फासीवाद म्हणजे काय आणि त्याविरुद्ध लढायचे कसे?
तिसऱ्या भाग
लेखक : अभिनव
मराठी अनुवाद : अमित शिंदे
गेल्या काही वर्षांपासून चालू असलेल्या खोल आर्थिक मंदीमुळे एकीकडे लाखो लोकांना आपला रोजगार गमवावा लागत असताना बहुतेक देशांमध्ये एक तर फासीवादी पक्ष सत्तेत आले आहेत किंवा बळकट तरी झाले आहेत. (जसे आपल्या देशात फासीवादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निवडणुकांमध्ये प्रतिनिधित्व करणारा भाजप) असे पक्ष सत्तेत येताच कामगारांच्या अधिकारांवर जोरदार हल्ला चढवतात आणि कॉर्पोरेट घराण्यांचा नफा वेगाने वाढविणारी धोरणे बनवतात. जर्मनीत हिटलर आणि इटलीमध्ये मुसोलिनी यांना आपण इतिहासातील फासीवादाचे जनक म्हणून ओळखतो. त्यांनी लाखो-कोट्यावधी निर्दोष माणसांची कत्तल केली आणि आजसुद्धा तमाम फासीवादी त्यांना आपले गुरू मानतात. अशा परिस्थितीत, आर्थिक अरिष्ट किंवा मंदी म्हणजे नेमके काय असते, ती फासीवादाला कसा जन्म देते, फासीवाद कसा ओळखावा आणि त्याच्याशी लढण्याचा खरा मार्ग कोणता, यांसारख्या गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे.
एखादा फासीवादी पक्ष सत्तेत असतो तेव्हाच फासीवादाचा धोका असतो, आणि फासीवादी पक्ष सत्तेतून बाहेर पडताच फासीवादाचा धोका टळतो, असे मानणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्त्वातील भाजप सरकारचा पराभव झाला होता, तेव्हा अनेकांचा असा गैरसमज झाला होता की फासीवादाचा धोका आता टळलेला आहे. त्यांचा समज किती बालीश होता हे स्पष्ट झालेच आहे, व आता फासीवादाचा धोका सर्वांत भयंकर रूपात आपल्या डोक्यावर घिरट्या घालीत आहे. फासीवाद म्हणजे काय? हे समजून घेतल्याशिवाय आपण काही झाले तरी त्यांच्या विरोधात लढण्याचा प्रभावी मार्ग शोधून काढू शकत नाही. त्याच्या सर्वच सामाजिक-आर्थिक-राजकीय-सांस्कृतिक पैलूंची योग्य जाणीव विकसित करूनच आपण त्याला पराभूत करण्याचा एक व्यावहारिक कार्यक्रम आखू शकतो. गेल्या वर्षी मोदी सरकार सत्तेत येताच, पाच वर्षांपूर्वी फासीवादाचा धोका टळला म्हणून सांगणारे लोक रडू-विव्हळू लागले आणि फासीवाद फासीवाद म्हणून ओरडू लागले आहेत. त्यांच्या मते भाजप सत्तेत असला, तर फासीवादाचा धोका असतो आणि जर भाजप सरकार बनवू शकला नाही तर फासीवादाचा धोका टळतो! फासीवादाची एवढी बालीश समज असल्यामुळेच हे लोक फासीवादाला पराभूत करण्याचा जो कार्यक्रम तयार करतात तोसुद्धा विसंगतींनी भरलेला असाच असतो. बिहारमध्ये नुकत्याचा झालेल्या भाजपच्या पराभव म्हणजे फासीवादाचे दिवस संपत आल्याचे द्योतक आहे असे हे लोक मानत आहेत. त्यामुळे ते उत्सव साजरा करण्याच्या मनस्थितीत आहेत. बिहारसारखे महागठबंधन किंवा व्यापक डाव्या आघाडीच्या बळावर फासीवाद संपवण्याची योजना बनवणाऱ्या डॉन क्विहोतेंची सध्या कमी नाही. ते फक्त निवडणुकीच्या माध्यमातून फासीवादाला पराभूत करण्याचे शेखचिल्लीचे स्वप्न पाहत आहेत. परंतु हे खरेच शक्य आहे का? निवडणुकीच्या माध्यमातून फासीवाद संपवला जाऊ शकतो का?
या प्रश्नावर गंभीरपणे विचार करणे व फासीवाद विरोधी लढ्याला योग्य दिशा देणे आज गरजेचे आहे. अशा वेळी, हा दीर्घ लेख फासीवादाची एक सुस्पष्ट समज निर्माण करण्यास वाचकांना साहाय्यक ठरेल, असे आम्हांला वाटते. हा लेख फासीवाद निर्माण होण्याच्या आर्थिक-राजकीय कारणांवर विस्ताराने चर्चा करतो, जर्मनी आणि इटलीमधील फासीवादाच्या इतिहासाचे विश्लेषण करून महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढतो, भारतातील सर्वांत मोठी फासीवादी शक्ती असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एकंदर जन्मकुंडली मांडतो आणि शेवटी फासीवादाशी लढण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यावहारिक कार्यक्रम सादर करतो. फासीवादाच्या निरनिराळ्या सैद्धांतिक पक्षांवरही हा लेख प्रकाश पाडतो व इतिहासात केल्या गेलेल्या सैद्धांतिक चुकांची समीक्षासुद्धा करतो.
हा निबंध सर्वप्रथम २००९ साली कामगारांसाठी प्रसिद्ध होणाऱ्या मजदूर बिगुल या मासिक वृत्तपत्रात सहा भागांमध्ये प्रसिद्ध झाला होता. हा निबंध मुळात हिंदीत लिहिला गेला होता व या लेखाने मांडलेल्या प्रस्थापनांना गेल्या पाच वर्षांतील घटनाक्रमाने योग्य सिद्ध केले आहे.
संपादक
इटलीमध्ये फासीवाद
इटलीमधील फासीवादाची विस्तृत चर्चा येथे करण्याचे काही कारण नाही. इटलीतील फासीवादाचा उदय जर्मनीतील फासीवादी उदयाहून वेगळा कोणत्या कारणांमुळे होता, ते फक्त येथे आपण समजून घेऊ.
इटलीमध्ये फासीवादी आंदोलनाची सुरुवात १९१९ मध्ये झाली. युद्धाच्या समाप्तीनंतर इटलीच्या मिलान शहरामध्ये बेनिटो मुसोलिनीने सभा घेऊन फासीवादी आंदोलनाची सुरुवात केली. ह्या सभेला जेमतेम १॰० लोक जमले. त्यापैकी बहुतेक युद्धात भाग घेतलेले तरुण सैनिक होते. पहिल्या महायुद्धात मित्र राष्ट्रांच्या बाजूने युद्धात भाग घेऊनही इटलीला त्याचा योग्य मोबदला मिळाला नाही. युद्धात इटलीला मोठे नुकसान मात्र सहन करावे लागले. त्यामुळे संपूर्ण देशात, खास करून सैनिकांमध्ये एक प्रतिक्रियेचे वातावरण तयार झाले होते. दुसरीकडे, देशाची आर्थिक स्थिती मोडकळीस आली होती. सरकार एकदम निष्प्रभ आणि कमकुवत झाले होते. कुठलीही पाउले उचलण्यास सरकार असमर्थ बनले होते. अशा वेळी मुसोलिनीने फासीवादी आंदोलनाची सुरुवात केली. फासीवाद हा मार्क्स्वाद, उदारमतवाद, शांततावाद आणि स्वातंत्र्य ह्यांचा उघड शत्रू आहे, अशी घोषणाच या सभेत मुसोलिनीने केली. राज्यसत्तेची सर्वोच्चता, उग्र राष्ट्रवाद, वांशिक श्रेष्ठत्व, युद्ध, नायकवाद, पावित्र्य आणि अनुशासन ह्या मूल्यांवर फासीवादाचा दांडगा विश्वास होता. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या विस्कळीत, असुरक्षितता आणि अनिश्चिततेने ग्रासलेल्या राष्ट्रांना अश्या गोष्टी आकृष्ट करतात. जेव्हा कुठलीही क्रांतिकारी शक्यता दिसत नसते, तेव्हा तर जास्तच. फासीवादाच्या सामाजिक आणि आर्थिक आधारांची चर्चा आपण पुढे करूयात. तत्पूर्वी त्याच्या वैचारिक आधारांबद्दल थोडेसे. मुसोलिनी सुरुवातीस इटलीच्या समाजवादी पक्षात होता. १९०३ ते १९१४ पर्यंत तो समाजवादी पक्षाचा एक महत्त्वपूर्ण नेता होता. त्यानंतर तो जॉर्ज सोरेल नावाच्या संघाधिपत्यवादी विचारवंताच्या प्रभावाखाली आला. संसदीय लोकशाही असू नये आणि श्रम संघांच्या माध्यमातून सरकार चालवले गेले पाहिजे, असे या विचारवंताचे मत. मुसोलिनीवर दुसरा मोठा प्रभाव होता तो फ्रेडरिक नित्शे नामक जर्मन विचारवंताचा. त्याच्या मते मानवी इतिहासामध्ये सत्ता प्राप्त करण्याची इच्छाशक्ती असलेल्या अतिमानवांची आणि नायकांची भूमिका केंद्रस्थानी असते. ह्या सर्व विचारांची भेसळ करून जेण्टाइल नामक फासीवादी विचारवंताच्या माध्यमातून मुसोलिनीने फासीवादी विचारसरणी उभारली. कामगार विरोध, भांडवलाच्या बाजूची खुली हुकूमशाही, अधिनायकवाद, लोकशाही विरोध, कम्युनिजम विरोध आणि साम्राज्यवादी विस्ताराचा उघड पुरस्कार अशा तत्त्वांनी बनलेली अशी ही विचारसरणी होती.
परंतु ही विचारसरणी जेण्टाइल वा मुसोलिनीच्या मेंदूची निर्मिती मात्र नव्हती. जेण्टाइल किंवा मुसोलिनी नसते तर दुसऱ्या कुणीतरी त्यांची जागा घेतली असती. कारण अशा प्रतिक्रियावादी विचारांसाठी अनुकूल परिस्थिती समाजातच मुळात अस्तित्त्वात होती. ही परिस्थिती समजून घेऊनच इटलीमधील फासीवादाचा उदय समजून घेतला जाऊ शकतो.
जर्मनीप्रमाणेच इटलीमध्येही भांडवली विकास उशिरा सुरू झाला. इटलीचे एकीकरण १८६१ ते १८७० च्या दरम्यान पूर्ण झाले. तोपर्यंत इंग्लंड, फ्रांस आणि हॉलंडसारख्या देशांनी भांडवली विकासाचा एक मोठा प्रवास पूर्ण केला होता आणि औद्योगिक क्रांतीसुद्धा संपन्न केली होती, हे आपण मागील प्रकरणात पाहिले आहे. ह्या देशांमध्ये आमूलगामी जमीन सुधारणा पूर्ण झाल्या होत्या. भांडवली विकास एका दीर्घ प्रक्रियेमधून पूर्ण झाला होता. त्यामुळे त्यातून निर्माण झालेला सामाजिक दबाव लोकशाहीच्या चैकटीत राहूनच झेलणे भांडवली व्यवस्थेला शक्य होते. इटलीमध्ये औद्योगिकीकरणाची सुरुवात १९८० च्या दशकात झाली आणि जर्मनी प्रमाणेच तिथेसुद्धा त्याच्या विकासाचा वेग प्रचंड होता. जर्मनीच्या तुलनेत इटलीमधील भांडवली विकासात क्षेत्रीय असमतोल होता. उत्तर इटलीच्या मिलान, तुरीन आणि रोम ह्यांच्यातील त्रिभुजाकार प्रदेशामध्ये उद्योगधंद्यांचा प्रचंड विकास झाला आणि त्याचबरोबर तिथे कामगार चळवळ सुद्धा फोफावली. सुरुवातीस ह्या चळवळीचे नेतृत्व इटलीची समाजवादी पार्टी करत होती, परंतु नंतर ह्या चळवळीमध्ये इटलीच्या कम्युनिस्ट पक्षानेसुद्धा स्थान मिळवले. इटलीच्या उत्तर भागामध्ये काही प्रमाणात भूमी सुधारणासुद्धा लागू झाल्या आणि शेतीचे व्यापारीकरण झाले. त्यातून शेतीमध्ये भांडवली विकास झाला. याचा परिणाम म्हणून औद्योगिक आणि कृषी क्षेत्रामध्ये कामगार चळवळीचाही विकास झाला. दुसरीकडे, दक्षिण इटलीमध्ये सामंती (सरंजामी) उत्पादन संबंध कायम राहिले. इथे कोणत्याही भूमी सुधारणा लागू झाल्या नव्हत्या. तेथे मोठमोठाल्या जहागिरी अस्तित्वात होत्या. त्यांची मालकी मोठ्या जमीन मालकांकडे होती. शिवाय, लहान शेतकरी आणि भूमिहीन शेतमजुरांची एक मोठी लोकसंख्या होती. ती ह्या मोठ्या जमीन मालकांच्या नियंत्रणाखाली होती. हे जमीन मालक खाजगी सशस्त्र टोळ्यांच्या माध्यमातून हे नियंत्रण टिकवून होते. ह्याच टोळ्यांना इटलीमध्ये माफिया म्हटले जात असे. पुढे ते एक स्वायत्त शक्ती बनले आणि पैशासाठी लुटमार, खून करू लागले. फासीवाद्यांनी ह्या माफिया टोळ्यांचा पुरेपूर वापर करून घेतला. दक्षिण इटलीमध्ये औद्योगिक विकास नसल्यासारखाच होता. हा फरक असूनही, किंवा हा फरक असल्यामुळेच, असे म्हणूया, फासीवाद्यांना दोन वेगवेगळ्या प्रतिक्रियावादी वर्गांचे पाठबळ मिळाले. हे कसे शक्य झाले यावर आपण नंतर चर्चा करू. मुसोलिनी सत्तेत कसा आला, अगोदर ती प्रक्रिया समजून घेऊ.
स्वतःचे साम्राज्य इरीट्रिया पासून इथियोपियापर्यंत पसरवण्याच्या प्रयत्नात अडोवा येथे १८९६ साली इटलीला एक लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे देशामध्ये ४ वर्ष भयंकर अस्थिरतेचे वातावरण तयार झाले. परंतु १९०० ते १९१४ दरम्यान उदारमतवादी भांडवली पंतप्रधान गियोवन्नि गियोलिटी यांच्या नेतृत्वाखाली थोडेसे स्थैर्य प्राप्त झाले आणि इटलीतील औद्योगिक विकासाने थोडीशी गती घेतली. १९१३ मध्ये सार्विक मताधिकाराच्या आधारे इटलीत सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. परंतु ही लोकशाही संसदीय व्यवस्था तिच्या बाल्यावस्थेतच असताना इटलीने मित्र राष्ट्रांच्या बाजूने पहिल्या जागतिक महायुद्धात भाग घेतला. त्यानंतर इटलीमध्ये निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे संसदीय व्यवस्था मूळ धरू शकली नाही. १९१७ मध्ये कापोरेट्टो येथे इटली पराभूत होता होता बचावली. युद्धानंतर फारसे काही इटलीच्या हाती लागले नाही. त्यामुळे देश विभागलेला होता. इटलीचे आर्थिक दृष्ट्या छिन्नविच्छिन्न होणे हे सुद्धा याचे एक कारण होते. १९१९ झालेल्या निवडणुकांमध्ये कुठल्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही.
समाजवादी आणि उदारमतवाद्यांना सर्वाधिक मते मिळाली, परंतु ते एकत्र सरकार बनवण्यास तयार नव्हते. समाजवाद्यांनी बोल्शेविक क्रांतीच्या प्रभावामुळे वेळेच्या अगोदरच सशस्त्र संघर्ष सुरू केला. १९१९-१९२० च्या दरम्यान इटलीच्या पो पर्वत रांगांमध्ये हा संघर्ष बराच पुढे गेला होता. समाजवाद्यांनी बऱ्याच शहरांवरती एक प्रकारे ताबा मिळवला होता. इटली गृहयुद्धाच्या वाटेवर असे, असेच वाटत होते. परंतु विद्रोहावर नियंत्रण ठेवण्यासाठी समाजवाद्यांनी ना स्वतःला तयार केले होता, ना जनतेला. त्यामुळे हा विद्रोह मोडून काढण्यात आला. हा विद्रोह चिरडण्यात भांडवली राज्यसत्तेची भूमिका होतीच, पण त्याच बरोबर फासीवादी सशस्त्र टोळ्यांनीसुद्धा या कामात महत्वपूर्ण भूमिका बजावली. १९१९ च्या निवडणुकांमध्ये फासीवाद्यांना उल्लेखनीय यश मिळाले नव्हते. परंतु १९१९-२० च्या कामगारांच्या विद्रोहाने मालमत्ताधारी वर्गाच्या मनात एक भीती निर्माण केली होती. रशियामध्ये जे झाले त्याचे उदाहरण त्यांच्यासमोर होते. अशा वेळी कामगारांच्या विद्रोहाला दडपून टाकण्यासाठी पर्यायी एकजूट उभारू शकेल, अशा शक्तीची त्यांना गरज होती. मुसोलिनीने त्याची हमी दिली. उद्योगपतींनी समर्थन दिले तर औद्योगिक अनुशासन, शिस्त पुन्हा स्थापित करण्याची हमी त्यांना मुसोलिनीने दिली. त्यानंतरच मुसोलिनीला उद्योगपतींकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळू लागली. या मदतीच्या आधारे फासीवाद्यांनी जबरदस्त प्रचार केला आणि जनतेच्या डोक्यात विष भिनवले. शहरांमध्ये फासीवाद्यांच्या सशस्त्र टोळ्यांनी कामगार कार्यकर्ते, ट्रेड युनियनिस्ट, कम्युनिस्ट आणि संपकऱ्यांवर हल्ले करावयास आणि नंतर त्यांच्या हत्या करण्यास सुरुवात केली. फासीवाद आपल्या सर्व शक्तीनिशी भांडवलदारांच्या आणि त्यातही मोठ्या भांडवलदारांच्या सेवेत रुजू झाला होता.
दक्षिण इटली मध्ये जमिनींच्या मोठ्या तुकड्यांचे मालक स्वबळावर फासीवादी पद्धतीने शेतकरी आणि भूमिहीन शेतमजुरांचे संघर्ष चिरडून टाकू लागले. फासीवाद्यांची ही जमात लवकरच मुसोलिनीला जाऊन मिळाली आणि जमिनीच्या मोठ्या पट्ट्यांचे मालक शेतकरी मुसोलीनीचे कट्टर समर्थक म्हणून पुढे आले. १९२० च्या शेवटी अजून एका प्रतिस्पर्धी फासीवादी संघटनेचा प्रमुख गाब्रियेल दश्अनुंसियो मुसोलिनीच्या फासीवादी प्रवाहात येऊन मिळाला. इटलीच्या समाजवादी पक्षाचा तयारीशिवाय केलेला विद्रोह १९२१ पर्यंत मोडून काढण्यात आला. शहरांमध्ये कायम झालेले कामगार नियंत्रण सुयोग्य योजना आणि सशस्त्र तयारीशिवाय मोडून काढण्यात आले होते. फासीवादी आंदोलनाचे वर्चस्व स्थापित झाले होते. १९२२ मध्ये मुसोलिनीने नेपल्समध्ये फासीवादी पक्षाच्या वार्षिक सभेत रोमवर चढाई करण्याचा निर्णय घेतला. फासीवादी सशस्त्र टोळ्यांनी रोमवर चढाई सुरू केली. तत्कालीन राजा विक्टर इमन्युएल (तिसरा)ने गुडघे टेकले आणि मुसोलिनीला सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केले. अशा प्रकारे मुसोलिनी १९२२ मध्ये इटलीचा पंतप्रधान झाला. त्याने स्थापन केलेल्या आघाडी सरकारमध्ये इटलीतील संशोधनवादीसुद्धा सहभागी झाले होते. याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. ते मुसोलिनीला उदारमतवादी बनवू शकतील, असा त्यांना भरवसा वाटत होता. त्यांची ही इच्छा किती मूर्खपणाची होती, हे इतहिासाने दाखवून दिले आहे.
१९२४ च्या निवडणुकांमध्ये फासीवादी पक्षाला ६५ टक्के मते मिळाली. परंतु, हे दोन तृतियांश बहुमत फासिवाद्यांनी निवडणुकांमध्ये घोटाळे करून आणि बळाचा उपयोग करून मिळवले होते, हे सामाजिक लोकशाहीवादी नेता मात्तिओत्तीने संसदेत पुराव्यानिशी हे सिद्ध केले. मात्र फासीवाद्यांनी संसदेमध्ये गोंधळ घालून त्यांना पुढे बोलू दिले नाही. दोन महिन्यांनंतर फासीवाद्यांनी मात्तिओत्तीची चाकूने भोसकून हत्या केली. लवकरच मुसोलिनीला विरोध करण्याची हिम्मत करणाऱ्या सगळ्यांची हीच गत करण्यात आली. १९२५ मध्ये मुसोलिनीने हुकूमशाही स्थापित करण्याची प्रक्रिया खुलेपणाने सुरू केली. एक-एक करून सर्व पक्षांवर बंदी घालण्यात आली. नोव्हेंबर १९२६ मध्ये “अपवादस्वरुपात लागू केलेल्या कायद्याच्या” माध्यमातून ही प्रक्रिया पूर्णत्वास गेली. त्यानंतरच्या १७ वर्षांत मुसोलिनीने त्याच्या सर्व राजकीय प्रतिस्पध्र्यांना संपवण्याचे काम केले. त्याने विरोधी शक्तींना अजिबात डोके वर काढू दिले नाही.
फासीवादी सत्ता सुदृढपणे स्थापन झाल्यानंतर कामगाराचा प्रतिरोध क्रूरपणे मोडून काढण्यात आला. दिखाव्यासाठी उद्योगांचे मालक आणि कामगारांचे संघ स्थापन करण्यात आले. त्यांत फासीवादी पक्षाचे लोकही असत. ह्या संघांकडे उत्पादन कीती असावे, कसे करावे आणि कोणासाठी करावे हे ठरवण्याचे अधिकार होते. पण हा केवळ दिखावा होता. वास्तविक पाहता कामगार प्रतिनिधी ह्या संघांमध्ये काहीही बोलू शकत नव्हते. सर्व निर्णय भांडवलदार वर्गाचे प्रतिनिधी फासीवाद्यांच्या सोबत मिळून घेत असत. कामगारांचा एक हिस्सा फासीवाद्यांनी स्वतःबरोबर घेतला होता. त्यामुळे कामगार कुठलाही प्रतिकार संघटित करू शकत नव्हते. कामगारांना स्वतः बरोबर घेण्यासाठी फासीवाद्यांनी कामगारांमध्ये काही सुधारकार्ये केली आणि त्यांच्या मनोरंजनासाठी क्लब उभारले. त्याच बरोबर त्यांच्यामध्ये आर्थिक सहकार्य स्थापन करण्यासाठी संघटना उभ्या केल्या. त्यांचा फायदा १० ते १५ टक्के कामगारांना मिळायचा. परंतु कामगार वर्गाच्या छोट्याश्या हिश्शाला भ्रामक आणि जुजबी फायदा पोहोचवून आणि कामगार वर्गाच्या एका मोठ्या हिश्शाला ह्या फायद्याचे आमिष दाखवून कामगारांची वर्गजाणी आणि एकजूट तोडण्यात फासीवादी यशस्वी झाले. म्हणूनच अशा मालक आणि कामगारांच्या संघांमध्ये कामगारांचे अतोनात शोषण होऊनही त्याविरुद्ध कुठलाही प्रभावी प्रतिरोध होऊ शकला नाही. नंतर संप करण्यावर बंदी घालण्यात आली. कुठल्याही प्रकारची निदर्शने आणि मेळावे करणे हा गुन्हा ठरवण्यात आला. ट्रेड युनियन्सवर बंदी घालण्यात आली आणि त्यांच्या जागी भांडवलदारांचे पाय चाटणारे कामगार संघ बनवण्यात आले. त्यांच्यामध्ये अर्थातच फासीवाद्यांचा भरणा होता. वर्ग सहयोगाच्या नावाखाली फासीवाद्यांनी पगारी श्रमाची गुलामगिरी अधिकच वाढवली आणि कामगारांना भांडवलदारांचे जास्तच गुलाम बनवले.
इटलीच्या फासीवाद्यांना भांडवली शेतकरी वर्गाचेसुद्धा जबरदस्त समर्थन मिळालेले होते. अगोदर सांगितल्याप्रमाणे उत्तर इटलीमध्ये भांडवली शेतीचा विकास झाला होता आणि तेथे संपन्न आणि प्रगत असा भांडवली शेतकरी अस्तित्वात आला होता. पण त्याच बरोबर गरीब शेतकरी आणि भूमिहीन शेतमजुरांचे एक आंदोलन कम्युनिस्ट आणि समाजवाद्यांच्या नेतृत्वाखाली विकसित झाले होते. संघटित छोटे शेतकरी आणि शेतमजुरांच्या संघर्षामुळे नफ्याचा दर खालावत चालला होता. ह्यातून मार्ग काढण्यासाठी भांडवलदारांना राज्यसत्तेच्या समर्थनाची आवश्यकता होती. परंतु इटलीचे एकीकरण झाल्यानंतरची उदारमतवादी भांडवली राज्यसत्ता इतकी प्रबळ नव्हती की ती भांडवलदारांच्या बाजूने कुठलेही उघड दमनात्मक पाउल उचलू शकेल. त्यामुळे इथे फासीवाद्यांच्या उदयास अनुकूल अशी परिस्थिती येथे अस्तित्वात होती. फासीवाद्यांनी ह्या भांडवली शेतकरी वर्गाला शेतमजुरांच्या आंदोलनावर नियंत्रण मिळवून देण्याची हमी दिली. त्या बदल्यात त्यांना मोठ्या भांडवली शेतकरी वर्गाचे समर्थन प्राप्त झाले. राज्यसंस्थेच्या हस्तक्षेपाची जागा फासीवाद्यांच्या नंग्या हस्तक्षेपाने घेतली. दक्षिण इटलीमधील मोठ्या जमिनींचे मालक असलेल्या वर्गाला फासीवाद्यांच्या समर्थनाची गरज नव्हती. कारण ते सर्व प्रकारचे फासीवादी उपाय आणि हिंस्त्र हल्ले स्वतःच्या माफिया टोळ्यांच्या माध्यमातून करत असत आणि गरीब शेतकरी, काश्तकार जनता आणि शेतमजुरांना दडपून टाकत असत. हा जमिनींच्या मोठ्या पट्ट्यांचा मालक वर्गसुद्धा फासीवाद्यांचा जबरदस्त समर्थक बनला.
इटली मधील फासीवाद्यांच्या उदयाची पार्श्र्वभूमी आणि प्रक्रिया यांच्या विश्लेषणानंतर हे स्पष्ट आहे की इथेही फासीवाद्यांच्या उदयाची कारणे कमी-अधिक प्रमाणात जर्मनीमधील फासीवाद्यांच्या उदयाच्या कारणांसारखीच होती. जर्मनीमध्ये फासीवाद्यांच्या उद्याचा कालानुक्रम वेगळा होता परंतु तरीही त्यामागील प्रेरक शक्ती जवळपास सारख्याच होत्या.
फासीवादाच्या उदयासाठीची परिस्थिती नेहमीच भांडवली विकासामधून निर्माण होणाऱ्या बेरोजगारी, गरिबी, भूक, अस्थिरता, असुरक्षितता, अनिश्चितता आणि आर्थिक संकट यांतून तयार होत असते. ज्या देशांमध्ये भांडवली विकास हा क्रांतिकारी प्रक्रियेमधून न होता एका विकृत, उशिराने झालेल्या कुंठित प्रक्रियेतून झालेला असतो, तेथे फासीवादी प्रतिक्रिया निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. जर्मनी आणि इटली जगतिक इतिहासाच्या पटलावर उशिराने अस्तित्वात आलेली राष्ट्रे होती. ह्या देशांमध्ये एकीकृत भांडवलशाही आणि तिच्याबरोबरच जन्म घेणारा अंधराष्ट्रवाद अस्तित्वात आला तेव्हा जागतिक पातळीवर भांडवलशाही तिच्या अत्युच्च अवस्थेमध्ये – साम्राज्यवाद- म्हणजेच एकाधिकारी भांडवलशाहीमध्ये पोहोचली होती. त्यामुळे ह्या दोन्ही देशांमध्ये भांडवलशाही विकास अत्यंत वेगाने झाला. त्याने सर्वसाधारण कष्टकरी जनता आणि मध्यम वर्गाला इतक्या वेगाने उध्वस्त केले की त्यांचा दबाव झेलण्याची क्षमता ह्या देशांमधील अर्धविकसित लोकशाहीमध्ये नव्हती. दुसरीकडे, जगातिक महामंदीने ह्या दोन्ही देशांमधील भांडवली वर्गाची अवस्था बिकट करून ठेवली होती. भांडवलदार वर्ग आता उदार भांडवलशाही आणि त्याच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांचा खर्च उचलण्यास अजिबात तयार नव्हता. तो कामगारांना आता त्यांचे श्रम अधिकार देण्यासही तयार नव्हता. ह्यासाठी सर्व लोकशाही अधिकारांचे दमन आणि कामगार आंदोलनाचा बिमोड करणे गरजेचे होते. कामगार आंदोलनाला एका प्रतिक्रियावादी आंदोलनाच्या मदतीनेच चिरडले जाऊ शकत होते. जर्मनीमध्ये नात्झी पक्ष आणि इटलीमध्ये फासीवादी पक्षाने हे प्रतिक्रियावादी आंदोलन निम्न भांडवलदार वर्ग, लंपट सर्वहारा वर्ग, श्रीमंत आणि मध्यम शेतकरी वर्गाच्या प्रतिक्रियेवर स्वार होत उभे केले. परंतु फासीवादाच्या उदयाने निम्न भांडवलदार वर्ग, लंपट सर्वहारा आणि मध्यम शेतकऱ्यांना काहीही मिळवून दिले नाही, असे इतिहास सांगतो. पुढे चालून त्यांचेही दमन केले गेले. वास्तविक पाहता फासीवादाने नेहमीच मुख्यत्वे दोनच वर्गांना फायदा पोहोचवला. कारण फासीवाद ह्या दोनच वर्गांचा प्रतिनिधी होता – वित्तीय आणि औद्योगिक मोठा भांडवलदार वर्ग आणि श्रीमंत शेतकरी, कुलक आणि मोठ्या शेतकऱ्यांचा वर्ग म्हणजेच मोठा भांडवलदार शेतकरी वर्ग. पण तत्कालीन परिस्थितीमध्ये दुसरा कुठलाही मार्ग इतिहासासमोर नव्हता, असे मात्र नाही. उलट, अशा देशांमध्ये भांडवली संकट निर्माण झाल्यावर क्रांतिकारी शक्यता आणि प्रतिक्रियावादी शक्यता, दोन्ही समान प्रमाणात अस्तित्वात असतात. इटली आणि जर्मनी ह्या दोन्ही देशांमध्ये फासीवादाच्या उदयाचे सर्वात मोठे कारण कामगार वर्गाशी दगाफटका केलेल्या सामाजिक-लोकशाहीवाद्यांचे उद्योग हे होते. ह्या दोन्ही देशांमध्ये क्रांतिकारी शक्यता पुरेपूर उपस्थित होत्या. परंतु सामाजिक-लोकशाहीवाद्यांनी कामगार चळवळीला अर्थवाद, सुधारवाद, संसदवाद आणि ट्रेड युनियनवादाच्या चैकटीत बंदिस्त करून टाकले. जर्मनीमध्ये संपूर्ण कामगार चळवळ सर्वाधिक संगठित होती, पण ती फक्त दबाव टाकण्याचे साधन बनून राहिली. भांडवलशाहीचे संकट भांडवलशाहीच्या पर्यायाची मागणी करत असताना, ही चळवळ मिळवलेल्या लोकशाही हक्कांना चिकटून बसली. कुठल्याही क्रांतिकारी पर्यायाच्या अभावी ही क्रांतिकारी शक्यता प्रतिक्रियावादाच्या मार्गावर गेली. जर्मनीमध्ये नात्झी पक्ष आणि इटलीमध्ये फासीवादी पक्ष त्यासाठी टपूनच बसले होते.
जिथे भांडवलशाही भांडवली लोकशाही क्रांतीच्या माध्यमातून आली नसून विशिष्ट प्रकारच्या क्रमिक प्रक्रियेमधून अस्तित्वात आली आहे, जिथे क्रांतिकारी भूमी सुधारणा लागू झालेल्या नाहीत, जिथे भांडवलशाहीचा विकास हा दीर्घकालीन, सुव्यवस्थित आणि समाजात मुरलेल्या लोकशाही प्रक्रियेमधून झाला नसून असामान्य रूपात अव्यवस्थित, अराजक आणि वेगवान प्रक्रियेमधून झालाय, जिथे ग्रामीण भागांमध्ये सामंती अवशेष कुठल्या न कुठल्या रुपात शिल्लक आहेत, अशा देशांमध्ये फासीवादी प्रतिक्रिया निर्माण होण्याची शक्यता नेहमीच जागी असते, असा निष्कर्ष आपण काढू शकतो. अशा सर्व देशांमध्ये भांडवली संकट अतिशय वेगाने उलाथापालथीची परिस्थिती निर्माण करू शकते. समाजामध्ये बेरोजगारी, गरिबी, अनिश्चितता आणि असुरक्षितता तयार होणे आणि करोडो लोकांचे आर्थिक, सामाजिक आणि भौगोलिकदृष्ट्या उध्वस्त होणे अतिशय वेगाने होते. अशात तयार होणाऱ्या परिस्थितीला एक तावून सुलाखून तयार झालेली क्रांतिकारी पार्टीच क्रांतिकारी दिशा देऊ शकते. अशी परिस्थिती अटळपणे फासीवादाच्या उदयास कारणीभूत ठरत नाही. फासीवादाचा उदय नेहमीच सामाजिक-लोकशाहीवाद्यांचा घृणित विश्वासघात आणि क्रांतिकारी कम्युनिस्टांच्या अकुशलतेमुळे शक्य झाला आहे. जर्मनी आणि इटली दोन्ही देश ह्याचीच साक्ष देतात.
पुढील अंकात आपण भारतातील फासीवादी उभाराचा इतिहास वाचू तसेच भारतात फासीवादाच्या विरुद्ध लढण्याच्या क्रांतिकारी मार्गांचा विचार करणार आहोत. आज सर्व क्रांतिकारी शक्तींच्या समोर असलेल्या सर्वांत जीवंत आणि ज्वलंत प्रश्नांपैकी हा एक आहे.
कामगार बिगुल, डिसेंबर २०१६