‘हर घर तिरंगा’चे संघ-भाजपचे ढोंग ओळखा!
जाणून घ्या संघाचा स्वातंत्र्य चळवळीशी गद्दारीचा इतिहास!
✍ अश्विनी
नुकताच स्वातंत्र्याचा “अमृत महोत्सव” येऊन गेला. या संदर्भात “हर घर तिरंगा”चा नारा देत घराघरापर्यंत देशभक्तीचे आवतान घेऊन येणाऱ्या मोदी सरकारचा पक्ष, म्हणजे भाजप, ज्या पार्श्वभूमीतून येतो, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास तर आज प्रत्येकाने जाणणे आवश्यक आहे. कारण देशभक्तीचे प्रमाणपत्र देणारे हे स्वघोषित ठेकेदार स्वतः देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात आणि त्यानंतरही किती “हाडाचे देशभक्त” होते, तिरंग्याचे “प्रेमी” होते, आणि इंग्रजांचे “विरोधक” होते, याचा इतिहास प्रत्येक भारतीयापर्यंत नक्की पोहोचला पाहिजे.
1925 च्या विजयादशमीला नागपूर मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना प्रथम सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार ह्यांनी केली. 1920-21 चे असहकार आंदोलन ज्यावेळी चालू होते, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं स्वप्न ज्यावेळी तरुणांच्या नसानसात भिनले होते, त्यावेळी संघाने ह्या स्वातंत्र्य लढ्यात पुढाकार तर घेतला नाहीच, इतरांना लढ्यात सहभागी होण्याबाबत कुठल्याही प्रकारचे प्रोत्साहन देखील दिले नाही. इंग्रजांच्या दमनाने पेटून उठून त्याविरोधात संघर्ष पुकारत असताना भगतसिंह, सुखदेव, राजगुरू अतिशय कोवळ्या वयात फासावर चढले, त्यावेळेस संघाच्या कार्यकर्त्यांना ब्रिटिशांविरुद्ध लढायला प्रोत्साहन न देता, आपल्याच देशवासीयांविरुद्ध लढण्याचे म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन, कम्युनिस्टांना संपवण्यासाठी तलवारीचे प्रशिक्षण ह्या हाफ-चड्डी धारकांना दिले जात होते. ज्यावेळेस भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांनी फाशी न देता गोळी मारावी ही मागणी केली त्यावेळेस तथाकथित महान हिंदू राष्ट्राचे जनक सावरकर अंदमानातील तुरुंगातून इंग्रजांना माफीनाम्यावर माफीनामे पाठवण्यात व्यस्त होते आणि तुरुंगातून सुटल्यावर आयुष्यभर इंग्रजांचे पेंशनधारक बनून राहिले.
9 मार्च 1960 रोजी इंदोर, मध्यप्रदेश येथे संघाच्या कार्यकर्त्यांसमोर गोळवलकर म्हणाले “…1930-31 ला मोठे स्वतंत्रता आंदोलन झाले. त्यावेळेस काही युवक डॉक्टरांकडे (हेडगेवार) ही मागणी घेऊन गेले की यावेळी स्वातंत्र्य मिळेल आणि संघाने मागे राहता कामा नये. ह्याच शिष्टमंडळातील एक मनुष्य डॉक्टर हेडगेवारांना म्हणाला की ‘मी तुरुंगात जायला तयार आहे.’ हेडगेवारांचा त्यावरील अभिप्राय होता की “नक्की जा, पण तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या घरच्यांकडे कोण बघेल?” त्या माणसाने उत्तर दिले की “पुढील दोन वर्षात संपूर्ण घर चालण्यासहित जामिनासाठी लागणारे पैशांचीही तयारी मी आधीच करून ठेवली आहे.” त्यावर हेडगेवार म्हणाले की “तुम्ही तयारी केली आहे तर पुढची दोन वर्ष संघाच्या कामासाठीच द्या.” (श्री गुरूजी समग्र दर्शन’, खंड-4, भारतीय विचार साधना, नागपुर, 1981).
1942 ला जेव्हा भारत छोडो आंदोलन उभे राहिले, तेव्हा गोळवलकर हे सरसंघचालक होते. ब्रिटिशांकडून भारतीयांवर होणाऱ्या दमन, अत्याचारांचे उच्चांक गाठणारी ही वेळ होती. देशातला सामान्य कष्टकरी भूक, महागाई, बेरोजगारीच्या आगीत होरपळत होता. “खूप सहन केली गुलामी, आता बास” ह्या भावनेने ओतप्रोत होऊन प्रत्येक जण ही गुलामी संपवायला रस्त्यावर उतरला होता. त्यावेळेस संघाने काही न करण्याचे ठरवले. संघाच्या सन 1925 मध्ये विजयादशमीच्या दिवसाच्या स्थापनेपासून, ते 1947 मध्ये भारत स्वतंत्र होईपर्यंत संघाने स्वातंत्र्य लढ्यापासून जाणीवपूर्वक अंतर ठेवले. पहिले संस्थापक डॉ हेडगेवार, नंतर पूजनीय गुरुजी म्हणवले जाणारे गोळवलकर आणि हिंदु राष्ट्राचे पुरस्कर्ते ‘स्वातंत्र्यवीर’ सावरकर सर्वांनीच कुठल्याही स्वातंत्र्यलढ्यात ना योगदान दिले ना जनतेला स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. संघासाठी देशभक्ती म्हणजे ब्रिटिश भक्ती होती. देश स्वतंत्र करण्यासाठी ब्रिटिशांना घालवण्याची गरज नाही तर आपल्याच देशातील हिंदू सोडून इतर सर्वांना म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन सर्व अल्पसंख्यांकांना घालवण्याची गरज आहे, हा संघाचा विचार होता. गोळवलकरांच्या नजरेत ब्रिटिश हुकूमत ही विजेत्यांच्या स्वरूपात होती आणि ह्या दृष्टीने विजेत्यांशी संघर्ष न करता, अथवा कुठलीही द्वेषभावना न ठेवता त्यांच्याशी आपलेपणाने वागले पाहिजे ही भावना ते संघात रूजवत होते. 1942 च्या स्वातंत्र्यलढ्यासहित प्रत्येक संघर्षात सामील न होण्याचे गोळवलकरांनी दिलेले कारण होते ‘संघर्षाचे परिणाम वाईट होतात.’ वरील कारणानुसार मग भारतीयांनी इंग्रजांशी संघर्ष सोडून प्रेमाने वागायला हवे होते? की होणाऱ्या जुलुमांबाबत मूग गिळून गप्प बसायला हवे होते? वरील सर्व उदाहरणे संघाने सुरुवातीपासूनच स्वातंत्र्यलढ्यासोबत केलेली गद्दारीच दर्शवतात.
संघाचे ढोंगी तिरंगा प्रेम
स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अमृत महोत्सव साजरा करण्याचे, हर घर तिरंगा फडकविण्याचे आवाहन ज्येष्ठ संघ प्रचारक प्रधानमंत्री मोदी कडून करण्यात आले. संघाच्या शाखांमधून घराघरात तिरंगा पोचविण्याचे काम केले गेले. परंतु हर घर तिरंगा म्हणत असताना किती जणांकडे हक्काचे चांगले घर आहे याच्याशी सरकारला काहीही देणे-घेणे नव्हते. 2011 च्या आकडेवारीनुसार भारतात ज्यांच्या डोक्यावर छतच नाही, जे बेघर आहेत अशा लोकांची संख्या एकूण 17 लाख, 73 हजार, 40 होती. ही संख्या इतकी कमी दिसण्याचे कारण हे आहे की यामध्ये भाड्याने राहणारे, झोपडपट्टीत खुराड्यांसारख्या घरात राहण्यास ज्यांना भाग पाडले आहे, जे दहा बाय दहाच्या घरात 7-8 जणं राहतात अशांना बेघर मानले गेलेलेच नाही! असे असतानाही पुढील 10 वर्षात “बेघरांच्या” संख्या वाढीचा वेग प्रचंड राहिलाय. त्यामुळे कोट्यवधी जनतेच्या डोक्यावर छत नसतानादेखील हर घर तिरंगा मोहीम राबवली गेली. अशामध्ये हे तिरंगा प्रेम सुरुवातीपासूनच आहे की अचानकच उतू चालले हेदेखील पडताळण्याची आवश्यकता बनते.
स्वातंत्र्य लढ्यातील काळातच, 1930 साली 26 जानेवारीच्या दिवशी सर्व भारतभर तिरंगा फडकवण्याचा निर्णय घेतला असता तेव्हाचे सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार ह्यांनी आदेश पत्रक जारी केले की देशभरातील आर.एस.एस.च्या सर्व शाखांमध्ये भगवा पुजला जावा. आर.एस.एस. चे इंग्रजी मुखपत्र ‘ऑर्गनायझर’च्या 14 ऑगस्ट 1947 च्या अंकात लिहिले होते, “जे लोक नशिबाच्या जोरावर सत्तेपर्यंत पोचले आहेत, त्यांनी भलेही आमच्या हातात तिरंगा सोपवला असेल, परंतु हिंदुंद्वारे ना कधी या तिरंग्याचा सन्मान केला जाईल, ना ह्याला आपले मानले जाईल. 3 हा आकडा स्वतःहूनच अशुभ आहे आणि असा 3 रंग असलेला झेंडा अतिशय वाईट मनोवैज्ञानिक प्रभाव पाडेल आणि ते देशासाठीही नुकसान पोचवणारे ठरेल.”
गोळवलकरांनी आपल्या लेखात म्हटले की “कोण म्हणू शकते की हा एक निरोगी आणि शुद्ध राष्ट्रीय दृष्टीकोन आहे? ही फक्त एक राजकीय तडजोड होती, तात्कालिक राजकीय कामचलावू उपाय होता. तो एखाद्या राष्ट्रीय दृष्टिकोनातून किंवा राष्ट्रीय इतिहास व परंपरेवर आधारित एखाद्या सत्याने प्रेरित नव्हता. तोच झेंडा आज थोड्या बदलांसहित सरकारी ध्वज म्हणून स्विकारला गेला आहे. आपले एक प्राचीन व महान राष्ट्र आहे, आणि त्याला गौरवशाली इतिहास लाभला आहे, तेव्हा आपला राष्ट्रीय ध्वज नव्हता का? हजारो वर्षात आपले कोणतेच राष्ट्रीय चिन्ह नव्हते का? नक्कीच होते! तर मग आपल्या डोक्यामध्ये हे शून्यतापूर्ण रिकामेपण का?” (एम.एस. गोळवलकर, विचार नवनीत, पान. 237).
हे प्रश्न विचारताना गोळवलकरांच्या मनात होता तो महाराष्ट्रातील पेशवाई ब्राम्हणांचा इतिहास, ज्यांचा स्वतःचा भगवा झेंडा होता, आणि तोच भगवा स्वतंत्र हिंदू राष्ट्राचा झेंडा त्यांना बनवायचा होता. गोळवलकर गुरुजींच्या मते “आपल्या महान संस्कृतीचा परिपूर्ण परिचय देणारा, प्रतिकात्मक आपला भगवा झेंडा आहे, जो आम्हाला ईश्वरासमान आहे, त्यामुळेच अशा वंदनीय ध्वजाला आम्ही आपल्या गुरुस्थानी ठेवणे योग्य समजले आहे. हा आमचा दृढ विश्वास आहे की शेवटी ह्याच ध्वजापुढे संपूर्ण राष्ट्र नतमस्तक होईल.” (गोळवलकर, ‘श्री गुरूजी समग्र दर्शन’, भारतीय विचार साधना, नागपुर, खंड-1, पान 98)
संघाचे हे दुतोंडी धोरण आहे. सत्तेवर बसून कळीचे, जमिनीवरचे खरे प्रश्न सोडून म्हणजे बेरोजगारी, महागाई, शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, महिला अत्याचार हे प्रश्न सोडून जात धर्माच्या नावाखाली सतत दंगली भडकावून, विविध मुद्दे पेटवून, कामगार कष्टकरी जनतेत फूट पाडून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणे हे काम तर साध्य होतेच, तर दुसऱ्या बाजूला तिरंगा, वंदे मातरम, राष्ट्रगीत, पंतप्रधान एवढ्यांचा मान ठेवलात तर तुम्ही देशभक्त, अन्यथा देशद्रोही असे धोरण स्वीकारत देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटत फिरणे हे आर.एस.एस. ला खूप चांगल्या प्रकारे जमते. प्रधानमंत्री मोदी आंतरराष्ट्रीय योग-दिनी इंडिया गेट वर तिरंगा चुरगळून त्याने नाक आणि घाम पुसतात, आणि त्यावर तिरंग्याला घेऊन अंधभक्ती पसरवणारी भांडवली प्रसारमाध्यमे चकार शब्दही काढत नाहीत परंतु हेच एखाद्या गैर-संघी व्यक्तीकडून घडले असते तर त्या व्यक्तीला देशद्रोहाचे प्रमाणपत्र देऊन ही प्रसारमाध्यमे केव्हाच मोकळी झाली असती.
प्रश्न नक्कीच उद्भवतो की भगव्या झेंड्यावर प्रेम करणाऱ्या संघींना, भाजपाईंना अचानक तिरंग्याबद्दल भरते कसे आले? देशातील अनेक उदारवादी तर यामुळेच हर्षोल्लित झाले आहेत की भाजपला, संघाला तिरंगा स्विकारावा लागला आणि ते याला देशातील उदारवादी भांडवली लोकशाहीचा विजयच मानत आहेत व म्हणत आहेत की मोदी सरकारला “झुकावे लागले”. अशा उदारवादी विचारांपासून कामगार वर्गाने फार सावध राहिले पाहिजे आणि फॅसिस्टांच्या अशा पावलांना नीट ओळखले पाहिजे. तिरंग्याचा केलेला पुरस्कार ही मोदी सरकारची आणि संघ-परिवाराची शरणागती नाही तर त्यांच्या फॅसिस्ट अजेंड्याचाच एक भाग आहे.
ना संघाने भगव्याचा पुरस्कार सोडला आहे, ना मोदी सरकारने संघाला तिरंगा स्विकारून भगवा सोडण्यास सांगितले आहे. “तिरंगा” देशातील भांडवली लोकशाही व्यवस्थेचे प्रतिक आहे, आणि 21 व्या शतकातील भारतीय फॅसिझमचा आणि तिरंग्याचा काहीच मूलभूत अंतर्विरोध नाही; जी राज्यघटना त्या तिरंग्याला मान्यता देते तिच्याशी सुद्धा फॅसिस्ट अजेंड्याचा मूलभूत अंतर्विरोध नाही हे ध्यानात घेतले पाहिजे. संघ परिवाराने नेहमीच आपल्या रणनितीमध्ये बदल करत राज्यसत्तेच्या बदलत्या वर्गीय चरित्रानुसार स्वत:ची ध्येयधोरणे बदलली आहेत आणि सत्त्ताधारी-शोषणकारी वर्गाचे प्रतिनिधित्व केले आहे. उदारवाद्यांनी पसरवलेल्या भ्रमाच्या विपरित देशाच्या राज्यघटनेच्या चौकटीत राहूनच आज फॅसिझम काम करत आहे, आणि सर्व प्रकारच्या जातीयवादी-धर्मवादी अजेंड्याला राबवत आहे, मग तो धर्मांतरबंदी कायदा असो, राममंदिर बांधणे असो, लोकशाही अधिकारांचे दमन असो, दमनकारी कायदे बनवणे असो, कामगार कायदे बदलणे असो, जनांदोलनांचे दमन असो, जीएसटी-नोटबंदी असो, एन.आर.सी.-सी.ए.ए. असो, वा गोवंशहत्याबंदी कायदा असो! यापैकी सर्व, आणि अशा इतर असंख्य, कृत्यांना भाजपने राज्यघटनेच्या चौकटीत लागू करवले आहे. आज तिरंग्याला सुद्धा भाजप देशातील तथाकथित धर्मनिरपेक्षतेचे वा उदारवादी लोकशाहीचे प्रतिक म्हणून नाही तर भाजपच्या एकाधिकारशाही फॅसिस्ट अजेंड्याचे प्रतिक म्हणून देशातील जनतेच्या गळी उतरवत आहे आणि त्यासाठीच तिरंग्याची सक्ती केली जात आहे. तोच तिरंगा ज्याने कॉंग्रेसकरिता थोड्या उदारवादी भांडवली लोकशाहीचे प्रतीक म्हणून काम केले, तोच आता राज्यघटनेच्या चौकटीतच भाजपच्या फॅसिस्ट अजेंड्याचे सुद्धा प्रतिक बनला आहे!
भांडवली लोकशाहीमध्ये राज्य करणारे सरकार कुठलेही असले तरी सत्तेत येऊन कामगार कष्टकरी वर्गाच्या श्रमाची लूट करून, भांडवलदार मालक वर्गाच्या प्रतिनिधीचे काम करून त्यांच्या गडगंज नफ्याचे वाटेकरी होणे, एवढेच उद्दिष्ट प्रत्येक सत्ताधाऱ्यांचे असते. अशी भांडवली व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी दुतोंडी फॅसिस्टांना विविध मुखवट्यांची गरज पडतेच. आज तो मुखवटा तिरंगा आहे आणि उद्या भगवाही असू शकतो. परंतु याने कामगार वर्गाच्या जीवनात काय फरक पडतो? जिथे दिवसाला वीस रूपये कमावणे सुद्धा अनेकदा अशक्य आहे, त्या देशात वीस रुपयांचा झेंडा विकत घेण्याची सक्ती हेच दाखवते की स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर देशाचा अमृतकाळ नव्हे तर देशातील भांडवली व्यवस्थेचा कामगारांसाठीचा ‘मृत’काळ चालूच आहे!
कामगार बिगुल, सप्टेंबर 2022