तुमच्या सदाचाराचा ऱ्हास – 2

राहुल सांकृत्यायन  (अनुवाद – प्रविण सोनवणे)

लेखकाचा परिचय

राहुल सांकृत्यायन खऱ्या अर्थाने जनतेचे लेखक होते. ते आजच्यासारख्या तथाकथित प्रगतिशील लेखकांसारखे नव्हते, जे जनतेच्या जीवन आणि संघर्षापासून अलिप्त राहून आपापल्या महालांमध्ये बसून कागदावर प्रकाश टाकत असतात. जनतेच्या संघर्षाचे मोर्चे असोत वा सरंजामदार-जमीनदारांच्या शोषण-दमनाच्या विरूद्ध शेतकऱ्यांच्या संघर्षाचा लढा असो, ते नेहमीच पहिल्या फळीत उभे राहिले. अनेक वेळा तुरूंगात गेले, यातना सहन केल्या. जमीनदारांच्या भाडोत्री  गुंडांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्लासुद्धा केला, परंतु स्वातंत्र्य, समानता आणि मानवी स्वाभिमानासाठी ते ना कधी संघर्षातून मागे  हटले आणि ना कधी त्यांची लेखणी थांबली.

जगभरातील 26 भाषा अवगत असलेल्या राहुल सांकृत्यायन यांच्या अचाट बुद्धीचे अनुमान यावरूनसुद्धा लावता येऊ  शकते की,  ज्ञान-विज्ञानाच्या अनेक शाखा,  साहित्याच्या अनेक प्रकारांमध्ये त्यांनी हातोटी मिळवली होती.  इतिहास, तत्वज्ञान, पुरातत्वशास्त्र,  मानववंशशास्त्र, साहित्य, भाषा-विज्ञान इ. विषयांवर त्यांनी अधिकारवाणीने लेखन केले. बौद्धिक गुलामी, तुमचे अध:पतन, पळू नका-जगाला बदला, तत्वज्ञान-संदर्भ, मानवसमाज, वैज्ञानिक भौतिकवाद, जय यौधेय, सिंह सेनापती, साम्यवादच का?,  बावीसावे शतक इ. रचना त्यांच्या महान प्रतिभेची ओळख स्वत:हूनच करून देतात.

राहुल देशातील दलित-शोषित जनतेला हर-तऱ्हेच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी लेखणीचा हत्यारासारखा वापर  करायचे. त्यांचं म्हणणं होतं की, “साहित्यकार जनतेचा जबरदस्त सहकारी, सोबतच तो त्यांचा नेता (पुढारी) आहे. तो सैनिक आहे आणि सेनापतीसुद्धा.”

राहुल सांकृत्यायन यांच्यासाठी जीवनाचं दुसरं नाव गती होतं आणि मरण किंवा स्तब्धतेचं दुसरं नाव होतं गतिरोध. यामुळेच अगोदरच तयार असलेल्या मार्गावर चालणे त्यांना कधीही आवडले नाही. ते नव्या मार्गाचे संशोधक होते. परंतु फिरणे म्हणजे त्यांच्यासाठी फक्त  भूगोलाची ओळख करून घेणे नव्हते. ते सुदूर देशांतील जनतेचं जीवन आणि त्यांच्या संस्कृतीशी, त्यांच्या जिजीविषेशी ओळख  करून घेण्यासाठीचं फिरणं होतं.

समाजाला मागे ढकलणाऱ्या हरतऱ्हेच्या विचार, रूढी, मूल्ये, मान्यता-परंपरांच्या विरूद्ध त्यांचे मन अतिशय तिरस्काराने भरलेले होते. त्यांचं संपूर्ण जीवन आणि लिखाण याविरूद्ध विद्रोहाचं जितं-जागतं उदाहरण आहे. यामुळेच त्यांना महाविद्रोहीसुद्धा म्हटले जाते. राहूल यांची ही वेगळी रचना आजसुद्धा आपल्या समाजातील प्रचलित रूढी-परंपरांच्या विरुद्ध  तडजोड विहीन संघर्षाची आरोळी आहे.


मद्यपान

जगातील अनेक मुख्य धर्म दारूला निषिद्ध मानतात. इस्लाम सुद्धा तिला अगदी कट्टर शत्रू मानतो. दारू पिणे मोठा दुराचार मानला जातो. पण धनिकांमध्ये गेल्या तेराशे वर्षांमध्ये किती जणांनी या नियमावर अंमल केला आहे? अनेक ठिकाणी तर दारूच्या दुकानांचे मालकच मुसलमान आहेत. ज्या काळात मुसलमानी सत्तांनी दारू विरोधात कडक शिक्षा ठरवून दिल्या होत्या, त्या काळातही धनिक लोकांना दारू पिण्यात काही अडत नव्हते. हिंदूंमध्ये सुद्धा अनेक संप्रदाय दारू पिण्याला महापाप समजतात. पण किती जाती आहेत ज्यांच्यामधील धनिक दारूपासून दूर आहेत? ब्राह्मण, मारवाडी, राजपूत, ज्या कोणाकडे खर्च करायला भरपूर पैसा आहे, तो विनासंकोच पितो; आणि जातवाले टूक-टूक पहात राहतात. दारूमागे लाठी घेऊन फिरणाऱ्या महात्माजींच्या अनुयायांमध्ये सुद्धा किती मोठ-मोठे महापुरूष आहेत जे आतून तर आपल्या गुरूशी मतभेद ठेवतात, पण दारूबंदीची व्यवस्था लागू करण्यात ते कोणापेक्षाही मागे राहणार नाहीत.

असत्य

सत्य बोलण्यावर धर्म आणि समाज जोर देत आहेत; आणि मी मानतो की, जर समाजात कृत्रिमता नसेल तर ते तितके अवघड नाही! तेव्हा सत्य बोलणे सुद्धा आजकाल किती अवघड काम आहे, हे सांगण्याची गरज नाही. या मुश्किलीचे उत्तरदायित्व शेवटी आपल्या समाजाच्या सध्याच्या संरचनेवरच आहे, जिच्यात खरे बोलणाऱ्यांसाठी स्थानच नाही. आपल्या राजकीय संस्था तर खोटारडेपणाच्या प्रचाराचे सर्वात मोठे अड्डे आहेत. खोटे बोलले जाते ते लोकांना फसवण्यासाठी. आपल्या स्वार्थासाठी खोटे बोलून दुसऱ्यांना धोका देणे हे प्रत्येक राष्ट्र आणि राजकारणी आपले परम कर्तव्य समजतो. राजकीय शब्दकोषात जणू खोटे बोलणे हे पाप समजलेच जात नाही. आपल्या धर्मात आणि समाजात सत्य बोलण्यावर एवढा जोर बिनकामाचा आहे, कारण दुसरीकडे तेच व्यक्तींना खोटे बोलण्यास भाग पाडतात. शाळेत एखाद्या मुलाने शाईची दौत तोडली. जर त्याने तोडल्याचे स्विकारले तर त्याला शिक्षा आणि निर्भत्सनेला तोंड द्यावे लागेल आणि खोटे बोलले तर तो सरळ सुटून जाईल. हाणामारी आणि इतर अपराधांमध्ये सुद्धा खोटे बोलणारेच नफ्यात राहतात, मग कोण खरे बोलून शिक्षा भोगायला तयार होईल? प्रामाणिकपणे काम करून पोट भरणे सुद्धा आजकाल मुश्किल आहे. खरे बोलून लोकांशी मैत्री करणे सुद्धा अशक्य आहे. यामुळेच तर माणसाला खोटं बोलणे भाग पडते. आजकाल तर मोठ-मोठी संपत्ती, मोठ-मोठे पद, मोठ-मोठे सन्मान हे खोटं बोलण्याच्या कौशल्यासाठी पारितोषिकं आहेत; बोलायचा सदाचार एक आहे आणि वागायचा दुसरा. जोपर्यंत संपूर्ण समाजाच्या बाबतीतच हे खरे आहे, तोपर्यंत एक क्षुल्लक व्यक्ती स्वत:ला त्यापासून कसे वाचवू शकतो. अनेक जंगली जमाती आहेत ज्या भांडवली सभ्यता आणि संस्कृतीच्या तुलनेत खालच्या मानल्या जातात, पण त्यांच्यामध्ये असत्य फार कमी दिसून येते. याचाच अर्थ आहे की ही सभ्यता आणि संस्कृती उन्नत होऊन आपल्या समाजाला सत्यासंदर्भात तर अजून खालीच घेऊन जाते. आपल्या समाजाने ढोंग आणि आत्मवंचनेला जितका अधिक आश्रय दिला आहे तितकाच प्रत्येक व्यक्ती आपल्या विचारांना स्वतंत्ररित्या प्रकट करण्यात असमर्थ बनला आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती स्वत:साठी तर अशी इच्छा करत नाही, पण इतरांना धोका देऊन आपला कार्यभार मात्र साधू पाहतो. कोणाचा कोणावर पूर्णत: विश्वास नाही, याचा परिणाम होत आहे—स्त्री पुरुषाला सोडू पाहते आणि पुरुष स्त्रीला; बाप मुलाला धोका देऊ पाहतो आणि मुलगा बापाला. शेवटी या प्रकारच्या वंचना, अराजकतेला जबाबदार कोण आहे? आपला समाज.

चोरी-लाचखोरी

जुन्या काळात चोरी करणाऱ्याचे हात छाटले जात असत, जीवही घेतला जाई.आजकाल शिक्षा थोड्या हलक्या झाल्या आहेत, पण समाजाच्या नजरेत मात्र चोरी हे मोठे पाप समजले जाते. चोरीकरिता कडक कायदे आणि मोठमोठे तुरूंग बनले आहेत. सरकार लाखो रूपये पोलिसांवर खर्च करत आहे. मोठ-मोठे पगार घेणारे जज्ज आणि मॅजिस्ट्रेट यासाठीच नेमले आहेत. पण यामुळे काही पायबंद बसला का? ज्या लोकांना चोरी बंद करवण्याचे काम मिळाले आहे, तेच जर स्वत:च चोरी करत असतील, तर चोरी बंद कशी होणार? पोलिस चोरांना पकडण्यासाठी आणि चोरी थांबवण्यासाठी स्वत:ला जबाबदार समजतात, पण चौकीदार आणि कॉंस्टेबलच नाही तर ठाणेदार, इन्सपेक्टर आणि वरचे अधिकारी सुद्धा हात गरम झाले की नरम होतात. सर्व लोक जाणतात की शंभरातले नव्वद ठाणेदार लाच घेतात, गावांकडे तर कोणापासून हे लपले आहे? पोलिस काही चोरांना पकडून तुरुंगात तर धाडतात, पण कधी कोणी हिशोब लावला आहे का, की किती खऱ्या गुन्हेगारांना त्यांनी पैसे घेऊन सोडले आहे? जनतेचे सरकार स्थापित झाल्यानंतरही आपण पोलिसांच्या या प्रवृत्तीमध्ये काही फरक पाहू शकत नाही. जोपर्यंत असा लाचखोरीचा बाजार चालू आहे, तोपर्यंत चोरी कशी थांबणार? विचार करा की ज्या लोकांना आपल्या कुटुंबाच्या गुजाऱ्यासाठी दरमहिना भरपूर पैसे मिळतात, ते सुद्धा जर अवैध उत्पन्नापासून दूर राहू शकत नाहीत, तर भूकेने बेजार होऊन चोरी करणारे स्वत:ला कसे थांबवू शकतील?

तुरुंगामध्ये अपराध्याला सुधारण्यासाठी पाठवले जाते. कोण्या काळी शिक्षेचा अर्थ होता गुन्हेगाराला यंत्रणेची जरब बसवणे, पण आजच्या सभ्यतेत तुरूंग आणि शिक्षेला सुधार करण्याची संधी म्हणून पाहिले जाते. या तुरुंगांची अवस्था काय आहे? कैदी तिथे जाऊन पहातो की छोट्या शिपायापासून सुपरिंटेंडंट पर्यंत सर्वजण कैद्यांच्या हिश्श्यातून काहीनाकाही आपल्या गरजेसाठी घेतात. तीन मण तांदळातून अर्धा मण काढला जातो. गव्हाच्या पिठात भुसा आणि माती सुद्धा टाकली जाते. चांगल्या भाज्या अधिकाऱ्यांसाठी बाजूला काढल्या जातात, साध्या भाजीतला सुद्धा चांगला भाग इतरच कोणी घेऊन जाते आणि कैद्यांच्या वाटेला येते फक्त झाडपत्ती. तेल, दूध, तूप, गूळ—अशा सर्व वस्तूंमध्ये सुद्धा याच प्रकारची लूट आहे. सिगारेट आणि तंबाखूवर बंदी आणून सरकार कैद्यांना संयमाचे धडे देऊ पहाते, पण याचा परिणाम फक्त इतका आहे की पैशावाल्या कैद्यांना या गोष्टी थोड्या महाग मिळतात. खरेतर ज्या कैद्याकडे लाच द्यायला पैसे आहेत, त्याला जेल मध्येही सर्व सुविधा उपलब्ध होतात. अशा वातावरणात खरंच काही सुधार होईल?

(पुढील अंकामध्ये याच लेखाचा राहिलेला भाग: तुमच्या न्यायाचा ऱ्हास)

कामगार बिगुल, मार्च 2021