क्रांतिकारी कामगार शिक्षण मालिका – 6
मूल्याच्या श्रम सिद्धांताचा विकास: ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो आणि मार्क्स – 1

अभिनव

केवळ प्रत्येक भौतिक गोष्टीच्या विकासालाच नव्हे, तर प्रत्येक वैज्ञानिक सिद्धांताच्या विकासालासुद्धा आपण ऐतिहासिकदृष्ट्या समजून घेतले पाहिजे. कुठलाही क्रांतिकारी आणि वैज्ञानिक विचार आकाशातून टपकत नाही हे आपण कधीच विसरता कामा नये. एकाबाजूला तो सामाजिक व्यवहाराच्या मूलभूत स्वरूपांच्या आणि त्यांच्या अनुभवांच्या सारांशाच्या माध्यमातून विकसित होतो तर दुसरीकडे तो त्याच्या काळातील बौद्धिक विचारप्रवाहांशी टीकात्मक संबंध प्रस्थापित करूनच विकसित होऊ शकतो. मार्क्सनेसुद्धा त्याचे वैज्ञानिक आणि क्रांतिकारी राजकीय अर्थशास्त्र वैचारिक पोकळीत किंवा शून्यात विकसित केले नाही. एकीकडे त्यांनी त्यांच्या काळातील भांडवली अर्थव्यवस्थेच्या ठोस गतीचा सखोल अभ्यास केला, तर दुसरीकडे भांडवली राजकीय अर्थशास्त्रज्ञांनी त्यांच्या काळापर्यंतच्या भांडवली अर्थव्यवस्थेच्या गतिकीवर केलेल्या अभ्यासाचेही त्यांनी टीकात्मक विवेचन केले. या प्रक्रियेत त्यांनी विल्यम पेटी, जेरेमी बेन्थम, डेव्हिड ह्यूम, तसेच फिजीओक्रॅट धारेचे अर्थशास्त्रज्ञ क्वेस्ने, टर्गात इत्यादी आणि विशेषत: इंग्रजी राजकीय अर्थशास्त्राच्या शिखरांचा, म्हणजे ॲडम स्मिथ आणि डेव्हिड रिकार्डो यांच्या राजकीय अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास केला, त्यांच्यातील सकारात्मक योगदानांना ओळखून त्यांना योग्य दिशेने विकसित केले तसेच त्यांच्या उणिवा व चुकांची टीकाही प्रस्तुत केली. या ऐतिहासिक विकासाचा थोडक्यात आढावा घेतल्यास मार्क्सच्या राजकीय अर्थशास्त्राला नीट समजून घेता येईल आणि आपली मार्क्सवादी राजकीय अर्थशास्त्राची म्हणजेच सर्वहारा वर्गाच्या राजकीय अर्थशास्त्राची समजदारी अधिक स्पष्ट आणि उन्नत होईल.

आपण मागील प्रकरणामध्ये पाहिले की प्रत्येक मालाचे मूल्य हे कसे त्यासाठी लागलेल्या प्रत्यक्ष/जिवंत आणि अप्रत्यक्ष/मृत अमूर्त श्रमाच्या प्रमाणाने निर्धारित होते, जे स्वतः सामाजिकदृष्ट्या आवश्यक श्रमकाळानुसार मोजले जाते. आपण हे समजले की प्रत्येक मालाला उपयोग मूल्य आणि विनिमय मूल्य असते. आपण हे देखील पाहिले की विनिमय मूल्य दुसरे काही नसून दोन मालांच्या मूल्यांचे गुणोत्तर असते आणि मालाचे मूल्य हे इतर काही नसून सामाजिकदृष्ट्या आवश्यक अमूर्त श्रम असते.

पण आज भांडवली अर्थशास्त्राच्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सांगितले जाते की मालांचे मूल्य आणि त्यांच्या किमती मागणी आणि पुरवठ्यावरून ठरतात आणि भांडवलदाराला नफासुद्धा माल स्वस्तात खरेदी करून आणि महागात विकून, अर्थात बाजार किमतींच्या माध्यमातूनच मिळतो. परंतु जर किंमत मागणी आणि पुरवठा यावरून ठरत असेल तर मागणी आणि पुरवठा संपूर्णपणे संतुलित असताना किंमत शून्य असली पाहिजे! स्पष्ट आहे की मागणी आणि पुरवठा मालांच्या बाजारभावातील तात्कालिक चढउतार स्पष्ट करू शकतात, त्यांचे मूल्य नाही.

तसेही मालाची मागणी आणि पुरवठा स्वतःहून काहीच स्पष्ट करत नाहीत, उलट त्यांनाच स्पष्ट करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, एखाद्या मालाची प्रभावी मागणी एखाद्या विशिष्ट किमतीला प्रभावी मागणी असते; जर किंमत कमी झाली तर प्रभावी मागणी वाढते, याउलट किंमत वाढल्यास प्रभावी मागणी कमी होते. परिणामी, मागणीतील वाढ किंवा घट किमतींच्या चढउताराचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही कारण प्रत्येक प्रभावी मागणी ही कुठल्यातरी किमतीला प्रभावी मागणी असते. त्याचप्रमाणे पुरवठ्याची पातळी ही स्वतः एखाद्या मालाच्या उत्पादनाच्या पातळीद्वारे ठरते, जी स्वतः नफ्याच्या दराने ठरत असते. तीसुद्धा स्वतःहून किमती ठरवत नाही. जोपर्यंत मालाची किंमत ठरवण्यासाठी त्याच्या उत्पादनात लागलेल्या श्रमांचा विचार केला जात नाही तोपर्यंत ह्या सर्व समस्यांचे निराकरण होत नाही.

पण आज जर तुम्ही एखाद्या भांडवलदाराला किंवा भांडवली विचारसरणीचा प्रभाव असलेल्या कोणत्याही मध्यमवर्गीय बुद्धिजीवीला असे म्हणाल की प्रत्येक मालाचे मूल्य त्यात लागलेल्या मानवी श्रमांवरून ठरते, तर तो तुम्हाला ‘कम्युनिस्ट’, ‘मार्क्सवादी’ वगैरे शेरे मारेल आणि मालाचे मूल्य प्रत्यक्षात त्यामध्ये लागलेल्या श्रमांद्वारेच निर्धारित होते ह्या तुमच्या गोष्टीला कुठलाही तर्क न देता फेटाळण्याचा प्रयत्न करेल. तो मालाची किंमत आणि भांडवलदाराच्या नफ्याला त्याच्या हुशारीचा, व्यापार बुद्धीचा किंवा कौशल्याचा परिणाम म्हणून सांगेल, ज्याला वापरून भांडवलदार इतर भांडवलदारांची फसवणूक करून किंवा स्वत:च्या कुटीलपणाने नफा कमावतो! परंतु जर असे असेल तर संपूर्ण सामाजिक स्तरावर एकूण नफा (aggregate profit) असं काही राहणार नाही कारण एका भांडवलदाराचा नफा हा दुसऱ्या भांडवलदाराच्या तोट्यातून निर्माण होत आहे. ज्यांना हे समजत नाही ते समाजाच्या एकूण संपत्तीत होणाऱ्या नियमित वाढीचे स्पष्टीकरण देखील देऊ शकत नाही, कारण जर एका भांडवलदाराचा नफा हा दुसर्‍या भांडवलदाराचा तोटा असेल तर एकूण सामाजिक स्तरावर एकूण संपत्तीत वाढच होणार नाही.

त्याचप्रमाणे भांडवली विचारधारेच्या कचाट्यात सापडलेली व्यक्ती कामगाराच्या मजुरीबद्दल म्हणेल की ते त्याच्या कुशलतेवर किंवा अकुशलतेवर अवलंबून असते आणि त्याने केलेल्या श्रमाचा मोबदला त्याला मिळाला, त्याचे शोषण झाले नाही! त्याने तक्रार करण्याचे काही कारण नाही! भांडवलदार वर्ग, त्यांची व्यवस्था आणि त्यांची शिक्षण व्यवस्था प्रसारमाध्यमे सर्वसाधारणपणे जनतेला भांडवलदार वर्गाच्या नफ्याबद्दल आणि कामगार वर्गाच्या मजुरीबद्दल अशाच प्रकारच्या मूर्ख अवैज्ञानिक गोष्टी सांगत असतात आणि जर तुम्ही संपूर्ण उत्पादनाचे मूल्य म्हणून सामाजिक श्रमाबद्दल बोलले किंवा समाजाच्या समृद्धीचा स्रोत म्हणून मानवी श्रमाबद्दल बोलले तर ते तुमच्या गोष्टीला कुठलाही तर्क देतामार्क्सवादीकिंवाकम्युनिस्टम्हणून फेटाळण्याचा प्रयत्न करतात.

पण गमतीची गोष्ट ही की सर्व मालांचे मूल्य त्यात लागलेल्या एकूण मानवी श्रमांवरून ठरते असे सांगणारा मार्क्स हा पहिला माणूस नव्हता. ही बाब मार्क्सच्या आधी (कृषी उत्पादनाच्या बाबतीत) क्वेस्ने आणि टर्गोटसारख्या फिजिओक्रॅट धारेच्या अर्थशास्त्रज्ञांनी आणि नंतर सर्वसाधारणपणे एकूण उत्पादनाच्या बाबतीत ॲडम स्मिथ आणि डेव्हिड रिकार्डो यांनी म्हटली होती. स्मिथ आणि रिकार्डो यांनी हे तर्क आणि तथ्यांच्या आधारे सिद्धही केले होते, मात्र भांडवलदार वर्गाचा नफा कसा आणि कोठून निर्माण होतो हे ते स्पष्ट करू शकले नव्हते. त्यांना हे माहीत होते की प्रत्येक मालाच्या मूल्याचे दोन भाग असतात: पहिला, भूतकाळातील श्रमाने उत्पादित केलेला भाग, म्हणजेच अप्रत्यक्ष श्रमाने उत्पादित केलेला भाग जो कच्चा माल व यंत्रे इ. मध्ये लागलेल्या श्रमांच्या रूपात मालाच्या श्रम-मूल्यात भर घालतो; आणि दुसरा, प्रत्यक्ष श्रमाचा भाग जो कामगाराच्या श्रमाने तयार होतो. त्यांना हेसुद्धा माहीत होते की भांडवली माल उत्पादन सुरू झाल्यानंतर, प्रत्यक्ष श्रमाने तयार केलेले नवीन मूल्य मजुरी आणि नफा (आणि सोबतच खंड, कर आणि व्याज) यामध्ये विभागले जाते. त्यामुळे त्यांना हे स्पष्ट होते की कामगाराच्या श्रमातून निर्माण झालेले सर्व नवीन मूल्य त्याला मिळत नाही. पण ते याच्या विश्लेषणात जाऊन नफ्याचा मूळ स्रोत शोधू शकले नाहीत. ते फक्त एवढे सांगून थांबतात की प्रत्यक्ष किंवा जिवंत श्रमाने तयार केलेले नवीन मूल्य नफा आणि मजुरीत विभागले जाते. त्यामुळे असे भासते की खाजगी मालमत्तेचा म्हणजेच उत्पादनाच्या साधनांचा मालक असल्याने, भांडवलदार वर्ग एक प्रकारे नवीन मूल्याचा काही भाग नफा म्हणून घेण्याचा योग्य अधिकारी आहे. म्हणूनच मार्क्सने एकदा क्लासिकल राजकीय अर्थशास्त्रावर टीका करताना म्हटले होते की, त्याचे उद्दिष्ट खाजगी मालमत्तेची व्याख्या करणे म्हणजेच तिचे मूळ स्पष्ट करणे असायला हवा होते, परंतु त्याचे विश्लेषणच खाजगी मालमत्तेची वस्तुस्थिती स्वीकारून सुरू होते. परंतु याचा अर्थ असा होत नाही की स्मिथ आणि रिकार्डोच्या राजकीय अर्थशास्त्राचे काही वैज्ञानिक चरित्र आणि सकारात्मक भूमिका नव्हती.

विशेषतः, ॲडम स्मिथ आणि डेव्हिड रिकार्डो यांच्या अभिजात राजकीय अर्थशास्त्राची मार्क्सने प्रशंसा केली आणि म्हटले की भांडवलशाही आणि भांडवली राजकीय अर्थशास्त्राच्या या प्रगतीशील काळात मांडल्या गेलेल्या आर्थिक सिद्धांतांचे दोन पैलू आहेत: वैज्ञानिक किंवा गूह्य (esoteric) आणि विचारधारात्मक किंवा सामान्य-गैरसमज (exoteric). आपण त्याच्या वैज्ञानिक पैलूंचा स्वीकार करून त्याचा विकास केला पाहिजे आणि त्याच वेळी त्याच्या अवैज्ञानिक पैलूंचा त्याग केला पाहिजे. यालाच आपण तत्त्वज्ञानाच्या भाषेत ‘नकाराचा नकार’ या माध्यमातून विकास म्हणतो, ज्यामध्ये एखाद्या गोष्टीचे योग्य आणि वैज्ञानिक पैलू स्वीकारून त्यांना विकसित केले जाते, तर तिचे चुकीचे किंवा अवैज्ञानिक पैलू त्यागले जातात. कबीरांनी म्हटल्याप्रमाणे, ‘सार-सार का गहि रहे, थोथा देई उडाय’. मार्क्सने ॲडम स्मिथ आणि डेव्हिड रिकार्डोच्या मूल्याच्या श्रम सिद्धांताची वैज्ञानिक टीका प्रस्तुत केली, त्याचे सकारात्मक पैलू विकसित केले आणि याच प्रक्रियेत अतिरिक्त मूल्य आणि उद्योजकाचा नफा, जमीनमालकाचे भाडे, सावकाराचे व्याज आणि व्यापाऱ्याच्या वाणिज्यिक नफ्याच्या विविध रूपांमध्ये अतिरिक्त मूल्याचे वितरण स्पष्ट केले.

परंतु ॲडम स्मिथ आणि डेव्हिड रिकार्डो यांनी मूल्याचा श्रम सिद्धांत कसा विकसित केला, त्यांच्या सिद्धांताचे मूलभूत घटक काय होते आणि त्यांच्या कमतरता काय होत्या हे समजून घेतल्यास, मार्क्सने त्यांची काय टीका मांडली आणि कशा प्रकारे मूल्याच्या मार्क्सवादी श्रम सिद्धांताला विकसित करत अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत मांडला आणि भांडवलदार वर्गाच्या नफ्याचे घृणास्पद-क्षुद्र रहस्य उघड केले हे समजून घेणे आपल्याला सोपे होईल.

आधी आपण ॲडम स्मिथच्या श्रम सिद्धांतापासून सुरुवात करू.

ॲडम स्मिथ: अभिजात राजकीय अर्थशास्त्राचा पाया

ॲडम स्मिथच्या आर्थिक सिद्धांताचे दोन पैलू सर्वात महत्त्वाचे आहेत: पहिला हा की कोणत्याही देशाच्या/राष्ट्राच्या समृद्धीचा स्रोत हे त्या देशाचे/राष्ट्राचे श्रम असतात. दुसरा, कोणत्याही मालाचे सापेक्ष मूल्य किंवा विनिमय मूल्य त्यामध्ये लागलेल्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष श्रमाद्वारे निर्धारित होते.

ॲडम स्मिथ त्यांच्या विश्लेषणाची सुरुवात माल उत्पादनाच्या अशा काळापासून करतात ज्याला ते प्रारंभिक आदिम अवस्था’ (rude and early state) म्हणतात. या टप्प्यात स्मिथ असे गृहीत धरतात की सर्व उत्पादक स्वत: त्यांच्या उत्पादन साधनांचे मालक आहेत. म्हणजे सर्व माल उत्पादक स्वतः त्यांच्या श्रमाने आणि त्यांच्या उत्पादनाच्या साधनांनी उत्पादन करतात आणि मुक्त स्पर्धा असणाऱ्या बाजारात त्यांचा माल विकतात, म्हणजेच त्यांच्या मालाचा आपापसात विनिमय करतात. हे स्पष्ट आहे की वास्तवात ऐतिहासिकदृष्ट्या माल उत्पादनाचा असा कोणताही टप्पा नसणार आहे ज्यात प्रत्येक उत्पादक हा स्वतंत्र माल उत्पादक असेल, जो स्वतःच्या श्रमाने आणि उत्पादनाच्या साधनांनी काम करत असेल, आदर्श स्वरूपात मुक्त व्यापार व मुक्त स्पर्धेच्या परिस्थितीत बाजारात आपला माल विकत असेल आणि जमिनीची कोणतीही खाजगी मालकी किंवा उत्पादनाच्या साधनांवर कुठलीही खाजगी मक्तेदारी नसेल. निश्‍चितच, साधारण माल उत्पादनाच्या या युगातही असे व्यापारी, सावकार वगैरे असतील जे साधारण माल उत्पादकांकडून त्यांच्या मालाला त्या मालाच्या मूल्यापेक्षा कमी दराने विकत घेत असतील आणि त्या मालाच्या मूल्याएवढ्या किमतीला विकून नफा मिळवत असतील. या नफ्याला मार्क्सने विलगीकरणाद्वारे नफाकिंवा profit on alienation असे म्हटले. का? कारण माल उत्पादकाकडून त्याच्या मालाला, त्या मालाच्या किमतीपेक्षा कमी किमतीत विलग करून, म्हणजे घेऊन, आणि त्याच्या मूल्याएवढ्या किमतीला बाजारात विकून मिळवला जातो. अजून आपण अतिरिक्त मूल्याच्या श्रेणीबद्दल बोलू शकत नाही कारण उत्पादक स्वतः श्रमिक आहे तसेच उत्पादनाच्या साधनाचा मालकही आहे. तथापि, ॲडम स्मिथ या ‘प्रारंभिक आदिम अवस्थे’ची गोष्ट विश्लेषणात्मक पातळीवर करत आहेत आणि त्यांच्या मूल्याच्या सिद्धांताला स्पष्ट करण्यासाठी ते असे गृहीत धरत आहे की सर्व उत्पादक अशाच प्रकारचे साधारण माल उत्पादक आहेत आणि इतर कोणत्याही प्रकारचे विचलन (disturbance) जसे की व्यापारी, सावकार, जमीन मालक इत्यादींना ते सध्या ह्या चित्रात आणत नाहीयेत.

हीच विज्ञानाची पद्धतसुद्धा असते. कुठल्याही नियमाला त्याच्या शुद्ध स्वरूपात (law as such) समजून घेण्यासाठी विविध बाह्य प्रभावांना किंवा विचलनांना विश्लेषणाच्या पहिल्या टप्प्यावर नजरेआड करणे आवश्यक असते आणि तो नियम स्थापित केल्यानंतरच इतर घटक किंवा विचलनांचे त्याच्यावरील प्रभावाचे आकलन केले जाऊ शकते. जर असे केले नाही तर ना आपण त्या नियमाला समजू शकत आणि ना ही त्या घटकांना आणि विचलनांना समजू शकतो जे त्या नियमाच्या कार्यान्वयनाला प्रभावित करतात. उदाहरणार्थ, गुरुत्वाकर्षणाचा नियम स्थापित करण्याआधीच घर्षणाच्या प्रभावाची चर्चा केली जात नाही. गुरुत्वाकर्षणाचा नियम शुद्ध स्वरूपात प्रस्थापित झाल्यानंतरच त्यावरील घर्षणाच्या प्रभावाची चर्चा अर्थपूर्ण स्वरूपात होऊ शकते.

असो, स्मिथ म्हणतात की असे मानून चला की सर्व माल उत्पादक त्यांच्या स्वत:च्या श्रमाने आणि त्यांच्या उत्पादनाच्या साधनांनी उत्पादन करतात. अशात, मालांची सापेक्ष किंमत किंवा विनिमय मूल्य त्यांच्या उत्पादनात लागलेल्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष श्रमांद्वारे निर्धारित होईल. स्मिथ म्हणतात की प्रत्येक क्षेत्रात एका तासाच्या श्रमाद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नाचे संतुलन होत राहते. का? स्मिथ म्हणतात की समजा एखाद्या मालाच्या उत्पादनाच्या क्षेत्रात उत्पादकांना एका तासाच्या श्रमाच्या बदल्यात सरासरी रु. 15 आणि एका दुसऱ्या मालाच्या उत्पादनाच्या क्षेत्रात उत्पादकांना एका तासाच्या श्रमाच्या बदल्यात सरासरी रु. 13 उत्पन्न आहे. लक्षात घ्या की येथे आपण ‘मजुरी’ नव्हे तर श्रमाच्या प्रत्येक तासाला होत असलेल्या उत्पन्नाबद्दल बोलत आहोत कारण अजूनपर्यंत उत्पादनाच्या साधनांपासून वंचित कुठला कामगारवर्ग निर्माण झालेला नाही आणि उत्पादनाच्या साधनांवर मक्तेदारी असलेला भांडवलदार वर्गही निर्माण झालेला नाही. त्यामुळे स्मिथच्या या ‘प्रारंभिक अवस्थेत’ अद्याप भांडवल, मजुरी आणि नफा यावर बोलले जाऊ शकत नाही. मात्र इथे उत्पादन, विनिमय आणि स्पर्धा आहे. तथापि, जर दोन भिन्न मालांच्या उत्पादनाच्या क्षेत्रांमध्ये प्रति तास श्रमाच्या उत्पन्नामध्ये फरक असेल, तर आपल्या वरील उदाहरणात, दुसऱ्या मालाच्या उत्पादनाच्या क्षेत्रातून काही उत्पादक उत्पादनाच्या पहिल्या क्षेत्रात जातील कारण तेथे प्रति तास श्रमावर मिळणारे उत्पन्न जास्त आहे आणि परिणामी पहिल्या मालाच्या उत्पादनाच्या क्षेत्रात पुरवठा वाढेल आणि सापेक्ष किंमत कमी होईल. याउलट दुसऱ्या मालाच्या उत्पादनाच्या क्षेत्रातील काही श्रम पहिल्या मालाच्या उत्पादनाच्या क्षेत्रात गेल्यामुळे इथे पुरवठा कमी होईल आणि सापेक्ष किंमत वाढेल. याद्वारे दोन्ही क्षेत्रांत प्रति तास श्रमाच्या मोबदल्यात मिळणाऱ्या उत्पन्नात परिवर्तन येईल कारण हे उत्पन्न केवळ किमतींच्या माध्यमातूनच मिळते. उत्पादकांचे एका क्षेत्रातून दुसर्‍या क्षेत्रात जाण्याची ही प्रक्रिया तोपर्यंत चालेल जोपर्यंत दोन्ही क्षेत्रातील प्रति तास श्रमाचे उत्पन्न समान होत नाही.  ज्याला स्मिथ बाजाराचा ‘अदृश्य हात’ म्हणतो, ती बाजारातील स्पर्धा ही प्रक्रिया घडवत राहते.

त्यामुळे प्रति तास श्रमावर मिळणारे उत्पन्न सर्व क्षेत्रांमध्ये एक सतत चालणारी प्रवृत्ती म्हणून संतुलित होत राहील. साहजिकच, ही प्रक्रिया चढ-उताराची असेल आणि श्रमाच्या प्रत्येक तासावर मिळणाऱ्या सरासरी उत्पन्नाचे संतुलन एका प्रक्रियेच्या स्वरूपात निरंतर चालू राहील. परंतु हे संतुलन होईल हे मात्र नक्की, कारण हा बाजारातील स्पर्धेचा स्वाभाविक परिणाम असतो. आणि स्मिथच्या मते, मालाचे विनिमय मूल्य किंवा सापेक्ष मूल्य हे त्या मालाच्या उत्पादनात लागलेल्या श्रमावर मिळणाऱ्या उत्पन्नावरून ठरते. अ‍ॅडम स्मिथच्या मते, अशावेळी प्रत्येक मालाचे सापेक्ष मूल्य किंवा विनिमय मूल्य हे त्या मालाच्या उत्पादनात लागलेल्या अप्रत्यक्ष श्रम आणि प्रत्यक्ष श्रम यावरून ठरेल. स्मिथसाठी अप्रत्यक्ष श्रम म्हणजे ते श्रम जे उत्पादनात गुंतलेल्या उत्पादनाच्या साधनांच्या उत्पादनात आधीच खर्च झाले आहे, तर प्रत्यक्ष श्रम म्हणजे सध्या उत्पादनात कार्यरत असलेले मानवी श्रम. म्हणजेच, मार्क्स ज्याला मृत श्रम म्हणतात ते स्मिथसाठी अप्रत्यक्ष श्रम आहे तर मार्क्स ज्याला जिवंत श्रम म्हणतात ते स्मिथच्या व्याख्येनुसार प्रत्यक्ष श्रम आहे. तथापि, अशा प्रकारे स्मिथच्या मते प्रत्येक मालाचे मूल्य त्यामध्ये लागलेल्या एकूण श्रमाच्या (प्रत्यक्ष श्रम + अप्रत्यक्ष श्रम) एकूण प्रमाणाद्वारे निर्धारित होईल.

यासाठी स्मिथ एक उदाहरण देतो. तो म्हणतो कल्पना करा की आपण एका शिकार करणाऱ्या समाजाबद्दल बोलत आहोत. आपण शिकार करणाऱ्या दोन समूहांबद्दल बोलूयात. एक समूह सशाची शिकार करतो आणि दुसरा हरणांची शिकार करतो. सशाची शिकार करण्यासाठी जाळं लागतं. माल उत्पादकांचा तिसरा समूह जाळं बनवतो. त्याचप्रमाणे हरणाची शिकार करण्यासाठी धनुष्यबाण लागतो. माल उत्पादकांचा चौथा समूह धनुष्यबाण तयार करतो. जर जाळं तयार करण्यासाठी 4 तास आणि सशाची शिकार करण्यासाठी सरासरी 4 तास लागले, तर सशाची सापेक्ष किंमत त्यात लागलेल्या 8 तासांच्या श्रमांवरून निश्चित होईल. त्याचप्रमाणे, जर धनुष्यबाण बनवण्यासाठी 2 तास आणि हरणाची शिकार करण्यासाठी सरासरी 2 तास लागले आणि तर हरणाची सापेक्ष किंमत 4 तासांच्या श्रमाने ठरेल. परिणामी, एका सशाच्या बदल्यात दोन हरिणांचा विनिमय होईल. स्मिथ स्पष्ट करतात की विनिमयाचे ह्या नियमांतर्गत होणे ते नैतिक, न्याय्य किंवा योग्य असल्या कारणाने आवश्यक आहे असे नाही, तर ते यामुळे होईल कारण स्पर्धा किंवा बाजाराचाअदृश्य हात  हे घडवेल.

इथे एका मुद्द्याचा उल्लेख करून पुढे जाऊयात. स्मिथ नक्कीच श्रमाचे वर्णन समृद्धीचा स्रोत म्हणून करतात, परंतु सर्व श्रमाचा नाही. ते गैरउत्पादन श्रम (जो ‘अनुत्पादक श्रम’ यापेक्षा चांगला शब्द आहे) आणि उत्पादनात लागलेले श्रम किंवा उत्पादनश्रमामध्ये फरक करतो. स्मिथच्या मते उत्पादक श्रम किंवा ‘उत्पादन-श्रम’ ते श्रम आहे जे समाजात संपत्ती निर्माण करते, तर गैर-उत्पादन श्रम किंवा ‘अनुत्पादक श्रम’ ते श्रम आहे जे इतर सामाजिक प्रकार्ये पूर्ण करण्यासाठी त्या संपत्तीचा वापर करते, जी नक्कीच आवश्यक असू शकतात. अनुत्पादक श्रमिकांमध्ये ते राज्यसत्तेच्या संस्था चालवणाऱ्या व्यक्ती किंवा समूहांचा देखील समावेश करतात. उदाहरणार्थ, राजा आणि सैन्य हे स्मिथसाठी अनुत्पादक श्रमिकांच्या श्रेणीत येतात, मात्र स्मिथ लगेच हे स्पष्ट करतात की राजाला ‘अनुत्पादक श्रमिक’असे संबोधून ते राजाचा अपमान करत नसून केवळ एक वैज्ञानिक फरक स्पष्ट करत आहे जो अनुत्पादक श्रम आणि उत्पादक श्रम यात अस्तित्वात आहे! याचा अर्थ असा नाही की स्मिथसाठी राजा किंवा सैन्य निरुपयोगी आहे किंवा सामाजिकदृष्ट्या उपयुक्त नाही. स्मिथने उत्पादक आणि अनुत्पादक श्रमात केलेला फरक रिकार्डो आणि मार्क्सच्या लेखनातही वेगवेगळ्या स्वरूपात उपस्थित आहे, परंतु तो रिकार्डोमध्ये पुढे विकसित होतो आणि मार्क्सच्या लेखनात सर्वात पद्धतशीरपणे विकसित झाला आहे. उदाहरणार्थ, स्मिथमध्ये सर्व सेवांना अनुत्पादक श्रम मानणारी प्रवृत्ती दिसते, तर मार्क्ससाठी माल स्पर्श करता येणारी भौतिक वस्तू असणे किंवा एक उपयुक्त व उत्पादक सेवा असणे याला विशेष महत्त्व नाही. मार्क्स परिवहन सेवेलाही एक माल मानतो, जरी तो असा माल नाही ज्याला स्पर्श करता येऊ शकतो. हा माल एका उपयुक्त प्रभावाच्या स्वरूपात तयार होतो आणि उत्पादित होण्याच्या प्रक्रियेतच त्याचा उपभोगही होतो, जे इतर भौतिक मालांपासून त्याला वेगळे करते. त्यामुळे, उत्पादक आणि अनुत्पादक श्रम यांच्यात महत्त्वाचा फरक प्रस्थापित करूनही स्मिथला त्याचा वैज्ञानिकदृष्ट्या पूर्ण विकास करता आला नाही.

पुढे जाऊयात.

साधारण माल उत्पादनाच्या टप्प्यावर श्रमाद्वारे विनिमय मूल्य किंवा सापेक्ष किंमत ठरवण्याचा सिद्धांत स्थापित केल्यानंतर ॲडम स्मिथ थेट खाजगी मालमत्ता भांडवलाच्या श्रेणीला त्यांच्या विश्लेषणात जोडतात आणि माल उत्पादनाच्या त्यांच्या या ‘प्रारंभिक आदिम अवस्थेतून’ भांडवली माल उत्पादनाच्या विश्लेषणावर येतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की भांडवल आणि वेतनी-श्रम कशा प्रकारे उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाच्या साधनांपासून वेगळे केल्यामुळे निर्माण झाले, कशा प्रकारे या प्रक्रियेच्या मुळाशी हिंसा आणि बळजबरी होती या चर्चेत स्मिथ जात नाहीत किंवा भांडवलाचा आणि भांडवली खाजगी मालमत्तेचा उगम कोठे आहे याचा विचार स्मिथ करत नाहीत. ते थेट या नवीन टप्प्यात, म्हणजे भांडवली माल उत्पादनाच्या टप्प्यात, भांडवल आणि खाजगी मालमत्तेच्या प्रकारापासून सुरुवात करतात, जे भांडवलदारांचे नैसर्गिक अधिकार बनतात.

इथे ॲडम स्मिथ त्याचे संपूर्ण विश्लेषण तसेच ठेवून फक्त एक गोष्ट जोडतात. स्मिथच्या मते, काही पूर्वअटींची पूर्तता केली तर साधारण माल उत्पादनातून भांडवली माल उत्पादनापर्यंतच्या संक्रमणामध्ये स्वतःहून असे काहीही होत नाही जे मालाचे मूल्य एकूण श्रमाच्या प्रमाणाद्वारे ठरण्याच्या तत्त्वाला नाकारेल. या पूर्वअटी आपण नंतर पाहूयात. स्मिथ म्हणतात की प्रत्यक्ष श्रमाने तयार होणारे नवीन मूल्य आता मजुरी, नफा आणि भाडे यामध्ये विभागले जात आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की अशा प्रकारे स्मिथने हे मान्य केले आहे की आता प्रत्यक्ष उत्पादक अर्थात कामगाराच्या श्रमातून जे मूल्य तयार होत आहे, ते पूर्ण मूल्य त्याला मिळत नाहीये आणि त्याच्या श्रमातून तयार झालेल्या नवीन मूल्याचा एक भाग भांडवलदार आणि जमीनदार यांच्याद्वारे हडप केला जात आहे. म्हणूनच मार्क्स त्यांच्या ‘अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत’ नावाच्या पुस्तकाच्या पहिल्या भागात म्हणतात की ॲडम स्मिथने एक प्रकारे अतिरिक्त मूल्याचे अस्तित्व अप्रत्यक्षपणे मान्य केले आणि अशाप्रकारे कामगाराचे म्हणजेच प्रत्यक्ष उत्पादकाचे शोषणही मान्य केले. नक्कीच, स्मिथ तसे थेट म्हणत नाहीत. ते केवळ एवढंच म्हणतात की कामगाराच्या जिवंत/प्रत्यक्ष श्रमाने जे मूल्य निर्माण होते ते मजुरी, नफा आणि भाडे यामध्ये विभागले जाते कारण भांडवलदार हा दावा करतो की कारखाना आणि उत्पादनाची साधने त्याच्या मालकीची असल्यामुळे त्याला एक हिस्सा मिळायला हवा, तर जमीनमालक हा दावा करतो की ज्या जमिनीवर कारखाना सुरू आहे, ती जमीन त्याची असल्यामुळे त्याला त्याचा हिस्सा मिळायला हवा.

जमीनदार वर्गाचे प्रतिगामी चरित्र समजणे हे भांडवलशाहीच्या त्या प्रगतिशील काळात एखाद्या भांडवली राजकीय अर्थशास्त्रज्ञासाठीही सोपे होते, परंतु नवीन मूल्याच्या एका हिश्श्यावर भांडवलदाराचा दावा कशा प्रकारे कामगाराच्या शोषणावर आधारलेला आहे हे स्पष्ट करणे ॲडम स्मिथसारख्या प्रतिभाशाली आणि काही बाबतीत प्रगतीशील भांडवली राजकीय अर्थशास्त्रज्ञालाही शक्य नव्हते. महानातील महान विचारवंत किंवा शास्त्रज्ञ देखील त्यांच्या वर्गाने आणि इतिहासाने लादलेल्या मर्यादा निरपेक्षपणे ओलांडू शकत नाहीत. तथापि अ‍ॅडम स्मिथ नवीन मूल्य मजुरी, नफा आणि भाडे यामध्ये विभाजित होण्याबद्दल तर बोलतात, परंतु हे नवीन मूल्य मजुरी, नफा आणि भाडे यांच्यामध्ये कोणत्या प्रमाणात आणि कोणत्या नियमानुसार विभागले जाते हे स्पष्ट करण्यात ते अपयशी ठरतात. भांडवलदार किती प्रमाणात अतिरिक्त मूल्य हडप करतो, त्याचा किती हिस्सा तो जमीनमालकाला भाडे म्हणून देतो आणि मजुराला मजुरी म्हणून किती हिस्सा मिळतो आणि या हिश्श्यांचे प्रमाण कसे ठरते या प्रश्नांवर ॲडम स्मिथ पुढे जाऊ शकले नाहीत. म्हणूनच ते भांडवलदार वर्गाच्या नफ्याचा स्रोत आणि तो निर्माण होण्याच्या प्रक्रियेसंदर्भात खुलासा करू शकला नाहीत. त्याचे कारण म्हणजे श्रम आणि श्रमशक्ती यामध्ये त्यांनी फरक केला नाही. पण तरीही अ‍ॅडम स्मिथ यांनी मूल्याचा श्रम सिद्धांत मांडला आणि त्याच्या पुढील विकासाचा पायाही घातला.

अ‍ॅडम स्मिथने श्रम हे सर्व संपत्तीचा स्रोत असल्याचे सांगितले आणि म्हटले की समाजातील एकूण श्रम हा त्या समाजाच्या एकूण संपत्तीचा स्रोत आहे. ते दोन प्रकारे सर्व समृद्धीचा स्रोत आहे: प्रथम, त्याने उत्पादित केलेल्या मालाचा समाजाकडून थेट वापर होऊन आणि दुसरे, एका देशाच्या स्वतःच्या मालाचा दुसर्‍या देशाच्या मालाशी विनिमय करून. अ‍ॅडम स्मिथच्या या सिद्धांताला नंतर डेव्हिड रिकार्डो यांनी समस्त राजकीय अर्थशास्त्राचे सर्वात महत्त्वाचे मूलभूत तत्त्व म्हटले आणि ते योग्यच म्हटले. 1776 मध्ये जेव्हा अ‍ॅडम स्मिथचे ‘राष्ट्राच्या संपत्तीची चरित्र आणि स्रोत याबाबत एक अध्ययन’ हे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा ती एक मोठी वैज्ञानिक आणि क्रांतिकारी गोष्ट होती. दुसरी गोष्ट जी ॲडम स्मिथ म्हणता ती ही की मालाचा विनिमय त्यांच्यामध्ये लागलेल्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष श्रमांच्या एकूण प्रमाणाद्वारे ठरणाऱ्या सापेक्ष मूल्याच्या आधारावर होतो. याच सिद्धांताला ॲडम स्मिथचा मूल्याचा श्रम सिद्धांत म्हटले जाते.

नक्कीच ॲडम स्मिथना हे माहीत होते की श्रम एकटे हवेमध्ये समाजाची संपत्ती निर्माण करत नाही तर त्यासाठी निसर्गाकडून कच्च्या मालाची आवश्यकता असते. परंतु स्मिथ श्रमाला सर्व संपत्तीचा स्रोत म्हणतात कारण ते उत्पादन प्रक्रियेला एक श्रमप्रक्रिया म्हणून पाहतात आणि त्यांच्यासाठी श्रम हेच उत्पादन प्रक्रियेतील सक्रिय घटक होते. निसर्गातून येणारी सामग्री ही स्वतःहून जुळून काही उपयुक्त वस्तू बनत नाही. हे काम श्रमानेच होऊ शकते. म्हणजेच, उत्पादन प्रक्रियेत श्रम हेच सक्रिय घटक किंवा कारकाची भूमिका बजावते आणि म्हणूनच स्मिथसाठी मानवी श्रम हे सर्व संपत्तीचे स्रोत होते. इथपर्यंत की बहुतांश नैसर्गिक कच्च्या मालाला सुद्धा श्रम खर्च करूनच निसर्गातून काढावे लागते, तो स्वतःहून उत्पादनाला वापरण्यासाठी उपयुक्त स्वरूपात अस्तित्वात नसतो.

हे ॲडम स्मिथच्या सिद्धांतांमधील ते मूलभूत सिद्धांत आहेत ज्यांना मार्क्सने स्मिथच्या शिकवणीचे वैज्ञानिक पैलू म्हटले होते आणि ज्यांना पुढे रिकार्डो आणि नंतर संपूर्ण स्वरूपात मार्क्सने विकसित केले. याची तुलना आजच्या ओबडधोबड भांडवली अर्थशास्त्राशी म्हणजे नव-अभिजात (neoclassical) अर्थशास्त्राशी केली तर ॲडम स्मिथच्या या सिद्धांताची प्रगतीशीलता आपल्याला लगेच दिसून येईल. आजचे भांडवली अर्थशास्त्र मालांच्या मूल्याचे उत्पादन कशा पद्धतीने समजते? ते ‘उत्पादन प्रकार्या’चे (production function) एक सूत्र देते ज्यानुसार उत्पादन हे श्रम आणि भांडवल यांच्या सहकार्याने तयार होते. म्हणजे Y (Yield) = K (Capital) + L (Labour), किंवा ‘उत्पादन = भांडवल + श्रम’. यामध्ये श्रमाची सक्रिय भूमिका लपून जाते आणि उत्पादन हे श्रम-प्रक्रिया म्हणून पाहिले जात नाही, तर एक अशी प्रक्रिया म्हणून बघितले जाते ज्यामध्ये श्रम आणि भांडवल समान योगदान देतात आणि ज्यात श्रम हा काही एकमेव सक्रिय घटक किंवा कारक नाही. हे वास्तवात सर्व उत्पादनाचे स्रोत म्हणून श्रमाची भूमिका लपवण्यासाठी आणि भांडवलाचे मूळ लपवण्यासाठी उचललेले एक विचारधारात्मक पाऊल आहे. परंतु निओक्लासिकल अर्थशास्त्राच्या उलट, ॲडम स्मिथचा अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास नव्हता. श्रम हेच सर्व संपत्तीचे मूळ आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते. मार्क्सने नंतर याला अचूक करत सांगितले की सर्व संपत्तीचे दोन स्रोत आहेत: श्रम आणि निसर्ग आणि समस्त मूल्याचा केवळ एकच स्रोत आहे: श्रम. पण तरीही इथे ॲडम स्मिथच्या सिद्धांताचे वैज्ञानिक चरित्र स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते.

जसे की आपण पाहू शकतो, ॲडम स्मिथच्या सिद्धांताची एक समस्या म्हणजे भांडवली समाजात भांडवल, नफा आणि मजुरी या श्रेणींच्या उपस्थितीत श्रमांच्या प्रमाणाद्वारे मालाचे मूल्य ठरवणे. हा सिद्धांत साधारण माल उत्पादक समाजात (ज्याला स्मिथने ‘प्रारंभिक आदिम अवस्था’ म्हटले होते) अचूकपणे लागू केला जाऊ शकतो, परंतु एका भांडवली माल उत्पादक समाजासाठी तो लागू करण्यात अनेक क्लिष्टता होत्या. दुसर्‍या शब्दांत, ॲडम स्मिथचा मूल्याचा श्रम सिद्धांत एका अशा माल उत्पादक समाजातील मालांचे मूल्य किंवा सापेक्ष किमती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष श्रमाच्या प्रमाणाद्वारे ठरवू शकतो ज्यामध्ये माल उत्पादक स्वत: उत्पादनाच्या साधनांचे मालक आहेत, परंतु ज्यावेळी प्रत्यक्ष उत्पादकांना उत्पादनाच्या साधनांपासून वेगळे करून कामगार बनवले जाते आणि उत्पादनाच्या साधनांची मालकी भांडवलदार वर्गाच्या हातात येते, ज्यावेळी खाजगी मालमत्ता, भांडवल आणि मजुरी या श्रेणी तयार होतात, तेव्हा स्मिथचा श्रम सिद्धांत अनेक गोष्टींचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही: जसे की भांडवलदार आणि कामगार यांच्यातील असमान विनिमय, किंमत आणि मूल्य यांच्यात फरक तयार होणे, नफ्याचे स्त्रोत, .

त्याचे कारण हे होते की स्मिथ यांनी श्रम आणि श्रमशक्ती यात फरक केला नाही आणि त्यामुळेच ते अतिरिक्त मूल्याच्या सिद्धांतापर्यंतही पोहोचू शकले नाहीत. ॲडम स्मिथला वास्तविक उदाहरणांवरून कळले होते की बाजारातील किमती श्रमाने निर्धारित सापेक्ष किंमत अथवा विनिमय मूल्यापासून काही प्रमाणात भिन्न असतात किंवा त्या श्रम-मूल्यापासून विचलन करतात. ॲडम स्मिथ या विचलनाचे स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत आणि त्याला दूर करण्यासाठी ते स्थिरांक म्हणून दोन गोष्टी गृहीत धरतात. पहिली, ते असे गृहीत धरतात की प्रत्येक उद्योगात प्रत्यक्ष श्रमाने निर्माण केलेले नवीन मूल्य समान प्रमाणात मजुरी आणि नफ्याच्या स्वरूपात कामगार आणि भांडवलदार यांच्यात विभागले जाते; दुसरी, ते असे गृहीत धरतात की प्रत्येक उद्योगात भांडवल आणि श्रम यांचे गुणोत्तर, म्हणजेच उत्पादनाच्या साधनांवर होणारा खर्च आणि श्रम (शक्ती) यांच्यावरील खर्च यांच्यातील गुणोत्तर समान असेल. मार्क्सने याच गुणोत्तराला भांडवलाची जैविक संरचना (organic composition of capital) म्हटले होते. हे उत्पादनाच्या साधनांसाठी लागणारे भांडवल आणि श्रमशक्तीच्या खरेदीसाठी वापरले जाणारे भांडवल, म्हणजेच स्थिर भांडवल आणि परिवर्तनशील भांडवल यांचे गुणोत्तर आहे. या संकल्पनांची आपण पुढील प्रकरणांमध्ये तपशीलवार चर्चा करू.

हे नमूद करण्यासारखे आहे की अ‍ॅडम स्मिथ श्रमशक्तीच्या संकल्पनेपर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि हेच समजत राहिले की भांडवलदार आणि कामगार यांच्यात श्रम आणि मजुरी यांचा विनिमय होत आहे; इतर अनेक कारणांव्यतिरिक्त हे एक मुख्य कारण होते ज्यामुळे ते अतिरिक्त मूल्याच्या सिद्धांतापर्यंत देखील पोहोचू शकले नाहीत. श्रमशक्तीची संकल्पना न समजल्या कारणाने, स्मिथ भांडवलदार आणि कामगार यांच्यातील विनिमय स्पष्ट करू शकला नाही, कारण त्याच्या दृष्टिकोनानुसार ही देवाणघेवाण समतुल्यांच्या विनिमयाच्या नियमाचे खंडन करत आहे असे दिसत होते, ज्यानुसार श्रमाच्या समान प्रमाणाचा विनिमय होतो. सोबतच श्रम-मूल्य आणि सापेक्ष किंमत यातील फरक देखील ॲडम स्मिथना योग्यपणे स्पष्ट करता आला नाही आणि या विचलनाला नजरेआड करण्यासाठी त्यांना सर्वत्र नवीन मूल्याचे नफा आणि मजुरीमध्ये समान प्रमाणात विभाजन आणि प्रत्येक उद्योगात भांडवल-श्रम यांचे समान गुणोत्तर गृहीत धरावे लागले. परंतु प्रत्यक्षात तसे होत नसल्याने आणि ॲडम स्मिथला ही वस्तुस्थिती माहीत असल्याने, अखेरीस ते मूल्याच्या श्रम सिद्धांतापासूनच विचलित झाले आणि ‘मूल्याच्या उत्पादनखर्च सिद्धांता’पर्यंत (production-cost theory of value) पोहोचले. इथे ॲडम स्मिथच्या सिद्धांताचा वैज्ञानिक पैलू धूसर होतो आणि त्याचा विचारधारात्मक पैलू प्रबळ होतो.

ॲडम स्मिथ म्हणतात की जर सर्व भांडवलदारांना नवीन मूल्यातून समान प्रमाणात नफा मिळत असेल आणि सर्व उद्योगांमध्ये श्रम आणि भांडवल यांचे गुणोत्तर समान असेल तर त्यांचा मूल्याचा श्रम सिद्धांत लागू होतो, परंतु जर भांडवली व्यवस्थेत तसे होत नसेल, तर मग सापेक्ष किंमतीच्या उत्पादन-खर्च सिद्धांताकडे जावे लागते. स्मिथ म्हणूनच असेही म्हणतात की भांडवलशाहीमध्ये स्वतःहून असे काहीही नाही जे मूल्याच्या श्रम सिद्धांताला नाकारेल, परंतु त्यांच्या मते जर वरील दोन अटी पूर्ण होत नसतील तर श्रमसिद्धांत श्रम-मूल्यापासून सापेक्ष किमतीचे विचलन स्पष्ट करू शकत नाही आणि तिथे आपल्याला मूल्याच्या उत्पादन-खर्च सिद्धांताकडे जावे लागेल.

मूल्याचा हा उत्पादनखर्च सिद्धांत काय होता? यात स्मिथ नफ्याचा एक नैसर्गिक दर आणि मजुरीचा एक नैसर्गिक दर गृहीत धरतात. त्यानुसार ते उत्पादनाच्या साधनांवर झालेला खर्च आणि मजुरीवर झालेला खर्च याचे आकलन करून त्या एकूण खर्चाच्या आधारे नफ्याच्या नैसर्गिक दरानुसार नफा काढतात आणि त्याला उत्पादन खर्चात जोडतात. उत्पादन खर्च आणि नफ्याच्या नैसर्गिक दराद्वारे मिळणारा नफा यांची बेरीज ही मालाची सापेक्ष किंमत असते. पण यात अडचण अशी आहे की नफ्याचा आणि मजुरीचा नैसर्गिक दर कसा तयार होतो आणि त्यात श्रमाची उत्पादकता व श्रमाचे प्रमाण यांची काय भूमिका आहे हे स्मिथ स्पष्ट करत नाहीत. हा अवैज्ञानिक आणि अतार्किक सिद्धांतच पुढे जाऊन नंतर ओबडधोबड भांडवली अर्थशास्त्राने म्हणजे निओक्लासिकल अर्थशास्त्राने स्वीकारला, आणि स्मिथच्या शिकवणीतील वैज्ञानिक पैलू त्याने नाकारले. परिणामी, काही मूलभूत गोष्टी समजू शकल्याने वास्तविक भांडवली माल उत्पादनाची व्याख्या करण्यात स्मिथचा श्रम सिद्धांत अपयशी ठरतो.

थोडक्यात, स्मिथच्या सिद्धांताच्या या कमकुवतपणामागे अनेक अंतर्विरोध होते. आम्ही वर नमूद केल्याप्रमाणे, पहिला प्रमुख अंतर्विरोध हा होता की स्मिथला हे माहित होते की बाजारामध्ये नेहमी समतुल्य गोष्टींचीच देवाणघेवाण होते, परंतु भांडवली उत्पादनात भांडवलदार आणि कामगार यांच्यातील विनिमयामध्ये ते समतुल्यता बघू शकत नव्हते. 10 तासांच्या श्रमासाठी कोणीही 5 तासांच्या श्रमाचा विनिमय करणार नाही. स्मिथ हे देखील समजत होते की भांडवली माल उत्पादनात संपूर्ण नवीन मूल्य कामगारांच्या प्रत्यक्ष श्रमानेच निर्माण होत आहे; परंतु त्यातील एक भाग नफ्याच्या आणि दुसरा भाग भाड्याच्या स्वरूपात अनुक्रमे भांडवलदार आणि जमीनमालकाकडे जात आहे. अशा परिस्थितीत विनिमयाच्या समतूल्यतेचे मूलभूत तत्त्वच धोक्यात येते. स्मिथ हे समजण्यात अपयशी ठरतात की कामगार त्याची श्रमशक्ती, जी स्वतःच एक माल बनली आहे, भांडवलदाराला विकत आहे  आणि तिचे मूल्य देखील तिच्या उत्पादन आणि पुनरुत्पादनासाठी आवश्यक असलेले श्रम, म्हणजेच कामगार आणि त्याच्या कुटुंबाला जगण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू आणि सेवा यांच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या सामाजिक श्रमाद्वारे निर्धारित होते आणि कामगाराला मजुरीच्या स्वरूपात सामाजिकदृष्ट्या आणि सरासरी त्याच्या श्रमशक्तीची किंमतच प्राप्त होते. येथे समतुल्यांचाच विनिमय होत आहे: श्रमशक्ती आणि मजुरी. परंतु श्रमशक्ती उत्पादनात खर्च होण्याच्या प्रक्रियेत स्वत:च्या मूल्यापेक्षा अधिक मूल्य निर्माण करते, म्हणजेच स्वतःच्या मूल्याच्या बरोबरीचे मूल्य निर्माण केल्यानंतर ती भांडवलदारासाठी अतिरिक्त मूल्य निर्माण करते आणि हेच अतिरिक्त मूल्य भांडवलदार, जमीनदार आणि सावकार या सर्वांच्या उत्पन्नाचा स्रोत असते. ॲडम स्मिथ श्रमशक्तीच्या संकल्पनेपर्यंत पोहोचले नसले तरी त्यांना हे माहीत होते की मनुष्याची उत्पादकता अशा टप्प्यावर पोहोचलेली आहे की एक कामगार त्याच्या उपजीविकेसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या मूल्यापेक्षा अधिक मूल्य एका कार्यदिवसात निर्माण करतो, कारण त्याशिवाय समाजात ना सामाजिक अधिशेष निर्माण होऊ शकतो आणि ना वर्ग निर्माण होऊ शकतात. स्मिथना समाजातील वर्गांच्या अस्तित्वाची चांगली जाणीव होती आणि त्यांनी स्वतःच समाजातील तीन मुख्य वर्गांच्या (भांडवलदार, जमीनमालक आणि कामगार) अस्तित्वाबद्दल आणि त्यानुसार उत्पन्नाच्या तीन मुख्य प्रकारांच्या (नफा, भाडे, मजुरी) अस्तित्वाबद्दल स्पष्ट मांडणी केली होती. अशा परिस्थितीत, स्मिथचा मूल्याचा सिद्धांत भांडवली माल उत्पादनाच्या व्याख्येच्या बाबतीत अंतर्विरोधांमध्ये अडकण्याचीच अपेक्षा केली जाऊ शकते, कारण तो श्रमशक्तीची संकल्पना आणि भांडवली समाजात त्याचेसुद्धा मालामध्ये रूपांतर होण्याची संकल्पना समजू शकला नाही.

दुसरे म्हणजे, साधारण माल उत्पादनापासून भांडवली माल उत्पादनापर्यंत विकासाच्या प्रक्रियेत भांडवल आणि खाजगी मालमत्ता कोठून येते हे सुद्धा स्मिथ समजू शकले नाहीत. यासाठी ते एक संयम/कंजुषीचा (parsimony) सिद्धांत मांडतात, ज्यानुसार भांडवलदाराकडे संयम असतो ज्याला वापरून ते खर्च करण्याच्या प्रवृत्तीला दाबतात, संचय करतात आणि हाच त्यांच्या खाजगी संपत्तीचा आणि भांडवलाचा स्रोत असतो. स्मिथ हे समजत नाहीत की वेतनी-श्रम आणि भांडवल या दोन ध्रुवांच्या निर्मितीमागे आदिम संचयाची हिंसक प्रक्रिया होती ज्यामध्ये साधारण माल उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाच्या साधनांपासून बळजबरीने वंचित केले गेले आणि याचबरोबर एकीकडे कामगारांचा एक असा वर्ग तयार झाला ज्यांच्याकडे स्वतःच्या श्रमशक्तीशिवाय काहीही नव्हते, तर दुसरीकडे भांडवलदारांचा एक असा वर्ग निर्माण झाला ज्यांची उत्पादनाच्या साधनांवर मक्तेदारी होती. हे भांडवली समाजाचे ‘मूळ पाप’ होते ज्यातून भांडवली समाजाचा ध्रुवीय अंतर्विरोध, म्हणजेच श्रम आणि भांडवल यांच्यातील अंतर्विरोध अस्तित्वात आला. यासोबतच भांडवल-संबंध किंवा मजुरी-संबंध अस्तित्वात आले. त्याआधी सावकारी भांडवल किंवा व्यापारी भांडवल या स्वरूपात भांडवलाचे अस्तित्व होते जे माल उत्पादकांसोबत असमान विनिमय करून ‘विलगीकरणातून नफा’ प्राप्त करत होते ज्याबाबत आपण वर चर्चा केली आहे, परंतु ते स्वतः उत्पादन प्रक्रियेत श्रमाला आपल्या अधीन करून अतिरिक्त मूल्याचे उत्पादन करत नव्हते. हा काळ अजून भांडवली व्यवस्थेचा नव्हता आणि माल उत्पादकांशी असमान विनिमय अथवा ‘विलगीकरणाद्वारे नफा’ मिळवणाऱ्या सावकार आणि व्यापारी भांडवलाचे अस्तित्व गुलाम समाज आणि सरंजामी व्यवस्थेच्या काळापासूनच होते. त्यामुळे हे समजणे आवश्यक आहे की भांडवलाचा, म्हणजे संपत्तीचे असे प्रमाण जे गुंतवणूक केल्यावर वाढते, इतिहास भांडवलशाहीच्या इतिहासापेक्षा जुना आहे. सावकारी भांडवल आणि व्यापारी भांडवल उत्पादनाच्या श्रम प्रक्रियेला आपल्या अधीन न करता हे काम करायचे. परंतु भांडवलशाहीचा इतिहास हा आदिम संचय, वेतनी-श्रम आणि उद्यमी भांडवलाची निर्मिती, उत्पादनाच्या संपूर्ण प्रक्रियेला आणि श्रमाला भांडवलाद्वारे अधीन केले जाणे आणि भांडवलाद्वारे अतिरिक्त मूल्याचे उत्पादन आणि त्यानंतर अतिरिक्त मूल्याचे भांडवलामध्ये रूपांतर होणे यापासून सुरू होतो. उत्पादनाच्या साधनांवर भांडवलदार वर्गाची मक्तेदारी प्रस्थापित होत, श्रमशक्ती विकण्यास बाध्य असलेल्या कामगार वर्गाच्या निर्मिती सोबत, आणि भांडवल-संबंध व मजुरी-संबंध प्रस्थापित होण्यासोबत भांडवलाने श्रम-प्रक्रियेला आपल्या अधीन केले आणि अतिरिक्त मूल्याचे उत्पादन आणि अधिग्रहण आपल्या ताब्यात घेतले.

तिसरे, स्मिथ हे समजू शकत नव्हते की भांडवली अर्थव्यवस्थेत मालाचे श्रममूल्य आणि त्यांची किंमत यात फरक का असतो. हा फरक समजवू न शकल्यामुळे त्यांचा मूल्याचा श्रम सिद्धांतच धोक्यात येतो आणि तो वाचवण्यासाठी ते अशी दोन गृहीतके करतात जी की  भांडवली अर्थव्यवस्थेत सहसा शक्यच नाहीत. याचे कारण असे की स्मिथ मानतात की सर्वसाधारणपणे वेगवेगळ्या उद्योगांमध्ये भांडवल आणि श्रम यांचे प्रमाण वेगवेगळे असेल आणि त्यामुळे त्यांच्या नफ्याचे दर वेगवेगळे असतील. परंतु जर या परिस्थितीचा विचार केला तर स्मिथचा मूल्याचा श्रम सिद्धांतच धोक्यात येतो. रिकार्डो आणि नंतर योग्य वैज्ञानिक स्वरूपात मार्क्सने निदर्शनास आणून दिले की किमतींचे मूल्यांपासून विचलन होऊनही मूल्याचा श्रम सिद्धांत कायम राहतो. प्रत्यक्षात घडते हे की जर नफ्याचे दर वेगवेगळ्या उद्योगात वेगवेगळे असतील, तर कमी नफ्याचा दर असलेल्या उद्योग किंवा आर्थिक क्षेत्रांमधून भांडवल जास्त नफ्याचा दर असलेल्या आर्थिक क्षेत्रांमध्ये जाईल. त्यामुळे विविध उद्योगांमध्ये मागणी आणि पुरवठ्याचे समीकरण बदलेल. उच्च नफा दर असलेल्या आर्थिक क्षेत्रांमध्ये पुरवठा वाढेल, किमती कमी होतील आणि नफ्याचा दर देखील कमी होईल; परंतु मालांच्या मूल्यावर या घटकाचा स्वतःहून परिणाम होणार नाही. त्याचप्रमाणे ज्या क्षेत्रांमध्ये नफ्याचा दर कमी आहे तेथे पुरवठा तुलनेने कमी होईल, किमती वाढतील आणि नफ्याचा दर वाढेल. सर्व आर्थिक क्षेत्रांतील नफ्याच्या दरातील फरकामुळे होणाऱ्या भांडवलाच्या सतत प्रवाहामुळे नफ्याच्या दराचे सतत सरासरीकरण होत राहील. बाजारपेठेतील स्पर्धा याची हमी देत राहील. प्रत्येक भांडवल स्वतःसाठी सरासरी नफ्याची अपेक्षा करेल आणि नफ्याच्या दराच्या सरासरीकरणाच्या प्रवृत्तीमुळे, मालांचे मूल्य मालांच्या उत्पादनाच्या किमतींमध्ये (prices of production) बदलेल आणि त्यांच्यात फरक येईल. परंतु असे असूनही, संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या स्तरावरील एकूण मूल्य एकूण किमतींच्या बरोबरीचे असेल आणि हे विचलन मूल्याच्या श्रम सिद्धांताच्या अंतर्गतच होते. हे विचलन किंवा अपवाद नियम खोटा ठरवत नाही तर सिद्धच करतो. रिकार्डोने स्वतःच्या पद्धतीने हे अंशतः समजून घेतले आणि निदर्शनास आणून दिले की भांडवल, वेतनी श्रम, नफा असूनही मालांचे मूल्य त्यांच्यामध्ये लागलेल्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष श्रमांच्या प्रमाणाने निर्धारित होते आणि रिकार्डोने ते दाखवून देखील दिले, परंतु नंतर त्याला संपूर्ण स्वरूपात वैज्ञानिकरित्या मार्क्सने समजले. पुढील प्रकरणांमध्ये आपण याबद्दल तपशीलवार चर्चा करू.

ॲडम स्मिथ यांनी मूल्याचा श्रम सिद्धांत दिला परंतु त्यांच्या वैचारिक पूर्वग्रहांमुळे ते वैज्ञानिकदृष्ट्या त्याला पुढे विकसित करू शकले नाहीत. त्याची विचारधारा भांडवली विचारधारा होती. परंतु स्मिथ हे भांडवलशाहीच्या उदयाच्या काळातील राजकीय अर्थशास्त्रज्ञ होते. हा तो काळ होता जेव्हा भांडवलशाही सरंजामशाही आणि चर्चच्या बेड्यांविरुद्ध लढत होती, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठी लढत होती. त्या काळात ती ऐतिहासिकदृष्ट्या प्रगतीशील होती. कष्टकरी जनतेलाही सरंजामशाही आणि चर्च यांच्या विरुद्ध लोकशाही आणि स्वातंत्र्य हवे असल्याने, त्यांची उदयोन्मुख भांडवलदार वर्गासोबत आघाडी होती. भांडवलदार वर्ग हा या आघाडीत राजकीयदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सर्वात शक्तिशाली आणि परिपक्व होता. हा मॅन्युफॅक्चरिंगचा काळ होता, जेव्हा भांडवली उद्योगांचे यांत्रिकीकरण अद्याप पद्धतशीरपणे सुरू झाले नव्हते. औद्योगिक क्रांती अजून व्हायची होती. ॲडम स्मिथ मॅन्युफॅक्चरिंग युगातील भांडवलदार वर्गाच्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांचा असा विश्वास होता की माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती ही त्याच्या वैयक्तिक हितासाठी काम करण्याची आहे, विनिमय करण्याची प्रवृत्ती (म्हणजे खरेदी-विक्रीची प्रवृत्ती) त्याच्या स्वभावात आहे आणि याद्वारे तो नफा मिळविण्याचा प्रयत्न करतो. एका माल उत्पादकाच्या स्वरूपात मनुष्याच्या प्रवृत्तीला समजण्याऐवजी त्यांनी एका माल उत्पादकाच्या प्रवृत्तीलाच मनुष्याची प्रवृत्ती घोषित केले. याच भांडवली व्यक्तिवादी विचारधारेने त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीलाही बाधित केले. भांडवल आणि खाजगी मालमत्तेचे मूळ काय आहे, भांडवलदार वर्गाच्या नफ्याचा स्रोत काय आहे, कामगार आणि भांडवलदार यांच्यात कुठल्या गोष्टीचा विनिमय होतो हे त्यांना न समजू शकण्यामागे हेच कारण होते.

स्मिथ असे मानत की जर आपण उत्पादनाच्या सर्व कारकांना उर्ध्वगामी दिशेने (vertical break-up) तोडत पुढे गेलो तर आपण शेवटी श्रम आणि निसर्गावरच पोहोचू आणि त्यामुळे एकूण भांडवल गुंतवणुकीला शेवटी मजुरीच्या स्वरूपात व्यक्त केले जाऊ शकते. हे नक्कीच चुकीचे आहे कारण उत्पादनाला जर आपण त्याच्या मुळापर्यंत घेऊन गेलो तर नक्कीच आपल्याला श्रम आणि निसर्गातून मिळणाऱ्या गोष्टींशिवाय काहीही मिळणार नाही; परंतु त्यामुळे उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर उत्पादनाच्या साधनांची मालकी आणि नवीन मूल्यातील नफ्याला भांडवलदार वर्गाद्वारे हडप केले जाणे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. स्मिथ म्हणतात की भांडवलशाहीमध्ये भांडवल संचयाची प्रवृत्ती असते त्यामुळे भांडवलाची गुंतवणूक वाढते, श्रमशक्तीची मागणी वाढते, मजुरी वाढते. स्मिथ या आधारावर हा निष्कर्ष काढतात की भांडवलशाहीच्या विकासाचा फायदा कामगार वर्गाला होईल कारण त्यामुळे मजुरी वाढेल. पण यांत्रिकीकरणाचा काळ अजून सुरू झाला नसल्यामुळे स्मिथना हे समजत नाही की भांडवलदार जेव्हा वाढत्या भांडवली संचयाबरोबर गुंतवणूक वाढवतात तेव्हा त्यात यंत्र आणि तंत्रज्ञानावरील गुंतवणूक तुलनेने वाढत जाते आणि श्रमशक्तीवरील गुंतवणूक तुलनेने कमी होत जाते. परिणामी, भांडवल संचयामुळे श्रमशक्तीची मागणी नेहमीच वाढते असे नाही. बेरोजगारांच्या राखीव सैन्याला ती नेहमीच उत्पादित आणि पुनरुत्पादित करत राहते आणि निरपेक्षपणे सांगायचे तर हे राखीव सैन्य कमी होत नाही तर वाढत जाते, आणि कामगारांचे सक्रिय सैन्य म्हणजे रोजगारात कार्यरत कामगार लोकसंख्येशी त्याचे प्रमाण भांडवल संचयातील तेजी किंवा मंदीनुसार बदलत राहते. भांडवल संचयाच्या परिणामी शेवटी समाजाच्या एका टोकाला समृद्धी आणि दुसर्‍या टोकाला दारिद्र्य वाढत जाणे चालू राहते ना की मजुरीत अनिवार्यपणे वाढ होणे. भांडवलदार उत्पादकता वाढवून श्रमशक्तीचे मूल्य कमी करतो, नवीन उत्पादित मूल्यातील मजुरीचा वाटा सापेक्षरित्या कमी होतो (आणि मंदीच्या काळात निरपेक्षरित्या सुद्धा), तर नफ्याचा वाटा सापेक्षरित्या वाढतो. भांडवल संचयाच्या स्थितीत ही एक सामान्य प्रवृत्ती आहे. परंतु स्मिथ हे मॅन्युफॅक्चरिंग युगातील भांडवली राजकीय अर्थशास्त्रज्ञ होते, त्यामुळे ते विशेषतः यांत्रिकीकरणाच्या युगातील कारखाना प्रणालीचे हे वैशिष्ट्य ओळखू शकले नाही. मॅन्युफॅक्चरिंग युगात स्मिथच्या मते उत्पादकता वाढवण्याचा एकमेव स्रोत श्रम विभागणी होता. आणि स्मिथच्या मते ते स्वतःहून, सामान्यतः, श्रमशक्तीतील भांडवलाच्या गुंतवणुकीच्या हिश्श्याला उत्पादनाच्या साधनांमधील गुंतवणुकीच्या हिश्श्याच्या तुलनेत सापेक्षरित्या कमी करत नाही. म्हणूनच स्मिथ हे समजू शकले नाहीत की भांडवली उद्योगांचा विकास आणि भांडवल संचयासोबत कामगार वर्ग समृद्ध होत जात नाही तर तुलनेने दरिद्री होत जातो. हेच कारण आहे की स्मिथ भांडवली विकासाला कामगार वर्गासाठी चांगले मानतात, कारण ते हे समजू शकत नाहीत की भांडवलाचे जैविक संघटन वाढत जाणे ही भांडवलशाहीमध्ये भांडवलदार वर्गाची आपापसातील स्पर्धा आणि भांडवलदार वर्ग व कामगार वर्ग यांच्यातील संघर्षाची नैसर्गिक आणि अपरिहार्य सामान्य प्रवृत्ती आहे.

ही सामान्य प्रवृत्ती न समजू शकल्यामुळे, भांडवलशाहीमध्ये नफ्याचा सरासरी दर घसरण्याच्या सामान्य दीर्घकालीन प्रवृत्तीचे काय कारण आहे हे समजून घेण्यातही स्मिथ अपयशी ठरले. ते उत्पादनाच्या एका क्षेत्रात भांडवलाचा अतिप्रवाह आणि अतिउत्पादनाच्या स्तरावर या प्रवृत्तीची व्याख्या करू शकले; परंतु संपूर्ण भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील या सामान्य प्रवृत्तीचे स्पष्टीकरण ते देऊ शकले नाहीत, जरी भांडवलशाही अर्थव्यवस्थेत नफ्याचा सरासरी दर घसरण्याची दीर्घकालीन प्रवृत्ती असते हे त्यांना चांगले ठाऊक होते. त्यामुळे आवर्ती क्रमात येणारे भांडवली संकट, म्हणजे नफ्याच्या दराचे संकट आणि त्याच्या कारणांची एक वैज्ञानिक समजदेखील स्मिथ विकसित करू शकले नव्हते.

परंतु या सर्व उणिवा असूनही ॲडम स्मिथने मूल्याच्या श्रम सिद्धांताचा पाया घातला आणि हे त्यांचे महान योगदान होते ज्याला मार्क्सनेही ओळखले. समाजात उत्पादित होणाऱ्या प्रत्येक मालाचे विनिमय मूल्य किंवा सापेक्ष मूल्य हे त्यात लागलेल्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष श्रमातूनच तयार होते हे ओळखणारे ते पहिले व्यक्ती होते. या स्वरूपात त्यांनी भांडवली अर्थव्यवस्थेच्या गतिशीलतेची समज विकसित करण्यात निश्चितपणे मूलभूत योगदान दिले, भलेही ते कितीही अपूर्ण असो, आणि ही बाब मार्क्सने वेगवेगळ्या ठिकाणी अनेक वेळा निदर्शनास आणली आहे. याशिवाय स्मिथने उत्पादक आणि अनुत्पादक श्रम, नफ्याचा दर घसरण्याची प्रवृत्ती, जमीन-भाडे इत्यादींवरही बरेच लिखाण केले, ज्याचे स्वतःचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही पैलू आहेत. मार्क्सने त्यांचे टीकात्मक विवेचन केले आणि सकारात्मक गोष्टी विकसित करून नकारात्मक बाबी नाकारल्या. पण त्याच्या तपशिलात आपण आता इथे जाऊ शकत नाही. सध्या आपला रस ह्या गोष्टीत होता की ॲडम स्मिथचा श्रम सिद्धांत काय होता, त्याचे योगदान काय होते आणि त्याच्या मर्यादा काय होत्या.

डेव्हिड रिकार्डोने ॲडम स्मिथच्या मूल्याच्या श्रम सिद्धांतातील काही समस्या दूर केल्या, परंतु तो देखील मार्क्सप्रमाणे मूल्याचा श्रम सिद्धांत अर्थात मूल्याच्या नियमाला वैज्ञानिक परिपूर्णपणे विकसित करू शकला नाही आणि अतिरिक्त मूल्याच्या सिद्धांतापर्यंत पोहोचू शकला नाही. असे असूनही डेव्हिड रिकार्डोने वैज्ञानिक राजकीय अर्थशास्त्राला त्याच्या काळात उच्च स्तरावर आणले. म्हणूनच मार्क्सने रिकार्डोच्या सिद्धांतांना एकंदरीत भांडवली राजकीय अर्थशास्त्राचे शिखर म्हणून पाहिले, पण रिकार्डोचा मूल्याचा श्रम सिद्धांत, व्यापाराचा सिद्धांत आणि जमीन भाड्याचा सिद्धांत यावर मार्क्सने टीका सुद्धा केली, त्यांच्या उणिवा आणि चुका दूर केल्या. पुढील भागात डेव्हिड रिकार्डोने मूल्याचा श्रम सिद्धांत कसा विकसित केला ते आपण थोडक्यात पाहू.

(मूळ लेखमजदूर बिगुल, नोव्हेंबर 2022; मराठी अनुवादजयवर्धन)