नौजवान भारत सभेतर्फे फिरत्या वाचनालयाची सुरुवात
वाचनसंस्कृती रुजवण्याचा, कष्टकऱ्यांच्या दारापर्यंत ज्ञानाचा झरा पोहोचवण्याचा उपक्रम

प्रवीण  एकडॆ

एकच शत्रू असे आपुला

अज्ञान

धरुनी त्याला पिटायाचे

आपल्यामधुनी हुसकायाचे

– सावित्रीबाई फुले (अज्ञान या कवितेतील एक उतारा )

नौजवान भारत सभा या  क्रांतिकारी युवक संघटनेतर्फे पुणे शहराच्या दांडेकर पूल, कात्रज व इतर विविध भागांमध्ये “फिरत्या वाचनालयाची” सुरुवात केली गेली आहे. या वाचनालया अंतर्गत झोपडवस्तीत राहणाऱ्या कामगार कष्टकऱ्यांच्या घरी जाऊन पुस्तके वितरित केली जात आहेत. ज्ञानाच्या संधीपासून वंचित केल्या गेलेल्या कामगार कष्टकऱ्यांपर्यंत आणि त्यांच्या मुला-मुलींपर्यंत जगातील उत्तमोत्तम साहित्याचा, विज्ञानाचा, कला-संस्कृती आणि मनोरंजनाचा खजिना पोहोवण्यासाठी झोळीमध्ये पुस्तके घेऊन युवक कार्यकर्ते घरापर्यंत पोहोचत आहेत.  नौजवान भारत सभेचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन कामगार कष्टकऱ्यांना पुस्तकांबद्दल माहिती देतात, वाचनाचे महत्व समजावून सांगतात. पुस्तक देताना जनते कडून 1 रूपया प्रति पुस्तक किंवा महिन्याला 10 रुपये असा सहयोग ही घेतला जातो. गेले 2 महिने फिरत्या वाचनालयाचे काम अविरतपणे सुरू आहे. विशेषतः स्त्रियांना आणि छोट्या मुला-मुलींना या फिरत्या वाचनालयाच्या माध्यमातून ज्ञानाच्या अथांग सागराची ओळख करून देण्याचे काम ते करत आहेत. वाचनालयाला कामगार कष्टकऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमामागील विचार आणि कार्यपद्धती क्रांतिकारी समाजपरिवर्तनाच्या कामामध्ये एक नवीन प्रयोग आहे आणि अशा प्रयोगांना जागोजागी अजून मोठ्या रुपात राबवण्याची गरज आहे.

मोदी सरकार सत्तेत आल्या पासून राष्ट्रवाद शिकवण्याच्या नावाखाली अतार्किक आणि अवैज्ञानिक शिक्षण अभ्यासक्रमात सामाविष्ट केले जात आहेत. शाळेत भूतविद्या, ज्योतिष्यशास्त्र सारखे विषय समाविष्ट करून समाजात अज्ञानता पसरवली जात आहे. अशात गरज आहे ती जनतेत तार्किक, वैज्ञानिक विचार घेऊन जाण्याची. शहीद भगतसिंह पासून ते सुखदेव, राजगुरू, शिव वर्मा, चंद्रशेखर आजाद यासारख्या असंख्य क्रांतिकारकांचे चरित्र आणि विचार पुस्तकांच्या माध्यमातून नवा विचार नौजवान भारत सभा जनतेत घेऊन जात आहे.  फक्त पुस्तक देण्याचेच नाही तर पुस्तकांवर चर्चा घडवण्याचे कामही या वाचन उपक्रमा अंतर्गत केले जात आहे. लोकचवळीचे रुप असलेल्या या फिरत्या वाचनालयाचे काम हे पूर्णपणे जनतेच्या आर्थिक सहयोगातूनच चालवले जात आहे.

आजच्या या मानवद्रोही समयी गरज आहे ती भविष्याचा रस्ता दाखवणारे साहित्य कामगार कष्टकऱ्यांमध्ये घेऊन जाण्याची. ‘शहीद भगतसिंह’ यांच्या शब्दात असे भविष्य जिथे माणसाकडून होणारे माणसाचे शोषण अशक्यप्राय होऊन जाईल. सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांनी आपले अवघे आयुष्य समाजातील वंचित घटकांना, स्त्रियांना तर्कशुद्ध आणि वैज्ञानिक शिक्षण देण्यात घालवले. अज्ञानाचा फायदा घेऊनच भांडवलदार वर्गाने कामगार कष्टकऱ्यांच्या शोषणाचे काम अविरतपणे सुरू ठेवले आहे. आज या अज्ञानाचाच फायदा घेऊन संघ परिवारासारख्या सांप्रदायिक शक्ती कामगार कष्टकऱ्यांच्या खऱ्या समस्यांपासून लक्ष हटवून त्यांच्यापुढे खोटे शत्रू सादर करत आहेत. कुठे हे शत्रू दलितांच्या रूपात आहेत तर कुठे धार्मिक अल्पसंख्याक, मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्या रूपात. या अज्ञानाचा फायदा घेऊनच सांप्रदायिक शक्ती कामगार कष्टकरी वर्गातील एका हिश्श्याला दंगलखोर बनवत आहेत, कामगार कष्टकऱ्यांमध्ये एकी होऊ नये म्हणून त्यांच्यात जाती धर्माचे झगडे लावत आहेत. आज गरज आहे ‘शहीद भगतसिंह’ यांनी लिहिलेला ‘जाती धर्माचे झगडे सोडा खऱ्या लढाईशी नाते जोडा’ सारखा लेख कामगार कष्टकऱ्यांमध्ये घेऊन जाण्याची. आज गरज आहे अश्फाक-उल्लां खान, रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्र लाहिरी, रोशन सिंग यांचा वारसा जनतेत घेऊन जाण्याची.

पितृसत्ताक समाजाने महिलांना नेहमीच दुय्यम स्थान दिले आहे. पितृसत्तेने महिलांना चूल आणि मूल अशा दुहेरी भूमिकेत बांधून ठेवले होते आता या भांडवली व्यवस्थेने महिलांवर चूल-मूल आणि सोबतच नोकरी अशी तिहेरी जबाबदारी टाकली आहे. अनेक महिलांना कामावरून घरी आल्यानंतर घरातील काम आणि मुलांना सांभाळावे लागत असल्याने घरातून बाहेर पडणे अशक्य बनले आहे. फिरत्या वाचनालयाच्या माध्यमातून त्यांच्या पर्यंत साहित्य पोहचत असल्याने महिलांमध्ये वाचनासाठीचा उत्साह वाढत आहे. अनेक महिला आग्रहाने पुस्तक घेतात आणि वाचून झाल्यावर त्यावर चर्चाही करतात. आपल्या मनातील संकोच दूर करून अनेक महिला आता नौजवान भारत सभेच्या वाचनालयात येऊनही पुस्तके वाचायला घेऊन जात आहेत.

भांडवली व्यवस्थेने निर्माण केलेल्या निराशेच्या वातावरणाने अनेक तरुण हताश झाले आहेत. देशात करोडो तरुण आज कामा अभावी बेरोजगारांच्या फौजेत सामील झाले आहेत. निराशेतून अनेक तरुण नशेच्या आहारी जात आहेत, देशात तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आज गरज आहे या तरुणांसमोर नव्या समाजनिर्मितीच्या आशा पल्लवीत करण्याची आणि या भांडवली व्यवस्थेचे चरित्र उघडे करण्याची. बेरोजगारी सारख्या प्रश्नांची योग्य समज नसल्यामुळे अनेक तरुण जाती धर्माच्या झगड्यात खोट्या प्रचाराला बळी पडून दंगेखोरांच्या जमातीत सामील होत आहे. आज गरज आहे आपले वैकल्पिक मीडिया उभारून तसेच फिरत्या वाचनालयाच्या माध्यमातून या तरुणांपर्यंत पर्यंत या भांडवली व्यवस्थेने निर्माण केलेल्या प्रश्नांची योग्य समजदार घेऊन जाण्याची.

कामगार कष्टकऱ्यांमधील या भांडवली व्यवस्थेने निर्माण केलेले भ्रम दूर करायचे असतील, तार्किक आणि वैज्ञानिक विचारांचा प्रचार-प्रसार करायचा असेल, योग्य राजकीय समजदारीवर उभे असलेले क्रांतिकारी आंदोलन उभे करायचे असेल तर क्रांतिकारी साहित्याचा प्रचार प्रसार करणे आत्यंतिक आवश्यक आहे. देशभरात या सारख्या असंख्य फिरत्या वाचनालयाचे जाळे निर्माण करणे गरजेचे आहे. मानवी संवेदना, विवेकाला आवाहन करतील असे साहित्य जनतेत घेऊन जाणे गरजेचे आहे. आज कामगार कष्टकऱ्यांपर्यंत असे साहित्य घेऊन जाणे आवश्यक आहे जे या माणसाद्वारे माणसाचे शोषण करवणाऱ्या, अन्यायावर आधारलेल्या शोषणकारी व्यवस्थेविरुध्द जनतेला उद्वेलित करेल आणि न्यायावर आधारित समाजवादी व्यवस्था निर्माण करण्यासाठी शिक्षित करेल.

कामगार बिगुल, फेब्रुवारी 2021