वृत्तपत्रे आणि कामगारवर्ग
✍ एंटोनियो ग्राम्सी
(आजही कामगारांमध्ये भांडवलदार वर्गाच्या विविध हिश्श्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांचा मोठा प्रभाव आहे. रोज रु. 5 ते 10 देऊन अशी वृत्तपत्रे विकत घेणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. अशा कामगारांचा मोठा हिस्सा हे समजत नाही की ही वृत्तपत्रे आज मुख्यत्वे मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या, बिल्डर, उद्योगपती, व्यापारी अशा भांडवलदारांनी दिलेल्या जाहिरातींच्या पैशावर वा त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर चालतात आणि म्हणूनच ती कामगारवर्गाच्या बाजूचे विचार वा सत्य मांडत तर नाहीतच शिवाय रोज प्रस्थापित भांडवली व्यवस्था कशी चांगली याबद्दलचा विचार कणाकणाने झिरपवण्याचे काम करतात. भांडवली वृत्तपत्रे, टीव्ही चॅनेल्स आज अशी झालेली नाहीत, तर नेहमीच अशी होती. म्हणूनच याच परिस्थितीवर जवळपास 100 वर्षे अगोदर एंटोनियो ग्राम्सी या इटालियन कम्युनिस्ट लेखक, कलाकाराने लिहिलेला हा लेख प्रस्तुत करत आहोत.- संपादक मंडळ)
हे सदस्यता मोहिमेचे दिवस आहेत. भांडवली वृत्तपत्रांचे संपादक आणि प्रशासक त्यांच्या मालाकडे ग्राहकांना (म्हणजे वाचकांना) आकर्षित करण्यासाठी दुकानाचा मुख्यभाग सुशोभित करतात, त्यांच्या दुकानाच्या साइनबोर्डवर थोडे वार्निश लावून चमकवतात आणि त्यांना आवाहन करतात. त्यांच्या वस्तू म्हणजे चार-सहा पानांची वृत्तपत्रे असतात जी रोज सकाळी किंवा संध्याकाळी बाहेर पडतात आणि वृत्तपत्रांचे निर्माते आणि व्यापार्यांसाठी सोयीस्कर अशा तऱ्हेने वर्तमान राजकारणातील वस्तुस्थिती जाणण्याची व समजून घेण्याची सामग्री वाचकांच्या डोक्यात भरण्याचे काम ते करतात.
आम्हाला विशेषत: कामगारांसोबत, या वरवर पाहता साध्या वाटणाऱ्या कृतीचे महत्त्व आणि गांभीर्य यावर चर्चा करायची आहे, जे तुम्ही कुठल्या वृत्तपत्राचे सदस्यत्व घेता यात निहीत आहे. प्रलोभने आणि धोक्यांनी भरलेली ही निवड आहे, आणि खरेतर ती विविध निकष वापरून, कठोर आणि परिपक्व विचारमंथनानंतर जाणीवपूर्वक केली पाहिजे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कामगाराने भांडवली वृत्तपत्राशी असलेली कोणतीही एकता ठामपणे नाकारली पाहिजे आणि त्याने सतत, सतत, सतत लक्षात ठेवले पाहिजे की भांडवली वृत्तपत्र (त्याचा रंग कोणताही असो) हे आपल्या विचारांच्या आणि (वर्ग)हितांच्या विरुद्ध प्रेरित असलेले (भांडवलदार वर्गाचे) संघर्षाचे साधन आहे. त्यात प्रकाशित होणारी प्रत्येक गोष्ट एकाच विचाराने प्रभावित आहे: सत्ताधारी-प्रबळ वर्गाची सेवा करणे आणि हाच विचार आवश्यकता भासताच खालील तथ्यात परिवर्तित होतो: कामगार वर्गाचा विरोध करणे. आणि खरंच, भांडवली वृत्तपत्राच्या पहिल्या ओळीपासून ते शेवटच्या ओळीपर्यंत आपल्याला याचा अनुभव येतो आणि ते सहज दिसू शकते.
पण सुंदर, म्हणजेच खरेतर विद्रुप, गोष्ट अशी आहे की भांडवलदार वर्गाच्या बाजूने केलेल्या या निर्दयी कामासाठी भांडवलदारांकडून पैसे घेण्याऐवजी, भांडवलदार वृत्तपत्रे देखील त्याच कामगार वर्गाकडून पैसे गोळा करतात ज्यांना त्यांनी नेहमीच विरोध केला आहे. आणि कामगार वर्ग पैसे देतो; अगदी शिस्तीने, उदारपणे.
लाखो कामगार त्यांचे पैसे भांडवली वृत्तपत्रांना नियमित आणि दररोज देतात, आणि त्याद्वारे त्यांची शक्ती वाढवण्यास मदत करतात. का? जर तुम्ही ट्राममध्ये किंवा रस्त्यावर भांडवली वृत्तपत्र घेऊन जात असलेल्या पहिल्या कामगाराला हा प्रश्न विचारला असता, तर तुम्हाला उत्तर मिळाले असते: ‘काय चालले आहे हे मला माहित असणे आवश्यक आहे.’ परंतु हे त्याच्या डोक्यात कधीच जात नाही की बातम्या आणि त्या बनवणारी सामग्री अशा खुबीने प्रस्तुत केल्या जातात की त्याच्या विचारांना एका विशिष्ट दिशेला वळवतात व त्याच्या चेतनेला त्या दिशेने प्रभावित करतात. आणि तरीही त्याला हे माहित आहे की हे वृत्तपत्र संधीसाधू आहे, दुसरे वृत्तपत्र श्रीमंतांसाठी आहे, तिसरे, चौथे, पाचवे वृत्तपत्र दुसऱ्या राजकीय पक्षांशी संबंधित आहेत ज्यांचे हित त्याच्या हितसंबंधांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे.
आणि अशा प्रकारे तोच कामगार दररोज वैयक्तिकरित्या बघतो की भांडवली वृत्तपत्रे अगदी साधी तथ्ये देखील अशा प्रकारे सांगतात जी भांडवलदार वर्गाच्या बाजूने आणि कामगार वर्गाच्या आणि त्यांच्या राजकारणाच्या विरोधात असतात. काय कुठे संप चालू झालाय का? जिथपर्यंत भांडवली वृत्तपत्रांचा संबंध आहे, संपामध्ये कामगार नेहमीच चुकीचे असतात. कुठे आंदोलन होत आहे का? आंदोलक नेहमीच चुकीचे असतात, कारण ते कामगार आहेत ज्यांचे डोके नेहमी गरम असते, ते हिंसक असतात, ते दंगेखोर असतात. सरकारने एखादा कायदा मंजूर केला आहे का? तो नेहमीच चांगला, उपयुक्त आणि न्याय्य असतो, जरी तो वास्तवात तसा नसेल तरीही. आणि जर निवडणूक, राजकीय किंवा प्रशासकीय संघर्ष असेल तर? सर्वोत्तम कार्यक्रम आणि उमेदवार नेहमीच भांडवली पक्षांचे असतात.
आणि त्या सर्व तथ्यांबद्दल आम्ही अजून बोललोच नाहीत ज्यावर भांडवली वृत्तपत्रे एकतर गप्प बसतात, किंवा कामगारांची दिशाभूल करण्यासाठी, त्यांना अज्ञानात ठेवण्यासाठी तथ्यांची थट्टा उडवतात किंवा त्यांना खोटे ठरवतात. असे असूनही, कामगारांची भांडवली वृत्तपत्रांप्रती सदोष मूकसंमती अमर्याद आहे. आपण याविरोधात उभे राहून कामगारांना वास्तवाची जाणीव करून दिली पाहिजे. आपल्याला त्यांना पुन्हा पुन्हा सांगावे लागेल की अशा वृत्तपत्र विक्रेत्याकडे पैसे भिरकावणे म्हणजे भांडवली वृत्तपत्रांना असे तोफगोळे देणे होय, ज्याचा उपयोग तो योग्य वेळी कामगार वर्गाच्याच विरोधात करेल.
जर कामगारांना या मूलभूत सत्यांची जाणीव करून दिली गेली असती तर ते भांडवली वृत्तपत्रांवर बहिष्कार टाकायला शिकले असते, अगदी त्याच एकजुटीने आणि शिस्तीने जसे भांडवलदार कामगारांच्या वृत्तपत्रांवर, समाजवादी वृत्तपत्रांवर बहिष्कार टाकतात. भांडवली प्रसारमाध्यमे जी तुमची विरोधक आहेत, त्यांना आर्थिक पाठबळ देऊ नका. सर्व भांडवली वृत्तपत्रांच्या सदस्यत्व मोहिमेच्या या काळात आपले घोषवाक्य असले पाहिजे: बहिष्कार करा, बहिष्कार करा, बहिष्कार करा!
मूळ लेख : “अवांती!”, पिडमॉंट आवृत्ती मध्ये डिसेंबर 22, 1916 रोजी इटलीमध्ये प्रकाशित
(अनुवाद: जयवर्धन)
कामगार बिगुल, सप्टेंबर 2022