8 मार्च 2025, आंतरराष्ट्रीय कामगार महिला दिनानिमित्त स्त्री मुक्ती लीग तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
स्त्री मुक्ती लीग
8 मार्च हा दिवस केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. अगदी लहानग्या मुलांना सुद्धा माहित असतं की 8 मार्च हा महिला दिवस आहे. पण आज या दिवसामागील खरी प्रेरणा आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी सामान्य जनतेपर्यंत पोहचवली जात नाही, आणि बाजारी व्यवस्थेद्वारे या दिवसाला सुद्धा एका मालाच्या रुपात सादर केलं जातं; ज्यात महिलांना एखादी भेट वस्तू देणे, कुठली तरी योजना आखणे, कुठल्यातरी प्रॉडक्टवर सवलत देणे या पर्यंत मर्यादित ठेवले जाते.
8 मार्चचा खरा कामगार वर्गीय संघर्षाचा इतिहास जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी आणि त्यासोबतच पुढच्या संघर्षांचा संकल्प घेण्यासाठी स्त्री मुक्ती लीग तर्फे 8 मार्च 2025 रोजी मुंबई आणि पुण्यात रॅलीचं आयोजन करण्यात आले. विविध कामगार वस्त्यांमधून रॅली मार्गक्रमण करत होती, आणि यावेळी “आठ तास काम, आठ तास आराम, आठ तास मनोरंजन” अशा 20व्या शतकातील घोषणांना उजाळा देण्यात आला, ज्या काळात लाखोंच्या संख्येने कामगार व न्यायप्रिय नागरिक आपल्या हक्क-अधिकारांसाठी रस्त्यावर उतरले होते आणि महिलांनी त्या चळवळीत पुढाकाराची भूमिका बजावली होती. या दोन्ही रॅलींमध्ये महिला आणि पुरुष दोघांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
पुण्यात रॅलीनंतर अंबिकानगर येथे एक भव्य सभा आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये अश्विनी यांनी महिलांवरील वाढत्या अत्याचारांवर प्रकाश टाकला. त्यांनी नुकतेच उघडकीस आलेल्या स्वारगेट बस डेपोमधील बलात्कार प्रकरणाचा उल्लेख करत सांगितले की, हे प्रकरण आज अनेक प्रश्न उभे करत असून, आजही महिलांची सुरक्षितता गंभीर प्रश्नचिन्हाखाली आहे. महिला सुरक्षेबद्दल सर्वच सरकारे मोठमोठे दावे करतात, पण भाजप, कॉग्रेस सारखे पक्ष सतत अत्याचाऱ्याना, बलात्काऱ्यांना पाठिशी घालण्याचे, त्यांच्या रक्षणाचे काम करतात आणि अनेकदा तर यांचे नेते महिलांवरील अत्याचाराकरिता महिलेलाच दोष देताना दिसतात. त्यानंतर स्वप्नजा यांनी 8 मार्चच्या लढाऊ इतिहासाची आठवण करून दिली आणि आजही आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी नव्याने एकत्र येण्याची गरज आहे, असे स्पष्ट केले. आज जरी कागदावर कामाचे तास आठ दर्शवले गेले असले, तरी प्रत्यक्षात ज्यांना रोजगार आहे, ते 10 ते 12 तासांपेक्षा कमी वेळ काम करत नाहीत. इतकी हाडतोड मेहनत करूनही मिळणाऱ्या पगारात दोन माणसांनाही पोषक अन्न घेता येत नाही. ही समस्या स्त्री-पुरुष दोन्ही कामगारांची आहे, आणि स्त्री कामगारांची अधिक आहे, कारण स्त्रिला ना समान वेतन मिळते, ना तिची घराच्या कामातून सुटका झाली आहे. स्त्री मुक्तीच्या संघर्षाला व्यापक कामगार वर्गाच्या संघर्षासोबत जोडणे का आवश्यक आहे याचे महत्व त्यांनी अधोरेखित केले. उपस्थितांपैकी अनेक महिलांनी आपली सहमती नोंदवली आणि सतत संघर्षासाठी कंबर कसली पाहिजे हे सांगितले. उपस्थित अनेक महिलांनी आपली सहमती नोंदवली आणि सतत चालणाऱ्या संघर्षासाठी सज्ज राहणे आवश्यक आहे, हे ठामपणे व्यक्त केले.
याच दिवशी मुंबईतील मानखुर्द – गोवंडी भागात ‘मुक्ती चे स्वर रॅली’ चे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पत्रक वाटप, भाषण आणि घोषणांद्वारे 8 मार्चच्या इतिहासाची आठवण दिली गेली. क्रांतिकारी गीत, रॅप आणि सफदर हाश्मी यांचे ‘औरत’ नाट्याची प्रस्तुती करण्यात आली. विद्यार्थी, युवक व कामकरी जनतेला भांडवलशाही, पितृसत्ता आणि फॅसिझमच्या विरोधात एक संघटित लढा उभारण्यासाठी आवाहन केले गेले. रॅलीला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून, 9 मार्च रोजी पुण्यात “स्त्रीने काय केले पाहिजे” या विषयावर स्त्री मुक्ती लीगतर्फे परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादाची सुरुवात सांस्कृतिक टोळीने “महिलाएं अब उठी नहीं तो” या गाण्याने केली. त्यानंतर प्रज्ञा यांनी स्त्री मुक्ती लीगच्या महाराष्ट्रातील कामांचा आढावा सादर केला. ठिकठिकाणी होणाऱ्या महिला विरोधी अत्याचाराविरोधात आंदोलने, चित्रपट प्रदर्शन, सावित्री-फातिमा अभ्यास गट, ऑनलाइन चर्चा, पोस्टर सादरीकरण, तसेच मुंबईतील “मुक्तीचे स्वर” वाचनालय यांचा उल्लेख त्यांनी केला.
यानंतर ‘शहरातील स्त्री- किती स्वतंत्र?’ या विषयावर मत व्यक्त करताना स्वप्नजा यांनी मांडले की आज शहरातील स्त्रियांना जे स्वातंत्र्य उपभोगता येते ते केवळ बाजाराच्या चौकटीतील आणि आभासी स्वातंत्र्य आहे. कामगार महिला आपली श्रमशक्ती विकण्यासाठी ‘स्वतंत्र’ आहेत आणि भांडवलदार वर्ग त्यांचे शोषण करण्यासाठी स्वतंत्र आहे. खिशात येणारा पगार स्वतंत्र असल्याचा आभास देतो, परंतु आज भांडवलशाहीने बेरोजगारी, बेकारी, महागाई इतकी प्रचंड वाढवून ठेवली आहे की आयुष्यभर हाडतोड मेहनत केली तरी ना चांगले जीवन जगता येते, ना चांगल्या आरोग्याचा लाभ घेता येतो, ना मुलांना चांगले शिक्षण देता येते, ना राहायला चांगली घरे उपलब्ध होतात. महिलांना स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. जोडीदार निवडण्याचा निर्णय असो, नोकरी करावी की करू नये, बाहेर फिरायला जावे की नाही जावे, कुठले कपडे घालावे इथपासून तर कसे दिसावे, कसे बोलावे, कसे हसावे की हसूच नये इत्यादींबाबत अनेक बंधने स्त्रियांवर आजही लादली जातात. कामाच्या ठिकाणी स्त्रियांबाबत भेदभाव, समान कामासाठी समान वेतन ना देणे, तसेच दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या स्त्रीविरोधी अत्याचारांच्या घटना हेच दाखवून देतात की शहरातील स्त्रिया आजही खऱ्या स्वातंत्र्यापासून खूप लांब आहेत आणि यासाठी कारणीभूत आहे ती म्हणजे भांडवली पितृसत्ताक व्यवस्था. पितृसत्ता हजारो वर्षांपासून समाजामध्ये मूळ धरून बसलेली आहे आणि आज भांडवलशाहीच्या काळात तिचे स्वरूप भांडवलशाहीच्या शोषणाच्या अनुरूप झालेले आहे. त्यालाच आपण भांडवली पितृसत्ता म्हणू शकतो. नफ्याच्या व्यवस्थेकरिता आज स्त्रियांना कमी पगारात राबवणे, स्त्रिच्या घरातील श्रमाद्वारे मजुरीचा दर कमी करवणे, स्त्रिच्या देहाचा बाजार करून माल विकणे, स्त्रीदेहाचाच बाजार मांडणे अशा अनेक पद्धतींनी भांडवली पितृसत्ता काम करत आहे. स्त्रियांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य तेव्हाच मिळू शकते जेव्हा त्या भांडवलशाहीच्या जोखडातून मुक्त होतील.
यानंतर पूजा यांनी कात्यायनी यांचे “प्रेम, परंपरा, विद्रोह-आजच्या संदर्भात” या विषयावर मांडणी केली. त्यांनी मांडले की 15 वर्षांपूर्वी झालेल्या या मांडणीचे आज फॅशिझमचा उभार समोर असताना मोठे महत्व आहे, कारण ही पुस्तिका फॅशिझमशी लढण्याचा जो कार्यभार असेल असे मांडत होती, त्याची आज प्रत्यक्ष अनुभूती येत आहे. एका बाजूला मूलतत्त्ववादी फॅशिस्ट संघटनांचा महिलांच्या अधिकारांवरील हल्ला आणि दुसऱ्या बाजूला चंगळवाद, स्वैरवाद, बाजाराची चौकट यामध्ये आज स्त्रिया अडकलेल्या आहेत. आज न्यायव्यवस्था, कार्यपालिका ह्या सगळ्यांचे चरित्र महिला विरोधी आहे. ब्रिजभूषण सिंग, कुलदीपसिंह सेंगर इत्यादी भाजपच्या अत्याचारी, बलात्कारी नेत्यांपासून तर बलरामपुर, हाथरस, कठुवा, उन्नाव, कोलकाता, बदलापूर इत्यादी ठिकाणी घडलेल्या घटनांना हिंदुत्ववाद्यांची साथ सुद्धा आपल्याला याचा पुरावा देतात की सत्ताधारी फॅशिस्टांनी स्त्री स्वातंत्र्यावर हल्ला चढवला आहे आणि बलात्काऱ्यांच्या रक्षणात ते उभे आहेत. लव्ह जिहाद सारखे नकली मुद्दे हे खरेतर स्त्रीच्या निवड करण्याच्या अधिकारावरच हल्ला आहेत. खऱ्या अर्थाने प्रेम करण्याचे स्वातंत्र्य तेव्हाच असू शकते जेव्हा एक समतामुलक, न्याय आधारीत समाज निर्माण होईल; तसेच असा समाज घडविण्यासाठीच्या संघर्षातच खऱ्या प्रेमाची अनुभूती केली जाऊ शकते.
यानंतर “कॉम्रेड शरद पाटील यांच्या मार्गाने स्त्रीमुक्ती शक्य आहे का?” या विषयावर बोलताना अभिजित यांनी मांडले की एक कष्टाळू विचारवंत, जीवनदायी कार्यकर्ते असलेल्या शपांचे इंडॉलॉजी मधील योगदान लक्षणीय आहे. परंतु त्यांच्या मार्क्सवादावरील टीका निराधार आहेत, आणि मार्क्सवादी विज्ञानाच्या अपुऱ्या समजदारीवर आधारित आहेत. वैज्ञानिक पद्धतीचा आणि सामान्यीकरणाचा मार्ग त्यागल्यामुले मार्क्सवादाच्या चुकीच्या आकलनातून त्यांनी एंगल्सच्या मांडणीला सपशेल चुकीचे म्हटले. स्त्रीराज्याच्या शोधानेही मार्क्सवादी सिध्दांत रद्दबातल होत नाही. त्यांच्या मते भारतामध्ये भांडवली लोकशाही क्रांतीची गरज आहे जी जातिव्यवस्थेला संपवेल; परंतु शपा म्हणतात तसा सामंती समाज आज शिल्लक नाही. भारतीय समाज भांडवली आहे, आणि येथील जातीव्यवस्था व पितृसत्ता आता भांडलशाहीच्या चौकटीने पुनर्व्याख्यायित झाल्या आहेत. जाती संपवणारी कोणतीही भांडवली क्रांती आज होणार नाही. सर्व जाती आणि स्त्रियासुद्धा वर्गविभाजित आहेत, आणि त्यांना एकसंघ समुदाय म्हणून बघणे चूक आहे. स्त्री प्रश्नावर सुद्धा आता रोजगार हक्काची मागणी प्रमुख मागणी बनत आहे याचमुळे कारण की देशात भांडवलशाही आहे, सामंती व्यवस्था नाही. तेव्हा आज देशात भांडवली क्रांतीची मागणी करणे म्हणजे स्त्री मुक्तीचा प्रश्न मागे सोडणे आहे.
प्रत्येक वक्तव्यानंतर झालेल्या चर्चांमध्ये उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि अनेक प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण झाली. या चर्चांदरम्यान उपस्थितांनी मांडलेल्या विचारांवर अधिक सखोल चर्चा करण्यासाठी भविष्यातही अशा सत्रांचे, विविध कार्यक्रमांचे, चर्चासत्रांचे आणि बैठकींचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. अनेकांनी स्त्री मुक्ती लीगशी स्वतःला जोडून घेण्याचा निर्णय घेतला आणि या चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन स्त्री मुक्तीचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प केला. शेवटी, सावित्रीबाई फुलेंच्या स्मरणार्थ सादर करण्यात आलेल्या गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.