कामगारबंधो
नामदेव ढसाळ
हे जग तुझ्या श्रमावर चालले आहे
किती रे करतोस रक्ताचे पाणी
मी तुलाच सर्जनाचा निर्माता मानतो
बाकीच्यांचा हिशोब कशाला?
एकतृतीयांश जगावर रक्ताने रंगलेला ध्वज फडकावणारा तच
ह्या देशाच्या रक्तधमनीतून वाहणाराही तूच
लोखंडाला वितळवणारा आणि आकार देणाराही तूच
जिथं जिथं यंत्राचा वावर झाला त्या शहरांना
क्रांतिकारक वारसा देणाराही तूच
तुझे घामेजलेले स्नायूबद्ध चित्र मी माझ्या
कवितेत प्रतिमेसाठी वापरतो.
माझ्या कवितेला सप्राण करतो.
तिचा आणि तुझा सन्मान करतो.
मला माहिताहे की तूच लढू शकतोस गुलामगिरीविरुद्ध
मला माहिताहे की तूच पर्दाफाश करू शकतोस सरंजामशाहीचा
मला माहिताहे की तूच मूठमाती देऊ शकतोस भांडवलशाहीला
मला माहिताहे की तूच वितरणासाठी वापरू शकतोस शासनयंत्रणा
तुझा मी स्तुतिपाठक भाट
त्यांच्या लेखी मी देशद्रोही आणि गुन्हेगार
ते वल्गना करताहेत माझ्या घरावरून नांगर फिरवण्याची
कामगारबंधो!
ज्या हिटलरचं थडगं तू बांधलंस
त्या थडग्याचाच ह्या कुत्रांना विसर पडलाय.
कामगार बिगुल, जानेवारी 2020