सवालाचा जबाब दे रं

भास्कर जाधव

ही आग चहू बाजूनं हो लागली संसारा
सवालाचा जबाब दे रं देशाच्या सरकारा
दुधाच्या रंगाची आज बुजली वळख
परागंदा झालं हो, खोबरं खारीक
गुळाच्या चहावर बाळाचा गुजारा
सवालाचा जबाब दे रं …
सोन्याची किंमत आली, गोडया रं तेलाला
खोबरेलचा थेंब, आम्हा मिळंना डोईला
घासलेटावाचून अंधार सोईरा
सवालाचा जबाब दे रं …
उन्हात भाजतो, आम्ही पावसात भिजतो
थंडीचा कडाका, उघडयानं सोशितो
आम्हालाच अजून का मिळंना निवारा
सवालाचा जबाब दे रं …
रात्रंदिस राबून, आम्ही झोपतो उपाशी
आईतखाऊ हा तिकडं, जेवतो तुपाशी
चोराला मलिदा, अन् धन्याला धतुरा
सवालाचा जबाब दे रं …
मोठयाच्या गुराला, चराया गायरानं
जंगलाच्यासाठी आहे, राखली जमीन
माणसाला जगण्यासाठी नाही का आसरा
सवालाचा जबाब दे रं …
स्वराज्याच्यासाठी, आम्ही भरिले तुरुंग
गोऱ्याच्या गादीला, आम्ही लाविला सुरुंग
हे पोळ पोसाया का आम्ही पुजीला देव्हारा
सवालाचा जबाब दे रं …
मजूरीत वाढ आणि बेकारांना काम
कसण्यासाठी आम्ही, थोडी मागतो जमीन
तुरंग काठया गोऱ्यांचा का मिळतो इशारा
सवालाचा जबाब दे रं …
आता आम्ही राहू, उभे पायावर
जाती धर्म भेद, आम्ही सोडू वाऱ्यावर
राबणाऱ्या गोताचा करीत पुकारा
सवालाचा जबाब दे रं …
घेतो आज आण आम्ही, जिवानिशी लढू
भांडवलशाहीला, आम्ही मसणात गाडू
आमुच्या राज्याचा हो वाजवू नगारा
सवालाचा जबाब दे रं …

कामगार बिगुल, जुलै 2020