स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारक शहिदांच्या नजरेतून रा.स्व.संघांची काळी कृत्ये
“भयानक कट”
सुरेंद्र कुमार (नौसेना विद्रोहात भाग घेतलेले स्वातंत्र्य सैनिक)
रा.स्व.सेवक संघाने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात कधीच भाग घेतला नाही. त्याच काळात संघाचे लोक देशातील लोकांना धर्माच्या नावाखाली आपापसात लढवण्यामध्ये गुंतले होते. इथे एका लेखाचा अंश सदर करत आहोत, जो सांगतो की जेव्हा सगळा देश इंग्रजांविरोधात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरून लढत होता, त्याच काळात 1946-47 च्या दरम्यान संघ आपल्याच देशातील लोकांच्या विरोधात कट कारस्थाने रचण्यात गुंतला होता. गुजरात दंगलींच्या काळात संघाच्या लोकांनी कसे मुसलमानांच्या घरांना आणि दुकानांना वेचून वेचून नष्ट केले त्याची पाळेमुळे या लेखात सापडतात. मग लक्षात येते की या सगळ्या कट कारस्थानांच्या मागे किती तयारी केली गेली होती. हिटलरच्या जर्मनीमधील नाझींनी ज्यू लोकांच्या कत्तली करण्यासाठी वापरलेल्या पद्धतींचा वापर कसा करायचा याची कला संघाने आत्मसात केली होती. या लेखाचा हा भाग प्रसिद्ध पत्रकार आणि नौसेना विद्रोहात भाग घेतलेले स्वातंत्र्य सैनिक सुरेंद्र कुमार यांनी “दायित्वबोध पत्रिके” साठी प्रस्तुत केला होता.
इकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अधिक कृर चेहरा प्रकाशात आला आहे, ज्याच्याबद्दल श्री. राजेश्वर दयाल (आय.सी.एस., आता दिवंगत) यांनी आपल्या पुस्तकात “अ लाइफ ऑफ अवर टाइम” (ओरिएंट लाँगमॅन 1998 पा.क्र. 93-94) मध्ये लिहिले आहे. ते 1946-47 दरम्यान उत्तर प्रदेश चे गृहसचिव होते, त्या काळातील अनुभव मांडत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या मानवद्वेषी संस्थेने पश्चिमी उत्तरप्रदेशमधील मुस्लीम रहिवासी असलेल्या भागातील रस्ते, गल्ल्या अगदी घरांपर्यंतचे नकाशे तयार केले होते, अतिशय पद्धतशीरपणे जनसंहार करण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते, हे सगळे काम सरसंघचालक एम.एस. गोळवलकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. हा सगळा अनुभव राजेश्वर दयाल यांच्या शब्दांमध्ये…
“उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाच्या टाळाटाळ आणि निर्णय न घेण्याचे भयंकर परिणाम झाले, याबद्दलचा मी अतिशय गंभीर स्वरूपाचा वृत्तांत सांगत आहे.”
“सांप्रदायिक तणावाचा उन्माद अतिशय जोरदारपणे आकार घेत होता, त्याच काळात वेस्टर्न रेंजचे डेप्युटी इंस्पेक्टर बी. बी. एल. जेटली जे अतिशय मुरलेले-मुत्सद्दी आणि सुयोग्य पोलीस अधिकारी होते, ते अत्यंत गुप्तपणे माझ्या घरी आले. त्यांच्यासोबत आणखी दोन पोलीस अधिकारी आले होते, त्यांच्याकडे कुलुपबंद दोन मोठ्या ट्रंका होत्या. जेंव्हा त्या ट्रंका उघडल्या गेल्या, तेव्हा राज्यातल्या पश्चिमी जिल्ह्यांमध्ये सांप्रदायिक आधारावर नरसंहार करण्याचा कट समोर आला. त्या ट्रंका जेव्हा उघडल्या तेव्हा त्या प्रांतातील सर्व पश्चिमी जिल्ह्यांमधील प्रत्येक शहर, गावांचे नकाशे समोर आले, ज्यात चूक होण्याची कोणतीही शक्यता नव्हती. ते सर्व नकाशे पद्धतशीरपणे तयार करण्यात आले होते. त्या नकाशांवर मुस्लीम बहुल वस्त्या, गल्ल्या आणि मुसलमान लोकांच्या विभागांवर मोठमोठ्या खुणा करण्यात आल्या होत्या. या सर्व वेगवेगळ्या खुणा केलेल्या ठिकाणी कसे पोहचावे या आणि अशा प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचे निर्देश करणारे दस्तावेज तयार करण्यात आले होते. हे सर्व त्यांच्या महाअनर्थकारी उद्देशावर प्रकाश टाकत होते.”
“या भयंकर रहस्याचा भेद झाल्यानंतर मी सर्व पोलिसांना घेऊन सरळ प्रधानमंत्र्यांच्या (त्यावेळी मुख्यमंत्र्यांना प्रधानमंत्री म्हटले जायचे) स्थानी गेलो. तिथेच एक बंदिस्त खोलीमध्ये जेटली यांनी आपल्या संपूर्ण तपासाचा अहवाल सादर केला, ज्याचे सगळे पुरावे त्या ट्रंकमध्ये उपलब्ध होते. संघाच्या अड्ड्यावर योग्यवेळी छापे मारल्यामुळे एका भयंकर षडयंत्राचा भांडाफोड झाला होता. हा सगळा कट संघाच्या प्रमुखांच्या आदेशाखाली आणि देखरेखीखाली सामंजस्याने तयार केला गेला होता. जेटली आणि मी, आम्ही दोघांनी गोळवलकरांच्या ताबडतोब अटकेवर जोर दिला.”
“पंतजींना (गोविंद वल्लभ), त्यांच्या समोर असलेल्या पुराव्यांचा स्वीकार करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पण प्रमुख आरोपीला अटक करण्याचा निर्णय घेण्याबद्दल, ज्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करत होतो आणि रफी अहमद किदवाई (गृहमंत्री) यांनी जो निर्णय नक्की घेतला असता, पंतजीनी सर्व मामला मंत्री मंडळाच्या पुढील बैठकीत विचारविनिमयासाठी नेण्यात यावा असा निर्णय घेतला. नक्कीच हा सगळा मामला राजकीय दृष्टीने अत्यंत नाजूक होता, कारण संघांची पाळेमुळे देशात सर्वत्र पसरलेली होती. या शिवाय राजकीयदृष्ट्या त्यांचे हात दगडाखाली होते कारण संघाचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही प्रकारचे सहानुभूतीदार कांग्रेस पार्टीमध्ये आणि मंत्रिमंडळामध्ये होते. विधान परिषदेचे अध्यक्ष आत्मगोविंद खेर स्वत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले होते. तसेच त्यांचा मुलगा स्वत: संघाचा प्रत्यक्ष सदस्य होता ही बाब सर्वांनाच माहित होती.”
“मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये नेहमीप्रमाणे टाळाटाळ होत राहिली आणि अप्रासंगिक गोष्टींची चर्चा होत राहिली. पोलिसांनी एका अशा कटाचा पर्दाफाश केला होता जो कट संपूर्ण विभागाला आगीत टाकू शकला असता. संबंधित अधिकाऱ्यांची प्रशंसा होणे अपेक्षित होते, पण या तथ्यावर या सगळ्या चर्चांमध्ये काहीच बोलले गेले नाही. सगळ्या चर्चांच्या अंती असे ठरवले गेले की गोळवलकरांच्या नावे एक पत्र पाठवण्यात यावे, या पत्रात त्यांच्या विरुद्ध समोर आलेले पुरावे आणि त्यांचे गंभीर स्वरूप याबद्दल त्यांना सांगण्यात यावे आणि त्यांच्याकडून याबाबत स्पष्टीकरण मागवण्यात यावे. असे पत्र तयार केल्यानंतर त्याचे वजन वाढावे म्हणून ते प्रधानमंत्र्यांच्या नावाने पाठवले जावे यावर मी भर दिला. पंतजीनी मला या पत्राचा मसुदा तयार करण्यास सांगितले. त्यांच्या लिखाण शैलीची नक्कल करत ते पत्र मी तयार करून दिले. हे पत्र ताबडतोबीने पाठवणे अपेक्षित होते. हे काम दोन पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले पण त्याचवेळी गोळवलकर यांना आधीच सावधान करण्यात आले होते. त्या इलाक्यात त्यांचा ठावठिकाणाच नव्हता. शोधता शोधता असे समजले की ते दक्षिणेकडे निघून गेले आहेत. तिकडे त्यांचा पाठलाग करणाऱ्यांच्या चकवण्यात ते यशस्वी झाले होते. ठिकठिकाणी त्यांचा शोध घेतला जात होता, ज्याला कुठलेही यश मिळत नव्हते आणि अनेक आठवडे या सगळ्यात निघून गेले.”
“मग आला 1948 चा 30 जानेवारीचा दिवस, ज्यादिवशी शांतीचा सर्वोच्च दूत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका मतांधाच्या गोळीचा शिकार झाला. या संपूर्ण त्रासदायक प्रकरणाचा मला उबग येऊ लागला.”
अनुवाद : तृप्ती
कामगार बिगुल, जुलै 2018