मुस्लिम लोकसंख्या वाढीचे मिथक
नितेश शुक्ला
अनुवाद : अभिजीत
अनेकदा असं ऐकण्यात येतं की भारतात मुस्लिम वेगानं लोकसंख्या वाढवत आहेत व यामुळे हिंदूंना धोका आहे. समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) हे “वास्तव” खुप आरडून-ओरडून पसरवलं जात आहे. व्हॉट्सएप वर संदेश पसरवले जात आहेत की भारतात मुस्लिम वेगाने लोकसंख्या वाढवत आहेत आणि असंच चालू राहिलं तर २०५० पर्यंत भारत एक मुस्लिम बहुसंख्याक राष्ट्र बनेल (काही काळापूर्वीपर्यंत हे २०४० पर्यंत होणार असे ऐकण्यात येत होतं).
मग काही लोक घाबरतात. त्यांचं रक्त धर्म आणि देशाच्या रक्षणासाठी खवळू लागतं. मग ते अशा संदेशाला इतरांसोबत शेअर करून स्वत:च्या खरा हिंदू असण्याचा पुरावा देतात. ते याचाही विचार करत नाहीत की संदेशात म्हटलेली गोष्ट कितपत खरी आहे. अशाप्रकारे सामान्य लोकांच्या भावनांचा वापर करून धार्मिक संघटना लोकांचं धर्माच्या नावाने धृवीकरण करतात आणि राजकीय लाभ घेतात. या पक्षांच्या आणि संघटनांच्या आयटी सेल द्वारे असे संदेश बनवले जातात आणि मग त्यांचे कार्यकर्ते संदेशांना शेकडो ग्रुप्समध्ये पसरवतात. बहुतेक मामल्यांमध्ये पसरवला गेलेला संदेश एकतर पूर्णपणे खोटा असतो किंवा त्यात फक्त काही अंश सत्य असतं. जेव्हा एखादे मिथक अनेकदा समाजात पसरवलं जातं तेव्हा लोकांना ते एक प्रचलित सत्य वाटू लागतं. या लेखात आपण मुस्लिम लोकसंख्येबाबत आरएसएस द्वारे पसरवल्या गेलेल्या अनेक मिथकांची पडताळणी करूयात.
पहिलं मिथक: मुस्लिम ४ लग्न करतात आणि मोठ्या संख्येने मुलं जन्माला घालतात
तुम्हाला अनेकदा हे ऐकायला आणि वाचायला मिळू शकतं की मुस्लिम अनेक लग्न करतात आणि अनेक मुलं जन्माला घालतात. या दाव्याच्या खरेपणाची पडताळणी न करताच लोक याला खरं मानू लागतात. अनेक लोक असे उदाहरण सुद्धा देतात की त्यांच्या अमुक गावामध्ये तमुक मुस्लिम व्यक्तीनं ३ लग्नं केली आहेत. हिंदूंमध्ये प्रचलित असलेल्या या मान्यतेची जरा पडताळणी करूयात.
एका छोट्याश्या आकड्याने हे प्रचलित ‘सत्य’ फोल ठरतं. तो आकडा म्हणजे भारतात १००० मुस्लिम पुरुषांमागे किती मुस्लिम महिला आहेत. २०११ च्या जनगणनेच्या हिशोबाने भारतात १००० मुस्लिम पुरुषांमागे ९५१ मुस्लिम महिला आहेत. म्हणजे जर प्रत्येक व्यक्तीने एकच लग्न केले तरी सुद्धा १००० मुस्लिम पुरुषांपैकी ४९ अविवाहितच राहतील. असे असताना प्रत्येक मुस्लिम अनेक लग्नं करतो या विचारानेच चक्रावायला होतं. जर असे मानले की काही मुस्लिमांनी एकापेक्षा जास्त लग्न केली असतील, तर हे सुद्धा निश्चित आहे की त्या प्रमाणात अविवाहित मुस्लिम पुरुषांची संख्या वाढणार आहे.
परंतु संघी अजूनही हार मानायला तयार होत नाहीत. त्यांचा तर्क असा असतो की खरेतर मुस्लिम लव्ह जिहाद करत आहेत म्हणजे हिंदू मुलींना फसवून त्यांच्याशी लग्न करत आहेत, म्हणूनच एक मुस्लिम अनेक लग्न करू शकतो. या थापेसाठी कोणताही आकडा मात्र संघींकडे नाहीये. आंतरधार्मिय लग्नांमध्ये दोन प्रकारची लग्न होतात. एक प्रकार म्हणजे जो आपण सर्वसाधारणरित्या जाणतो, म्हणजे ज्यात दोन वेगवेगळ्या धर्मांचे लोक स्वत:च्या मर्जीने लग्न करतात. दुसऱ्या प्रकारची लग्न ती आहेत ज्यात मुस्लिम मुलं एका कारस्थानाचा भाग म्हणून हिंदू मुलींना फसवून त्यांच्याशी लग्न करतात आणि त्यांचे धर्म परिवर्तन घडवून आणतात. दुर्दैवाने दुसऱ्या प्रकारचे लग्न एकतर व्हॉट्सअॅप वर किंवा संघी लोकांच्या मेंदूतच सापडते. २०१४ साली निवडणुकांच्या अगोदर जेव्हा लव्ह जिहादचा मुद्दा उचलला गेला तेव्हा संघी लोक संपूर्ण देशात याचे एकच उदाहरण उत्तरप्रदेशातील मेरठ मध्ये दाखवू शकले. नंतर समजलं की हा मामला सुद्धा खोटा होता आणि स्थानिक आमदार व मुलीच्या वडीलांनी मुलीवर दडपण आणून तिच्याकडून तसं वदवलं होतं. (बातमी या लिंक वर बघू शकता: http://www.thehindu.com/news/national/other-states/for-meeruts-love-jihad-couple-३year-courtship-ends-in-nikah/article७९५३२३८.ece )
अशाप्रकारे संघ आणि भाजपचा लव्ह जिहादचा एकमात्र मामला फुस्स झाला. आता तर भक्त इतके व्याकुळ झाले आहेत की त्यांनी प्रसिद्ध क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगेच्या लग्नाला सुद्धा लव्ह जिहाद जाहीर केले आहे.
या बाबतीत वास्तवच सांगायचे तर असे की राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या २००५-०६ च्या आकड्यांवर आधारित एका अभ्यासानुसार भारतात फक्त २.१% लग्नंच आंतरधर्मिय असतात. याव्यतिरिक्त जर आकड्यांबद्दल बोलायचे झाले तर या अहवालानुसार २००५-०६ मध्ये भारतात २% लोकांचे एकापेक्षा जास्त वैवाहिक संबंध होते. धार्मिक लोकसंख्येनुसार हिंदूंमध्ये १.७७% आणि मुस्लिमांमध्ये २.५५% लोक बहुपत्नीक होते. यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की हिंदू कोड बिलानुसार एकापेक्षा जास्त लग्न करायला परवानगी नसताना, आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड एकापेक्षा जास्त लग्नाला सशर्त मान्यता देत असतानाचे हे आकडे आहेत. १००० मुस्लिम पुरुषांमागे ९५१ महिला असणे, आंतरधर्मिय विवाहांचे प्रमाण फक्त २.१% असणे आणि मुस्लिमांमध्ये फक्त २.५५% पुरुषांचीच एकापेक्षा जास्त लग्न असणे हे तीन आकडे असे आहेत जे संघाद्वारे पसरवल्या जाणाऱ्या थापांची हवा काढण्यासाठी पुरेसे आहेत.
दुसरे मिथक: मुस्लिम इतक्या वेगाने लोकसंख्या वाढवत आहेत की सन २०५० पर्यंत भारत मुस्लिम बहुल देश होईल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे पसरवल्या जाणाऱ्या प्रचलित असत्यांपैकी हे सुद्धा एक असत्य. लोकांच्या डोक्यात असुरक्षितता पेरूनच यांच्या राजकारणाची भरभराट होऊ शकते. बघूयात की संघाने केलेल्या या भविष्यवाणीमध्ये किती दम आहे.
आरएसएस खूप पूर्वीपासून ही गोष्ट पसरवत आहे की भारतातील मुस्लिम अनेक मुलं जन्माला घालून आपली लोकसंख्या वाढवत आहेत आणि भारताला इस्लामिक देश बनवू पाहत आहेत. यात मजेची गोष्ट ही आहे की आरएसएसची प्रचार यंत्रणा भारताला इस्लामिक देश बनवण्याची तारीख सतत पुढे सरकावत असते. काही वर्षांपूर्वीपर्यंत हे म्हणायचे की भारत २०३५ पर्यंत इस्लामिक देश बनेल, मग त्यांनी २०४० म्हणणे सुरू केले, आणि आता म्हणताहेत की २०५० पर्यंत भारत मुस्लिम बहुल देश बनेल. अमेरिकन संस्था पिऊ रिसर्च सेंटरने सांगितले आहे की २०५० पर्यंत भारतात जवळपास ३१ कोटी मुस्लिम आणि १३० कोटी हिंदू असतील, तेव्हा होऊ शकते की आरएसएस भारताला इस्लामिक देश बनवण्याची तारीख २०६० किंवा २०७० करेल. तरीही बऱ्यापैकी संख्येने लोक संघाच्या प्रचार यंत्रणेद्वारे पसरवलेल्या या भविष्यावर विश्वास ठेवतात आणि असुरक्षिततेच्या भावनेने ग्रासून राहतात. म्हणून हे जाणून घेणे गरजेचे आहे की भविष्याबद्दलच्या या बागुलबुव्याला खरंच काही अर्थ आहे का? भारत भविष्यात कधीतरी म्हणजे २०७० मध्ये किंवा २१०० मध्ये किंवा २१५० मध्ये इस्लामिक राष्ट्र बनू शकतो का?
यासाठी अगोदर लोकसंख्या विज्ञानाला थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूयात.
कोणत्याही देशाच्या लोकसंख्या वाढीचा दर अनेक कारणांवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ जन्मदर, मृत्यू दर, प्रवास, युवक लोकसंख्या इत्यादी. ही कारणं सुद्धा देशाच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितींवर अवलंबून असतात.
सामान्यरित्या लोकसंख्या एकरेषीय पद्धतीने (१, २, ३, ४, ५…) किंवा गुणोत्तराने (१, २, ४, ८, १६…) वाढत नाही. जपान किंवा इंग्लंड सारख्या अनेक विकसित देशांमध्ये लोकसंख्या वाढीचा दर ऋणात्मक आहे, म्हणजे तेथील लोकसंख्या कमी होत आहे. काही देशांच्या लोकसंख्या वाढीचा दर जास्त आहे तर काही देश असे आहेत ज्यांची लोकसंख्या वाढत आहे, पण वाढीचा दर सतत कमी होत आहे. एखाद्या देशाची लोकसंख्या कशी वाढेल हे तेथील सामाजिक, आर्थिक परिस्थिती ठरवतात. जर एका मोठ्या कालखंडात लोकसंख्येचा विकास पाहिला, तर भांडवलशाहीच्या आगमनानंतर गेल्या २०० वर्षांमध्ये औद्योगिक क्रांत्या झाल्यावर विकसित देशांची लोकसंख्या वेगाने वाढली. लोकसंख्या वाढीचा दर नंतर कमी होत गेला आणि आता तो स्पेन, जपान सारख्या अनेक देशांमध्ये ऋणात्मक झाला आहे. इंग्लंडच्या लोकसंख्येचे उदाहरण बघूयात:
१८०१ – ८३ लाख
१८५१ – १.८ कोटी (वाढ – ११७%)
१९०१ – ३.१ कोटी (वाढ – ७२%)
१९५१ – ४.२ कोटी (वाढ – ३६%)
२००१ – ४.९ कोटी (वाढ – १७%)
आपण पाहू शकतो की प्रत्येक ५० वर्षांमध्ये लोकसंख्या वाढीचा दर कमी होत गेला. सुरूवातीच्या ५० वर्षांमध्ये लोकसंख्या ११७% वाढली, आणि नंतरच्या ५० वर्षांमध्ये फक्त १७% वाढली. लोकसंख्या अजूनही वाढत आहे, पण वाढीचा दर कमी होत आहे. आता पुढे बघूयात.
ज्या देशांमध्ये औद्योगिकीकरण आणि नवीन उत्पादक शक्तींचा विकास नंतर झाला, तेथे लोकसंख्या वाढण्याची सुरूवात नंतर झाली. भारत आणि चीन अशा देशांपैकी आहेत. भारतात १९०० ते १९५० पर्यंत लोकसंख्या ६५% वाढली आणि १९५० ते २००० पर्यंत लोकसंख्या १८३% वाढली. अशाप्रकारे आपण बघू शकतो की एखाद्या देशात किंवा राज्यात लोकसंख्या वाढीचा दर स्थिर नसून तो तेथील आर्थिक व सामाजिक परिस्थितींवर अवलंबून असतो. जेव्हा देशात नवीन उत्पादन पद्धत विकसित होते आणि उत्पादन वेगाने वाढू लागते तेव्हा लोकसंख्या वेगाने वाढते. परंतु एका काळानंतर, वैद्यकीय सेवा आणि शिक्षणाचा विकास झाल्यानंतर, लोकांचे आयुर्मान वाढल्यामुळे लोक छोट्या कुटुंबांकडे वळू लागतात. आजच्या नवीन उत्पादन पद्धतीत आणि बाजार व्यवस्थेत पूर्वीच्या मोठ्या आणि संयुक्त कुटुंबांची जागा विभक्त कुटुंब (छोटे कुटुंब) घेत आहेत. यासोबतच भांडवलशाही व्यवस्थेत सामाजिक आणि आर्थिक विकासात एक स्थिरता किंवा जडता येत जाते, ज्याचा प्रभाव लोकसंख्येवर पण पडतो.
लोकसंख्येची ही वाढ एका संतृप्त स्तरावर पोहोचल्यावर एकतर स्थिर होते, त्यानंतर हळू-हळू वाढत राहते किंवा कमी होते. भारत त्या देशांमध्ये आहे जिथे लोकसंख्येचा स्तर अजून संतृप्त झालेला नाही. भारताची लोकसंख्या अजून वाढत आहे परंतु तिचा वाढीचा दर कमी होत आहे. १९६१ नंतर आजपर्यंतच्या वाढीचे आकडे बघूयात:
१९६१ ते ७१ दरम्यान २४.८%
१९७१ ते ८१ दरम्यान २५%
१९८१ ते ९१ दरम्यान २४.९%
१९९१ ते २००१ दरम्यान २०%
२००१ ते २०११ दरम्यान १६.७%
आपण बघू शकतो की सुरूवातीच्या तीन दशकांमध्ये लोकसंख्या एका समान दराने वाढली आणि १९८० नंतर हा दर वेगाने कमी होऊ लागला, आणि आता २४% वरून कमी होऊन १६.७% आहे. या संपूर्ण काळात हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्येच्या वाढीचे दर वेगवेगळे बघूयात:
हिंदूंचा वृद्धीदर:
१९६१ ते १९७१ दरम्यान २३.७६%
१९७१ ते १९८१ दरम्यान २५.०१%
१९८१ ते १९९१ दरम्यान २३.९२%
१९९१ ते २००१ दरम्यान १७.८९%
२००१ ते २०११ दरम्यान १५.४३%
मुस्लिमांचा वृद्धीदर:
१९६१ ते १९७१ दरम्यान ३३.१९%
१९७१ ते १९८१ दरम्यान ३०.४५%
१९८१ ते १९९१ दरम्यान ३०.३३%
१९९१ ते २००१ दरम्यान २९.५%
२००१ ते २०११ दरम्यान २३.४७%
सोबतच महिला जनन दर (TFR, यानुसार कळते की एक महिला आपल्या संपूर्ण आयुष्यात किती मुलांना जन्म देते) बघूयात :
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण २००५-०६ नुसार प्रति महिला जनन दर याप्रकारे आहे:
१९९१-९२
हिंदू महिला – ३.३
मुस्लिम महिला – ४.४
१९९८-९९
हिंदू महिला – २.७८
मुस्लिम महिला– ३.५९
२००५-०६
हिंदू महिला– २.५९
मुस्लिम महिला – ३.४०
प्रति महिला जनन दर समजण्यासाठी: जर १०० हिंदू आणि १०० मुस्लिम महिलांचे उदाहरण घेतले तर १९९१ मध्ये १०० हिंदू महिला आपल्या पूर्ण जीवनकाळात ३३० मुलांना जन्म देत होत्या, हा दर २००५ मध्ये कमी होऊन २५९ मुलांवर आला. याचप्रकारे १९९१ मध्ये १०० मुस्लिम महिला ४४० मुलांना जन्म देत होत्या आणि हा दर २००५ मध्ये कमी होऊन ३४० वर आला. यात लक्षात घेण्याची गोष्ट अशी की एखाद्या लोकसंख्येला स्थिर राहण्यासाठी एकूण जनन दर २.१ असला पाहिजे.
या दोन्ही आकड्यांना पाहून असे म्हणता येईल की भारताची लोकसंख्या तर वाढत आहे, पण वाढीचा दर सतत कमी होत आहे.
२०५० मध्ये काय होईल?
लोकसंख्येचे पूर्वानुमान काढण्यासाठी आपण जुन्या आकड्यांचा कल पाहूयात. गेल्या ५ दशकांच्या आकड्यांच्या आधारावर भविष्याचे एक पूर्वानुमान काढले जाऊ शकते. आपण २०५० मध्ये भारताची लोकसंख्या तसेच भारतात हिंदू व मुस्लिम लोकसंख्या किती असेल हे काढूयात आणि पाहूयात की आरएसएस द्वारे पसरवली जाणारी गोष्ट कितपत बरोबर आहे.
लोकसंख्येच्या पूर्वानुमानासाठी अनेक पद्धती वापरल्या जातात. आपण त्यापैकी एका उपयुक्त पद्धतीचा म्हणजे ‘घटणाऱ्या वाढ पद्धतीचा’ वापर करूयात. जेव्हा एखादी लोकसंख्या वाढते पण वाढीचा दर कमी होत असतो तेव्हा ही पद्धत समाधानकारक अंदाज देते. लोकसंख्येत होणाऱ्या बदलांसाठी काही आकस्मिक घटनांच्या (जसे युद्ध, नैसर्गिक संकट, साथ, इत्यादी) प्रभावाकडे दुर्लक्ष करत आपण आकडेमोड करूयात. आपल्याकडे गेल्या ५ दशकांमधील लोकसंख्या वाढीचे आकडे आहेत. कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय लोकसंख्या याच दराने वाढेल असे मानल्यास, पुढील निष्कर्ष निघतात –
पुढील ४ दशकांनंतर २०५० मध्ये भारताची लोकसंख्या जवळपास १७५ कोटी असेल.
भारतात हिंदूंची लोकसंख्या पुढील ४ दशकांमध्ये खालील दराने वाढेल:
२०११-२१ १२.४३%
२०२१-३१ ९.४०%
२०३१-४१ ६.४०%
२०४१-५१ ४.००%
२०५१ मध्ये हिंदूंची लोकसंख्या जवळपास १२९.२६ कोटी असेल. हा आकडा पिऊ रिसर्च सेंटरने दिलेल्या आकड्याच्या (१३० कोटी) फार जवळ आहे.
मुस्लिमांची लोकसंख्या पाहिली तर ती पुढील ४ दशकांमध्ये खालील दराने वाढेल:
२०११-२१ २०.२२%
२०२१-३१ १६.७२%
२०३१-४१ १३.७२%
२०४१-५१ १०.२२%
२०५१ मध्ये भारतात मुस्लिमांची लोकसंख्या जवळपास ३१.५२ कोटी असेल, हा आकडा सुद्धा पिऊ रिसर्च सेंटरने दिलेल्या आकड्याच्या (३१ कोटी) फार जवळ आहे.
यानंतर हिंदूंच्या लोकसंख्या वाढीचा दर जवळपास स्थिर होईल, पण मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा दर पुढील एक दोन दशके टिकून राहील. या आधारावर असा अंदाज करू शकतो की २०७१ पर्यंत मुस्लिम लोकसंख्या वाढीचा दर हिंदू लोकसंख्या वाढीच्या दराच्या जवळपास समान होईल व ४ ते ५ %च्या आसपास असेल. २०७१ मध्ये भारताची लोकसंख्या जवळपास १९२ कोटी असेल, ज्यात हिंदूंची लोकसंख्या १४० कोटी आणि मुस्लिमांची लोकसंख्या ३५ कोटी असेल. सोबतच भारताच्या लोकसंख्या वाढीमध्ये सुद्धा स्थैर्य येईल आणि लोकसंख्या एकतर स्थिर होईल किंवा एकदम हळू-हळू वाढेल.
तरीही २०७१ च्या वाढीच्या दराला स्थिर मानून गणना केली तर २१०० मध्ये भारताची लोकसंख्या २१६ कोटी असेल ज्यात हिंदूंची संख्या १५७ कोटी आणि मुस्लिमांची संख्या ३९ कोटी असेल. शतकाच्या शेवटच्या दोन दशकांमध्ये लोकसंख्या कमी होण्याची सुरूवात होऊ शकते.
वरील आकडेमोडीवरून हे एकदम स्पष्ट आहे की २०५०, २०७० किंवा २१०० मध्ये भारत एक हिंदू बहुल देशच असेल, आणि मुस्लिमांची जास्तीत जास्त लोकसंख्या ३९ कोटी (एकूण लोकसंख्येच्या १८%) पेक्षा जास्त असणार नाही, व हिंदूंची लोकसंख्या १५७ कोटींच्या (एकूण लोकसंख्येच्या ७२%) पर्यंत राहील.
आरएसएसने पुन्हा एकदा आपली तारीख पुढे सरकावली पाहिजे, कारण आता त्यांच्या घोषणा साफ खोट्या सिद्ध होत आहेत.
खरेतर कोणत्याही समुदायाचा लोकसंख्या वाढीचा दर त्यांच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीवर अवलंबून असतो, त्यांच्या धर्मावर नाही. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात ही गोष्ट चांगल्या प्रकारे दिसते. हायस्कूलपर्यंत शिकलेले हिंदू हायस्कूलमध्ये न शिकलेल्या हिंदूंपेक्षा जास्त मुलांना जन्म देतात. हीच गोष्ट मुस्लिमांसाठी सुद्धा खरी आहे. शिक्षणाचा स्तर, आर्थिक अवस्था, युवकांचे प्रमाण ही कारणे लोकसंख्या वाढीच्या दराला प्रभावित करतात. याला नीट समजण्यासाठी खाली काही तथ्य दिले आहेत:
भारतात केरळ मध्ये लोकसंख्या वाढीचा दर सर्वात कमी आहे. २०११ च्या जनगणनेनुसार केरळची लोकसंख्या ४.४% दराने वाढली, तर बिहारची लोकसंख्या २५% दराने वाढली.
काही लोक मानतात की मुस्लिम कुटुंब नियोजन करत नाहीत. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण २००५-०६ चे आकडे सांगतात: १९९१-९२ मध्ये ३७.७% हिंदू महिला कुटुंब नियोजन करत होत्या, हे प्रमाण २००५-०६ मध्ये वाढून ५०.२% झाले. याच्या तुलनेत १९९१-९२ मध्ये २२% मुस्लिम महिला कुटुंब नियोजन करत होत्या, हे प्रमाण २००५-०६ मध्ये वाढून ३६.४% झाले. मुस्लिम महिलांमध्ये हिंदू महिलांच्या तुलनेत नक्कीच कुटुंब नियोजनाप्रती जागरूकता कमी आहे, परंतु त्यांचा कुटुंब नियोजन वाढीचा दर जास्त आहे. हिंदू महिलांमध्ये १५ वर्षात १२.५% जास्त महिलांनी कुटुंब नियोजन केले, तिथे हाच दर मुस्लिम महिलांमध्ये १४.४% आहे.
या व्यतिरिक्त अनेक छोटी कारणे आहेत, जी मुस्लिम लोकसंख्या वाढीच्या जास्त दराला कारणीभूत आहेत:
१. हिंदूंच्या तुलनेत मुस्लिमांमध्ये स्त्री-पुरुष गुणोत्तर जास्त आहे. हिंदूंमध्ये १०० पुरुषांमागे ९३९ महिला आहेत, तर मुस्लिमांमध्ये १००० पुरुषांमागे ९५१ महिला आहेत.
२. एनएफएचएस २००५-०६ नुसार हिंदूंचे सरासरी आयुर्मान ६४ वर्ष आहे, तर मुस्लिमांचे सरासरी आयुर्मान ३ वर्षे जास्त म्हणजे ६८ वर्ष आहे.
३. हिंदूंमध्ये ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचा मृत्यू दर मुस्लिमांपेक्षा जास्त आहे. हिंदूंमध्ये ५ वर्षांखालील मुलांचा मृत्यूदर प्रत्येक १००० मुलांमागे ७६ आहे, तर मुस्लिमांमध्ये हाच दर ७० आहे.
सच्चर आयोगाचा अहवाल आणि लोकसंख्या वाढीचे आकडे एकत्र पाहिले, तर मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीच्या जास्त दराचे खरे कारण समोर येईल. सच्चर आयोगाच्या (२००६) अहवालानुसार २००४-०५ मध्ये भारतात सरासरी २२.७% लोक दारिद्र्य रेषेखाली होते, परंतु मुस्लिमांमध्ये हेच प्रमाण ३१% होते. शहरांमध्ये तर हा आकडा अजून भयावह आहे, जिथे ३८.४% मुस्लिम दारिद्र्य रेषेखाली होते.
या अहवालानुसार भारतात २००१ साली साक्षरतेचा दर ३५% होता, ज्यात हिंदूंमध्ये साक्षरतेचे प्रमाण ७०.८% होते, पण मुस्लिमांमध्ये साक्षरतेचे प्रमाण फक्त ५९.१% होते. शहरांमध्ये हिंदू साक्षरतेचे प्रमाण ८५% होते, पण मुस्लिम साक्षरतेचे प्रमाण फक्त ७०.१% होते. ६ ते १४ वयाच्या २५% मुस्लिम मुलांनी एकतर कधी शाळेचे तोंड पाहिलेले नव्हते किंवा शिक्षणच सोडून दिलेले होते. हिंदूंमध्ये हेच प्रमाण ९% होते.
लोकसंख्या आणि एनएफएचएसचे आकडे हे दाखवतात की भारतात खराब आर्थिक अवस्था आणि शिक्षणाचे कमी प्रमाण असलेले लोक जास्त मुलांना जन्म देतात. यामागे अनेक कारणं असतात. गरीब कुटुंब असल्यामुळे जितकी मुलं जास्त तितके काम करणारे लोक जास्त अशी मानसिकता असते. ही मानसिकता अनेक मुलांना जन्म देण्याचे कारण बनते. याशिवाय गरीब लोकांच्या मुलांना कुपोषण व इतर अनेक आजारांमध्ये योग्य इलाज न मिळाल्यामुळे अनेकदा मृत्यूमुखी पडावे लागते. सोबतच गरीबांच्या वस्त्यांमधून मुलं गायब होण्याच्या घटनाही सतत होत असतात. अशा मुलांना भीक मागणे आणि किडनी काढण्यासाठी वापरले जाते. या कारणांमुळे गरीब लोक असुरक्षिततेच्या भावनेपायी जास्त मुलांना जन्म देतात. कुटुंब नियोजनाबाबत जागरूकतेचा अभाव हे सुद्धा जास्त मुलांना जन्म देण्याचे एक कारण आहे.
वरील उदाहरणांमध्ये आपण पाहिले आहे की भारत कधीच इस्लामिक राष्ट्र होऊ शकत नाही. परंतु संघाच्या फासीवादाला तीव्र विरोध केला नाही तर एक दिवस भारत इस्लामिक देशासारखा नक्कीच बनेल, जिथे:
- अहिंदूंच्या प्रत्येक सण-उत्सवावर बंदी असेल,
- अहिंदूंना दुय्यम दर्जाचे नागरिक मानले जाईल,
- मुलींनी जीन्स-टीशर्ट घालणे बेकायदेशीरअसेल,
- मुलींना रात्री ८ वाजता घराबाहेर निघण्यावर बंदी असेल,
- लग्नाअगोदर प्रेम करण्यावर बंदी असेल, बागेत प्रेमी जोडप्यांना पोलिस धरून मारतील आणि राखी बांधतील,
- मनुस्मृतीवर टीका करणाऱ्यांचे डोके उडवले जाईल,
- आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणे बेकायदेशीर असेल.
तेव्हा भारत एक इस्लामिक देश नाही, तर इस्लामिक देशांसारखे हिंदू राष्ट्र असेल.
तिसरे मिथक : पाकिस्तानात स्वातंत्र्याच्या वेळी १५% हिंदू होते. आज हे प्रमाण फक्त १.५% आहे कारण त्यांच्या सर्रास कत्तली व धर्मपरिवर्तन केले जात आहे.
अनेकदा संघाचे लोक पाकिस्तानात हिंदूंच्या कमी होत असलेल्या लोकसंख्येबाबत सांगतात की पाकिस्तानात मुस्लिमांनी तेथील हिंदू लोकसंख्येला १९४७ वरील १५% टक्यांवरून १.५% आणले आहे. हे धादांत खोटं सुद्धा आरएसएस द्वारे पसरवण्यात आलेल्या त्या शेकडो अफवांपैकी आहे ज्यांचा वापर हिंदूंना मुस्लिमांविरुद्ध भडकवण्यासाठी केला जातो. फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इतर नेटवर्कींग साईट्स वर ते असा मुस्लिम विरोधी प्रचार करतात आणि बहुतेक लोक त्यांच्या कारस्थानाला बळी सुद्धा पडतात.
पाकिस्तानात हिंदूंच्या लोकसंख्येबाबत जर आकडे पाहिले तर खरी गोष्ट ही आहे की १९४७ मध्ये पाकिस्तानात हिंदूंची लोकसंख्या १५% होती आणि हे सुद्धा खरे आहे की आज त्यांची लोकसंख्या १.६% आहे, पण मधल्या काळातली गोष्टच गायब केल्यामुळे असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो की या काळात हिंदूंचे मोठ्या प्रमाणात हत्याकांड करण्यात आले. हे अर्धसत्य खरेतर एक कपटी असत्य आहे.
पाकिस्तानातील हिंदूंचे प्रमाण
१९३१ १५%
१९४१ १४%
१९५१ १.३%
१९६१ १.४%
१९८१ १.५%
१९९८ १.६%
२०११ २ %
दुसरीकडे, भारतातील पंजाबमध्ये मुस्लिमांचे लोकसंख्येतील प्रमाण
१९३१- ५२.४%
१९४१- ३२.३%
१९५१- ०.८%
१९६१- १.९४%
१९७१- ०.८४%
१९८१- १.०%
१९९१- १.२%
२००१- १.५६%
वर १९३१ आणि १९४१ चे आकडे त्या भागांचे आहेत जे १९४७ नंतर पाकिस्तानात गेले. आकड्यांमध्ये स्पष्ट दिसून येते की १९५१ येईपर्यंत दोन्ही भागांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात मोठा बदल घडून आला होता.
याचे कारण हे आहे की १९४७ नंतर दोन्ही देशांमध्ये ज्या दंगली झाल्या, त्यांच्या परिणामी दोन्ही देशांमधून मोठ्या प्रमाणात विस्थापन झाले आणि अनेक लोक मारले सुद्धा गेले. याच कारणामुळे १९५१ येईपर्यंत पाकिस्तानातील हिंदूंची लोकसंख्या फक्त १.३% राहिली. ठीक हेच भारतातील पंजाबमध्ये सुद्धा घडले. इथे १९४७ मध्ये मुस्लिमांची लोकसंख्या ३३% होती, जी १९५१ मध्ये ०.८%च राहिली आणि आता १.६% आहे.
जर हे तथ्य सुद्धा चुकीच्या पद्धतीने दाखवले तर असे वाटू शकते की पंजाबमध्ये मुस्लिमांचे मोठ्या प्रमाणात हत्याकांड झाले. परंतु असे नाहीये. लोकसंख्येचे आकडे हे सिद्ध करतात की पाकिस्तानामध्ये हिंदूंची लोकसंख्या कमी होणे आणि भारतातील पंजाबमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या कमी होणे या दोन्ही घटना स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात झालेल्या विस्थापनामुळे झाल्या आणि ही प्रक्रिया १९५१ च्या जनगणनेपर्यंत पूर्ण झाली होती. १९५१ नंतर पाकिस्तानातील हिंदूंची संख्या थोड्या प्रमाणात का होईना, वाढली आहे.
संघ आणि त्यांच्या सर्व संलग्न संघटना अशा अफवा पसरवून हिंदू जनतेमध्ये मुस्लिमांप्रती द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय अशा हजारो भूलथापा आहेत ज्या रोज समाज माध्यमांवर पसरवल्या जात आहेत. इतक्या की त्यांचे उत्तर देणे शक्य होणार नाही. त्यांचे एक धोरण हेच आहे की आम्ही खोटं बोलत जाऊ, तुम्ही कितीही उघडकीस आणले तरी. तुम्ही जो पर्यंत उघडकीस आणाल, आम्ही अजून २५६ अफवा पसरवल्या असतील आणि आमच्या भूलथापा हजारो लोकांपर्यंत पोहोचलेल्या असतील.
आज हजारोंच्या संख्येने खोट्या बातम्यांच्या वेबसाईट्स भूछत्रा (मशरूम) सारख्या उगवल्या आहेत. यांचे कामच हे आहे की फोटोशॉप वापरा, आफ्रिकेचा व्हिडीओ भारतातील म्हणून दाखवा किंवा वर्तमानपत्रातील बातमीचे शीर्षक बदलवून द्या, काहीही करा. फक्त लोकांच्या डोळ्यात धूळफेक करून आपले जातीय राजकारण वाढवत न्या. हजारो लोक यांच्या सायबर सेल मध्ये काम करतात आणि पगार घेतात.
आज आपण प्रत्येक खोटं उघडकीस तर आणू शकत नाही पण आरएसएसची विचारधारा ओळखणे जरूरी आहे. त्यांच्या फासीवादी विचारधारेसाठी एका समुदायाला दुसऱ्या समुदायाच्या नजरेत शत्रू सिद्ध करणे आवश्यक आहे. जर्मनीमध्ये हिटलरने सुद्धा ज्यूं विरुद्ध असाच खोटा प्रचार मोठ्या स्तरावर केला होता. त्याचा प्रचार मंत्री गोबेल्सचे म्हणणे होते की एक खोटं शंभर वेळा सांगितले की ते खरं बनतं.
हिंदू संकृतीचे रक्षण, भारत माता की जय, हिंदू धर्म संकटात (खतरे मे) अशा नाऱ्यांच्या मागे खरेतर हे लोक अंबानी-अडानी सारख्या मालकांच्या सेवेत मग्न आहेत आणि जनतेच्या खिशातील शेवटचा पैसा सुद्धा काढून घेण्यास आतूर आहेत. सोबतच मंदीच्या काळात सरकारच्या लुटखोर धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाला मुस्लिमांकडे वळवू पाहत आहेत. आज न्यायावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे की यांचा विरोध करावा. कारण आज जर चुप्प बसलो तर उद्या आपली पाळी येईल. जर्मन कवी पास्टर निमोलरने म्हटल्याप्रमाणे –
पहिले ते कम्युनिस्टांसाठी आले
आणि मी काहीच बोललो नाही
कारण मी कम्युनिस्ट नव्हतो.
मग ते आले ट्रेड युनियन वाल्यांसाठी
आणि मी काहीच बोललो नाही
कारण मी ट्रेड युनियन मध्ये नव्हतो.
मग ते आले ज्यूंसाठी
आणि मी काहीच बोललो नाही
कारण मी ज्यू नव्हतो.
मग ते आले माझ्यासाठी
आणि तोपर्यंत कोणीच वाचले नव्हते
जे माझ्यासाठी बोलले असते.
कामगार बिगुल, सप्टेंबर २०१७