11 ऑगस्ट, क्रांतिकारी खुदिराम बोस यांच्या शहादत दिनानिमित्त
✍ प्रवीण एकडे
11 ऑगस्ट म्हणजे खुदिराम बोस यांचा शहादत दिवस. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या या क्रांतिकारकाला इंग्रजांनी फासावर लटकवले. कोण होते खुदिराम बोस आणि काय आहे त्यांचा वारसा?
खुदिराम बोस यांचा जन्म बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील हबिबपुर या गावी झाला. 3 डिसेंबर 1889 रोजी जन्मलेले खुदिराम बोस लहान असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. त्यांच्या मोठ्या बहिणीने त्यांचा पुढे सांभाळ केला. खुदिराम बोस लहान असतानाचा काळ तो होता जेव्हा ब्रिटिश साम्राज्यवादाचे दमन प्रचंड वाढले होते. शालेय जीवनापासूनच खुदिराम बोस यांनी राजकीय गतिविधींमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली होती. नववीत असतानाच शाळा सोडून देऊन ते स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झाले. 1904 मध्ये त्यांच्या बहिणीला काही न सांगता खुदिराम बोस घर सोडून निघून गेले. काही दिवसांनी त्यांची मोठी बहीण अनुरूपा देवी यांना एक पत्र मिळाले ज्यात खुदिराम बोस यांनी लिहिले होते की त्यांना आता सामान्य गृहस्थाचे जीवन जगणे शक्य नाही आणि त्यांना शिक्षण पुढे सुरू ठेवण्याची सुद्धा इच्छा नाही. संन्यास घेणार असल्याचे त्यांनी त्या पत्रामध्ये लिहिले होते. खुदिराम बोस अत्यंत संवेदनशील होते. मिदनापूर मध्ये जेव्हा कॉलेरा ची साथ पसरली तेव्हा ते लोकांची सेवा करण्यासाठी सर्वात पुढे होते.
सत्येन बसू यांच्या नेतृत्वाखाली खुदिराम यांनी आपल्या क्रांतिकारी जीवनाची सुरुवात केली. ते एका गुप्त क्रांतिकारी संघटनेचे सदस्य बनले. बंगालमध्ये शारीरिक व्यायामासाठीचे अनेक गट सुद्धा निर्माण झालेले होते. ब्रिटिश साम्राज्यवादाचा मुकाबला करण्यासाठी तरूणांना सज्ज करणे हा मुख्य उद्देश या गटांचा होता. मातृसदन नावाच्या एक गटामध्ये खुदिराम बोस सहभागी झाले. पुढे ते या गटाचे एक प्रमुख व्यक्ति देखील बनले. 1905 मध्ये बंगालमधील राजकीय वातावरण अशांत बनले होते. जनतेच्या असंतोषाचे रूपांतर जर संघटित संघर्षामध्ये झाले तर भारतातील ब्रिटिश साम्राज्यवादाचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते याची जाणीव ब्रिटिश राज्यसत्तेला झाली होती. म्हणूनच इंग्रजांनी फोडा आणि झोडा च्या नितीवर काम करत धार्मिक आधारावर बंगालची फाळणी करण्याचा प्रस्ताव आणला. ही फाळणी करण्यामागचा मुख्य उद्देश होता धार्मिक आधारावर जनतेमध्ये फुट पाडणे. या फाळणीच्या प्रस्तावाविरोधात बंगालच्या जनतेकडून कडाडून विरोध केला गेला. वायसराय कर्जनने मात्र या विरोधाला न जुमानता बंगालची धार्मिक आधारावर फाळणी करण्याचा निर्णय पक्का केला. या फाळणी विरोधात जनतेचा तीव्र प्रतिसाद उमटला. 1905 च्या बंगालच्या फाळणी नंतर सुरू झालेल्या स्वदेशी आणि बहिष्कार चळवळीमध्ये खुदिराम बोस यांनी सक्रिय सहभाग घेतला. इंग्रजांनी बनवलेल्या वस्तूंची विक्री बंद करण्यापासून ते विदेशी कपड्यांची होळी करण्यामध्ये ते सहभागी होते. ते जोशाने या आंदोलनामध्ये साम्राज्यवादविरोधी घोषणा द्यायचे.
पुढे 28 फेब्रुवारी 1906 मध्ये त्यांना सोनार बांगला नावाच्या ब्रिटिश साम्राज्यवादविरोधी वर्तमानपतत्राचे वितरण करत असताना पोलिसांनी पकडले. पोलिसांच्या तावडीतून सुटण्यात मात्र खुदिराम यशस्वी झाले. 16 मे 1906 रोजी त्यांना ब्रिटिश साम्राज्यवादविरोधी आंदोलनांमध्ये सहभागी झाले म्हणून अटक करण्यात आली, मात्र त्यांचे वय बघता त्यांना इशारा देऊन सोडण्यात आले. या घटनेनंतर ते गुप्त संघटनेच्या क्रांतिकारी कार्यासाठी आर्थिक संसाधने गोळा करण्याच्या कामात लागले. हाटगछिया मध्ये खजिना लुटला गेला त्यात खुदिराम बोस सहभागी होते.
कोलकत्यामधील किंग्सफर्ड या क्रूर ब्रिटिश दंडाधिकारी(magistrate) विरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष होता. क्रांतिकारकांचे मानणे होते की किंग्सफर्ड क्रांतिकारकांविरोधात क्रूरपणे कारवाया करतो. बंगालच्या फाळणी विरोधात चाललेल्या आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या असंख्य युवकांना किंग्सफर्डने क्रूर शिक्षा दिल्या होत्या. बिपिन चंद्र पाल यांच्यावर चाललेल्या राजद्रोहाच्या खटल्या वेळी न्यायालयाच्या बाहेर विरोध प्रदर्शने सुरू होती. या प्रदर्शनामध्ये सहभागी एका 14 वर्षाच्या तरुणाला किंग्सफर्डने 14 चाबुकाच्या मारांची शिक्षा दिली होती. अशा या क्रूर ब्रिटिश अधिकाऱ्याला बढती देत सत्र न्यायाधीशाच्या रूपात मुजफ्फरपूरला पाठवण्यात आले. बंगालमधील क्रांतिकारकांनी या अधिकाऱ्याची हत्या करण्याचा निर्णय घेतला. युगांतर या संघटनेचे नेते विरेंद्र घोष यांनी घोषणा केली की किंग्सफर्डला बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये ठार केले जाईल. या कामासाठी खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चंद यांची निवड केली गेली. खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चंद मुजफ्फरपूरला पोहचले. तिथे पोहचल्यानंतर त्यांनी किंगसफर्डवर पाळत ठेवायला सुरुवात केली. मुजफ्फरपूरमध्ये एक प्रसिद्ध क्लब होता जिथे इंग्रज अधिकारी आपल्या कुटुंबियांसह जायचे. 30 एप्रिल 1908 रोजी किंग्सफर्ड आपल्या पत्नीसह क्लब मध्ये पोहचला. रात्री 8.30 च्या सुमारास केनेडी या एका अन्य इंग्रज अधिकाऱ्याची पत्नी आणि मुलगी क्लब मधून बाहेर निघून घरी जाण्याच्या दिशेने निघाले. केनेडीची पत्नी आणि मुलगी बसलेल्या गाडीला किंग्सफर्डची गाडी समजून त्या गाडीवर खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चंद यांनी बॉम्ब फेकला. या बॉम्ब हल्ल्यामध्ये केनेडीची पत्नी आणि मुलगी यांचा मृत्यू झाला. या बॉम्ब हल्ल्यानंतर इंग्रजांनी खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चंद यांच्या अटकेसाठी 500 रुपयांचे (त्या काळातील 500 रुपये आजच्या लाखो रुपयांसमान आहेत) बक्षिस जाहीर केले. 1 मे 1908 रोजी खुदिराम बोस यांना पोलिसांनी अटक केली तर प्रफुल्ल चंद यांनी स्वतःला गोळ्या झाडून शहादत पत्करली. वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी 11 ऑगस्ट 1908 रोजी खुदिराम बोस यांना फासावर लटकवण्यात आले. खुदिराम बोस यांचे नाव त्या असंख्य क्रांतिकारकांमध्ये जोडल्या गेले ज्यांनी ब्रिटिश साम्राज्यवादाविरोधात लढताना आपल्या प्राणांचे बलिदान दिले.
खुदिराम बोस यांचा काळ हा स्वातंत्र्य चळवळीमध्ये एक नवीन राजकीय प्रवाह प्रखरतेने पुढे येण्याचा काळ होता. बंगालमधील असंख्य तरुणांनी कॉंग्रेसच्या दबाव-तडजोड-दबावच्या धोरणाच्या (जनांदोलन उभे करणे, परंतु त्याला क्रांतिकारी धार येऊ न देता ब्रिटीशांशी तडजोडीचे हत्यार म्हणून वापरणे आणि आंदोलन मागे घेणे) विरोधात वैयक्तिक त्याग आणि बलिदानाचा मार्ग स्वीकारला. त्यांची विचारधारात्मक कमजोरी होती, परंतु खुदिराम बोस आणि इतर क्रांतिकारकांनी जनतेमध्ये क्रांतीचे स्पिरीट निर्माण करण्याचे काम केले. बंगालमधील ही क्रांतिकारकांची पहिली पिढी होती. या क्रांतिकारकांची क्रांतीची प्रेरणा ही धर्मातून यायची, आणि इंग्रजांच्या विरोधात लढताना ते धार्मिक आणि भावनिक मुद्यांचा आधार घ्यायचे, कारण क्रांतिकारी आंदोलनाचा भौतिकवादी विकास अजून झालेला नव्हता. असे असले तरी ते कुठल्याही प्रकारे धर्मवादी म्हणजेच धर्माचा राजकारणासाठी आसरा घेणारे नव्हते. त्यांच्या कृतीतून त्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचाच अवलंब केल्याचे आपल्याला दिसते. खुद्द खुदिराम बोस यांना त्यांनी बहिणीचे घर सोडल्यानंतर एक मुस्लिम वकील सैय्यद अब्दुल वाहिद यांच्या बहिणीच्या घरी आश्रय मिळाला होता.
क्रांतिकारी आंदोलनाच्या या चरणातील क्रांतिकारकांच्या काही विचारधात्मक कमजोरी होत्या. बंगाल मधील क्रांतिकारी स्वतः मुस्लिमविरोधी नव्हते परंतु त्यांच्या हिंदू पूर्वाग्रहामुळे आणि मुस्लिमांच्या एका हिश्श्यामध्ये असलेल्या मूलतत्ववादी विचारांच्या प्रभावामुळे मुस्लिम जनता काही प्रमाणात त्यांच्यापासून दूर राहिली. व्यक्तिगत त्याग आणि बलिदानावर जास्त विश्वास असल्याने या क्रांतिकारकांनी सक्रियपणे जनतेमध्ये राजकीय प्रचारकार्य करण्याचे प्रयत्नही कधी केले नाही. भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांनी खुदिराम बोस सारख्या असंख्य क्रांतिकारकांच्या बलिदानातून प्रेरणा घेत परंतु त्यांच्या विचारधारात्मक कमजोरी ओळखून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला. भांडवलशाही मुर्दाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद, इंकलांब जिंदाबाद सारख्या घोषणांनी आधीच्या धर्मावर आधारित घोषणांची जागा घेतली. ते आता वैज्ञानिक समाजवादाविषयी बोलायला लागले. ते असा समाज निर्माण होण्याबद्दल बोलत होते जिथे एका मनुष्याद्वारे होणारे दुसऱ्या मनुष्याचे शोषण अशक्यप्राय होऊन जाईल. 1917 मध्ये रशियात झालेल्या समाजवादी क्रांतीचा भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांच्या वैचारिक जडणघडणीवर मोठा प्रभाव होता. या क्रांतीने संपूर्ण साम्राज्यवादी व्यवस्थेला मोठा झटका दिला. या समाजवादी क्रांतीद्वारे रशियात मनुष्याद्वारे होणारे मनुष्याचे आणि राष्ट्राद्वारे होणारे राष्ट्राचे शोषण यावर आधारित व्यवस्थेला समाप्त करून टाकले. भगतसिंह यांनी म्हंटले होते की त्यांना गोरे इंग्रज जाऊन भुऱ्या इंग्रजांची सत्ता नको आहे म्हणजेच त्यांना लॉर्ड इरविन च्या जागी पुरुषोत्तम दास ठाकूरदास चे शोषण नको आहे.
आज यापण बघतो की खुदिराम बोस आणि त्यांचे न्याय्य वारस असलेल्या भगतसिंहादी क्रांतिकारकांना जो समाज बनणे अपेक्षित होते तो बनला नाही आहे. आज देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षासारख्या फॅसिस्ट शक्ती मजबूत झाल्या आहेत. दलितांवरील जातीय अत्याचार वाढले आहेत, अल्पसंख्याकांवरील धर्मवादी हल्ले वाढले आहेत, स्त्रियांवरील लैंगिक शोषणाच्या घटना वाढल्या आहेत, कामगार कायदे बदलून कामगार वर्गाचे जीवन नरकासमान बनवण्यात येत आहे. एकीकडे बेरोजगारीत अभूतपूर्व अशी वाढ होत असताना रेल्वे, बँकांसारखे सरकारी विभाग भांडवलदारांना विकून ज्या थोड्या बहुत सरकारी नोकऱ्या होत्या त्याही समाप्त केल्या जात आहे. आरोग्य, शिक्षण सारख्या मूलभूत गोष्टींना सुद्धा भांडवलदारांच्या सेवेत सामील केले जात आहे. आज या फॅसिस्ट शक्ति खुदिराम बोस, भगतसिंह सारख्या असंख्य क्रांतिकारकांच्या वारशाला हडपण्याचे काम करत आहेत. पाठ्यपुस्तकांमधुन क्रांतिकारकांचा इतिहास लपवला जात आहे किंवा विकृत केला जात आहे तर दुसरीकडे सावरकर सारख्या इंग्रजांची माफी मागणाऱ्या माफीविराची क्रांतिकारी असल्याची खोटी प्रतिमा निर्माण केली जाते आहे.
आज निराशेच्या या काळात खुदिराम बोस सारख्या क्रांतीकारकांना आठवणे गरजेचे आहे. खुदिराम बोस सारख्या क्रांतिकारकांनी जी क्रांतीची चेतना जागवली होती ती आज पुन्हा जिवंत करणे गरजेचे आहे. प्रतिक्रियेच्या आणि निराशेच्या या समयी पुन्हा एकदा सर्व प्रकारच्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी सर्व शक्तिनिशी मैदानात उतरणे आवश्यक आहे. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षीच खुदिराम बोस यांनी बलिदानाची सर्वोच्च पायरी गाठली होती. त्यांचा क्रांतिकारी वारसा आज जनतेसमोर घेऊन जाणे आपले परम कर्तव्य आहे.
कामगार बिगुल, सप्टेंबर 2022