सोमनाथ केंजळे यांच्या दोन कविता

अॅलिनेशन

ज्यांच्या कणखर हातांनी
घाव घातले दगडांवर
उभारला संपत्तीसंस्कृतीचा डोलारा
कुणाच्या असण्यावर अन् कुणाच्या नसण्यावर सुद्धा
शेवटचा घाव पडताच
चुकते होतात हिशेब
अॅलिनेट होत बाहेर
फेकली जातात मांण्स
त्यांनीच निर्माण केलेल्या
सुंदर जगापासून …
मग जग असत नाही
त्यांच्या श्रमाची जादुगरी
मग जगात दिसत नाही
एकही माणूस …
माणूस झोपडपट्टयातून हुंगत राहतो
माणूस वस्त्या वस्त्यातून रांगत राहतो
माणूस शोधत राहतो
हरवलेला माणूस
मग या सुंदर जगात
तो बनत जातो क:पदार्थ…
दखलपात्र जगातलं बेदखल पात्र …
बेदखल माण्सांबरोबर पांगत जाते वस्ती
बेदखल माण्साबरोबर पेंगत जाते वस्ती
बेदखल वस्त्यांबाहेर
इथिक्स विथिक्स -मॅनर्स डेकोरेमच
विन्ल जातं जाळं
राज्य दूर उभं राहत …
पाळतिला ठेवलं जात
गिधाडांच टोळं
वस्तीलाच कळू लागतं
माण्सांच दुःख
दुःखाच्या महासागरात बुडून जाते वस्ती
मग वस्तीच कुजबूजु लागते
माण्सांच्या कानात …
हल्ला बोल! हल्ला बोल!!
ढिम्म्म हलत नाही

श्रम, अंतर्विरोध, कामगार वैगरे

एकही दगड खाणीतला …
पोलाद गुमान पडून रहातं
यंत्रांच्या सांगाड्या सोबत …
श्रम नावाची लवचिकता
शिरत नाही पोटात जोवर …
तोवर जग लोंबकळत राहतं
शुन्य प्रहरात निपचित …
मग श्रमाचं गतीशास्त्र
प्रसवूलागतं दौलत आभाळभर…
श्रमा शिवाय महाल माती असतो
श्रमा शिवाय यंत्र माती असतं
श्रमा शिवाय अस्तित्व माती असतं
मात्र बांडगुळशाही सांगु लागते
हक्क आभाळभर दौलतीवर …
श्रमाचे मायबाप विकले जातात
बांडगुळी बाजारात चवलीपावलीवर
आता बांडगुळशहा असतो
अनभिषीक्त सम्राट …
उत्पादन साधनांचा…
अंतर्विरोध थडग्यातून उभा राहतो
अन् म्हणतो मी वर्गसंघर्ष आहे…
मालका विरुध्द गुलामांचा …
मालका विरुध्द मजूरांचा…
बांडगुळा विरुध्द श्रमाचा…
संघर्ष…आहे…
अंडरग्राउंड ज्वालामुखी ओकत राहतो
नव्या युगाच्या प्रज्ञावान सुर्यांना
विचार तळपू लागतात
अन् नाकारतात म्यान होणं
अंतापर्यंत …
आता कारखाने असत नाहीत
पगारी गुलामांची स्मशानभूमी…
हत्यारबंद क्रांतीकारकांचे
जीवंत केंद्र बनू पाहतात कारखाने.

कामगार बिगुल, एप्रिल २०१७