अयोध्येत राम मंदिराच्या नावाने जमीन घोटाळा
अभय
‘मुंह मे राम, बगल मे छुरी’ अशी हिंदीमध्ये म्हण आहे. तिचा अर्थ आहे की तोंडात राम नावाचे, पण इरादे मात्र धोका देण्याचे. सध्या सत्तेत असलेले संघी फॅसिस्ट या म्हणीचे मूर्तीमंत प्रतिक आहेत. रामाचे नाव घेऊन, राम मंदिर बांधण्याचे राजकारण करत ज्यांनी देशात धार्मिक विद्वेष पसरवला, दंगली घडवल्या, कामगार-कष्टकऱ्यांची माथी भडकावून स्वत: मात्र सत्तासोपानापर्यंत पोहोचले, त्या मोदी-योगींच्या राज्यामध्ये अयोध्येत राम मंदिराच्या नावाने या भक्तांनी प्रचंड मोठा जमीन घोटाळा चालवला आहे आणि भाजप व संघाचे मोठमोठे पदाधिकारी त्यात सामील आहेत.
या मंडळींनी राम मंदिराच्या ट्रस्टच्या नावाने स्वस्तात जमिनी घेऊन त्या गडगंज भावाने विकण्याचा जमिन घोटाळा चालवला आहे. अयोध्येत राम मंदिर ट्रस्ट वेगवेगळ्या बांधकामांसाठी जमिनी घेत आहे. यातच मागच्या वर्षी मोदी ने भूमिपूजन केल्यापासून जमिनींच्या किमतीमध्ये अमाप वाढ झालेली आहे. त्याचे कारण हेच की आता अयोध्येच्या भव्य राममंदिराभोवती भले मोठे पर्यटन व्यवसाय उभे राहणार असताना त्यात आपला वाटा निश्चित करण्यासाठी जमिनींचे व्यवहार करणारे दलाल, छोटे मोठे पर्यटन व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक सरसावत आहेत. जमिनींच्या उलाढाली होताहेत.
नुकत्याच समोर आलेल्या एका घोटाळ्यानुसार, अशाच एका व्यवहारामध्ये एका जमिनीच्या दोन भागांचे वेगवेगळे व्यवहार झाले, ज्यात आधी 10,000 स्क्वेअर फुट जमीन एका व्यक्तीने राम मंदिर ट्रस्टला 8 कोटी रुपयांसाठी विकली, आणि त्याच जमिनीचा दुसरा 2,000 स्क्वेअर फुट भाग त्या व्यक्तीने रवी मोहन तिवारी याला दोन कोटींसाठी विकला. आश्चर्याची बाब म्हणजे या व्यवहाराच्या एकोणीस मिनिटानंतर तोच जमिनीचा भाग तिवारी ने 18.5 कोटी रुपयात राम मंदिर ट्रस्ट च्या नावावर केला. म्हणजे एकोणीस मिनिटात दोन कोटींचे साडे-अठरा कोटी झाले. या दोन्ही व्यवहारांमध्ये साक्षीदार म्हणून सध्या असलेले अयोध्येचे महापौर, भा.ज.प. व संघाचे पदाधिकारी आणि मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी यांच्या आहेत.
दुसरी घटना. ‘मांझा बरेहाटा’ नावाचे अयोध्येच्या अगदी जवळ एक गाव आहे. इथे 1992 मध्ये काही भगवा वेषधारी मंडळी ‘महर्षी रामायण विद्यार्थी ट्रस्ट’ या नावाने आले होते ज्यांनी गावातील शेतकर्यांना आश्वासन दिले की जर त्यांनी ट्रस्टला जमिनी विकल्या तर महर्षी रामायण विद्यार्थी ट्रस्ट येत्या काळात या जमिनींवर दवाखाने, शाळा-महाविद्यालये बांधेल. या आश्वासनाच्या जिवावर शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी ट्रस्टला विकल्या. आता उत्तरप्रदेशातील कायद्यानुसार एखादी जमिन जर एस.सी. व्यक्तीकडे असेल तर तिचे व्यवहार फक्त ईतर एस.सी. कॅटेगरीत लोकांशी होऊ शकतात. या ‘रामभक्त’ लोकांनी एस.सी. व्यक्तीची जमिन हडपून ट्रस्टच्या नावे करायला बाहेरगावाहून बोलावलेल्या रोंघई नावाच्या एका एस.सी. व्यक्तीला हाताशी धरले. त्यांनी अगोदर सर्व एस.सी. व्यक्तींच्या जमिनी रोंघईच्या नावावर करवल्या आणि मग त्याने या जमिनी ट्रस्टला दान केल्या असे दाखवले. रोंघईने 1 लाखाला विकलेल्या विकलेल्या या जमिनींची किंमत आज 4 ते 9 कोटी रुपये आहे. अशा प्रकारे अयोध्येला अगदी लागून असलेल्या या गावातील बऱ्याच जमिनी हळूहळू महर्षी रामायण विद्यार्थी ट्रस्टच्या नावे झाल्या. पुढे ट्रस्टच्या ज्या जमिनींवर जे शेतकरी शेती करायचे त्यांना तिथेच ट्रस्टने शेती करू दिली. परंतु मग आता जसा राम मंदिराचा निकाल लागला तशा या जमिनींसंबंधात हालचाली सुरू झाल्या. झपाट्याने जमिनींचे भाग अधिकाऱ्यांच्या, नेत्यांच्या, आमदार खासदारांच्या, स्थानिक हिंदुत्ववाद्यांच्या, पोलिस अधिकाऱ्यांच्या नावे होताना दिसत आहेत व त्या जमिनींना कुंपणं घातली जात आहेत, त्या जमिनींभोवती भिंती बांधून त्या बंद केल्या जात आहेत. अनेक खरेदी व्यवहारांमध्ये समोर आले आहे की स्थानिक आमदार, नोकरशहा, अधिकाऱ्यांचे नातेवाईक, रिव्हेन्यू अधिकारी, राज्य माहिती अधिकारी, पोलिस अधिकारी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या थोडे अगोदर आणि नंतर मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्या आहेत. उदाहरणार्थ अयोध्येचे विभागीय आयुक्त एम.पी.अग्रवाल यांच्या सासऱ्याने, अयोध्येचे महसूल अधिकार पुरुषोत्तम दास गुप्तांचे एक नातेवाईक, गोसाईगंजचे आमदार इंद्र प्रताप तिवारी, पोलिस डेप्युटी इंसपेक्टर जनरल दिपक कुमार यांची मेव्हणी, माजी आय.ए.एस. अधिकारी उमाधर द्विवेदी, इत्यादींची नावे समोर आली आहेत. याशिवाय इतरही व्यावसायिकांशी आता या ट्रस्टने करायला सुरुवात केली आहे. लक्ष देण्याची गोष्ट ही आहे की या सगळ्याची सुरुवात 1992 पासूनच झालेली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर एका स्थानिक न्यायालयाने हे व्यवहार बेकायदेशीर ठरवत जमीन सरकारजमा करण्यास सांगितले आहे.
घोटाळे बाहेर आल्यानंतर आरोप करणार सर्वच ‘राम विरोधक’ आहेत आणि असा काही घोटाळा झालाच नाही असा प्रचार भाजप-संघाने चालू केला आहे आणि चौकशीचे नाटक करून स्वत:च्या सरकारलाच ‘क्लिन चीट’ देण्याचा सोपस्कारही निभावत आहे. भाजपने कॉंग्रेसवर आरोप चालू केले आहेत की अगोदर प्रियांका गांधींनी त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या जमिन घोटाळ्यांची चौकशी करवावी. आम्ही आपल्यास आठवण करून देऊ इच्छितो की रॉबर्ट वाड्रांविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन देत भाजप सत्तेवर आली होती, मग सत्तेत आल्यावर त्यांनी कारवाई का केली नसावी? वरवर भांडणाऱ्या या सर्व भांडवली पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांसोबत धंद्यावे व्यवहार असतात हे आता सर्वज्ञात आहे. खरेतर ‘भूखंडाचे श्रीखंड खाल्ले’ असे आरोप ज्यांच्यावर झाले त्या शरद पवारांपासून ते कॉंग्रसचे गांधी-वाड्रा, सर्वच भांडवली पक्षांचे नेते आणि भाजपचे मोठमोठे नेते हे सर्वच एकाच माळेचे मणी आहेत आणि सत्तेचा वापर करून जमिनींचे घोटाळे करणे हे सत्ताधाऱ्यांच्या नियमित कामांपैकी एक आहे.
परंतु भाजपवाल्यांचा या बाबतीत ढोंगीपणात कोणी हात धरू शकत नाही. या ‘रामाचे’ नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांसाठी, भक्तीला राजकारणाचे हत्यार बनवणाऱ्यांसाठी, ‘रामा’च्या नावाने दंगली घडवणाऱ्यांसाठी ‘राम’ आणि धर्म अजून काही नसून लोकांना एकमेकांची डोकी फोडायला लावून, मागच्या बाजूने स्वत:ची घरं भरण्याचा राजमार्ग आहे! अमित शहांच्या मुलाच्या संपत्तीत हजारो पटींनी वाढ झाली आहे, आणि पंचतारांकित पक्ष कार्यालये उभारून भाजप पक्ष सर्वाधिक श्रीमंत पक्ष बनला आहे तो असाच नाही. आजही सत्ता यांना पाहिजे आहे ती त्यांच्या पाठिराख्या कंपन्या, ठेकेदार, बिल्डर, मालकांना मोठमोठी कंत्राट देऊन अजून श्रीमंत करण्यासाठी! फक्त ऐयाश खाण्यावर आणि दिवसात तिनदा भरजरी कपडे बदलणाऱ्या ‘फकिर’ प्रधानमंत्री मोदीवर हजारो कोटी रूपये तुमच्या आमच्या घामाच्या कमाईतून केले गेले आहेत! हे विसरू नका की जेव्हा यांनी रथयात्रा काढली होती, तेव्हा सुद्धा हे आलिशान ए.सी. रथात फिरले होते! करोना काळात माणसं मरत असताना, व्हेंटीलेटर मध्ये घोटाळा करणारे हैवान आहेत हे! भाजपचे भांडवलदार मालक आजही त्यांच्यावर खुश आहेत, त्यामुळेच याच्या भ्रष्टाचाराच्या कहाण्या दलाल मीडीयामध्ये अजून येते नाहीत, पण जनता सगळे काही समजत आहे! संभाजी भगताच्या एका गाण्यात म्हटल्याप्रमाणे या लोकांनी ‘रथ राम का सजाया भाई, गेम देश का बजाया भाई’!