स्त्री विरोधी वाढते अत्याचार
पितृसत्ताक समाज आणि भांडवलशाहीच जबाबदार!!

अश्विनी

गेल्या दोन दशकांपासून स्त्री विरोधी अत्याचार, बलात्कार, हिंसा या सर्व घटनांमध्ये अतोनात वाढ झाली आहे. बलात्कार झाल्यावर मारहाण करून खून करण्याचेही प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. दररोज वर्तमानपत्रात कुठे तरी कोपऱ्यात स्त्री विरोधी अपराधाची एक तरी बातमी आढळतेच. देशाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात हे घडतंच असते असे म्हणून अनेकजण सहज कानाडोळा करून जातात. पण देशातल्या एखाद्या कोपऱ्यातली ही बातमी जेव्हा आपल्या राज्याची, आपल्या गावाची इतकचं नाही तर आपल्या गल्लीतली, आपल्या वस्तीतली होऊन बसते तेव्हा मात्र अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते.
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीतील राबिया बलात्कार घटनेने बातम्यांची ही मालिका भांडवली मीडियात पुन्हा सुरू झाली. त्या घटनेबाबत दिल्लीत आंदोलने चालू असतानाच 31 ऑगस्ट रोजी पुण्यात दुसरी घटना घडली. 14 वर्षीय मुलगी मित्राची वाट पाहत रेल्वे स्थानकावर उभी असताना अज्ञात रिक्षाचालकाने खोटी माहिती देऊन तिचे अपहरण केले. आपल्या इतर मित्रांना सोबत घेतले व शहराच्या विविध भागात नेऊन दोन दिवस तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेत सुरुवातीला रिक्षाचालक, रेल्वे कर्मचारी, व लॉज धारक अशा एकूण 14 लोकांना अटक केली गेली. घटनेचा खुलासा होत असताना एक एक माहिती समोर येऊ लागली. मुलीवर मुंबईतही बलात्कार झाले व एकूण आरोपींची संख्या 17 झाली आहे. सध्या जलदगती न्यायालयात (फास्ट्ट्रॅक कोर्टात)खटला चालू आहे. ह्या घटनेविषयी चर्चा चालू असतानाच पुण्यातीलच खेड तालुक्यातील आणखी एक घटना घडली. 12 वर्षीय बालिकेवर 6 लिंगपिसाटांनी 2 ते 2.5 महिने लैंगिक अत्याचार केले. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही हे अत्याचार केले गेले. पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवल्यावर 9 आरोपी अटकेत घेतले मात्र त्यातील 3 फरार झाले. महिलांवरील अत्याचाराचे हे सत्र सुरू असतानाच मुंबईत साकीनाका येथे दिल्लीतील निर्भया घटनेची पुनरावृत्ती झाली. 32 वर्षीय महिलेवर 45 वर्षीय नराधमाने एका टेंपोमध्ये बलात्कार केला, लोखंडी रॉडने मारहाण केली. एवढ्यावर भागले नाही तर महिलेच्या योनीत तोच लोखंडी रॉड खुपसून क्रूरतेचा कळस गाठला. उपचारादरम्यान अती रक्तस्त्रावामुळे महिलेचा मृत्यू झाला. घटनांमागून घटना वाढतच आहेत. उल्हासनगरमध्ये स्कायवॉक वरून जाणाऱ्या 15 वर्षीय मुलीच्या डोक्यावर हातोडा मारून एका नराधमाने तिचे अपहरण केले व स्टेशनबाहेर नेऊन झोपडीत तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या एका घटनेत 13 सप्टेंबर रोजी ठाण्यातील 6 वर्षीय मुलीवर घरात एकटीच असल्याचा फायदा घेऊन मुलीच्या मामानेच बलात्कार केला. अमरावती व पालघरच्या घटनेत अनुक्रमे 17 व 15 वर्षे वयाच्या गर्भवती मुलींवर शेजाऱ्याने बलात्कार केले. बदनामीच्या भीतीने अमरावतीच्या युवतीने आत्महत्या केली. 11 ऑक्टोबर रोजी मुंबईत लोकलमध्ये 8 जणांनी सामुहिक बलात्कार केला आहे. झालेल्या सर्वच घटनांची माहिती द्यायला गेले तर जागा अपुरी पडेल. बलात्कार, स्त्रीअत्याचार हे रोजच्या जीवनाचे भयावह वास्तव बनले आहे.
उत्तर प्रदेशमधील हाथरस बलात्काराच्या घटनेला वर्ष पूर्ण होतंय. देशभरात ह्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले, आंदोलने झालीत, राजकारण झाले पण काही दिवसानंतर जनतेचा राग मावळला. पुन्हा जो तो आपल्या घरात जाऊन बसला. दिल्लीनंतर कठूआ, उन्नाव, मुझफ्फरपूर, हाथरस, बलरामपूर ह्या ठिकाणी विविध बलात्काराच्या घटना आणि अमानुष कृत्ये घडली. अजूनही देशभरात विविध ठिकाणी अशा घटना घडत आहेत. मीडियाने लक्ष दिलेल्या थोड्या घटना तेवढ्यापुरते काहूर माजवतात, सामान्य जनता भडकून रस्त्यावर उतरते, एकत्र येऊन अशा घटनांना विरोध करते, त्या घटनांवर राजकारण होते, कडक कायदे केले पाहिजेत, फाशीसारख्या शिक्षांची वगैरे मागणी होते, पण शेवटी राग शांत झाल्यावर सगळे गप्प होतात. हे सत्र वर्षानुवर्ष असेच सुरू आहे, त्यात कुठे बदल होताना दिसत नाहीये की या कृत्यांवर कुठे लगाम बसताना दिसत नाहीये. उलट कैक पटींनी हे अत्याचार वाढतच आहेत.
स्त्रियांवरील अत्याचाराच्या बाबतीत इतिहासाचा थोडा अभ्यास केल्यास लक्षात येते की 2019 च्या वर्षभरात गेल्या वर्षाच्या म्हणजेच 2018 च्या घटनांपेक्षा 7 टक्क्यांनी वाढ झाली. 2018 मध्येच एकूण नोंदवले गेलेले स्त्री विरोधी अत्याचार 3,78,236 इतक्या मोठ्या संख्येत होते. 2020-2021 वर्षात तर त्यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. आणि त्यातही प्रामुख्याने जाणून घेण्याची बाब म्हणजे वर दर्शविलेली संख्या ही फक्त पोलिस स्टेशनला येऊन तक्रार नोंदवली गेली अशा घटनांची आहे. भारत हा सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या मागासलेल्या विचारांचा देश आहे. जिथे महिलेवर घडलेला अत्याचार म्हणजे महिलेनेच केलेला गुन्हा आहे अथवा तिच्याच चुकीमुळे झालेला अत्याचार आहे असे बऱ्याच प्रकरणात समजले जाते, आणि त्यामुळेच गुन्हा नोंदवणे म्हणजे अत्याचारामुळे आधीच गेलेली अब्रू चार चौघात कशाला मांडायची, समाज काय म्हणेल ही भीती! गुन्हेगाराला दोषी न मानता पीडीतेलाच दोषी मानले जाते! त्यामुळे कित्येक घटना नोंदवल्याच जात नाहीत. ह्या सर्वच घटनांची सरासरी काढली तर भारतात दर दिवसाला सरासरी 87 बलात्काराच्या घटना घडतात. म्हणजे दर 17 मिनिटाला एक महिला लिंगपिसाटांच्या अत्याचाराला बळी पडते. बलात्कार आणि त्यानंतरचा खून हा अतिशय टोकाचा गुन्हा आहे आणि ह्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये भारत हा जगाच्या अव्वल स्थानावर पोचतो आहे. त्यामुळे गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी कडक कायदे लागू करणे, वेळीच गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे ह्या मागण्या सामान्य जनतेकडून उचलल्या जातात, खुनाच्या शिक्षेचीही मागणी केली जाते. कडक शिक्षा तर झाल्या पाहिजेत, परंतु तेवढे पुरेसे नाही आणि फक्त शिक्षेने अशा प्रकारच्या गुन्हेगारीचे प्रमाण कमी होऊ शकत नाही, कारण गुन्ह्याचे कारण शिक्षेचा अभाव नसून समाजातील पितृसत्तात्मक, भेदभावकारी समाजव्यवस्था आणि लंपटगिरीला, बिभत्सतेला प्रोत्साहन देणारी भांडवली व्यवस्था आहे, हे समजणे आवश्यक आहे.
सध्या सत्तेवर असलेल्या मोदी सरकारच्या कारकिर्दीची सुरुवातच “बहुत हुआ नारी पर वार, अब की बार मोदी सरकार” असे म्हणत झाला आहे. याच सरकारने पुढे जाऊन “बेटी बचाव, बेटी पढाव”, सारखा पितृसत्तात्मक नारा सुद्धा दिला आहे (बेटी बचाव म्हणण्यामध्ये पितृसत्ता आहे हे सुद्धा अनेकांना समजत नाही!). पण वास्तव हे आहे की मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मात्र ह्या घटना वाढण्याला कुठलाच लगाम राहिला नाही. याचे एक कारण आहे की सत्तेत बसलेलेच बलात्कारी अथवा बलात्काऱ्यांचे पाठीराखे आहेत! कुलदीप सिंह सेंगर, चिन्मयानंद यासारखे फासिस्ट बलात्कारी या भाजपच्या सत्तेत सत्तेवर आहेत. उत्तरप्रदेशमध्ये “रामराज्य” आणू पाहणारे भाजपचेच योगी सरकार सत्तेवर असताना उन्नाव सारख्या घटनांमध्ये बलात्काऱ्याला वाचवण्यासाठी त्याच्याच समर्थनात रॅली काढली जाते. पोलिस प्रशासन सुद्धा अशा सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचत साधी घटना नोंदवून घ्यायलाही 8-8 दिवस लावतात. पीडितेच्या मृत्युनंतर परस्पर मृतदेह जाळायला ही ह्याच प्रशासनाचा, सत्तेचा पाठिंबा असतो. सत्ताधारीच जेथे बलात्काऱ्यांचे समर्थन करतात तेथे असे गुन्हे घडणार नाहीत तर काय?
1991 पासून आलेल्या नवीन आर्थिक नितीमुळे भारतात एकीकडे असा परजीवी वर्ग उदयाला आला जो सतत आर्थिक रित्या मजबूत होत आहे, ज्यात छोटे-मोठे उद्योगपती, दलाल, प्रॉपर्टी डीलर्स, सट्टेबाज यांच्यासारखा कष्ट न करता अपार कमाई करणाऱ्यांचा परजीवी वर्ग आहे ज्याची जीवनसंस्कृती चंगळवादीच आहे तर दुसरीकडे असेही वर्ग आहेत जे भांडवली व्यवस्थेच्या सांस्कृतिकरित्या अध:पतन झालेल्या विचारप्रणालीला आत्मसात करून, “खा, प्या व मजा करा” हे धोरण राबवत आहेत आणि स्त्री-पुरुष देहाला व्यापारवस्तू बनवणाऱ्या भांडवली संस्कृतीच्या अश्लिल विचारांचेही वाहक बनत आहेत. कामगार वर्गाचा आपल्या वर्गचेतनेपासून अलिप्त झालेला एक लंपट हिस्साही या विचारांना बळी पडत आहे. वस्तू जोपर्यंत उपयुक्त आहे तोपर्यंत वापरायची व काम झाल्यावर फेकून द्यायची हे तर निर्जीव वस्तुंबाबत ग्राह्य आहेच. परंतु हीच भोगवादी संस्कृती जेव्हा पितॄसत्तेसोबत मिसळते तेव्हा स्त्रियांनाही एक उपभोगाची वस्तू “कमोडिटी” म्हणून दाखवण्याचा प्रचारही सुरू होतो. विविध जाहिरातींमधून, सिनेमांमधून स्त्री देहप्रदर्शन दाखवून स्त्रीला “माल” बनवून हा माल उपभोगण्याची रोगी मानसिकता देखील भांडवलशाहीनेच जन्माला घातली. त्यातून भयानक कुंठाग्रस्त मनोरुग्ण लोक तयार होत आहेत. परंपरेने तर स्त्रीला स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व असते हे मानलेच जात नाही आणि त्यात भोगवादी संस्कृती वापर करायचा व वापर झाल्यावर इतर वस्तूप्रमाणेच फेकून द्यायचे ही मानसिकता रूढ करत आहे. ही रोगी मानसिकता नफा आधारित मीडियाद्वारे सर्वत्र पसरवून संपूर्ण समाज रोगी बनण्याच्या वाटचालीवर आहे. एकीकडे हनी सिंग सारखे कलाकार आपल्या गाण्यांमधून तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात स्त्री विरोधी मानसिकता पसरविण्यास कारणीभूत आहेत, तर दुसरीकडे व्यापक प्रमाणात वितरित होणारी वर्तमानपत्रे आणि टीव्ही चॅनेल्स सुद्धा स्त्रिदेहाचे बाजारी प्रदर्शन करण्यात आणि लैंगिक भावना चेतावून धंदा वाढवण्यात मागे नाहीत. पतन इतके की पोर्नोग्राफी, वेश्यांचा बाजार हे तर विश्वव्यापी बाजारात नफा कमावून देणारे महत्वाचे साधन बनले आहे!
हजारो वर्षांपासून भारतात पितृसत्ताक समाजपद्धती रूढ आहे. वंशाचा दिवा तेवत ठेवणे ह्यासाठी मुल जन्माला घालणं आणि त्याला सांभाळणे हेच तिचे समाजाने घालून दिलेले प्रमुख कर्तव्य होते. मग ह्या पुरुष सत्तात्मक समाजात स्त्री म्हणजे पुरुषाच्या पायाखालची धूळ, घरदार सांभाळणारी मोलकरीण आणि मुल जन्माला घालण्याचे मशीन एवढेच तिचे अस्तित्व होते. जसजसा समाज पुढे गेला, स्त्रियांना स्वतःच्या अस्तित्वाची, गुलामीची जाणीव होऊ लागली, बंधनं झुगारून देण्यासाठी त्या पुढे आल्या तसतसे एका हिश्श्याला मर्यादित स्वातंत्र्य तर मिळाले पण दुसरीकडे चूल आणि मूलासोबतच नोकरीची तिसरी गुलामी सुद्धा अनेकींच्या माथी मारली गेली. असे असले तरी अत्याचारांमध्ये घट नाही तर वाढच झाली आहे. घरांमध्ये राहून अत्याचार – एका अहवालातील आकडेवारीनुसार समाजात वाढणाऱ्या ह्या घटनांमध्ये 70% घटना ह्या अशा असतात ज्यात महिलेच्या घरातील, नातेवाईकातीलच कोणीतरी, जवळच्या, ओळखीच्या व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केलेला असतो. त्यामुळे स्वतःच्या घरात राहिली तर महिला सुरक्षित राहील हा तर्क कुठेही लागू होत नाही. खरेतर बलात्काराच्या अशा बहुसंख्य घटना समोर येतच नाहीत. घरांमध्ये होणारे हे बलात्कार, अत्याचार समाजासमोर धरलेला तो आरसा आहेत जे समाजालाच त्याचा भेसूर चेहरा दाखवत आहेत! यातून हे सुद्धा दिसून येते की स्त्रीला सातच्या आत घरात म्हणणारी व्यवस्था, जी तिला स्वातंत्र्य नाकारते आणि पुरुषसत्तेच्या पंजाखाली ठेवू पाहते तीच तिला घराबाहेर असुरक्षितही बनवते! स्त्रीवर बंधन आणि अत्याचार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कारण दोन्हींमध्ये स्त्री देहावर पुरुषाचा अधिकार मानलेला आहे. तेव्हा बलात्काराच्या समस्येवर स्त्रीवर बंधन नाही, तर स्त्रियांना स्वातंत्र्य, समानतेचा अधिकार हेच असू शकते!
खाजगी मालकीच्या उदयासोबत कुटुंबव्यवस्थेला, स्त्रीवरील बंधनांना, स्त्रियांच्या गुलामीला सुरुवात झाली. एकीकडे स्त्रियांना देवीचे रूप म्हटले जाते तर दुसरीकडे पायी तुडवून तिच्यावर अमानुष अत्याचार केले जातात, हा फक्त दिखावी विरोधाभास नाही तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, ज्यात स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून, अस्तित्व नाकारणे समान आहे! जोपर्यंत ही पितृसत्ताक पद्धती आणि भोगवादी भांडवलशाही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेत स्त्रियांची पूर्ण मुक्तीची अपेक्षा करणही चुकीचं आहे. ह्यासाठी स्त्रियांना एकत्र येऊन, आपल्या हक्कांची जाणीव करून घेऊन, ते मिळवण्यासाठी लढावे तर लागेलच; परंतु जर संपूर्ण स्त्रीवर्ग म्हणजेच लोकसंख्येच्या निम्म्या भागाला मुक्ती हवी असेल, अत्याचारांपासून सुटका हवी असेल, तर शिक्षण, रोजगार, जोडीदार निवडीचे खरे स्वातंत्र्य, संपत्ती संबंध आणि आर्थिक बंधनांपासून मुक्ती देणारे क्रांतिकारी परिवर्तन घडवणे म्हणजे सध्या असलेली नफाकेंद्री व्यवस्था उलथवुन टाकून नवीन मानवकेंद्री व्यवस्था जन्माला घालण्या खेरीज दुसरा उपाय नाही.