कविता – बायांनो ! बोला!

कविता कृष्णपल्लवी, अनुवाद: राहुल

बायांनो ! बोला!
कष्टाच्या दुहेरी बोजाने, थकून दमलेल्या
उदास-निराश सर्व बायांनो! बोला!
खुल्या कंठाने बोला !
तोंडावर बांधलेली पट्टी ओरबाडून
छातीवर ठेवलेल्या वजनी दगडाला
दूर ढकलत बोला!
वर्षानुवर्षं सहन केलेल्या
कोंडमारा, अंधार आणि
जुलमा बद्दल सांगा !
घराच्या दरवाजाच्या साखळी विरोधात,
चुलीच्या डोळे चुरचुरवणाऱ्या धुराच्या विरोधात,
भाषेच्या कैदखान्याच्या आणि लादलेल्या
नैतिकता आणि मज्जावांच्या विरोधात बोला!
अंधारात मागे कधीतरी
ठेचल्या, चुरडल्या गेला होतात त्याबद्दल
खुलेआम बोला!
तुमच्या कोंडमाऱ्या आणि भितीबद्दल
खुल्या मंचावरून बोला !
सोसलेल्या सक्ती, धोके आणि
बेईमानी बद्दल सांगा
आणि गाठी सोडून सृजन-पाखरू बना
पंख पसरून उडण्यासाठी !
बोलाल तर प्रत्येक अनाचार आणि
अत्याचारा विरुद्ध बोला !
भांडवलाच्या पाशविकते विरोधात आणि खुनी
फॅसिस्ट पंजांविरोधात बोला
अर्ध्या आकाशाच्या आणि अर्ध्या धरतीच्या
हिश्श्यासाठी
न्याय आणि अधिकाराच्या लढाईतही
अर्धा हिस्सा तर द्यावाच लागेल !
म्हणूनच बोला !
भविष्यातल्या स्त्रियांसाठी
येणाऱ्या पिढयांसाठी बोला!
बोलून करायचीय तुम्हाला एक सुरूवात
मिळवायची आहे हरवलेली
मनुष्यता, सन्मान आणि आशा
मिळवायचे आहे
आपली स्वप्न आणि जीवनाचे ध्येय !
नाही! असे नाही कि बोलू लागताच
नवी पहाट उजाडणार आहे
पण विश्वास ठेवा , रात्र ढळण्याची
गती मात्र नक्कीच खूप वाढेल !

कामगार बिगुल, फेब्रुवारी 2021