नेटवर्क मार्केटींगचा भुलभुलैया
जनतेला मूर्ख बनवून पैसा कमावण्याची अजून एक सट्टेबाज प्रवृत्ती

राहुल

नेटवर्क मार्केटींगच्या नावाने झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने दाखवत असंख्य कायदेशीर आणि बेकायदेशीर योजना आज भारतात सर्रास राबवल्या जात आहेत. या सर्व योजना कामकरी वर्गातील लोकांना लुटून मुठभरांचे खिसे भरण्याचे मार्ग आहेत.  नेटवर्क मार्केटींग ही संकल्पनाच मूळातून अत्यंत बोगस आहे आणि तिचे कोणतेही रूप जनतेला श्रीमंत तर करू शकत नाहीच, उलट कोट्यवधी लोकांच्या घामाच्या कमाईला मूठभर लबाडांच्या खिशात घालण्याचे काम मात्र या योजनांद्वारे चालू आहे. कामकरी वर्गाने या सर्व योजनांचे खरे स्वरूप, त्यामागचे अर्थकारण, खरे अर्थशास्त्र समजले पाहिजे आणि या परिवर्तनाच्या खऱ्या मार्गाकडे वळले पाहिजे.

“घरबसल्या पैसे कमवा”, “पार्ट टाईम काम करून पैसे कमवा” अशा जाहिराती आज बस, रेल्वे पासून ते अनेक सार्वजनिक जागी लागलेल्या दिसतात. सिग्नलवर छोटी पत्रके वाटत अनेक युवक-युवती पैसे कमावण्याचे प्रलोभन इतरांना दाखवताना दिसतात. हे सर्व युवक नेटवर्क मार्केटींगच्या विविध योजनांचे बळी आहेत.  ऍमवे, ईझीवेज, आर.सी.एम., एम.आय. मार्केटींग, व्हेस्टीज, फ्युचर मेकर, एवोन, ओरिफ्लेम, मोदीकेअर अशा अनेक कंपन्या आज नेटवर्क मार्केटींग या तंत्राचा वापर करून “माल” विकण्याच्या बहाण्याने एकीकडे लोकांना फुकट राबवून घेत आहेत, आणि दुसरीकडे जनतेला फसवून पैसे हडपत आहेत. कसे ते समजून घेऊया.

नेटवर्क मार्केटींग च्या योजना विविध प्रकारांनी समोर येतात. त्यांच्या वैविध्यामुळे सुद्धा अनेकदा सर्वसामान्य माणसांना फरक करता येत नाही, आणि गोंधळून ते अशा योजनांना बळी पडतात. परंतु या सर्व योजनांमध्ये समान वैशिष्ट्य असते ते ‘पिरॅमिड’ संरचनेचे.

पिरॅमिड स्किम म्हणजे काय?

कोणत्याही मालाच्या विक्रीशिवाय असलेल्या शुद्ध स्वरूपातील पिरॅमिड स्किममध्ये तुम्हाला हे सांगितले जाते की तुम्ही अमुक (समजा रु. 5,000) रक्कम कंपनीकडे गुंतवायची. यानंतर तुम्ही काही व्यक्तींना, उदाहरणार्थ 4, या स्किममध्ये गुंतवणूक करण्यास सांगायचे. या लोकांनी पैसे जमा केल्यानंतर तुम्हाला त्यांनी जमा केलेल्या रु. 5,000 पैकी काही रक्कम परत मिळेल. उदाहरणार्थ 4 लोक जोडल्यास प्रत्येकी 1,000 म्हणजे एकूण 4,000 रुपये लगेच परत मिळतील. नंतर तुम्ही जोडलेल्या लोकांनी परत असेच करायचे. या 4 लोकांकडून दुसऱ्या “पायरी”चे 4 गुणिले 4 म्हणजे 16 लोक जोडले गेल्यानंतर तुम्हाला त्यांनी गुंतवलेल्या प्रत्येकी रु. 5,000 पैकी काही रक्कम (समजा रु. 500) मिळेल.  उदाहरणार्थ, दुसऱ्या “पायरी” च्या 4 गुणिले 4 म्हणजे 16 लोकांनी प्रत्येकी रु. 5,000, म्हणजे कंपनीला एकूण रु. 80,000 दिल्यावर त्यांच्या वरच्या पायरीच्या प्रत्येक व्यक्तीला 4,000 (म्हणजे एकून रु. 16,000 )आणि तुम्हालाही रु. 4,000 परत मिळतील. थोडक्यात दुसऱ्या पायरीला गेल्यावर तुम्हाला चक्क अतिरिक्त रक्कम मिळेल. स्किम जसजशी वाढत जाईल तसतसे तुम्हाला घरबसल्या पैसे मिळतील.

वरील वर्णनामध्ये रक्कम, व्यक्तींची संख्या, तुम्हाला मिळणारा वाटा हे बदलू शकतात. परंतु हे प्रलोभन बदलू शकत नाही की जसजसे लोक जोडले जातील तुम्हाला मिळणारे पैसे वाढत जातील. अनेक तथाकथित “सुशिक्षित” लोक सुद्धा अशा योजनांना बळी पडत आहेत.

या योजनेचा फोलपणा दोन अर्थांनी समजून घेतला पाहिजे. सर्वप्रथम गणिती पद्धतीने. अनेकांना असे वाटते की अशा योजना चालत राहिल्या तर पृथ्वीवरील सर्व माणसे सामावून घ्यायला शेकडो वर्षे वगैरे लागतील. खरेतर अशा योजना चालतच नाहीत याबद्दल पुढे मांडले आहेच, परंतु समजा अशा योजना चालत जरी राहिल्या असत्या तरी 4 गुणिले 4 गुणिले 4 असे करत जगाची लोकसंख्या संपायला   फक्त 17 पायरी पुरेशा आहेत! लोभ-लालसा, स्वार्थ यापायी आंधळे झालेले लोक हा प्रश्नही विचारत नाहीत की योजना आपल्या पर्यंत आली आहे तेव्हा आपण कितव्या पायरीवर आहोत!

दुसरे आणि सर्वात महत्वाचे, ज्याबद्द्ल पुढे विस्ताराने मांडणी केली आहे, ते म्हणजे विना मेहनत, काहीही माल निर्माण न करता, पैशाने पैसा कमावणे म्हणजे फक्त एका खिशातील पैसा दुसऱ्या खिशात जाणे असते, थोडक्यात संपत्ती निर्मिती नाही तर लूट असते. तेव्हा अशा योजनांमध्ये एकतर तुम्ही लुटखोर आहात किंवा लुटले जात आहात! बहुसंख्य कामकरी लोकांच्या बाबतीत तर ते लुटले जात आहेत हेच खरे आहे.  आता याच पिरॅमिड स्किमचे अजून फसवे रूप म्हणजे नेटवर्क मार्केटींग म्हणजे काय ते बघूयात.

नेटवर्क मार्केटींगचा भुलभुलैया

नेटवर्क मार्केटींग मध्ये पिरॅमिड स्किम सोबत माल विक्री सुद्धा जोडली जाते. पैशातून पैसा कमावला जात आहे हे लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्याकरिता हे केले जाते. ऍमवे हे याचे एक प्रसिद्ध उदाहरण आहे. यात कंपनी म्हणते की तुम्ही आम्हाला सामील व्हा(यालाच ‘आयडी’ बनवणे असेही म्हणतात), नंतर आम्ही तुम्हाला काहीतरी माल देऊ, जो तुम्ही विकायचा. या मालाच्या विक्रीच्या बदल्यात कंपनी तुम्हाला कमिशन पण देईल (काही वेळेस माल विकूनही थोडा नफा मिळेल). परंतु पुढे जाऊन तुम्ही अजून माल विक्रेते जोडायचे. तुम्ही जोडलेल्या या विक्रेत्यांनी विकलेल्या मालाच्या बदल्यातही तुम्हाला कमिशन दिले जाईल.  परंतु तुम्हाला कमिशन कोणत्या दराने दिले जाईल हे मात्र एकूण विक्रीवर अवलंबून असते, आणि तुम्ही जोडलेले विक्रेते (आणि त्यांनी पुढे जोडलेले विक्रेते) जितके जास्त, तितकी विक्री जास्त  आणि तितका कमिशनचा दरही वाढतो.  थोडक्यात तुम्ही (विनामजुरी!) मालही विकायचा आणि इतर विक्रेतेही जोडायचे.

अशा पद्धतीने सर्वप्रथम या कंपन्या तुम्हाला विनावेतन सेल्समनचे काम करायला लावतात आणि मजुरी वाचवतात. दुसरीकडे यात हा आभास जरी असला की माल विकला जात आहे, तरीही ही योजना पिरॅमिड स्किमचेच एक बदललेले फसवे रूप आहे.

या योजना विकताना खूप भारी छपाई असलेले माहितीपुस्तक देतात, त्यामध्ये स्वर्गासारख्या आयुष्याचे फोटो, विदेशात फिरायला जाण्याचे आमीष, 1-2 जणांच्या “यशगाथा” छापलेल्या असतात जेणेकरुन तुम्हाला प्रलोभन वाटावे. पण या योजना पिरॅमिड स्कीमच आहेत, कारण की तुम्ही जितके जास्त सेल्समन कामाला लावू शकाल तितक्याच प्रमाणात तुमचे “उत्पन्न” वाढते. जर तुम्ही तेवढे सेल्समन कामाला लावू शकला नाहीत, तर तुम्हाला स्वत:ला विनावेतन अतिशय जास्त विक्री करावी लागेल, जी शक्य नसते!  थोडक्यात सतत वाढत राहणाऱ्या पिरॅमिडच्या आधारावरच या स्किम चालतात.  उदाहरणार्थ ऍमवेच्या स्कीममध्ये तुम्ही 16,000 रुपयांची विक्री केली तर 3 टक्के कमिशन आहे, परंतु त्याच्या 50 पट विक्री केल्यावर, म्हणजे 8 लाखांची विक्री केल्यावर कमिशन 21 टक्के होते, म्हणजे 7 पट वाढते. थोडक्यात जास्त दराने कमिशन मिळवायला विक्री मात्र त्यापेक्षा खूपच जास्त दराने वाढवावी लागते.  हा भ्रम आहे की हे एक “पार्ट-टाईम” काम आहे, खरेतर किमान उत्पन्न मिळवण्याकरिता सुद्धा वास्तवात तुम्हाला 8 नाही तर 10-12 तास सुद्धा काम करावे लागते!

या योजनांमध्ये कधी कंपनी तुम्हाला माल अगोदर विकत घ्यायला लावते तर कधी माल विकून कंपनीला पैसे द्यायला लावते. जर तुम्ही माल कंपनीकडून विकत घेत असाल, तर तुमचे स्वत:चे पैसे गुंतवले जातात आणि स्वाभाविकपणे  माल विकण्याचे मोठे दडपण तुमच्यावर असते. आणि जरी कंपनीने तुम्हाला माल उधार दिला असेल, तरीही कमिशनवर किंवा थोडक्यात पिरॅमिड वाढण्यावरच तुमचे उत्पन्न अवलंबून असते.

आज 30 लाखांहून जास्त लोक ऍमवे सारख्या कंपनीकरिता फुकट राबत आहेत. अनेक अभ्यास झाले आहेत ज्यांच्यानुसार अशाप्रकारच्या नेटवर्क मार्केटींग मध्ये गुंतलेल्या 99 टक्क्यांवर लोकांना कधीही “फायदा” होतच नाही, उलट ते पैसे गमावतात, आणि ते फुकट राबणारे नोकरच बनतात! फायदा फक्त पिरॅमिडच्या टोकाला असलेल्या  1 टक्के लोकांना होतो, जे अशा योजना सुरू करणारे अतिश्रीमंत लोक असतात. थोडक्यात गरिबांची संपत्ती श्रीमंतांच्या खिशात जाण्याचा हा अजून एक मार्ग आहे! ऍमवे सारख्या कंपन्यांविरोधात अनेकदा खटले भरले गेले आहेत, परंतु पैशाच्या जोरावर, कायद्याच्या खाचाखोचा शोधून, या कंपनीने नेहमीच कायद्याच्या कचाट्यातून सुटका करवली आहे. ऍमवे कंपनीवर तर अमेरिकेमध्ये शेकडो खटले दाखल केले गेले आहेत. भारतातही ऍमवे वर 2006 मध्ये आंध्र प्रदेशात, 2011 व 2013 मध्ये केरळ मध्ये,  2016 मध्ये हरियाणात खटले दाखल झाले परंतु यांमध्ये काहीही सिद्ध झाले नाही.  हीच स्थिती इतर अनेक नेटवर्क मार्केटींग कंपन्यांची आहे.

संपत्ती कशी निर्माण होते?

जगात संपत्तीचे दोनच स्त्रोत आहेत. एक निसर्ग आणि दुसरा उत्पादक मानवी श्रम.  पैसा हा फक्त वस्तूंच्या देवाणघेवाणीचे साधन आहे, खरी संपत्ती तर वस्तू आणि सुविधांच्या रूपात असते. थोडक्यात संपत्ती निर्माण होते ती कारखान्यांमध्ये, शेतामध्ये आणि सुविधांच्या रूपात (शिक्षण, आरोग्य, प्रवास, मनोरंजन, इत्यादी).  जिथे संपत्ती निर्माण होते, तिथे सुद्धा कामगारांच्या श्रमातूनच ती सर्व संपत्ती निर्माण होते, परंतु भांडवली उत्पादन व्यवस्थेमध्ये जो मालक असतो त्याच्या खिशात या संपत्तीचा खूप मोठा वाटा जातो, आणि कामगारांना फक्त मजुरीएवढी संपत्ती हातात येते.

विक्री प्रक्रियेत तर कोणतीही संपत्ती निर्माण होत नाही. विक्रीमध्ये अगोदरच (म्हणजे श्रमातून, उत्पादन प्रक्रियेत) निर्माण झालेली संपत्ती, म्हणजे माल, एकाकडून दुसऱ्याकडे जाते. इथेही पैसा फक्त माध्यम असतो. कोणत्याही प्रकारच्या पिरॅमिड स्कीम मध्ये, नेटवर्क मार्केटींग मध्ये कधीही कोणतीही संपत्ती तयारच होत नसते त्यामुळे अशा सर्व योजना मूळातच फसव्या असतात. त्यामुळे अशा योजना जेव्हा प्रत्येकाला श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवतात, तेव्हा ती फसवणूकच असू शकते. या योजना फक्त काही जणांच्या खिशात अगोदरच असलेला पैसा मूठभरांच्या खिशात नेऊन ठेवतात.  थोडक्यात नेटवर्क मार्केटींग जुगाराचा सर्वात वाईट प्रकार आहे!

कामगार वर्गाचे निम्नभांडवलीकरण

नेटवर्क मार्केटींग सारख्या योजना फक्त कामगार-कष्ट्करी वर्गाची फसवणूकच करत नाहीत तर त्या त्याला वैचारिकरित्या सुद्धा भ्रष्ट करतात. विनामेहनत पैसा कमावणे ही भांडवलदार मालकाची मूल्य-मान्यता असते, कारण नफ्याच्या रूपाने ते विना-मेहनतच संपत्ती एकत्र करत असतात. नेटवर्क मार्केटींग सारख्या योजनांद्वारे ‘झटपट’, ‘विनामेहनत’, ‘नशिबाच्या जोरावर’  पैसे कमावण्याची सर्व भ्रामक स्वप्ने दाखवून खरेतर कामगार वर्गाच्या मनात भांडवली विचारांचे बी पेरले जाते आणि स्वत: अपरंपार मेहनत घेऊनही, फुकट राबूनही जेव्हा नेटवर्क मार्केटींग मधून स्वप्न साकार होत नाहीत तेव्हा दोष स्वत:च्या नशिबाला वा कतृत्वहीनतेला दिला जातो. याप्रकारे कामगार वर्गाला श्रमाच्या संस्कृतीपासून दूर करण्याचे, श्रमप्रतिष्ठेच्या मूल्यापासून दूर करण्याचे काम केले जाते.

अशा सर्व फसव्या योजनांना समजायचे असेल, त्यांचा भंडाफोड करायचा असेल तर कामगार वर्गाने मार्क्सवादी राजकीय अर्थशास्त्राचा अभ्यास चालू केला पाहिजे आणि नफ्याच्या, झटपट श्रीमंतीच्या शोषणकारी कल्पनांना नाकारत, समानतेच्या, श्रमप्रतिष्ठेच्या,  समाजवादाच्या मूल्यमान्यतांवर  आधारित, शोषणाच्या विरोधात एकता स्थापित केली पाहिजे.