हरिओम राजोरिया यांची बेरोजगारी वर कवितामाला: बेकार पोर

हरिओम राजोरिया
(अनुवाद: निश्चय)

1.

बेकार पोर
आईला घाबरत नाही
बापाला घाबरत नाही
आणि ना मरणाला
बेकारीच्या दिवसांमध्ये
सगळी भितीच मेली त्याची

2.

सिगरेटच्या भावापासून
दोस्तांच्या चेहऱ्यापर्यंत
बरंच काही बदलून गेलं
भिंतीवरून उतरलेल्या
जुन्या कॅलेंडरच्या तारखा गेल्या
पेपरच्या रद्दीसोबत
थुंकण्याशिवाय
शिल्लकच काय आहे
बेकार पोराकडे
जेव्हाकी दिवस
खूप छोटे झालेत
आणि थंड हवा
टोचतेय गालांना.

3.

बाजाराचा कोलाहल
धूळीने भरलेल्या गल्ल्यांची ओसाड शांतता
आणि आपल्या पाठीवर टिकलेल्या
गावाच्या नजरेतून वाचत
उशिरा रात्री पोहोचतो तो घरी
झोपेत बडबडणारा बाप
माहित नाही कसा ऐकतो
दारावर पडलेली थाप
बापाच्या दिनचर्येत
सामील झालीये दाराची ही हालचाल
मुंडी खाली घालून त्याचं
समोरून निघून जाणं
काही शब्दांच्या फेरफारानं
जगंच बिघडणं
आणि अरे माझ्या देवा म्हणत
पुन्हा झोपी जाणं
उखडलेल्या नखासारखी असते
बेकार पोराची रात्र.

4.

कुठून होते
स्वप्नांची सुरूवात?
स्वप्न हळू-हळू येतात
आणि मोठमोठ्या पुस्तकांपर्यंत पोहोचून
आकार घेऊ लागतात
कधी असं होतं
की बेकार पोरगा
त्याच्या बटव्यात लपवतो
शेजारच्या मुलीचं चित्र
आणि रात्री छतावर उभा होऊन
टक लावून पहातो चमकणाऱ्या इमारती
बेकार पोराची दुनिया
लिलावात विकत घेतलेल्या
कपड्यासारखी असते
जे झिजून जातं
पहिल्या धुलाईतच

5.

तागाचे कापड नसतात दिवस
की थोडी कात्री लागली आणि
चर्रsss करून कापलं जाईल
दिवसांची लढाई
साधी नसते
वेळ घालवायला
दिवस घालवावा लागतो
जिथे शत्रू असतो निराकार
आणि पहिली युद्ध-आघाडी
घरातच असते
सकाळच्या चहापासून
भाजीची ताटली फुटेपर्यंत
चालू राहतात झडपा
तरीही दिवस खपत नाही
खपतो तो बेकार पोरगा

6.

एकोणतीस वर्षांच्या वयात
आपल्या अस्तित्वाचा अर्थ
शोधतोय बेकार पोरगा
बेकार पोरासाठी
अंधाऱ्या गुहेपेक्षा
कमी नाहीत एकोणतीस वर्षं
वयाच्या या उतारावर उतरताना
एक क्षण असाही येतो
जेव्हा बेकार पोरगा
“पोरगा” म्हटलं म्हणून
उदास होतो
खूप कठिण असतं
वयाच्या शिड्या चढणं
जेव्हा प्रत्येक पायरीवर
असंच वाटतं
की आता करूच समुद्र पार.

7.

हिशोब द्या राव
कोणी खाल्ली
तुमची एकोणतीस वर्षं ?
चिमड्यांनी टोचे मारले
की एखाद्या घारीने मारली झेप
तिळा-तिळाचा नाही
पण ढोबंळ मानानं तरी
असंल ना हिशोब तुमच्याकडे
जुगार तर नाही खेळला
उधार ठेवलेत का
एखाद्या सावकाराकडे
की कोणी अल्लड मुलगी
खोसून घेऊन गेली वेणीत?
काय चूक झाली
जरा विचार करा
अशीच हिरावू शकत नाहीत
कोणी आपली एकोणतीस वर्षं

8.

हुंगून फेकून द्या फूल
चिरडून टाका फुलाला
विखरून टाका पाकळ्या
वाहवून टाका नदीच्या प्रवाहात
काही बोलत नाहीत फुलं
एकोणतीस वर्षाच्या वयात
एक दिवस अचानक
डहाळीवरून तुटलेलं फूल बनतो
बेकार पोरगा.

कामगार बिगुल, सप्टेंबर 2022