“फकिर” मोदींची ऐयाश जीवनशैली
✍निश्चय
“मी तर फकीर आहे” म्हणणाऱ्या, आणि भांडवलदारांच्या समर्थनाने त्यांच्या मीडियाचा वापर करून, जनतेसमोर खोटा प्रचार करून स्वत:ची “त्यागी”, “साधा” अशी प्रतिमा निर्माण करू पाहणाऱ्या नरेंद्र मोदींची जीवनशैली अत्यंत ऐयाशीची आहे. “मी चहा विकत होतो” असा प्रचार करून गरीबीच्या पार्श्वभूमीला लोकांच्या भावनांना हात घालण्यासाठी वापरणाऱ्या, श्रीमंत राजकारण्यांच्या विरोधात अगदी साधे असल्याचे भासवणाऱ्या, “संघ प्रचारक” म्हणून अत्यंत साधे आयुष्य जगलेलो आहे असा सतत प्रचार करणाऱ्या, तपस्या करतानाचे फोटो काढून जणूकाही देशासाठी फार मोठा आत्मत्याग चालवला आहे असे दाखवणाऱ्या, या “फकिर” माणसाच्या जीवनशैलीकडे चला नजर टाकूयात.
आधिकारिक आकड्यांनुसार मोदींना प्रधानमंत्र्याचा पगार मिळतो, जो आहे वर्षाला 33 लाख रूपये! “फकिर” व्यक्ती इतका पगार का घेत असेल बरे?
मोदी सध्या ज्या घरात राहतात, ते घर 12 एकर जमिनीवर पसरलेले आहे. हे घर त्याच भागात आहे जिथे दिल्लीतील सर्वात उच्चभ्रू लोक राहतात. इथे 50 माळी, स्वयंपाकी, ड्रायव्हर वगैरें नोकर त्यांच्या दिमतीला ठेवलेले आहेत. न्हावी, टेलर सतत दिमतीला उभे आहेत. नक्कीच संघी-भाजपाई-भक्त मंडळी म्हणतील की हा सगळा तर प्रधानमंत्र्याच्या राहण्याचा इंतजाम आहे. तसे असेल तर निश्चितपणे या देशातील सर्व प्रधानमंत्री अत्यंत अय्याशीचे आयुष्य जगत आले आहेत, आणि मोदी काही वेगळे नाहीत असेच म्हणावे लागेल. यावर भक्त मंडळी म्हणतील की प्रधानमंत्र्याच्या सुरक्षेसाठी हे सगळे आहे. सुरक्षेसाठी 50 नोकरांचा लवाजमा लागतो का, हा प्रश्न सामान्य जनतेने स्वत:ला नक्की विचारावा! आता हे घर ‘अपुरे’ होते म्हणून ‘व्हिस्टा’ प्रकल्पामध्ये यापेक्षा अधिक आलिशान घर शेकडो कोटी रुपये खर्चून उभे केले जात आहे!
33 लाख रुपये पगार!
12 एकरावरचे घर, 50 नोकर! नवीन घर तयार होत आहे! 1.5 कोटींची रोख बचत! हजारो कपडे, रोज नवी फॅशन! 8 लाखांचा फेसवॉश! खायला 80 हजारांचे मश्रूम ! 1.5 लाखांचा चश्मा! लाखो रुपयांचे घड्याळ! 350 लोकांच्या क्षमतेचे विमान! हजारो कोटींच्या जाहिराती |
मोदीच्या बाबतीत जी गोष्ट कोणाच्याही नजरेत सहज भरेल ती आहे मोदींचे कपडे! आजवर मोदींनी एक कपडा दोनदा घातला आहे की नाही असा प्रश्न निर्माण व्हावा इतके कपडे मोदी बदलतात! इंटरनेटवर, आणि सोशल मिडियावर मोदींनी बदललेल्या कपड्यांचे अनेकोनेक फोटो दिसून येतात. एकेका दिवसात तीनदा (किंवा जास्त!) वेळा कपडे बदलल्याचे फोटो अनेकदा समोर आले आहेत. मोदींच्या कपड्यांच्या खर्चाबद्दल अनेकदा माहिती अधिकारात विचारणा केली गेली आहे. मोदींची कपड्यांबद्दलची लालसा इतकी अश्लिल आहे की यांनी स्वत:चे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलेला सूट घातला होता, आणि जेव्हा प्रचंड टीका झाली तेव्हा लाजेने तो सूट 4.3 कोटी रुपयांना लिलावात विकला आणि पैसे स्वच्छ भारत मिशनला दिले. मोदी भक्त याला “दानशूरता” म्हणत आहेत, पण प्रश्न आहे की अगोदर सूट बनवून, घालून, विकून मग पैसे का दिले? मोदींच्या कपड्यांबद्दल तर विदेशी मीडीयामध्ये सुद्धा अनेक बातम्या आल्या आहेत. आता तर मोदी कुर्ता, मोदी जॅकेट अशा मोदीच्या कपड्यांच्या फॅशन सुद्धा प्रचारासाठी वापरल्या जात आहेत. तुम्ही इंटरनेटवर फक्त मोदींचे फोटो शोधा आणि हजारो प्रकारचे कपडे घातलेल्या मोदींचा अवतार स्वत:च बघा!
रोहित सभरवाल नावाच्या व्यक्तीने मोदींच्या कपड्यांची माहिती विचारली होती, तर त्याला सांगितले गेले की मोदी स्वत:च्या कपड्यांवर स्वत: खर्च करतात, तसेच हा प्रश्न वैयक्तिक स्वरूपाचा आहे आणि याबद्दल माहिती सरकारद्वारे ठेवलीच जात नाही! वैयक्तिक खर्च असेल तर गंभीर प्रश्न आहे की इतके महागडे कपडे रोज बदलायला मोदीकडे पैसे येतात कुठून? वर्षाला 33 लाख रूपयाच्या पगारातही इतके कपडे कसे शक्य आहेत? आणि 33 लाख रुपये खर्चणारा व्यक्ती फकीर आहे का? जर मोदी पगारातून खर्च करत नाही, तर मग काय मोदींचे उद्योगपती “मित्र” हे पैसे खर्च करत आहेत का? माहिती अधिकारातून समोर आलेल्या दुसऱ्या एका माहितीनुसार मोदी त्यांच्या पगाराचा मोठा हिस्सा बचत करतात आणि 2020 पर्यंत गांधीनगर येथील स्टेट बॅंकेच्या खात्यात त्यांच्या नावावर 1.60 कोटी रुपये होते. असे असेल तर पहिला प्रश्न आहे की अधिकृतरित्या ज्याच्याकडे दीड कोटी रुपये आहेत, तो “फकीर” कसा? आणि दुसरा गंभीर प्रश्न आहे की जर मोदी पगार बचतखाती टाकत आहे, तर मोदींच्या कपड्यांचा खर्च कोण करत आहे?
मोदीचा चमकदार चेहऱ्यामागचे रहस्य आहे “डायमंड फेशियल” ज्याकरिता मोदी रोज सकाळी 8 लाख रुपये खर्च करतात आणि रोज रु. 80,000 किमतीचे मशरूम खातात! मोदींच्या खाण्यावरचा खर्चही मोदी “स्वत:” करतात आणि त्यामुळे याबद्दलची माहिती देता येणार नाही असे उत्तर माहिती अधिकारामध्ये दिले गेले आहे. इथेही प्रश्न आहे की हा खर्च खरोखर कोण करत आहे? जर माहिती अधिकारात उत्तर देता येत नाही, तर मोदी बाजरीची भाकरी, खिचडी खातात, नवरात्रीमध्ये उपवास ठेवतात, साधे गुजराती अन्न खातात, अशा बातम्या ‘गोदी’ मीडिया सतत प्रसारित करत असतो, ही माहिती कुठून येते? आरोग्याच्या दृष्टीने मोदी निश्चितपणे असे ‘साधे’ पण पौष्टिक अन्नच खात असणार, पण मग मशरूम बद्दल इतकी गुप्तता का?
बव्हलगारी या अतिमहाग ब्रॅंडचे काही लाख रूपयांचे चश्मे, कधीकधी मेबीच कंपनीचे 1 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे चश्मे, मोव्हाडो या अतिमहाग कंपनीची लाखोंची घड्याळे , मॉंट ब्लॅक कंपनीचे हजारो रुपयांचे पेन मोदी वापरतात हे मोदींच्या फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसून येते. या सर्व वस्तुंच्या खर्चाचे स्त्रोत मात्र गुप्तच आहेत!
2019 च्या अगोदर दरवेळी करोडो रुपये खर्च करून विशेष विमान भाड्याने घेऊन मोदींनी जगभरात पन्नासच्या वर देशांचे दौरे केले आहेत. विदेश दौऱ्यांचा 5 वर्षाचा विमान खर्चच फक्त रु. 2,021 कोटी आहे असे समोर आले आहे. आता तर एक संपूर्ण विमान, ज्यामध्ये जवळपास 350 लोक प्रवास करू शकतात, त्याला बदलवून खास मोदींचे विमान बनवले गेले आहे. प्रधानमंत्री जेव्हा विदेश दौरे करतात तेव्हा अधिकारी वर्ग, सरकारच्या मर्जीतील पत्रकार, उद्योगपती, बॅंकांचे प्रतिनिधी, वगैरे लोकांना एकत्र अशा विमानाने नेले जाते, जेणेकरून या सर्वांच्या “बिझिनेस”ची, नफ्याची गणिते व्यवस्थितपणे रचली जावीत. पण मोदी मात्र एकटे फिरत असतानाहीएवढे मोठे विमान वापरतात. आता परत “भक्त” मंडळी म्हणतील की ही सुरक्षिततेची गरज आहे. प्रश्न तर असाही विचारला जाऊ शकतो की जनतेचा ‘लाडका’ प्रधानमंत्री एवढा असुरक्षित कसा? मोदी या विमानाने देशातही फिरतात आणि त्याकरिता किती खर्च होतो, याची आकडेवारी सरकारने ठेवलेली सुद्धा नाही! 5 बी.एम.डब्ल्यू गाड्या आणि अनेक रेंज रोव्हर गाड्यांचा ताफा तर मोदींच्या फोटोंमध्ये सतत दिसलाच आहे!
आता एवढी ऐश केल्यावर “फकिर” असल्याची प्रतिमा बनवायला जाहीरात तर करावीच लागेल ना? जनतेच्या कराच्या पैशातून फक्त मोदीची प्रतिमा निर्मिती करायला रु. 2014 ते 2018 या काळात 4,400 कोटी रुपये खर्च केले गेलेत!
ज्या देशामध्ये कोट्यवधी लोक तीन वेळचे चांगले खाऊ शकत नाहीत, जिथे अन्न-वस्त्र-निवारा सारख्या मूलभूत गरजा सुद्धा भागवल्या जात नाहीत, तिथे स्वत:ला देशाचा नेता म्हणवणाऱ्या व्यक्तीची ऐयाशीची जीवनशैली म्हणजे जनतेची उडवलेली थट्टा आहे.
मोदी एकटाच नाही! नुकताच “भारत जोडो यात्रा” काढणारा कॉंग्रेसचा ‘राजकुमार’ राहुल गांधी सुद्धा हजारो रुपयांचा टी-शर्ट घालून, आणि बरबेरी सारख्या कंपनीचे जॅकेट घालून फिरत आहे हे समोर आले आहे. तामिळनाडूची मुख्यमंत्री असलेल्या जयललिता यांनी सुद्धा कधीही एकही साडी दोनदा घातली नव्हती आणि कपाटे भरभरून बूट-चपला त्यांच्याकडे होत्या हे ज्ञात आहे. मोदींच्या विदेश दौऱ्यावर जसा खर्च होतो, तसाच खर्च अगोदरच्या प्रधानमंत्र्यांनी सुद्धा केला आहे. तसे असेल तर मोदी इतरांपेक्षा वेगळे कसे?
आणि, भांडवलदार वर्गाचे प्रतिनिधी असलेले राजकारण्यांनी ऐश केली तर आश्चर्य काय? जनतेला देशोधडीला लावून धनदांडग्यांची संपत्ती सतत वाढवण्यासाठी जे अहोरात्र मेहनत करतात, त्यांनी कमिशन खाऊन, आणि स्वत:च विविध व्यापार-उद्योगधंदे चालवून जनतेला लुटून कमावलेल्या पैशातून ऐश केली तर आपल्या वर्गाप्रती ‘प्रामाणिकपणा’च दाखवला असे म्हणावे लागेल! मोदींचे वैशिष्ट्य हे की त्यांसारखे लोकप्रतिनिधी याबाबतीत नागडेपणाने ऐयाशीचे प्रदर्शन करतात, एकीकडे असे असणे योग्य का आहे हे सुद्धा आपल्या चाहत्यांच्या एका गटाला सांगतात, असे “राजेशाही” जगले पाहिजे असा संदेशही आपल्या पाठिराख्यांच्या एका हिश्श्याला देतात, स्वत:बद्दल दरारा निर्माण करायलाही ही जीवनशैली वापरतात, आणि त्याचवेळी दुसरीकडे अत्यंत विरोधाभासी पद्धतीने स्वत:च्या ‘फकिर’ असल्याचे ढोल पिटत राजकीयदृष्ट्या अपरिपक्व जनतेला भुलावण्याचे काम जोमाने करतात! परंतु जीवनशैलीच्या बाबतीत मोदींपेक्षा जास्त धोकादायक आहेत ते राजकारणी जे साधेपणाचा आव आणतात किंवा खरोखर साधेपणाने राहतात सुद्धा, पण सेवा मात्र कामगार वर्गाची नाही तर भांडवलदार वर्गाची करतात! त्रिपुराचे सीपीएमचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार, वा बंगालच्या तृणमूलच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याच पठडीतल्या!
कामगार वर्गाने जीवनशैलीकडे कसे बघितले पाहिजे? कामगार वर्ग ऐयाशीची, गरजेपेक्षा जास्त खर्चाची, वाया घालवण्याची, उधळपट्टीची घृणा करतो आणि सोबतच तो घृणा करतो साधेपणाच्या दिखाव्याची सुद्धा! कामगार वर्गीय राजकारणी काटकसरीचे तत्व अंगिकारतो आणि त्याच्या नियोजित कामाच्या, जीवनस्थितीच्या गरजेनुसार जीवनशैली ठेवतो आणि “सर्वसंगपरित्यागा”लाही विरोध करत तो प्रत्येक बाबतीत कमीत कमी खर्चात जीवन जगण्याचा, प्रत्येक खर्च कमी करण्याचा, जनतेचा पैसा-न-पैसा वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. एक कामगार वर्गीय नेता एका कुशल कामगाराच्या जीवनखर्चापेक्षा जास्त वैयक्तिक उत्पन्न घेत नाही. व्यक्तीच्या जीवनशैलीचा मुद्दा अंतिमत: त्याच्या राजकारणाशी जोडलेला असतो. ऐयाशी करणे आणि साधेपणाचा दिखावा करणे या भांडवली राजकारणाच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. मोदी-ममता-राहुल-माणिक यांसारख्या राजकारण्यांच्या जीवनशैलीपेक्षाही जास्त धोकादायक आहे ते त्यांचे राजकारण, त्यांचा वर्गपक्ष, त्यांची भांडवलदारांप्रती बांधिलकी आणि कामगार वर्गाप्रती गद्दारी, त्यांनी घेतलेले निर्णय आणि बनवलेले कायदे जे कामगार-कष्टकऱ्यांच्या जीवनावर हल्ला करतात! या राजकारण्यांच्या जीवनशैलीचे ढोंग उघड करत असताना, आपला खरा शत्रू त्यांचे भांडवली राजकारण आहे हे विसरता कामा नये.
कामगार बिगुल, ऑक्टोबर 2022
“फकीर मोदींची ऐयाश जीवनशैली” या लेखातून अधिकृत आकड्यासहित दिलेल्या माहितीबद्दल लेखकाचे मनःपूर्वक आभार.
एक वाचक आणि देशाचा एक अगतिक नागरिक म्हणून पंतप्रधानांच्या अश्या ऐयाशीला रोख लावण्यासाठी सामान्य नागरिक थेट काय करू शकतो ह्याविषयी लेखक काही सूचना करू शकतील का ? माझी एक सूचना आहे कि जर सामान्य नागरिक म्हणून थेट काही करता येण्यासारखे नसेल तर मग लेखाकाने थोडा अधिक वेळ खर्च करून प्रत्येक पंतप्रधानाने आजवर जी काही ऐयाशी केली त्या बदल्यात देशाला काय दिले याचा एक तुलनाआत्मक अभ्यास वाचकांसमोर ठेवावा. त्यामुळे मोदी भक्तांचा जो एक भ्रम आहे कि मोदींनी पंतप्रधान म्हणून आजवरच्या इतर पंतप्रधानांच्या कामगिरीच्या तुलनेत देशाचा सर्वात जास्त फायदा करून दिला आहे, तो एक तर दूर होईल अथवा मोदी विरोधकांना योग्य माहिती मिळेल.
करदाता सामान्य नागरिक म्हणून शेवटी ह्यातच समाधान मानू शकतो कि आम्ही सरकारला दिलेल्या कररूपी पैशातून देशाला आणि परिणामी व्यक्तिगत नागरिकाला काय फायदा मिळाला.