नियोजन किंवा कुठलीही योजना नसते.
सामाजिक श्रम विभाजनासह, म्हणजे जेव्हा वेगवेगळे उत्पादक वेगवेगळ्या वस्तूंचे उत्पादन करतात, तेव्हा वस्तूंचा विनिमय सुरू होतो आणि यासोबतच त्यांचे मालामध्ये रूपांतर होते. आता ती केवळ उपयोग-मूल्ये राहत नाहीत तर सोबतच ती विनिमय-मूल्यांमध्येही रूपांतरित झाली आहेत. आपण पूर्वी पाहिल्याप्रमाणे, विनिमय-मूल्य हे दोन वस्तूंच्या देवाणघेवाणीच्या प्रमाणाशिवाय दुसरे काहीही नाही. म्हणजेच, ‘क’ या वस्तूच्या किती प्रमाणाचे ‘ख’ या वस्तूच्या किती प्रमाणासोबत देवाणघेवाण केली जाईल याचे गुणोत्तरच विनिमय-मूल्य आहे. आपल्याला हे देखील माहित आहे की विनिमय-मूल्य हे दुसरे काही नसून मूल्याचेच रूप असते, म्हणजेच दोन्ही वस्तूंच्या मूल्याचे प्रमाण किंवा त्यामध्ये लागलेल्या अमूर्त मानवी श्रमांच्या प्रमाणावरच हे गुणोत्तर ठरते. दुसऱ्या शब्दांत, विनिमय-मूल्य हे प्रत्यक्षात दोन वस्तूंच्या मूल्याचे गुणोत्तर आहे, जे स्वतः काही नसून अमूर्त मानवी श्रमाचे प्रमाण आहे, ज्याला सामाजिकदृष्ट्या आवश्यक श्रम-काळात मोजले जाते.
ॲडम स्मिथचा असा विश्वास होता की मनुष्य त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीमुळे देवाणघेवाण करतो आणि देवाणघेवाणीमुळे सामाजिक श्रम विभाजन निर्माण होते. मार्क्सने दाखवून दिले की बाब नेमकी उलटी आहे. वास्तवात श्रमाचे सामाजिक विभाजन उत्पादक शक्तींच्या विकासासह निर्माण होते आणि त्याच्या परिणामी देवाणघेवाण म्हणजेच विनिमय निर्माण होतो. मार्क्सने दाखवून दिले की विनिमय प्रत्यक्षात विकसित होण्याच्या खूप आधी, आदिम जमातींमध्ये वय आणि लिंग यांच्या आधारावर श्रमांची नैसर्गिक विभागणी विकसित झाली होती. नंतर, वेगवेगळ्या जमातींमध्ये देवाणघेवाण सुरू झाली कारण त्यांच्यामध्ये सामाजिक श्रम विभाजन विकसित झाले होते आणि ते वेगवेगळ्या वस्तूंचे उत्पादन करत होते आणि त्यांना एकमेकांच्या उत्पादनांची आवश्यकता होती. म्हणून, सामाजिक श्रम विभाजन देवाणघेवाणीपूर्वी निर्माण झालेले असते आणि त्याचा उत्तरोत्तर विकास विनिमयाला जन्म देतो आणि अशा प्रकारे माल उत्पादनासाठी ही एक पूर्वअट आहे.
पण हेही खरे आहे की, जेव्हा एकदा माल उत्पादन सुरू होते तेव्हा उत्पादक शक्तींच्या उत्तरोत्तर विकासाबरोबर, हे माल उत्पादन सामाजिक श्रम विभाजनाला आणखी वाढवते. एकच उत्पादन प्रक्रिया अनेक भागांमध्ये विभागली जाते आणि कालांतराने एक स्वतंत्र उत्पादन प्रक्रिया बनते.
मानवी सभ्यतेसाठी सर्व उत्पादित उपयोग-मूल्यांचे उत्पादन मानवी श्रमाद्वारे केले जाते आणि म्हणूनच मानवी सभ्यतेचा आधार दुसरा काही नसून मानवी श्रमच आहे. परंतु समस्त समृद्धीचे दोन स्त्रोत आहेत: श्रम आणि निसर्ग. श्रम हा सर्व संपत्तीचा पिता आहे तर निसर्ग ही सर्व समृद्धीची जननी आहे असे मार्क्सने म्हटले होते. परंतु सर्व मूल्यांचा केवळ एकच स्त्रोत आहे: श्रम. कारण मूल्य म्हणजे दुसरे काहीही नसून मालामध्ये वास्तवीकृत झालेले अमूर्त मानवी श्रम होय.
आता आपण मूल्य आणि विनिमय मूल्य यांच्यातील संबंध आणखी खोलात आणि तपशीलाने पाहू आणि याच प्रक्रियेत पैशाच्या उदय आणि विकासाची प्रक्रिया समजून घेऊ.
मूल्याचे रूप, किंवा, विनिमय–मूल्य
आपल्याला माहित आहे की उपयोग–मूल्याचा यथार्थ हा पूर्णपणे वैयक्तिक यथार्थ आहे. याचा अर्थ असा आहे की एक उपयोग-मूल्य केवळ गुणात्मकरीत्या दुसऱ्यापेक्षा वेगळे म्हणून पाहिले जाऊ शकते. हे प्रत्येक उपयोग-मूल्याला गुणात्मकरीत्या विशिष्ट बनवते. उदाहरणार्थ, बूट आणि घड्याळ यांचे स्वतःचे वेगळे गुणात्मक वैशिष्ट्य आहे आणि गुणांच्या आधारावर त्यांचे विशिष्ट अस्तित्व आहे. त्यामुळे उपयोग-मूल्य म्हणून प्रत्येक माल विशिष्ट प्रकारच्या ठोस श्रमाचे उत्पादन असते आणि त्याला त्याच्या विशिष्ट उपयुक्ततेच्या आधारावर इतर मालांपासून गुणात्मकपणे वेगळे केले जाऊ शकते. जेव्हा आपण म्हणतो की उपयोग-मूल्य म्हणून प्रत्येक मालाचे पूर्णपणे वैयक्तिक वास्तव असते, तेव्हा त्याचा अर्थ हाच आहे.
परंतु मूल्य म्हणून मालाचे वास्तव हे शुद्धरुपाने एक सामाजिक वास्तव आहे. म्हणजेच, गुणात्मकदृष्ट्या दोन मालांच्या मूल्यांमध्ये, म्हणजे त्यांच्या वास्तवीकृत झालेल्या अमूर्त मानवी श्रमांमध्ये गुणात्मक फरक केला जाऊ शकत नाही. ते दोन्ही अमूर्त श्रमाचे दोन भिन्न प्रमाण आहेत आणि मूल्याच्या दृष्टीने त्यांच्यामध्ये केवळ परिमाणात्मकपणेच फरक केला जाऊ शकतो, गुणात्मकरित्या नाही. गुणात्मकदृष्ट्या, एखाद्या मालाचे मूल्य हे सामान्य अमूर्त मानवी श्रमच आहे आणि इतर कोणत्याही मालामध्ये लागलेल्या सामान्य अमूर्त मानवी श्रमापेक्षा त्याकडे गुणात्मकदृष्ट्या भिन्न म्हणून पाहिले जाऊ शकत नाही. हा साधारणपणे मानवी मेंदू, मज्जातंतू आणि स्नायूंचा खर्च आहे, दुसरे काहीही नाही आणि त्यामुळे दोन्ही मालामधील मानवी मेंदू, मज्जातंतू आणि स्नायू यांच्या खर्चात गुणात्मक फरक केला जाऊ शकत नाही. दोन भिन्न उपयोग-मूल्यांमधील देवाणघेवाण करण्यासाठी, त्यांच्यामध्ये लागलेल्या ठोस श्रमांना नजरेआड करून त्यांच्यामध्ये लागलेल्या सामान्य मानवी अमूर्त श्रमांना लक्षात घेणे आवश्यक आहे, कारण हेच त्यांच्यामध्ये समान आणि तुलना करण्याजोगे आहे आणि याच प्रमाणाच्या आधारावर दोन मालांच्या देवाणघेवाणीचे अथवा विनिमयाचे गुणोत्तर निश्चित केले जाते. म्हणून, मूल्यांच्या रूपात मालांचे अस्तित्व पूर्णपणे सामाजिक आहे कारण त्यांचे सारतत्त्व संपूर्णपणे एक सामान्य सामाजिक वस्तू, म्हणजेच अमूर्त मानवी श्रम आहेत.
मूल्य विनिमयाच्या प्रक्रियेतच अभिव्यक्त होते, परंतु ते निर्माण विनिमयात नाही तर उत्पादनात होते. ज्याअर्थी मूल्याच्या रूपात मालांचे पूर्णपणे सामाजिक अस्तित्व असते आणि त्यांच्या मूल्याचे आकलन केवळ त्यांच्या सर्व वैयक्तिक वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष करूनच केले जाऊ शकते, त्यामुळे मूल्याच्या रूपात माल एकमेकांपासून केवळ परिमाणात्मकदृष्ट्याच भिन्न असतात. उदाहरणार्थ, खर्च झालेल्या अमूर्त मानवी श्रमाच्या प्रमाणाच्या आधारावर एका घड्याळासाठी दोन जोडी चपलांची देवाणघेवाण केली जाऊ शकते. मूल्याच्या रूपात त्यांच्यामध्ये केवळ परिमाणात्मक संबंधच आहे आणि मूल्याचा विचार करताना आपण उपयोग-मूल्यांच्या रूपातील त्यांच्या विशिष्टतेकडे दुर्लक्ष करतो.
साहजिकच, फक्त दोन भिन्न मालांचाच विनिमय केला जातो कारण कोणीही समान मालाचा समान मालाशी विनिमय करणार नाही. ज्याअर्थी मूल्याच्या रूपात मालाचे शुद्धपणे सामाजिक अस्तित्व असते, त्यामुळे एक माल आपले मूल्य केवळ दुसऱ्या मालाच्या रूपातच अभिव्यक्त करू शकतो. जेव्हा एक माल आपले मूल्य दुसऱ्या मालाच्या निश्चित प्रमाणाच्या रूपात अभिव्यक्त करतो, तेव्हा यालाच आपण विनिमय मूल्य म्हणतो, म्हणजे दोन मालांच्या मूल्यांच्या आधारे देवाणघेवाण करावयाच्या त्यांच्या प्रमाणांचे गुणोत्तर किंवा दोन मूल्यांच्या विनिमयाचे गुणोत्तर. या रूपात, विनिमय मूल्य दुसरे काही नसून मूल्याचे रूप (form of value) आहे. जेव्हा एखाद्या मालाचे मूल्य स्वतंत्र मूल्य-रूप धारण करते तेव्हा ते विनिमय मूल्याचे रूप धारण करते.
पैसा दुसरे काही नसून मूल्याच्या रूपाच्या विकासाचा परिणाम आहे, जो मूल्य आणि उपयोग–मूल्य यांच्यातील गहन होत जाणाऱ्या अंतर्विरोधाचा परिणाम असतो. आपण सर्व या रूपाला म्हणजे पैशाच्या रूपालाच ओळखतो ज्यामध्ये उपयोग-मूल्याचा प्रत्येक सुगावा, प्रत्येक खुण पुसली गेली आहे. हे चमत्कारिक रूप, म्हणजेच पैसा, आपल्याला रहस्यमय शक्तींनी संपन्न असल्याचे दिसते कारण त्याचा विनिमय जगातील कोणत्याही मालासोबत केला जाऊ शकतो. ज्या भांडवली समाजात संपत्ती अधिकाधिक मालांचे रूप धारण करत जाते, तिथे अधिकाधिक संपत्तीवान होण्याचा अर्थच आहे अधिकाधिक मालांचा मालक होणे. ज्याअर्थी पैशाचा विनिमय कोणत्याही मालासोबत केला जाऊ शकतो, त्याअर्थी त्याचे जास्त प्रमाण हे जास्त संपत्तीचा स्त्रोत असते. पैशाची हीच गूढ दिसणारी शक्ती त्यामागील रहस्य आणि त्याबद्दलची अंधभक्ती निर्माण करते, जे दुसरे काही नसून माल अंधभक्तीचे सर्वात विकसित रूप आहे. ही माल अंधभक्ती समाजातील सर्व मानवांमधील संबंधांना मालांमधील संबंधांच्या रूपात दडवून टाकते. वास्तवात मालाच्या देवाणघेवाणीच्या रूपात, माणसं केवळ एकमेकांच्या श्रमांच्या विशिष्ट प्रमाणाची देवाणघेवाणच करत असतात. हे सत्य तर ॲडम स्मिथ आणि डेव्हिड रिकार्डो यांनाही समजले होते की पैशाच्या रूपात व्यक्त केलेले मूल्य म्हणजेच किंमत हे केवळ नाममात्र किंवा सांकेतिक (nominal) विनिमय मूल्य असते, जे स्वतः मालांच्या उत्पादनात खर्च केलेल्या श्रमाच्या प्रमाणावर ठरत असते.
जेव्हा मनुष्य मिळून सामूहिकपणे सर्व वस्तूंचे उत्पादन करायचे, तेव्हा त्यांच्या श्रमाचे हे सामाजिक चरित्र, त्यांच्यातील संबंध, त्याला थेट आणि स्पष्टपणे दिसायचे. पण जेव्हा समाजात श्रम विभाजन होते आणि लोकांमधले श्रम केवळ देवाणघेवाणीद्वारे एकत्र येतात आणि आपल्या सामाजिक अस्तित्वाचा आणि चरित्राचा दावा करतात, तेव्हा मानवांमधील संबंध मालांमधील संबंधांच्या पृष्ठभागाखाली लपले जातात. हेच माल अंधभक्ती निर्माण होण्याचे मूळ आहे. परंतु आदिम कालखंडात जेव्हा दोन भिन्न मालांचे उत्पादक गरजांच्या योगायोगाच्या आधारे (म्हणजेच योगायोगाने पहिल्या मालाच्या उत्पादकाला दुसऱ्या उत्पादकाच्या मालाची गरज असते आणि दुसऱ्या मालाच्या उत्पादकाला पहिल्या उत्पादकाच्या मालाची गरज असते) देवाणघेवाण करत होते, तेव्हा श्रमाचे हे सामाजिक चरित्र आणि मानवाच्या नातेसंबंधांवर एक पातळ पडदा होता ज्याच्या मागे, थोडे विश्लेषण आणि प्रयत्नाअंती, अस्पष्टपणे त्या वास्तविक मानवी संबंधांना बघितले जाऊ शकत होते. पण जेव्हा मालांच्या थेट देवाणघेवाणी ऐवजी पैशाच्या माध्यमातून मालाची देवाण-घेवाण सुरू झाली, तेव्हा ही नाती हजारो पडद्यांच्या आड गेली आणि मालांच्या देवाणघेवाणीच्या प्रचंड गुंत्यात माणसांमधलं नातं पूर्णपणे अदृश्य झालं. आता जे दिसते, ते आहे चमकणाऱ्या पैशाची गूढ शक्ती ज्यापुढे प्रत्येकजण नतमस्तक होतो. या टप्प्यावर, माल-अंधभक्ती शिगेला पोहोचते, ज्याचे ठोस रूप आपल्याला दुकानांवर टांगलेल्या लिंबू-मिरचीपासून ते तिजोरीवर लिहिलेल्या ‘शुभ-लाभ’पर्यंत पाहायला मिळते.
परंतु हे पैशाचे रूप कसे विकसित झाले हे जर आपण ऐतिहासिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या समजून घेतले तर रहस्याचे हे वर्तुळ, पैशाची ही जादू तुटते. आता आपण हाच ऐतिहासिक विकास वैज्ञानिक रूपात समजून घेऊ.
मूल्याचे रूप अर्थात विनिमय–मूल्याच्या विकासाचे तार्किक टप्पे
सर्व प्रथम आपण हे समजून घेतले पाहिजे की मालामध्ये उपयोग-मूल्य आणि मूल्य यात एक अंतर्विरोध असतो. हा अंतर्विरोध वैयक्तिक श्रम आणि सामाजिक श्रम यांच्यातील अंतर्विरोध व्यक्त करतो. माल उत्पादक समाजात सर्व माल उत्पादक एकमेकांपासून स्वतंत्रपणे, एकमेकांपासून वेगवेगळे आणि एकमेकांबाबत अज्ञात आपआपल्या मालाचे उत्पादन करतात. त्यांच्या मालाला बाजारात किती मागणी आहे किंवा त्यांना खरेदीदार सापडतील की नाही हे त्यांना माहीत नसते. ते एका आकलनावर आणि अपेक्षेवर मालांचे उत्पादन करतात. जर त्यांचा माल विकला गेला, तर त्यांचे श्रम सामाजिकदृष्ट्या उपयुक्त श्रम म्हणून मान्यता प्राप्त करतात आणि उपयोग-मूल्य व मूल्य यांच्यातील अंतर्विरोध दूर होतो. परंतु त्यांच्या मालाला खरेदीदार न मिळाल्यास, त्यांच्या मालाला सामाजिकदृष्ट्या उपयुक्त श्रम मानले जात नाही आणि त्याचे मूल्यही वास्तवीकृत होत नाही आणि त्याला काही अर्थ उरत नाही. जर एखाद्या माल उत्पादकाच्या बाबतीत हे सतत घडत राहिले तर तो अन्य मालाचे उत्पादन करण्यास सुरवात करतो आणि अशा प्रकारे समाजात अस्तित्वात असलेले सामाजिक श्रम विभाजन बदलते. माल उत्पादक समाजात हे अराजक पद्धतीने घडते, त्यात अनिश्चितता असते. ही अनिश्चितता स्वतः माल अंधभक्तीला प्रोत्साहन देते. कित्येक दुकानदार किंवा भांडवलदार त्यांच्या मालाच्या साठ्यासमोर अगरबत्ती पेटवून पूजा करताना जर तुम्ही पाहिले असतील, तर विक्रीची अनिश्चितता मालावरील अंधभक्ती कशी वाढवते आणि वस्तूंना एक गूढ आभा कशी देते हे तुम्ही समजू शकता.
माल उत्पादक समाजात आणि भांडवली माल उत्पादनावर आधारित समाजामध्ये उत्पादन कोणत्याही सामाजिक योजनेवर आधारित नसते. एखादी वस्तू किंवा सेवा किती आवश्यक आहे आणि किती प्रमाणात सामूहिक श्रमातून योजनाबद्ध पद्धतीने ती तयार करायची आहे याचे कोणतेही मूल्यमापन केले जात नाही. त्यामुळे मालांची विक्री ही सहज-सोपी प्रक्रिया राहत नाही. हा स्वतः एक अंतर्विरोध सुटण्याचा प्रश्न आहे: उपयोग–मूल्य आणि मूल्य यांच्यातील अंतर्विरोध. या अंतर्विरोधाच्या विकासाच्या प्रक्रियेच्या एका विशिष्ट टप्प्यावर पैशाचे रूप निर्माण होते, पैसा अस्तित्वात येतो. या अंतर्विरोधाच्या तार्किक टप्प्यांचे शास्त्रीय स्पष्टीकरण मांडून मार्क्स पैशाचे गूढ आवरण फाडून काढतात.
मार्क्स विनिमय मूल्याच्या चार प्रकारांबद्दल बोलतात: आकस्मिक–रूप, विस्तारित–रूप, सामान्य–रूप आणि पैसा–रूप. यावर काही तपशीलवार चर्चा करणे आवश्यक आहे.
आकस्मिक–रूप (accidental form) हे असे रूप आहे ज्यावर मार्क्स सर्वात जास्त वेळ देतात कारण या रूपामध्येच पैसा-रूपाचे बीज अस्तित्वात आहे आणि जर हे मूळ रूप योग्यरित्या समजून घेतले तर पैशाचे रहस्योदघाट्न करणे तुलनेने सोपे होते. केवळ या आकस्मिक-रूपातच आपण मूल्य आणि उपयोग-मूल्य यांच्यातील अंतर्विरोध स्पष्टपणे चिन्हांकित करू शकतो, जो शेवटी पैशाला जन्म देतो. मूल्य-रूपाचे (value form) वैशिष्ट्य हे आहे की दोन मालांच्या मूल्यांमध्ये फरक असूनही, एकमेकांच्या तुलनेत त्यांचे विनिमय मूल्य समान राहू शकते. उदाहरणार्थ, जर एखाद्या वेळी माल ‘क’ च्या उत्पादनासाठी 2 तासांचे अमूर्त मानवी श्रम लागत असेल आणि माल ‘ख’ च्या उत्पादनासाठी त्याच वेळी 4 तासांचे अमूर्त मानवी श्रम लागत असेल तर त्या वेळी एका माल ‘ख’ च्या बदल्यात दोन माल ‘क’ चा विनिमय होईल. जर एक वर्षानंतर दोन्ही मालांच्या उत्पादनात श्रमाची उत्पादकता समान दराने वाढली असेल आणि आता माल ‘क’च्या उत्पादनासाठी 1 तासाचे श्रम आवश्यक आहेत, तर माल ‘ख’च्या उत्पादनासाठी 2 तासाचे श्रम आवश्यक आहेत. त्यामुळे दोन्ही मालांचे आंतरिक मूल्य तर अर्धे झाले, परंतु त्यांचे एकमेकांच्या सापेक्ष विनिमय मूल्य समान राहिले, म्हणजे आताही एका माल ‘ख’च्या बदल्यात दोन माल ‘क’चा विनिमय होईल. अशाप्रकारे, मूल्य–रूपाचे हे वैशिष्ट्य आहे की मालांचे मूल्य समान राहूनही त्यांचे विनिमय मूल्य बदलू शकते किंवा त्यांचे मूल्य बदलल्यानंतरही त्यांचे विनिमय मूल्य समान राहू शकते.
आकस्मिक-रूपाचे वैशिष्ट्य काय आहे? येथे दोन मालांची देवाणघेवाण योगायोगाने होते, ज्यामध्ये माल ‘क’च्या एका विशिष्ट प्रमाणाचा विनिमय माल ‘ख’च्या एका विशिष्ट प्रमाणासोबत होतो. म्हणजे:
x माल क = y माल ख
म्हणजेच माल ‘क’च्या x प्रमाणाचा विनिमय माल ‘ख’च्या y प्रमाणासोबत होत आहे. हे योगायोगाच्या परस्पर गरजांच्या, म्हणजेच दोन्ही उत्पादकांच्या गरजांच्या योगायोगाच्या आधारे होणारी देवाणघेवाण आहे ज्याला अर्थशास्त्राच्या भाषेत गरजांचा योगायोग (coincidence of needs) म्हणतात. मार्क्स या वरवर साध्या दिसणाऱ्या समीकरणात अंतर्भूत असलेला अंतर्विरोध पकडतो आणि त्याकडे आपले लक्ष वेधतो, जो संपूर्ण भांडवली समाज आणि अर्थव्यवस्थेच्या मुळाशी आहे: मूल्य आणि उपयोग–मूल्य यांच्यातील अंतर्विरोध.
मार्क्स स्पष्ट करतात की येथे माल ‘क’ हे सापेक्ष मूल्य (relative value) आहे, जेव्हाकी माल ‘ख’ समतुल्य मूल्य (equivalent value) आहे. दुसऱ्या शब्दांत येथे माल ‘क’ त्याचे मूल्य माल ‘ख’च्या रूपात अभिव्यक्त करत आहे. माल ‘क’, म्हणजे ज्या मालाचे मूल्य या समीकरणात अभिव्यक्त करायचे आहे, म्हणजे जो माल सापेक्ष मूल्याची भूमिका बजावत आहे, त्याच्यासाठी माल ‘ख’ हे मूल्याचे मूर्त रूप आहे. आपले मूल्य अभिव्यक्त करण्यासाठी, माल ‘क’ला एका दुसऱ्या मालाची आवश्यकता आहे, जो योगायोगाने या प्रसंगात त्याला माल ‘ख’ च्या रूपात मिळतो आणि माल ‘क’ जणूकाही म्हणायला लागतो की “ख हेच तर मूल्य आहे!” म्हणजेच, माल ‘क’ला या प्रकरणात त्याचे मूल्य स्वतंत्रपणे अभिव्यक्त करण्यासाठी माल ‘ख’ची आवश्यकता आहे. म्हणून माल ‘क’ साठी माल ‘ख’ चे उपयोग-मूल्यच हे आहे की तो मूल्य अभिव्यक्त करतो. माल ‘क’ साठी माल ‘ख’ हेच मूल्याचे मोजमाप (measure of value) आहे. वास्तवात पैसा देखील माल ‘ख’ प्रमाणेच कार्य करतो, म्हणजेच मूल्य मोजण्याचे कार्य करतो, परंतु केवळ माल ‘क’ साठीच नाही तर सर्व मालांसाठी. जर आपण वरील समीकरण उलटे केले, तर माल ‘ख’ हे माल ‘क’ च्या उपयोग-मूल्यामध्ये त्याचे मूल्य व्यक्त करेल आणि माल ‘क’ हे त्याच्यासाठी समतुल्य मूल्य बनेल, म्हणजे जे त्याच्यासाठी मूल्याचे मोजमाप असेल, मूल्याच्या समतुल्य असेल. येथे आपण समीकरणाच्या ज्या बाजूला उभे असू, त्यानुसार सापेक्ष मूल्य आणि समतुल्य मूल्य बदलेल. जर आपण माल ‘क’ च्या दृष्टीकोनातून बघितले तर माल ‘ख’ हे समतुल्य मूल्य असेल, मूल्याचे माप असेल आणि जर आपण माल ‘ख’ च्या दृष्टीकोनातून पाहिले, ज्यामध्ये माल ‘ख’ च्या मूल्याला अभिव्यक्त करावे लागेल आणि माल ‘ख’ सापेक्ष मूल्य असेल, तर भूमिका बदलून जातील आणि आता माल ‘क’ समतुल्य मूल्याची म्हणजे मूल्याच्या समतूल्याची किंवा मूल्याच्या मोजमापाची भूमिका बजावेल.
जसे की आपण पाहू शकतो की आदिम काळात झालेल्या या योगायोगाच्या देवाणघेवाणीमध्येच पैशाच्या जन्माची बीजे दिसून येतात. माल ‘क’ च्या दृष्टीकोनातून, माल ‘ख’ हे दुसरे काही नाही तर पैशाची, म्हणजे मूल्याच्या रूपाची, म्हणजेच मूल्याच्या मापाची भूमिका बजावत आहे, कारण माल ‘क’ त्याचे मूल्य माल ‘ख’ च्या मूर्त रूपातच अभिव्यक्त करत आहे आणि त्याच्यासाठी मूल्याचे मूर्त रूप दुसरे काही नसून माल ‘ख’आहे. माल ‘ख’ ची ही भूमिकाच पैसा बजावते, परंतु आकस्मिक-रूपाप्रमाणे कोण्या एका मालासाठी नाही, तर सर्व मालांसाठी. याचा अर्थ ते एक सार्वत्रिक समतुल्य (universal equivalent) आहे, मूल्याचे सार्वत्रिक रूप आहे. परंतु हीच बाब भांडवली अर्थतज्ञांच्या दृष्टीतून गायब होऊन जाते की जोपर्यंत सोन्याचे चमकणारे रूप किंवा गांधीजींचा फोटो असलेला हिरवा कागद आलेला नव्हता, तेव्हाही आपण माल ‘ख’ मध्ये पैशाचे बीज रूप बघू शकतो, कारण तो माल ‘क’ साठी तशीच भूमिका बजावत आहे जी पैसा सर्व मालांसाठी बजावते. जर माल ‘ख’ ला सापेक्ष मूल्य मानले, तर माल ‘क’ त्याच्यासाठी समतुल्य मूल्य किंवा पैशाचीच भूमिका बजावत असतो, म्हणजे माल ‘ख’ च्या मूल्याचे मोजमाप, त्याच्या मूल्याचे रूप, त्याच्या मूल्याचे समतुल्य.
परंतु मूल्याचे हे रूप पैशाच्या दैदिप्यमान करून टाकणाऱ्या रूपापर्यंत कसे पोहोचले हे समजून घेण्यासाठी आपल्याला उपयोग-मूल्य आणि मूल्य यांच्यातील अंतर्विरोधाच्या विकासाचा दुसरा तार्किक टप्पा पाहावा लागेल: म्हणजे विस्तारित–रूप (expanded form)
विस्तारित रूप काहीसे असे दिसते:
x माल ‘क’ = y माल ‘ख’
x माल ‘क’ = z माल ‘ग’
x माल ‘क’ = w माल ‘घ’
x माल ‘क’ = v माल ‘च’
म्हणजे, जेव्हा एकाच वस्तूच्या एका प्रमाणाचा विनिमय अनेक भिन्न मालांच्या निश्चित प्रमाणासोबत होऊ लागतो. जसजसे सामाजिक श्रम विभाजन विकसित होते, तसतसे अनेक मालांचे उत्पादन होऊ लागते व अधिकाधिक वस्तूंचे मालांमध्ये रूपांतर होत जाते. सर्वसाधारणपणे, सर्व संस्कृतींच्या इतिहासात असे आढळून आले आहे की त्या संस्कृतींमध्ये विविध वस्तूंच्या वेगवेगळ्या प्रमाणांमध्ये सामाजिक गरजा आणि उपलब्धतेनुसार, त्यांमधील एक किंवा काही वस्तूंना अधिक मागणी असते आणि विविध माल उत्पादक त्यासोबत त्यांच्या मालांचा विनिमय करू इच्छितात कारण त्या सर्वांना त्याची गरज असते. शेती आणि पशुसंवर्धनावर आधारित समाजांच्या इतिहासात अनेक वेळा ही भूमिका विविध पशु जसे की गाय किंवा शेळी (म्हणजे गुरे) आणि वेगवेगळ्या धान्यांनी बजावली. इथपर्यंत की काही समाजांमध्ये तंबाखू, कवडी इत्यादींनीही ही भूमिका बजावली. परिणामी, वेगवेगळ्या समाजांच्या इतिहासात एक किंवा काही वस्तू अधिक महत्त्वाच्या बनतात आणि त्या अधिक विनिमययोग्य असतात कारण जास्त लोकांना त्यांची आवश्यकता असते. वैदिक काळात आपल्या देशात गायी आणि काही धान्यांची अशीच परिस्थिती होती.
या विस्तारित–रूपामध्ये ही बाब पुढे येते की माल ‘ख’ मध्ये असे काही विशेष नव्हते की केवळ तेच मूल्याचे रूप, मूल्याचे मोजमाप आणि त्याच्या समतुल्याची भूमिका बजावू शकते आणि आकस्मिक–रूपात माल ‘क’च्या एका प्रमाणाचे माल ‘ख’ च्या एका निश्चित प्रमाणाशी विनिमय हा केवळ अपघाती होता ज्यामध्ये माल ‘क’ साठी माल ‘ख’ मूल्याच्या मापाच्या भूमिकेमध्ये होता आणि माल ‘ख’ हे माल ‘क’ साठी समतुल्य मूल्य होते. परंतु विस्तारित-रूपात आपल्याकडे माल ‘क’ बरोबर इतर अनेक मालांचे विनिमय समीकरण पुढे आहे आणि हे देखील स्पष्ट आहे की मूल्याचा स्वतःमध्ये ‘ख’ च्या उपयोग-मूल्याशी कोणताही नैसर्गिक किंवा अंतर्निहित संबंध नव्हता.
यानंतरचा टप्पा म्हणजे मूल्याच्या सामान्य–रूपाचा (General Form) टप्पा विस्तारित-रूपाच्या टप्प्यापेक्षा आणखी एका छोट्या पायरीसह पुढे येतो. यासाठी आपल्याला विस्तारित-मूल्य रूपालाच पालटायचे आहे. म्हणजे आता माल ‘क’ सापेक्ष मूल्याच्या भूमिकेत आणि माल ‘ख’, माल ‘ग’, माल ‘घ’, माल ‘च’ इत्यादी समतुल्य मूल्याच्या भूमिकेत नाहीत, ज्यामध्ये वेगवेगळ्या विनिमयांमध्ये माल ‘क’ त्याचे मूल्य अभिव्यक्त करत आहे, तर माल ‘ख’, माल ‘ग’, माल ‘घ’, माल ‘च’ इत्यादी सर्व सापेक्ष मूल्यांच्या भूमिकेत आहेत आणि हे सर्व माल त्यांचे मूल्य माल ‘क’ मध्ये अभिव्यक्त करत आहेत, जे आता इतर सर्व मालांसाठो समतुल्य मूल्य किंवा मूल्याचे माप किंवा मूल्याच्या रूपाची भूमिका बजावत आहे. आता समीकरणे अशी दिसतील:
y माल ‘ख’ = x माल ‘क’
z माल ‘ग’ = x माल ‘क’
w माल ‘घ’ = x माल ‘क’
v माल ‘च’ = x माल ‘क’
वरील रूपालाच आपण सामान्य–रूप म्हणतो. सामान्य यामुळे कारण यामध्ये सर्व माल त्यांचे मूल्य एका विशिष्ट मालामध्ये अभिव्यक्त करत आहेत. एक विशिष्ट माल सर्व मालांसाठी मूल्याचे रूप, मूल्याचे समतुल्य आणि मूल्याचे माप बनले आहे. हे एका बाजूला पहिल्या आकस्मिक किंवा तात्विक रूपाशी सुसंगत आहे कारण सर्व माल त्यांचे मूल्य कोणत्यातरी एका मालामध्ये अभिव्यक्त करत आहेत आणि हे सामान्य रूप देखील आहे कारण हा एक माल आहे जो सर्व मालांच्या मूल्यासाठी मूल्याचे मूर्त रूप बनला आहे. आता प्रत्येक मालाला त्याचे मूल्य अभिव्यक्त करण्यासाठी स्वतःचा समतुल्य शोधण्याची गरज नाही. म्हणजेच त्यांना प्रत्येक विनिमयाच्या वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या ठोस श्रमांचे अमूर्तीकरण करून त्यांचे मूल्य अभिव्यक्त करण्याची गरज नाही. जणू काही सर्व माल आता एकजूट होऊन, एकत्र येऊन कोण्या एका मालाला त्यांचे सार्वत्रिक समतुल्य मानतात, ज्यामध्ये ते सर्व त्यांचे मूल्य अभिव्यक्त करतात. उदाहरणार्थ, कॅलिफोर्निया, अमेरिकेत एकेकाळी तंबाखू ही भूमिका बजावत होता, चीनमध्ये कवड्या आणि वैदिक काळात भारतात गायी आणि काही धान्यांनी ही भूमिका बजावली होती कारण समाजातील बहुतेक लोकांना या विशिष्ट वस्तूंची गरज होती, त्यासाठी त्यांच्यामध्ये मागणी होती. त्यामुळे एका दीर्घ प्रक्रियेत काही माल असे सार्वत्रिक समतुल्याचे रूप ग्रहण करतात, ज्यासोबत सर्व उत्पादक त्यांच्या मालांची देवाणघेवाण करण्यास तयार असतात. यालाच मार्क्स सुंदर साहित्यिक परिभाषेत म्हणतात की जणू काही सर्व मालांनी एकत्र येऊन निर्णय घेतला की एखादा विशिष्ट माल हे मूल्याचे रूप आहे, सार्वत्रिक समतुल्य आहे आणि सर्व माल त्यात त्यांचे मूल्य अभिव्यक्त करतील आणि तेच त्यांच्यासाठी मूल्याचे मोजमाप असेल.
या सामान्य रूपाच्या जन्मानंतर पैसा–रूपाचा (Money-Form) जन्म हा देखील एक छोटा परंतु महत्त्वाचा ऐतिहासिक टप्पा होता. माल उत्पादकांनी आणि सर्वसाधारणपणे लोकांनी ऐतिहासिक अनुभवातून हे शिकले आहे की सार्वत्रिक समतुल्याची भूमिका बजावण्यासाठी एखाद्या मालामध्ये दोन गुणधर्म असणे आवश्यक आहे: पहिला, तो नाशवंत नसला पाहिजे आणि दुसरा, तो सगळीकडे समान रूपात आणि गुणवत्तेत उपलब्ध पाहिजे. उदाहरणार्थ, गाय किंवा बकरी किंवा धान्य नाशवंत असतात. कोणताही उत्पादक अशा सार्वत्रिक समतुल्याच्या रूपात स्वतःजवळ मूल्य किंवा समृद्धीचा दीर्घकालीन संचय करू शकत नाही आणि त्यांच्या टिकून राहण्याची कोणतीही हमी नसते कारण ते टिकाऊ नसतात आणि नाशवंत असतात. उदाहरणार्थ, जर एखाद्याने आपल्या मालाचा गाई किंवा बकरीसोबत विनिमय केला आणि बाजारातून परतत असताना त्याची गाय किंवा बकरी एखाद्या रोगामुळे मरण पावली किंवा पळून गेली, तर मालाच्या उत्पादकाचे नुकसान होईल आणि तो बरबाद होईल! त्याचप्रमाणे तंबाखूच्या अनेक प्रजाती आहेत, गायींच्याही अनेक प्रजाती आहेत. काही गायी जास्त प्रजनन करतात आणि चांगले दूध देतात आणि कमी श्रमाने त्यांचे उत्पादन केले जाऊ शकते आणि त्यांच्यापासून दुग्ध उत्पादन केले जाऊ शकते. अशा स्थितीत, दोन गायी किंवा दोन प्रकारच्या तंबाखूचा दर्जा आणि त्यांच्या उत्पादनासाठी लागणारे श्रम यांचे प्रमाणही वेगवेगळे असेल. म्हणूनच सुरुवातीच्या काळात जगातील विविध संस्कृतींनी अनेक वेगवेगळ्या धातूंची नाणी काढण्यास सुरुवात केली जी पैशाची भूमिका बजावू लागली. या संस्कृतींमध्ये राज्यसत्ता उदयास आलेली असल्याने संपूर्ण राज्यभर देवाणघेवाण सुलभ व्हावी म्हणून, अशा पैशांना राजमान्यताही मिळू लागली जेणेकरून ती सर्वांना स्वीकार्य होतील. शेवटी सर्वात कमी नाशवंत आणि सर्वाधिक एकसमान रूपात सापडणाऱ्या धातूचा शोध सोने आणि चांदीवर येऊन संपला आणि या दोन धातूंनी जवळपास सर्व सुसंस्कृत देशांमध्ये पैशाची अर्थात पैशाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली.
यासोबत सर्व मालांनी त्यांचे मूल्य सोन्यामध्ये तथा गौण रूपात चांदीमध्ये अभिव्यक्त करणे सुरु केले. समजा सोन्याच्या एका ठराविक प्रमाणाचे उत्पादन होण्यासाठी 10 तास लागतात आणि सोन्याच्या त्या प्रमाणाला आपण 1 शिलिंग किंवा 1 रुपयामध्ये अभिव्यक्त करत आहोत, तर कोणतीही वस्तू ज्याच्या एका नगाच्या उत्पादनासाठी 10 तासांचे अमूर्त मानवी श्रम लागतात, त्याचा विनिमय एक शिलिंग किंवा एक रुपयासोबत केला जाईल. इथे सोने हे पैसा आहे आणि मूल्याचे माप (measure of value) आहे आणि त्याचे परिमाण (denomination) जसे की शिलिंग, पौंड, आना, कवडी, पैसा, रुपया, फ्रँक, इ. नावे ही खरी तर किमतीची मानके आहेत (standard of price), जेणेकरून मालांच्या विविध लहान-मोठ्या प्रमाणांची देवाणघेवाण सहजतेने करता येईल. जेव्हा आपण मालाचे मूल्य पैशामध्ये अभिव्यक्त करतो तेव्हा त्यालाच किंमत किंवा दाम (price) म्हणतात. सुरुवातीस ही व्याख्या पुरेशी आहे. नंतर आपण पाहणार आहोत की वेगवेगळ्या मालांच्या बाबतीत अनेकदा त्यांचे मूल्य आणि त्यांची किंमत यामध्ये फरक असतो. परंतु आत्तासाठी आपण ही मूलभूत व्याख्या वापरून विश्लेषणाला पुढे नेऊ. म्हणजेच पैशांसोबत मालाचे मूल्य किंमत-रूप (price-form) धारण करते.
हे लक्षात ठेवले पाहिजे की मूल्याच्या रूपाच्या विकासाचे हे टप्पे तार्किक (logical) टप्पे आहेत, ते कालक्रमानुसार (chronological) नाहीत. म्हणजेच त्यांच्या इतिहासात घडण्याच्या प्रक्रिया एकमेकासोबत आच्छादित राहिल्या आहेत आणि जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मागे-पुढे राहिल्या आहेत.
(पुढील अंकात चालू)
(मूळ लेख: मजदूर बिगुल, फेब्रुवारी 2022; मराठी अनुवाद: जयवर्धन)