दिल्लीतील शाहबाद डेअरी वस्तीतील कामगार वर्गाच्या जीवनाची नरकीय परिस्थिती
मजदूर बिगुल प्रतिनिधी
प्रत्येक मोठ्या शहरात एक किंवा अधिक घाणेरड्या झोपडपट्ट्या आहेत, जेथे मजूर वर्ग खुराड्यात कोंबलेल आयुष्य खर्च करतो. हे खरं आहे की श्रीमंत राजवाड्यांच्या जवळपास नजरेत न येणारी गरिबी राहते पण बऱ्याचदा सुखसंपन्न वर्गाच्या नजरेदूर मजूर वर्गाला जागा दिली जाते जिथे ती आपसी वादात अडकून राहू शकतील. अशा घाणीचे साम्राज्य असणार्या झोपडपट्ट्या इंग्लंडमधल्या प्रत्येक शहरात जवळपास सारख्याच पद्धतशीर वसलेल्या आहेत- शहरातल्या सगळ्यात वाईट भागात निम्नस्तरीय वाईट घर, अनेकदा लांब रांगांमध्ये एक किंवा दोन मजली झोपडपट्टया, तळघर सुद्धा राहायला उपयोगात आणून, नेहमीच अस्ताव्यस्त बांधली गेलेली असतात. दोन किंवा तीन छोट्या खोल्या आणि एक स्वयंपाक खोली असणारी ही घरं लंडनचा काही भाग वगळता, सर्व इंग्लंडमधील कामगार वर्गाच्या सामान्य राहण्याचा मुक्काम आहे. कच्च्या खडकाळ ओबडधोबड गल्ल्या, घाणेरड्या आणि कचऱ्याने भरलेल्या असतात, इथे सीवर आणि नाले तर नसतात पण सडक्या वास मारणाऱ्या साचून थांबलेल्या पाण्याच्या गड्ड्यांची कमी नसते. याव्यतिरिक्त बांधणीच्या अस्ताव्यस्तते मुळे साफ खेळती हवा ही नसते. एका छोट्या हिश्शात खूप सारी माणसं खुराड्यात कोंबल्या गत आयुष्य जगतात त्यामुळे तिथल्या वातावरणाचा अंदाज बांधणे अवघड नाही. चांगल्या वातावरणात गल्ल्यांचा वापर सुकवण्याची जागा म्हणून होतो जिथे या घरापासून त्या घरापर्यंत गेलेले तार ओल्या कपड्यानि लादलेले असतात.
वरच्या ओळींमध्ये जर इंग्लंड चा उल्लेख वगळला तर दिल्लीतील शहाबाद डेअरी मध्ये जाणारा प्रत्येक व्यक्ती वरील विवरण तिथलच आहे हे सहज मान्य करू शकेल. परंतु वरील विवरण हे कामगारांचे महान शिक्षक आणि नेते फ्रेडरिक एंगल्स यांचं प्रसिद्ध पुस्तक ‘इंग्लंडमधील कामगारवर्गाची दशा’ मधून घेतलं गेलं आहे. हे पुस्तक एंगल्स ने आजपासून 175 वर्ष आधी लिहिलं. जवळजवळ सर्व देशांमध्ये भांडवलशाहीत उदय होऊन वाढणा-या मजुरांची परिस्थिती जवळजवळ सारखीच दयनीय राहिली आहे, फक्त वेळ वेगळी असू शकते. भारतासारख्या मागास भांडवलदार देशात, कामगार वर्गाची परिस्थिती आणखी जास्त वाईट आहे.
शाहबाद डेअरी ही दिल्लीच्या बाहेरील भागात स्थित एक झोपडपट्टी आहे, जेथे कामगारांची संख्या मोठी आहे. इथले कामगार जवळपासच्या औद्योगिक भागात जसे की शहाबाद डेअरी, बवाना, नरेला, बादली जहांगीर पुरी मध्ये काम करतात. वस्तीतील महिला कारखान्यांमध्ये काम करण्याव्यतिरिक्त जवळपासच्या मध्यमवर्गीय घरांमध्ये घरगुती कामगार म्हणून सुद्धा काम करतात. जसे भारतातील सगळ्याच कामगार वस्त्यांचे हाल आहेत तसेच शहाबाद डेअरीमध्ये सुद्धा मूलभूत सुविधा नसल्यात जमा आहेत. शहरात आपल्या कष्टाने झगमगाट ठेवणाऱ्या कामगार लोकसंख्याला अंधाऱ्या-खुराडांमध्ये जगायला भाग पाडल्या जाते.
शाहबाद डेअरीची सर्वात गरीब लोकसंख्या ही वस्तीच्या खालच्या भागात राहते जेथे मोठ्या तळी आणि खड्ड्यात पाणी सडत तुंबलेलं असतं त्यातून एक नाला निघतो. खड्ड्यांच्या चारी बाजुनी आणि नाल्याच्या दोन्ही बाजूला कामगारांनी जोडतोड करून वस्ती केलीये. पावसाळ्यात येथे काय परिस्थिती होत असेल याचा अंदाज सहज लावल्या जाऊ शकतो, नाल्यातील गलिच्छ पाणी सहजपणे घरामध्ये घुसतं, घरा बाहेर पडायला शक्य होत नाही आणि विविध प्रकारचे रोग पसरतात. हे लक्षात घेण्याजोग आहे की दिल्लीतील डेंग्यू रुग्णांची संख्या ज्या भागात सगळ्यात जास्त असतात त्यात शाहबाद डेअरी सुद्धा आहे.
शाहबाद डेअरी ची लोकसंख्या जवळपास एक लाख आहे, येथील लोकांना जवळ रिक्त निर्जन क्षेत्रात उघडयावर शौचाला जावं लागायचं कारण दोन वर्षांपूर्वी पर्यंत वस्तीत सार्वजनिक शौचालये नव्हती. महिला व मुलींना सहसा छळ करायला लागायचा आणि बलात्कार सारख्या भयानक घटना अतिशय सामान्य होत्या. शौचालय नसल्यामुळे परिस्थिती एवढी वाईट झाली होती की मातानी आपल्या मुलांना रात्री अन्न किंवा पाणी देणे बंद केलं जेणेकरून ते रात्री शौचाला जायला लागणार नाही. जेव्हा वस्तीतील कामगारांनी शौचालय बांधण्यासाठी नौजवान भारत सभेच्या नेतृत्वाखाली कडवा संघर्ष सुरु केला, तेव्हा सरकारने काही सार्वजनिक शौचालये बनवली परंतु ती परंतु ती एकूण लोकसंख्येसाठी फार कमी आहेत.
इथे 12 व्या वर्गापर्यंत फक्त एकच शासकीय शाळा होती, जी 2016 मध्ये शाळेत एका मुलाचा विजेचा झटका लागून मृत्यू झाला म्हणून बंद केल्या गेली. तेव्हापासून ती परत सुरू झाली नाही. ह्या शाळेतील मुले 3किमी पेक्षा जास्त अंतरावरील प्रहलादपूर शाळेत बदली करून दिली गेली. यामुळे बऱ्याच मुलांची आणि विशेष करून मुलींची शाळाच सुटली. याशिवाय, तीन प्राथमिक शाळा आहेत, ज्याची स्थिती इतकी खराब आहे की येथील एका वर्गात 70-70, 80-80 मुले आहेत. तिथे ना पिण्याचे पाणी आहे ना स्वच्छ शौचालय. यामुळे सर्व मुले आणि विशेषतः मुलींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
पिण्याच्या पाण्याची समस्या आणखी भयावह आहे. येथे पाण्याची पाईपलाईन ठेवली गेली नाही, त्यामुळे टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जाते. पूर्ण लोकसंख्येच्या गरजेसाठी जेवढे टँकर यायला हवेत त्याचा निम्मेसुद्धा येत नाही. केजरीवाल सरकारच्या हवाई दाव्याबाबत सत्य आपल्याला येथे माहीत होते. निवडणुकीआधी केजरीवाल सरकारनी दिल्लीतील सर्व लोकांना 700 लिटर पाणी दररोज, जिथे पाईपलाईन नसेल तेथे पाईपलाईन देण्याचे आश्वासन दिले होते. वास्तव हे आहे की प्रत्येक घरात, लोकांनी 2-3 प्लास्टिकची 20-20 लीटरची जार ठेवली आहे आणि जेव्हा पाणी टँकर येतात तेव्हा ते या जारांमध्ये पाणी भरतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की दररोज टँकरनेदेखील पाणी पुरविले जात नाही, परंतु टँकर दोन दिवसात एकदाच येतो. ह्यातून दररोज फक्त 20 लीटर पिण्याचे पाणी सरकारकडून प्रत्येक घरात उपलब्ध करून दिले जात आहे हे स्पष्ट होते. यामुळे लोकांमध्ये उगवणाऱ्या प्रत्येक दिवशी आपापसात भांडण होतात. आत्ता काही दिवस आधी दिल्लीतील वजीरपुर कामगार वस्तीत एक वृद्ध आणि त्याचा मुलगा यांनी टँकरमधील पाणी वेळेच्या आधी काढल्यामुळे त्यांची भांडणांमध्ये हत्या झाली. आपल्याला मध्यमवर्गातील अनेक लोक मिळतील जे म्हणत असतात कामगार चिडखोर-भांडकुदळ असतातच, ते लहानसहान गोष्टींवरून भांडण-वाद-मारामारी करायला तयारच असतात. परंतु जर ते त्यांच्या एसी घरांमधून बाहेर पडले आणि कामगारांच्या परिस्थितीचा आढावा घेतला तर त्यांना कळेल की ही नफेखोर भांडवली यंत्रणा कामगारांना अशी संघर्षमय जीवन जगण्यास प्रवृत्त करते ज्यात त्यांना पपाण्यासारख्या मूलभूत आवश्यकतांसाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो. परंतु ज्या लोकांच्या घरी पाईपलाईनीतून पाणी येते आणि ते पाणी फक्त पिण्यासाठीच नाही तर त्यांची कार धुण्यासाठी, घरातील पाळीव कुत्र्याला आंघोळ घालण्यासाठी सुद्धा वापरतात त्यांच्याकडून परिस्थिती समजण्याची अपेक्षा केल्या जाऊ शकत नाही.
शेवटी कामगार वर्गाची परिस्थिती फक्त शहाबाद डेअरी वस्तीतच भयावह नाही तर पूर्ण भारतात सारखीच आहे. नफ्यावर आधारित मनुष्यभक्षी भांडवली व्यवस्थित यापेक्षा वेगळी काही अपेक्षा केल्याचं जाऊ शकत नाही.
अनुवाद : डॉ. निखिल
कामगार बिगुल, जुलै 2018