उजव्या विचाराचे एन्फ्ल्युएंसर्स (प्रभावक): फॅशिस्ट विखारी प्रचाराची महामारी
✍ ललिता
हिटलरच्या नाझी जर्मनीतील मुख्य प्रचारक जोसेफ गोबेल्सपासून भारतातील सध्याच्या फॅशिस्ट भाजप सरकारांची गरज असते की, लोकांना धार्मिक, जातीय, वांशिक अशा अस्मितावादी विचारापासून दूर न जाऊ देण्यासाठी फॅशिस्ट प्रचाराला सतत तेवत ठेवावे, आणि कोणत्यातरी कथित “इतरां”पासून धोका आहे, ही जाणीव निर्माण करत रहावी. लोक फॅशिस्टांच्या गारुडाखाली रहावेत यासाठी, जनतेला, विशेषतः बेरोजगार, निराश तरुणांना जे कामगार वर्ग आणि निम्न मध्यमवर्गातून येतात, खोट्या शत्रूंविरुद्ध सतत रागात ठेवण्यासाठी प्रचारकांच्या फौजेची गरज आहे. खोटा शत्रू म्हणजे आज एखादा मुस्लिम, किंवा सरकारचा टीकाकार किंवा जो हिंदू अंधराष्ट्रवादी विचारांचा नाही. सतत द्वेषाचे वातावरण तयार करण्यासाठी आणि जनतेच्या आयुष्यातील सर्व समस्यांचे उत्तर देण्याचा आभास निर्माण करण्यासाठी फॅशिस्टांना एक मजबूत व्यक्तिमत्व असलेल्या आणि वरवर स्पष्टपणे पण खोटी मतं व्यक्त करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची आवश्यकता आहे. आज, उजव्या विचारसरणीच्या प्रभावकर्त्या (एन्फ्ल्युएंसर्स) लोकांचा उदय आणि त्यांच्या अनुयायांचे कडबोळे नेमके तेच करत आहे. हे प्रभावक दररोज व्हिडिओ, इन्फोग्राफिक्स, लेख, अध्यात्म, धर्म, “सनातन भारताचा अचूक भारतीय इतिहास”, जीवन, विश्व आणि प्रत्येक गोष्टीबद्दल पॉडकास्ट करतात जेणेकरुन जनतेला विषाचा दैनंदिन डोस दिला जाईल आणि मोदी राजवटीचे एक खोटे गुलाबी चित्र दाखवले जाईल. व्यापक गरिबी, बेरोजगारी आणि जनतेच्या दुःखाला कारणीभूत असलेल्या सध्याच्या भांडवलशाहीचे संकट आणि त्याचे फॅशिझममध्ये झालेले पतन याची जाणीव होण्यापासून रोखण्यासाठी हे प्रभावक जनतेला खोट्या मुद्द्यांमध्ये अडकवून ठेवतात.
जीवनशैलीचे प्रभावक, जे तरुणांना उजव्या विचारांकडे ढकलतात
भारतात 1.2 अब्ज पेक्षा जास्त इंटरनेट वापरकर्ते आहेत आणि तो चीननंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ऑनलाइन बाजारपेठ आहे. इंटरनेटवर अप्रतिबंधित प्रवेश आणि सामग्रीचा महापूर दररोज फोनवर भरभरून येत असल्याने, सोशल मीडिया प्रभावकांच्या वाढीसाठी ते एक सुपीक मैदान आहे. लोकांना काय खायचे, कसे कपडे घालायचे, कोणते संगीत किंवा चित्रपट वापरायचे हे शिकवणारे लाखो अनुयायी असलेले प्रभावक निरंतर अनुयायी गोळा करतात, आणि या देशातील असुरक्षित, दिशाहीन, परात्मभावी तरुणांचे आश्रयदाते बनतात. हे तरुणही स्वतःपेक्षा जास्त त्यांच्यावर विश्वास ठेवतात. पेड प्रमोशन, जाहिराती, बेटींगसहित विविध कंपन्यांच्या जाहिरातींसह, हे प्रभावक फक्त पैशासाठी सर्व प्रकारच्या उत्पादनांचा प्रचार करतात. अनेकांनी तर सरकारशी संगनमत करूनही मोठ्या प्रमाणात पैसे घेतले आहेत.
बीअर–बायसेप्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणवीर अल्लाबडिया सारख्या युट्युबरचे लाखो फॉलोअर्स आहेत आणि ते हिंदू धर्म, ज्योतिष, अलौकिक भूतबाधा वगैरे, आणि भूराजनीती सारख्या विविध विषयांवर, स्मृती इराणी सारख्या भाजप समर्थक व्यक्तीला त्यांच्या पॉडकास्टवर बोलावून, मोठ्या डोससह लघु स्वरूपातील प्रचारकी सामग्री तयार करतात. सुरुवातीला ही खाती “महिलांना प्रभावित करण्यासाठी”, तंदुरुस्त राहण्यासाठी, “सकारात्मक राहण्यासाठी” प्रेरक व्हिडिओ म्हणून सुरू झाली होती, परंतु नंतर त्यांना कळले की जातीय राजकारणाने मनं विषारी करणे अधिक फायदेशीर आहे. यूट्यूबवर 27 दशलक्ष सदस्यांसह संदीप माहेश्वरी प्रेरक व्हिडिओ बनवायचे परंतु आता आपल्या प्रेक्षकांना प्रभावित करण्यासाठी मोदींचे शब्द वापरतात. टेक्निकल गुरुजी प्रथम गॅजेट्स आणि तंत्रज्ञानाचा आढावा घेऊन उपभोगवादी संस्कृतीत चालना देत होते, परंतु आता केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासारख्या मंत्र्यांना त्यांच्या शोमध्ये आमंत्रित करून फॅशिस्ट राजवटीचे तळवे चाटण्याचा एक साइड बिझिनेस त्यांनी सुरू केला आहे. अभि आणि नियू या जोडप्याने सुरुवातीला मराठी आणि मुंबईस्थित मध्यमवर्गीयांसाठी शाश्वत विकास, प्रवास आणि इतिहास या विषयावर व्हिडिओ बनवले होते, पण त्यांना च लक्षात आले की सरकारचा प्रचार आणि बचाव करण्यात मोठा पैसा आहे आणि त्यांनी निवडणूक बॉंड घोटाळा आणि जातीयवादी कामगार-विरोधी सी.ए.ए.-एन.आर.सी. सारख्या घटनांमध्ये सरकारचा बचाव करण्यासाठी सरळ प्रचार केला. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर, दिल्ली येथे ‘राष्ट्रीय निर्माते पुरस्कार’ सोहळा आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये रणवीर/बीअर बायसेप्सला वर्षातील सर्वोत्कृष्ट विस्कळकाचा (डिसरप्टर) पुरस्कार देण्यात आला. सरकार आणि उजव्या विचारसरणीचा सामग्रीचा प्रचार करण्यात प्रभावक व्यक्तींनी केलेल्या सेवेची पावती देण्यासाठी हे पुरस्कार देण्यात आले होते, हे अगदी स्पष्टपणे दिसून येते.
सोशल मीडियावर कर्ली टेल्स या नावाने प्रसिद्ध असलेल्या कामिया जानीला, जिला इव्हेंटमध्ये सर्वोत्कृष्ट ट्रॅव्हल क्रिएटर गटात पुरस्कार मिळाला होता, तिला अलीकडच्या काळात तिची मांडणी बदलल्याबद्दल टीकेचा सामना करावा लागला. उजव्या विचारांचा युट्युबर एल्विश यादव, ज्याला मार्चमध्ये रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष विकल्याबद्दल अटक करण्यात आली होती, तो मोदी सरकारच्या टीकाकारांना खोटे ठरवणारे द्वेषाने भरलेले व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी ओळखले जातो. सरकारी नोकरीसाठी धडपडणाऱ्या उमेदवारांचे अनेक आवडते सामान्यज्ञान चॅनेल सरळ सरळ फॅशिस्ट प्रचारयंत्रणा आहेत आहेत. प्लॅकार्ड गाय रोहन पंड्या, स्किन डॉक्टर, सनातनी डॉक्टर यांसारखी खाती, महिलांविरुद्धच्या गुन्ह्यामध्ये धार्मिक बाजू निर्माण करण्यासाठी, मुस्लिमांची विधाने शोधत त्याविरोधात धर्मवादी प्रचार करण्यासाठी किंवा लव्ह जिहादच्या खोट्या केसेस समोर आणण्यासाठी, आणि ट्विटरवर अपराध्यांना पकडण्यासाठी ट्विट्-स्टॉर्म चालवण्यासाठी किंवा धार्मिक बाजू असू शकणाऱ्या बातम्यांचा मागोवा घेणारी, देखरेख करणारी खाती चालवतात. अशा जातीय पोस्ट ते तणाव थांबवण्याच्या उद्देशाने नव्हे तर त्याला वाढवण्याच्या आणि समाजात अधिक द्वेष पसरवण्याच्या हेतूने करतात! काही निर्माते अगदी उघडपणे दररोज मुस्लिमांविरुद्ध हिंसाचाराचे आवाहन करतात. त्यांच्या दैनंदिन पोस्टमध्ये हिंदूंना कसे लक्ष्य केले जाते, अपमानित केले जाते, त्यांच्यावर हल्ले केले जातात आणि म्हणून आपण जिहादी-इस्लामवादी अशा मुस्लिमांपासून सावध राहिले पाहिजे असे मांडले जाते, परंतु त्याच्या परिणाम मात्र सर्व मुस्लिमाविरोधात द्वेष निर्माण होण्याचा असतो; नरसंहाराच्या नाऱ्याने भरलेल्या हजारो टिपण्या त्यावर येतात. काही अधिक लोकप्रिय कट्टरपंथी प्रादेशिक खाती आहेत जी दररोज मुस्लीमांवर आणि सरकारच्या टीकाकारांवर हिंसाचारासाठी तुतारी फुंकण्याचे काम करतात.
अशा व्हिडिओ आणि सामग्रीला भारतातील त्या इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये मोठा आधार मिळाला आहे जे प्रादेशिक भाषा बोलतात. हे प्रभावक, जे स्वत: प्रादेशित भाषेत बोलतात, ते साम्यवादाच्या दुष्कृत्यांबद्दल बोलतात, डावे विचारवंत, ध्रुव राठी, रवीश कुमार किंवा देशभक्त यांसारख्या जास्त फॉलोअर असलेल्या उदारमतवादी विचाराच्या सर्व समीक्षकांना असे प्रस्तुत करतात की ते भारतीयांचा ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न करणारे डावे आहेत. त्याचा थोडक्यात हा प्रयत्न आहे की सर्व संघ-भाजप विरोधी लोक चुकीचे आहेत.
काही हिंदी यूट्यूब चॅनेल इतके लोकप्रिय आहेत की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजय सिंग बिश्त यांच्यासारखे नेते केवळ या उघडपणे उजव्या विचारसरणीच्या अतिरेकी यूट्यूबर्सनाच मुलाखती देतात आणि त्यानंतर इतर वृत्तवाहिन्या या मुलाखतींना प्रसिद्धी देतात. हे चॅनेल्स अनेकदा असे थोडेसेच संपादित केलेले व्हिडीओ बनवतात ज्यात रस्त्याच्या कडेला आणि बाजारपेठेत नियमितपणे तरुणांना विविध राजकीय समस्यांबद्दल त्यांची मते विचारली जातात. यांचे व्हिडिओ लोकप्रिय करण्याची एक ठरलेले सूत्र आहे: व्हाटअबाउटरी (याच मुद्यावर का बोलता, त्यावर का बोलत नाही),शिविगाळ, इस्लामविरोध भरलेले व्हिडिओ, ज्यात मुस्लिमांविरोधात किंवा एखाद्या विरोधी नेत्याविरोधात द्वेषयुक्त भाषण आणि व्हिडिओवर एखादे भडकावणारे “आकर्षक” थंबनेल (लघुचित्र) असेल जे क्लिक करण्यासाठी आकर्षित करेल. आश्चर्याची गोष्ट नाही की, डिसेंबर 2023 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येचा “विकास” आणि राम मंदिराच्या बांधकामाची जाहीरात करण्यासाठी प्रभावकांसाठी 25 लाख रुपयाची तरतूद केली. भाजपशी संलग्न असलेल्या एका नेत्याच्या दिलेल्या प्रोत्साहनातून ऑल इंडिया इन्फ्लुएंसर्स असोसिएशनच्या पुढाकाराने, सुमारे 500 प्रभावकांनी जानेवारीच्या मध्यात रामेश्वरम ते अयोध्या असा प्रवास केला. यातून दिसून येते की सरकार प्रभावकांना प्रचारक म्हणून किती महत्व देत आहे. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेशने अलीकडेच एक कायदा आणला आहे ज्याद्वारे सरकार कोणत्याही “देशविरोधी” कंटेंट निर्मात्यास जन्मठेपेची शिक्षा देऊ शकेल, म्हणजेच सर्व सरकार विरोधी निर्मात्यांना शिक्षा होईल.
एकीकडे उजव्या विचारसरणीच्या प्रभावक लोकांची चलती झाली आहे आणि दुसरीकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एक प्रसारण विधेयक प्रस्तावित केले आहे ज्याचे उद्दिष्ट सर्व कंटेंट निर्मात्यांना सरकारच्या नियंत्रणात आणणे आहे. हे विधेयक सध्या बारगळलेले असले तरी उद्या परत येऊ शकते. याद्वारे राजकारणावर चर्चा करणाऱ्या प्रभावकांना वृत्तनिवेदक म्हणून संबोधले जाईल. युट्युबर्स आणि इंस्टाग्रामर्स (आणि कदाचित टिकटॉकर्स) ज्यांचे चाहते एका ठराविक संख्येच्या वर आहेत, त्यांना विधेयक मंजूर झाल्यापासून एका महिन्याच्या आत भारत सरकारला स्वत:च्या अस्तित्वाची माहिती द्यावी लागेल. त्यांच्या सामग्रीला तज्ञांच्या पॅनेलची तपासणी पार करावी लागेल. सरकार किंवा संघाविरुद्ध असणारा कोणताही प्रचार दाबण्यासाठीच हे सर्व होत आहे. आपले मत मांडणे आणि सरकारला व एखाद्या मताला विरोध हा आपला लोकशाही अधिकार आहे, पण हा मर्यादित अधिकारही फॅशिस्ट भाजप-संघाने पूर्णपणे चिरडून टाकला आहे.
भांडवलशाहीने निर्माण केलेली पोकळी भरून काढण्यासाठी उजव्या विचारसरणीच्या प्रभावकांचे अनुसरण
भांडवलशाही व्यवस्थेत जगण्याच्या असुरक्षिततेमुळे निर्माण झालेल्या एकाकीपणाच्या शून्यतेवर मात करण्यासाठी दिवसभर मोबाईलवर स्क्रोल करणारे लोक त्यात येणारी निरर्थक सामग्री, खाद्यपदार्थ आणि मांजरीचे व्हिडिओ आणि प्रभावक व कंप्युटर द्वारे निर्मित द्वेषाने भरलेल्या उजव्या विचाराच्या सामग्रीला जवळ करतात. एकटेपणावर मात करण्यासाठी इंटरनेट हा एक आधार बनला आहे. प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा, सततची असुरक्षितता, शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळवण्याचा ताण, जीवनात काही अर्थपूर्ण नातेसंबंध बनत नसल्यामुळे या देशातील तरुणांना असा विचार भरवला जात आहे की भारताला एकेकाळी भरभराटीचा गौरवशाली भूतकाळ होता आणि सध्याच्या दुःखावर उपाय म्हणून त्याकडे परत जाणे आपली गरज आहे. गौरवशाली भूतकाळाकडे परतण्याच्या या आवाहनाने प्रभावित होऊन, ज्यांनी हे कथित वैभव हिंदुत्ववाद्यांच्या तथाकथित इतिहासात नष्ट केले त्या सर्वांविरुद्ध त्यांच्या मनात राग भरला जात आहे, म्हणजे कोण, तर आजचे मुस्लिम, ज्यांच्याबद्दल पसरवले जाते की ते मुघलांचे वंशज आहेत किंवा दलित, ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट आहेत, जे या एकांगी गौरवशाली भूतकाळाच्या कल्पनेला नाकारू पाहतात. इंटरनेट आणि द्वेषाने भरलेली प्रचारयंत्रणा आज या एकाकी आणि दिशाहीन तरुणांसाठी तो पाळणा आहे ज्यात बसून ते रोज सध्याच्या भांडवलशाही व्यवस्थेने प्रत्यक्षात निर्माण केलेल्या त्यांच्या आजारांना शांत करणारी उजव्या प्रभावकांची विखारी विचारांची शोकगाणी ऐकतात.
या भांडवलशाही व्यवस्थेच्या मर्यादा आणि तिची तथाकथित मर्यादित स्वातंत्र्ये आज समजली पाहिजेत, जसे की आपण शोषित होण्यास स्वतंत्र आहोत, आपले शोषण कुठे होईल ते निवडण्यास स्वतंत्र आहोत, 25 विविध प्रकारच्या टूथपेस्टमधून निवड करण्यास स्वतंत्र आहोत पण पोटात पुरेसे अन्न, पिण्याचे शुद्ध पाणी किंवा डोक्यावर छप्पर घेऊन सन्मानपूर्वक जीवन जगण्यास स्वतंत्र नाही.
स्त्रियांना प्रभावित कसे करायचे, स्त्रीवर कसा विजय मिळवायचा, मुक्त झालेल्या स्त्रिया आणि एल.जी.बी.टी.क्यू. लोक आमचे शत्रू का आहेत याबद्दल सुद्धा या उजव्या विचारसरणीच्या प्रभावकांकडून प्रचार केला जातो. भांडवलशाही जी असुरक्षितता पुरुषांसाठी सुद्धा निर्माण करते, ती अशी जमीन तयार करते जिच्यावर महिलाच्या दुय्यमत्त्वासहित जुन्या समाजरचनेतील सर्व तथाकथित “सुरक्षितता” टिकवाव्याशा वाटतात, ज्याचा वापर करून हे प्रभावक स्त्री-विरोधी, पितृसत्तावादी प्रचार करून पैसे कमावत आहेत.
आरक्षणाचा लाभ घेणारा दलित, ‘घर आणि चूली’च्या बंधनातून मुक्त झालेली स्त्री, रोहिंग्या किंवा बांगलादेशी म्हणत ज्यांचा अपमानास्पद उल्लेख केला जातो असे मुस्लिम, “बाहेरचे” जे लोकसंख्या वाढीस कारणीभूत आहेत, उदारमतवादी बातम्या देणारे ल्युटेन्स मीडिया किंवा खान मार्केट गँग, किवा कामगारांना संघटित करणारे वा खोटी आशा निर्माण करणाऱ्या भांडवली व्यवस्थेलाच आव्हान देणारे कम्युनिस्ट, हे शत्रू आहेत असे भासवण्याचे काम हे प्रभावक करतात.
जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवायचे असेल तर अशा प्रभावक लोकांना आपल्या फायद्यासाठी वापरण्याचीही गरज आहे, हे सरकारच्या त्वरीत लक्षात आले. 2020 च्या मध्यात भाजपचे मंत्री प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी, मुख्तार अब्बास नक्वी आणि रविशंकर प्रसाद यांच्या मंत्र्यांच्या गटाने एक अहवाल प्रकाशित केला ज्यामध्ये कथित “प्रतिमा संकटाचा” सामना करण्यासाठी अनेक शिफारसी केल्या होत्या. इराणी यांनी केलेल्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर किंवा एम.आय.बी.ला “50 नकारात्मक प्रभावकांचे सतत ट्रॅकिंग” करण्याची जबाबदारी सोपवली गेली आहे. “ॲक्शन पॉइंट्स” या शीर्षकाच्या एका विभागाखाली अहवालात नमूद केले आहे की “काही नकारात्मक प्रभावक खोटे वर्णन देतात आणि सरकारला बदनाम करतात. त्यांचा सतत मागोवा घेणे आवश्यक आहे जेणेकरून योग्य आणि वेळेवर प्रतिसाद दिला जाऊ शकेल.” त्या अनुषंगाने, कृती बिंदूंमध्ये “50 सकारात्मक प्रभावकांसह नियमित काम करणे” आणि ” जे सरकारचे समर्थन करतात किंवा तटस्थ असतात अशा…पत्रकारांशी संलग्नता” यांचा समावेश होतो. अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की असे पत्रकार “केवळ सकारात्मक गोष्टीच सांगत नाहीत तर सरकारबद्दलच्या खोट्या कथनांचाही प्रतिकार करतात.” यातून दिसून येते की भाजपने किती गांभीर्याने प्रभावकांना वापरून प्रतिमा निर्मिती चालवली आहे.
लक्षणांवर उपचार करण्याऐवजी भांडवलशाहीच्या मूळ समस्येचे निराकरण गरजेचे
सरकारच्या या सशुल्क ट्रोल्सचे भरकटवण्याचे काम चालवले आहे, ते आपण एकजूट होऊ नये आणि आपल्या हक्कांसाठी लढू नये आणि आपण राजकीयदृष्ट्या अजाण रहावे यासाठीच. हे उजव्या विचारसरणीचे प्रभावक उदारमतवाद्यांना आणि डाव्यांना (जे अजिबात एक नाहीत) “सिक्युलर” म्हणतात, जो धर्मनिरपेक्षतेसाठी एक अपशब्द आहे. धर्मनिरपेक्षतेची खरी व्याख्या सत्ता आणि धर्म वेगळे करणे ही आहे, परंतु या ट्रोल्सकडून तर जो कोणी धर्माच्या राजकारणावर सौम्यही टीका करतो त्याला सिक्युलर असे संबोधले जाते. धार्मिक श्रद्धा पाळण्याचा आणि आपापल्या निवडीच्या श्रद्धेचे पालन करण्याच्या प्रत्येकाच्या लोकशाही अधिकाराचे आपण दृढतेने समर्थन केले पाहिजे, परंतु धर्मनिरपेक्ष विचार हाच आहे की राजकारणात धर्माला स्थान नसले पाहिजे.
या उजव्या विचारसरणीच्या प्रभावकांवर बहिष्कार टाकणे आणि त्यांचे मिथकीय, निरर्थक आणि पूर्णपणे मूर्ख दावे तर्कसंगत, प्रगतीशील साहित्याच्या आधारे, तसेच इतिहास, वर्तमान आणि वर्तमान समस्यांच्या योग्य आकलनाच्या आणि न्याय्य, वैज्ञानिक मूल्यांच्या प्रचाराने खोडून काढणे आपल्या हिताचे आहे. भगतसिंग त्यांच्या ‘जातीय दंगली आणि त्यांचे उपाय’ या निबंधात स्पष्टपणे सांगतात की, असा धर्मवाद आणि धर्मवादी मीडिया यांच्याशी लढले पाहिजे:
“लोकांचे परस्परांशी होणारे झगडे थांबविण्यासाठी लोकांमध्ये वर्ग भावना रुजणे आवश्यक आहे. गरीब, कष्टकरी व शेतकरी यांना हे स्पष्टपणे समजावून सांगितले पाहिजे, की तुमचे खरे शत्रू भांडवलदार आहेत. म्हणून तुम्ही त्यांच्या हातचलाखीपासून स्वतःला शाबूत ठेवले पाहिजे. त्यांच्या तावडीत सापडून काहीही करता कामा नये. जगातील सर्व गोरगरिबांचे, मग ते कोणत्याही जातीचे, वर्णाचे, धर्माचे वा राष्ट्राचे असोत, अधिकार सारखे आहेत. धर्म, वर्ण, वंश आणि राष्ट्रियतेचे भेदभाव संपवून तुम्ही एकजूट व्हावे आणि सरकारची शक्ती आपल्या हाती घेण्यासाठी प्रयत्न करावेत, यातच तुमचे भले आहे. या प्रयत्नांमुळे तुमचे काही एक नुकसान होणार नाही. उलट एक ना एक दिवस तुमच्या बेड्या तुटून पडतील आणि तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळेल.”
आपल्या समाजाचा, येथील नियम-कायद्यांचा, कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यात आणि आपल्या खऱ्या प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या सामग्रीचा अभ्यास करण्याची ही वेळ आहे. आपले खरे प्रश्न म्हणजे वाढती बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, बेघरपणा, जाती-आणि धर्माच्या नावाखाली पाडली जाणारी फूट, महिलांविरुद्धचे वाढते गुन्हे. या सर्वांसाठी आपण चिकित्सकपणे विविध साहित्यकृती, डिजिटल सामग्री वाचणे आवश्यक आहे. जेव्हा आपल्या वास्तविक समस्या समजू तेव्हाच आपण फॅशिस्ट शक्तींनी निर्माण केलेल्या मृगजळातून आरपार पाहू शकतो आणि खरोखर एक चांगले जग तयार करू शकतो.
very informative…people should read this newspaper