धर्मसंसदेच्या आडून धार्मिक विद्वेषाची आग पसरवण्याचे हिंदुत्ववादी फॅसिस्टांचे पुन्हा षडयंत्र
धर्मद्वेष नाकारा, खऱ्या मुद्यांभोवती संघटित व्हा!
जयवर्धन
“मी मनमोहन सिंहांच्या छातीत सहाच्या-सहा गोळ्या झाडल्या असत्या”, “हाती शस्त्र घ्या आणि धर्माचे रक्षण करा”, “त्यांना मारा किंवा मारले जा”, “पुस्तके ठेवा आणि शस्त्रे हाती घ्या” अशा पद्धतीची गरळ ज्या “धर्मसंसदेत” ओकली गेली ती तथाकथित “धर्मसंसद” गेल्या महिन्यात 17 ते 19 डिसेंबर दरम्यान हरिद्वार येथे काही उजव्या हिंदुत्ववादी संघटना, भाजपचे नेते, भाजपशी संबंध असलेले धर्मगुरू यांच्या प्रमुख सहभागात पार पडली. जुना आखाड्याचे महामंडलेश्वर यती नरसिंहानंद याने या “धर्मसंसदेचे” आयोजन केले होते. यात खुलेआम हाती शस्त्र घेण्याचे व मुस्लिम समाजाचा नरसंहार करण्याचे आवाहन केले गेले. नेहमीच अतिशय विखारी आणि धार्मिक सद्भावाला तडा जातील असे व्यक्तव्य करणाऱ्या धर्मगुरूंनी व नेत्यांनी इथेसुद्धा खुलेआम मुसलमानांची कत्तल करण्याची, शस्त्रे उचलण्याची व सफाया करण्याची भाषा वापरली. विदेशी मीडियातसुद्धा याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. या आयोजनात केल्या गेलेल्या भाषणांचा विषारीपणा अगदी टोकाचा होता. उदाहरणादाखल,
आनंद स्वरूप महाराज : “जर सरकार मुसलमानांविरोधात हिंसा करून हिंदू राष्ट्राची स्थापना करण्याची आमची मागणी ऐकत नसेल तर आम्ही 1857 पेक्षाही जास्त भयंकर युद्ध सुरु करू.”
बिहारचा धर्मदास महाराज :“अर्धा भारत पाकिस्तान बनला आहे, सध्या भारतात 500 पाकिस्तान आहेत…जेव्हा मनमोहन सिंगांनी संसदेत म्हटले की राष्ट्रीय संसाधनांवर मुसलमानांचा पहिला अधिकार आहे तेव्हा जर मी संसदेत असतो तर नथुराम गोडसे बनून सहाच्या सहा गोळ्या मी त्यांच्यावर झाडल्या असत्या”.
सागर सिंधू महाराज : “…मी परत परत सांगतो की 500 रुपयाचा मोबाइल ठेवा पण एक लाखाचे शस्त्र ठेवा. तुमच्याकडे कमीत कमी लाठी आणि तलवार तरी असली पाहीजे.”
स्वामी प्रबोधानंद – “…मारण्यासाठी तयार राहा किंवा मारले जा. दुसरा पर्याय नाही. म्यानमारमध्ये केले तसेच प्रत्येक हिंदूने, पोलिसांनी, सेनेने आणि नेत्यांनी सफाई अभियान हाती घ्यावे लागेल.” त्यांचा रोख म्यानमार मध्ये झालेल्या रोहिंग्या मुस्लिमांच्या कत्तलीकडे होता. 2017 मध्ये एका गाजलेल्या वक्तव्यात त्याने म्हटले होते की हिंदूंनी आठ आठ मुले पैदा करावीत जेणेकरून हिंदुत्वाला आणि समाजाला वाचवले जाऊ शकेल. 2018 ला शामली येथे तो म्हणाला की केवळ मुस्लिमच हिंदू स्त्रियांचा बलात्कार करतात.
साध्वी अन्नपूर्णा माँ उर्फ पूजा शकुन पांडे जी हिंदू महासभेची सचिव आहे. तिने सरळ सरळ मुस्लिमांची हत्या करण्याचेच आवाहन केले. ती म्हणाली, “शस्त्राशिवाय काहीच शक्य नाही. तुम्हाला त्यांना संपवायचे असेल तर त्यांना मारून टाका. मारण्यासाठी आणि जेलमध्ये जाण्यासाठी तयार रहा. जर आपल्यापैकी 100 लोक जरी 20 लाख लोकांना मारायला तयार झाले तरी आपण विजयी होऊ…धर्माला वाचवायचे असेल तर वह्या-पुस्तकांना खाली ठेवा आणि शस्त्र उचला”. इतके विखारी भाषण तिने केले. ही तीच पूजा पांडे आहे जिने 2019 च्या जानेवारीमध्ये गांधींच्या फोटोला गोळ्या झाडून नथुरामचा जयजयकार केला होता. भाजपचे नेते अश्विनी उपाध्याय आणि भाजप महिला मोर्चाच्या नेत्या उदिता त्यागी सुद्धा या धर्मसंसदेत उपस्थित होत्या. अश्विनी उपाध्याय यांनी यती नरसिंहानंदांना ‘भगवा संविधान’ भेट दिले. त्यांच्यावर याआधीसुद्धा भडकाऊ भाषणे करण्याचे आरोप लागलेले आहेत.
विशेष म्हणजे या सर्व घटनाक्रमावर भाजपच्या इतर महत्वाच्या नेत्यांनी आणि मोदींनी कुठतेही भाष्य वा टीका केली नाही आणि यात आश्चर्याची काहीच बाब नाही. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप सरकारने नेहमीच धार्मिक उन्माद पसरवणाऱ्यांना पाठबळ दिले आहे. ते उघडपणे हे करू शकत नसले तरी आर.एस.एस. आणि त्याच्या सहयोगी कट्टरपंथी संघटनांद्वारे आणि त्यांच्या नेते व कार्यकर्त्यांद्वारे केल्या गेलेल्या विद्वेषी कारवायांना, हिंसेला व भाषणांना नेहमीच सत्तेचे अभय मिळत आलेले आहे. एकतर गुन्हाच नोंद होत नाही किंवा थातुरमातुर गुन्हा नोंद करून नंतरची कारवाई टाळली जाते व त्यांना मोकाट सोडले जाते. सरकारविरोधात लिहिलेल्या एका फेसबुक पोस्टवर तत्परतेने कारवाई करून यू.ए.पी.ए. चा खटला लावणारे पोलिस या घटनेबाबत मात्र बरेच दिवस कानात बोळे आणि तोंडावर बोट ठेऊन गप्प बसले होते. शेवटी बराच गहजब झाल्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला.
या घटनाक्रमाला येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि व्यापकरीत्या भारतात उभ्या राहिलेल्या हिंदू फॅसिस्ट आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समजून घेणे महत्वाचे आहे. अशा पद्धतीची धार्मिक उन्माद पसरवणारी व तेढ निर्माण करणारी तसेच दंगलींना प्रोत्साहन देणारी भाषणे व वक्तव्य नेहमीच निवडणुका जवळ आल्या की वाढायला लागतात. एरवीही त्या सुरु असतातच परंतु निवडणुकांच्या काळात त्यांची भूमिका फायद्याची असते हे सत्ताधारी फॅसिस्टांना योग्य ठाऊक आहे. गेल्या अनेक निवडणुकांचा इतिहास जर आपण बघितला तर आपल्याला हे स्पष्टपणे दिसून येईल कि यापध्दतीचे हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण करून भाजपने निवडणुकांमध्ये आपला फायदा करून घेतला आहे. ते मग रामजन्मभूमीचे आंदोलन असूद्या, रथयात्रा असुद्या किंवा मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या 2013 मधील दंगली असूद्यात. इतर काही नाही तर पाकिस्तान आणि बांग्लादेश व त्यानिमित्ताने मुस्लिमद्वेष यांच्या प्रचाराचे मुद्दे बनतातच. 1990 मध्ये रथयात्रा काढल्यानंतर भाजपाला अशा प्रचाराचा मतांची टक्केवारी वाढण्यात मोठा फायदा झाला. रथयात्रा ज्या ठिकाणांहून गेली तिथे दंगली घडल्या आणि अनेकांचे जीव गेले. त्यांनतर 1992 मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यानंतरही अनेक दंगली देशात झाल्या. या धार्मिक ध्रुवीकरणाचा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये आणि संसदेच्या निवडणुकांमध्ये भाजपने फायदा करून घेतला. हिंदू समुदायामध्ये मुस्लिमांबद्दल खोटी भीती निर्माण करायची, त्यांच्या धार्मिक आस्थेचा वापर करून तेढ वाढेल असे काहीतरी करून दंगली भडकवायच्या आणि या राजकारणासाठी भांडवलदारांनी, धन्नासेठांनी आपल्या पैशाच्या पोतड्या खाली करून रसद पुरवायची व सत्ता काबीज करायची अशा पद्धतीनेच हे सर्व चालत आहे.
या वर्षी फेब्रुवारी-मार्च मध्ये पंजाब, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर या राज्यांच्या आणि वर्षाच्या शेवटी हिमाचल व गुजरात राज्यांच्या विधानसभा निवडणूका आहेत. विकासाच्या सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरलेल्या आणि जनतेला महागाईच्या खाईत लोटणाऱ्या मोदी आणि भाजपासमोर या राज्यांमध्ये सत्ता टिकवण्याचे वा हस्तगत करण्याचे आव्हान आहे. वर्षाला 2 कोटी रोजगाराची घोषणा करणाऱ्या मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी अभूतपूर्व वाढली आहे आणि शिकलेले तरुण-तरुणी हताश आहेत. आरोग्य आणि शिक्षणव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत आणि खाजगीकरण जोरात सुरु आहे. अशा परिस्थितीत जनतेला धर्माची अफू पाजून, जनतेत हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण करून मते मिळवण्याचा आणि सत्ता काबीज करण्याचा हा डाव आहे. जनतेच्या धार्मिक आस्थेचा वापर करण्याचे, बेरोजगार युवकांना त्यांच्या समस्येचे कारण मुसलमान आहेत असे सांगून त्यांच्या हाती शस्त्र देऊन त्यांना मुसलमानांविरोधात हिंसा करण्यासाठी भडकवण्याचे हे सुनियोजित कारस्थान आहे.
एका बाजूला कामगार-कष्टकऱ्यांची पिळवणूक करून, त्यांच्याकडून 10-10, 12-12 तास काम करवून त्यांना जगण्यापुरताही मोबदला न देता हलाखीचे जीवन जगण्यास बाध्य करून, बेरोजगारांची फौज उभी करून भांडवलदार-मालक वर्ग व त्याचे सत्ताधारी प्रतिनिधी दुसऱ्या बाजूला प्रचंड चैनीचे व ऐषोआरामाचे जीवन जगत आहेत. या नफाकेंद्री भांडवली व्यवस्थेत वरच्या 10 टक्के वर्गाकडे 65 टक्के संपत्ती एकवटली आहे तर खालच्या 50 टक्के लोकांकडे एकूण संपत्तीच्या 5 टक्के संपत्ती आहे. भांडवलदारांच्या धंद्यांच्या व नफ्याच्या वाढीत येणारा कामगारवर्गाचा कुठलाही विरोध (जसे की वेतन वाढवण्यासाठी, कामाचे तास कमी करण्यासाठी, कंत्राटीकरण व खाजगीकरण रोखण्यासाठी आवाज उठविणे) त्यांना खपवून घ्यायचा नाही. ही शोषणकारी परिस्थिती अशीच टिकवण्यासाठी व कामगार-कष्टकरी जनतेला त्यांच्या खऱ्या प्रश्नांपासून भटकवण्यासाठी सत्ताधारी भांडवलदार वर्गाला नेहमीच अशा कट्टरपंथी धार्मिक विचारधारेची गरज असते आणि ती भारतात हिंदुत्वाच्या विचारधारेच्या रूपाने येथील प्रतिक्रियावादी भांडवलदार वर्गाने विकसित केली आहे. नाझी जर्मनीत हिटलरनेसुद्धा भांडवलदार वर्गाची नग्न हुकूमशाही लागू करण्यासाठी या फॅसिस्ट विचारधारेचा उपयोग केला आणि लाखो ज्यूंचा नरसंहार घडवून आणला.
या फॅसिस्ट विचारधारेला गाडून आपल्या खऱ्या समस्यांसाठी लढण्यासाठी कामगार-कष्टकरी वर्गाला आपली व्यापक एकजूट सर्व जाती धर्माच्या भिंती झुगारून देऊन उभी करावी लागेल. इतिहासातसुद्धा कागारवर्गानेच या भस्मासुराला (हिटलरच्या नाझी सत्तेला) त्याच्या योग्य जागी म्हणजेच थडग्यात गाडले होते. आजसुद्धा कामकरी सामान्य जनता जेव्हा महागाई, बेरोजगारी, आरोग्य आणि शिक्षणाचा अभाव, आवासाचा प्रश्न इत्यादी समस्यांनी त्रस्त आहे तेव्हा हा फॅसिस्ट भस्मासुर भांडवली सत्ताधाऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करत आहे. आपल्या जगण्याच्या खऱ्या मुद्द्यांभोवती कामकरी जनतेची व्यापक एकजुटच आज या भस्मासुरापासून आपल्याला वाचवू शकते.
Nice Article